::: आ दे श :::
( पारीत दिनांक :24.06.2016 )
आदरणीय सदस्या श्रीमती भारती केतकर, यांचे अनुसार
सदर तक्रार ग्राहक संरक्षण कायदा 1986 चे, कलम : 12 अन्वये, दाखल करण्यात आली असून थोडक्यात खालील प्रमाणे आहे.
तक्रारकर्त्याने विरुध्दपक्ष क्र. 1 कडून सॅमसंग कंपनीचा ए.सी. मॉडेल क्र.AR18HC5USV, एस.आर.क्र. 401BPPB400263, किंमत रु. 36,500/-, बजाज अलायन्स कंपनीकडून फायनान्स घेऊन, विकत घेतला. सदर ए.सी. तक्रारकर्त्यने दि.9/6/2015 रोजी त्याचे घरी लावला, मात्र सदर ए.सी. चालला नाही. या बाबतची माहीती विरुध्दपक्ष क्र. 1 यांना दिली असता त्यांनी कारागीराला तक्रारकर्त्याच्या घरी पाठविले व त्याने सांगितले की, या ठिकाणी होल्टेज कमी पडतो. कारागिराच्या सांगण्यावरुन तक्रारकर्त्याने होल्टेजसाठी व्होलटास रु. 5000/- किंमतीचे विकत आणले. त्यानंतर तक्रारकर्त्याने सदर ए.सी. चोहट्टा येथील भाड्याच्या घरात लावला, मात्र या ठिकाणी सुध्दा ए.सी. सुरु झाला नाही. या बाबत विरुध्दपक्ष क्र. 1 ला सांगितले असता त्यांनी कारागिर पाठविला व त्याने सांगितले की, सदर ए.सी.चा वायर जळला आहे, त्यामुळे रु. 2000/- खर्च करुन तक्रारकर्त्याने कारागिराकडून सदर दुरुस्ती केली, त्यानंतर फक्त दोन दिवस ए.सी. चालला व पुन्हा बंद पडला. या बाबत पुन्हा विरुध्दपक्ष क्र. 1 कडे तक्रार केली असता, त्यांनी या वेळी उडवाउडवीची उत्तरे दिली. त्यामुळे दि. 24/8/2015 रोजी तक्रारकर्त्याने विरुध्दपक्ष क्र. 1 व 2 यांना नोटीस देऊन सदर ए.सी. बदलवून देण्याची व नुकसान भरपाई देण्याची विनंती केली, परंतु त्याची दखल विरुध्दपक्षांनी घेतली नाही. अशा प्रकारे विरुध्दपक्षांनी सेवेत न्युनता दर्शविली आहे. तक्रारकर्त्याने सदर तक्रार मंचासमक्ष दाखल करुन विनंती केली आहे की, तक्रारकर्त्याची तक्रार मंजुर करण्यात यावी व विरुध्दपक्षांनी सदर ए.सी.बदलून द्यावा किंवा ए.सी.ची किंमत रु. 36,500/- व्याजासह द्यावी. शारीरिक, मानसिक व आर्थिक नुकसान भरपाईपोटी रु. 50,000/- द्यावे.
सदर तक्रार शपथेवर दाखल असून त्यासोबत एकंदर 06 दस्तऐवज पुरावे म्हणून जोडण्यात आले आहेत.
विरुध्दपक्ष क्र. 1 यांचा लेखीजवाब :-
2. विरुध्दपक्ष क्र. 1 यांनी सदर प्रकरणात लेखी जबाब दाखल केला नाही, त्यामुळे सदर प्रकरण विरुध्दपक्ष क्र. 1 च्या लेखी जबाबाशिवाय पुढे चालविण्याचा आदेश मंचाने पारीत केला.
विरुध्दपक्ष क्र. 2 यांचा लेखीजवाब :-
विरुध्दपक्ष क्र. 2 यांनी त्यांचा लेखी जबाब दाखल केला. त्यानुसार त्यांनी तक्रारीतील आरोप नाकबुल करुन असे नमुद केले की, विरुध्दपक्ष क्र. 2 ही एक नावाजलेली विश्वसनिय कंपनी आहे. तक्रारकर्त्याने विरुध्दपक्ष क्र. 2 निर्मित ए.सी. खरेदी केला. सदर ए.सी. सुरु करण्याकरिता अधिक व्होलटेजची आवश्यकता असते. तक्रारकर्त्याचे घरी आवश्यक तेवढा व्होल्टेज मिळत नव्हता, त्यामुळे सदरहू ए.सी. सुरु झाला नाही. तक्रारकर्त्याने विरुध्दपक्ष क्र. 2 च्या अधिकृत इंजिनिअर्स यांचेशी संपर्क न साधता लोकल इलेक्ट्रीशियन कडून सदरहू ए.सी. उघडला. कंपनीच्या वारंटीनुसार सदर ए.सी. कंपनीच्या इंजिनिअरद्वारे दुरुस्त करणे अनिवार्य आहे अन्यथा ग्राहक कुठल्याही गॅरंटी, वारंटी काळामध्ये मिळणाऱ्या सुविधांना अपात्र ठरतो. तक्रारकर्त्याने ज्या ठिकाणी ए.सी. लावला होता, ती खोली कौलारु असल्याने ती खोली आवश्यक तेवढी वातानुकुलीत होत नव्हती. तक्रारकर्त्याच्या घरी आवश्यक होल्टेज नसल्यामुळे सदर ए.सी. त्याच्या मानकानुसार कार्य करीत नव्हता. तक्रारकर्त्याने लोकल इलेक्ट्रीशियनद्वारे सदर ए.सी. उघडल्याने सदरहू ए.सी. हा गॅरंटी/वॉरंटीच्या हद्दीबाहेर होतो. त्यामुळे तक्रारकर्त्याचा सदर अर्ज हा पुर्णत: बेकायदेशिर असून, तक्रारकर्त्याने विनाकारण सदर तक्रार दाखल केलेली आहे व त्यामुळे सदर तक्रार खर्चासहीत खारीज करण्यात यावी.
3. त्यानंतर तक्रारकर्त्याने प्रतिजबाब व लेखी युक्तीवाद दाखल केला,
::: का र णे व नि ष्क र्ष :::
4. सदर प्रकरणात विरुध्दपक्ष क्र. 1व 2 यांचेतर्फे श्री डी.एस. काकड प्रतिनिधी म्हणून हजर झाले. नोटीस प्राप्त झाल्यावर विरुध्दपक्ष क्र. 1 श्री काकड यांच्यासह दि. 16/12/2015 रोजी मंचासमोर हजर झाले व त्यांच्यावतीने त्यांच्या वकीलांनी म्हणजे श्री काकड यांनी मेमो ऑफ अपिअरन्स दाखल करुन जबाबासाठी वेळ मागीतला. परंतु दि. 12/2/2016 रोजी संबंधीत वकीलांनी मंचासमोर “No instruction pursis” दाखल केली. विरुध्दपक्ष क्र. 1 यांना सदर प्रकरणाची माहीती असूनही त्यांनी स्वत: वेळेत जबाब दाखल न केल्याने सदर प्रकरण त्यांच्या विरुध्द विना जबाब चालवण्याचा आदेश दि. 25/4/2016 रोजी पारीत करण्यात आला.
विरुध्दपक्ष क्र. 2 यांचेतर्फे श्री काकड यांनी दि. 5/1/2016 रोजी वकीलपत्र दाखल करुन दि. 12/2/2016 रोजी लेखी जबाब दाखल केला. परंतु दि. 22/3/2016 रोजी विरुध्दपक्ष क्र. 2 च्या वकीलांनी पुरसीस दाखल करुन, सदर प्रकरणात विरुध्दपक्ष क्र. 2 च्या वतीने वकील म्हणून मंचामसोर हजर राहू शकत नसल्याचे कळविले. तसेच दि. 25/4/2016 रोजी पुन्हा अर्ज करुन विरुध्दपक्ष क्र. 2 ला, त्यांचे वकील म्हणून काम करीत नसल्याचे कळवणारा ई-मेल मंचासमोर दाखल केला.
सबब, या प्रकरणात विरुध्दपक्ष क्र.. 2 चा फक्त लेखी जबाब दाखल असून विरुध्दपक्ष क्र. 1 चा जबाब, दोन्ही विरुध्दपक्षाचा युक्तीवाद तसेच पुरावा मंचासमोर हजर नसल्याने, केवळ तक्रारकर्त्याची तक्रार, लेखी युक्तीवाद व पुराव्याचे दस्त, तसेच विरुध्दपक्ष क्र. 2 चा जबाब यांच्याच आधारे सदर प्रकरणात अंतीम आदेश पारीत करण्यात आला.
- दस्त क्र. 4, पृष्ठ क्र. 12 वरील खरेदी पावतीवरुन तक्रारकर्ता हा विरुध्दपक्ष क्र. 1 व 2 यांचा ग्राहक असल्याचे सिध्द होत असल्याने, तक्रारकर्ता हा विरुध्दपक्ष क्र. 1 व 2 यांचा ग्राहक असल्याचे मंचाने ग्राह्य धरले आहे.
- तक्रारकर्त्याच्या तक्रारीनुसार तक्रारकर्त्याने सुर्यवंश इलेक्ट्रॉनिक्स, प्रोप्रा. संतोष महादेव हिरपुरकर, अकोट यांच्याकडून दि. 9/6/2015 रोजी सॅमसंग कंपनीचा ए.सी. रु. 36,500/- ला विकत घेतला. सदर ए.सी. तक्रारकर्त्याने स्वत:च्या घरी लावला असता, ए.सी. अजीबात चालला नाही, म्हणून तक्रारकर्त्याने विरुध्दपक्ष क्र. 1 शी संपर्क साधला असता, विरुध्दपक्ष क्र. 1 ने त्यांचे कारागिर तक्रारकर्त्याच्या तरोडा येथील घरी पाठविले. सदर ए.सी. ला व्होल्टेज कमी पडत असल्याने कारागिराकडून कळले असता, त्यांच्या सांगण्यावरुन तक्रारकर्त्याने पुरोहीत इलेक्ट्रॉनिक्स येथून रु. 5000/- किंमतीचे व्होलटास विकत आणले. त्यानंतर तक्रारकर्ता त्याच्या व्यवसायानिमित्य चोहट्टा येथे राहवयास गेल्यावर सदर ए.सी. तेथील भाड्याने घेतलेल्या घरात लावला, तेथे ए.सी. सुरु झाला नाही. तक्रारकर्त्याने पुन्हा विरुध्दपक्ष क्र. 1 शी संपर्क साधला असता, पुन्हा त्यांचे 2 कारागीर तक्रारकर्त्याकडे गेले व सदर ए.सी.चा वायर जळाल्याचे तक्रारकर्त्याला सांगुन त्यासाठी रु. 2000/- चा खर्च येईल, असे सांगितले. तक्रारकर्त्याने रु. 2000/- खर्च करुन नवीन वायर बसविली, पण पुन्हा 2 दिवसांनी ए.सी. बंद पडला. त्यामुळे तक्रारकर्त्याने पुन्हा विरुध्दपक्ष क्र. 1 शी संपर्क साधला असता़ विरुध्दपक्ष क्र. 1 ने तक्रारकर्त्याच्या तक्रारीची दखल घेतली नाही. त्यानंतर तक्रारकर्त्याने विरुध्दपक्ष क्र. 1 ला नोटीस पाठविली, पण विरुध्दपक्ष क्र. 1 ने त्या नोटीसला उत्तर दिले नाही. म्हणून तक्रारकर्त्याने सदर प्रकरण मंचासमोर दाखल केले.
- विरुध्दपक्ष क्र. 2 ने त्यांच्या जबाबात असे नमुद केले आहे की, सदर ए.सी. सुरु होण्याकरिता आवश्यक असलेले व्होल्टेज तक्रारकर्त्याच्या घरी नसल्याने सदर ए.सी. सुरु झाला नाही. तक्रारकर्त्याने विरुध्दपक्ष क्र. 2 च्या अधिकृत इंजिनिअर्स यांचेशी संपर्क न साधता लेाकल इलेक्ट्रीशियन्स कडून सदर ए.सी. उघडला. कंपनीच्या वॉरंटीनुसार कंपनीचा ए.सी. कंपनीच्याच इंजिनिअरकडून दुरुस्त करुन घेणे आवश्यक आहे. अन्यथा ग्राहक गॅरंटी / वॉरंटी काळात मिळणाऱ्या सुविधांना अपात्र ठरतो. तसेच तक्रारकर्त्याचे घर कौलारु असून खिडक्याही पुर्णत: बंदीस्त नसल्याने खोली आवश्यक तेवढी वातानुकुलीत होत नव्हती. तसेच तक्रारकर्त्याने कंपनीच्या इंजिनिअर्स यांचे व्यतिरिक्त दुसऱ्या लोकल इलेक्ट्रीशियकडून दरुस्ती करिता ए.सी. उघडल्याने कंपनी सदर ए.सी.ची पुढील कुठलीही गॅरंटी/ वॉरंटी घेत नाही.
- तक्रारकर्त्याची तक्रार व विरुध्दपक्ष क्र. 2 चा जबाब वाचल्यावर मंचाने इतर दस्तांचे बारकाईने अवलेाकन केले. त्यावरुन तक्रारकर्ता सदर राहत असलेले भाड्याचे घर हे स्लॅबचे असल्याचे दिसून येते. पृष्ठ क्र.36 व 37 ) तसेच तक्रारकर्त्याने व्होल्टेजची कमतरता भरुन काढण्याकरिता व्होलटास मशिनचा वापर केल्याचे विरुध्दपक्षाने त्यांच्या जबाबात मान्य केले. तक्रारकर्त्याच्या तक्रारीतील मजकुरावरुन ए.सी. मध्ये उद्भवणाऱ्या तक्रारी दुर करण्यासाठी दरवेळा विरुध्दपक्ष क्र. 1 ने त्यांचेकडील कारागिर पाठवल्याचे दिसून येते. परंतु विरुध्दपक्ष क्र. 2 च्या म्हणण्यानुसार तक्रारकर्त्याने कंपनीच्या इंजिनिअर्स व्यतिरिक्त स्थानिक, अप्रशिक्षीत इलेक्ट्रीशियन्स कडून ए.सी. दुरुस्तीसाठी उघडला. परंतु सदर आक्षेप सिध्द करण्यासाठी कुठलाही ठोस पुरावा विरुध्दपक्ष क्र. 2 मंचासमोर दाखल केलेला नाही. तक्रारकर्त्याने त्याच्या तक्रारीत व विरुध्दपक्ष् क्र. 1 ला पाठविलेल्या नोटीस मध्येही विरुध्दपक्ष क्र. 1 ने कारागिर पाठविल्याचे व त्यांच्या सांगण्यावरुन खर्च करुनही ए.सी. व्यवस्थीत काम करीत नसल्याचे व तक्रारकर्त्याने पुन्हा बोलावल्यावर विरुध्दपक्ष क्र. 1 ने त्यांचे कारागीर पाठविले नसल्याचे नमुद केले आहे. विरुध्दपक्ष क्र. 1 ने मंचात या प्रकरणात जबाब दाखल न केल्याने विरुध्दपक्ष क्र. 2 च्या आक्षेपाला दुजोरा मिळालेला नाही व सदर आक्षेप विरुध्दपक्ष क्र. 2 पुराव्यासह सिध्द न करु शकल्याने मंच, विरुध्दपक्ष क्र. 2 चा, स्थानिक अप्रशिक्षीत इलेक्ट्रीशियन्स कडून तक्रारकर्त्याने ए.सी. दुरुस्तीसाठी उघडला, हा आक्षेप ग्राह्य धरु शकत नाही.
या उलट, तक्रारकर्त्याने ए.सी व्यवस्थीत चालावा, यासाठी विरुध्दपक्ष क्र. 1 च्या कारागीरांच्या निर्देशानुसार खर्च केल्याचे दिसून येते व तक्रारकर्त्याचा ए.सी. मध्ये वॉरंटी कालावधीत वारंवार तक्रारी उद्भवत असल्याचे तक्रारीवरुन दिसून येते. परंतु तक्रारकर्त्याच्या म्हणण्यानुसार सदर ए.सी. विकत घेण्यासाठी तक्रारकर्त्याने बजाज फायनान्स कडून कर्ज घेतले होते, हे कुठल्याही दस्त,पुराव्याचे आधारे सिध्द केले नसल्याने, सदर कर्जावरील व्याजाच्या मागणीचा विचार मंचाला करता येणार नाही.
सदर तक्रारीचा दाखल दस्तांसह विचार केल्यावर तक्रारकर्त्याच्या तक्रारीत मंचाला तथ्य आढळल्याने तक्रारकर्ता हा विरुध्दपक्ष क्र. 1 व 2 यांचेकडून नविन सॅमसंग कंपनीचा ए.सी. अथवा त्याची संपुर्ण किंमत रु. 36,500/- विकत घेतलेल्या तारखेपासून देय तारखेपर्यंत द.सा.द.शे. 9 टक्के दराने व्याजासह मिळण्यास पात्र आहे. तसेच मानसिक, शारीरिक व आर्थिक नुकसान भरपाईपोटी रु. 5000/- व प्रकरणाच्या खर्चापोटी रु. 3000/- विरुध्दपक्ष क्र. 1व 2 कडून वैयक्तीक व संयुक्तीकपणे मिळण्यास तक्रारकर्ता पात्र असल्याच्या निष्कर्षाप्रत सदर मंच आले असल्याने खालील प्रमाणे आदेश पारीत करण्यात येत आहे.
- तक्रारकर्त्याची तक्रार अंशत: मंजुर करण्यात येत आहे
- विरुध्दपक्ष क्र. 1 व 2 यांनी वैयक्तीक व संयुक्तीकपणे तक्रारकर्त्याच्या इच्छेप्रमाणे, तक्रारकर्त्याला मुळ ए.सी.च्या मॉडेलचा नविन सॅमसंग कंपनीचा ए.सी. बदलून द्यावा, अथवा त्यांची संपुर्ण किंमत रु. 36,500/- विकत घेतलेल्या तारखेपासून म्हणजे दि. 9/6/2015 पासून प्रत्यक्ष रक्कम देईपर्यंत द.सा.द.शे. 9 टक्के दराने व्याजासह द्यावी.
- विरुध्दपक्ष क. 1 व 2 यांनी वैयक्तीक व संयुक्तीपणे तक्रारकर्त्याला शारीरिक, मानसिक व आर्थिक नुकसान भरपाईपोटी रु. 5000/- ( रुपये पांच हजार ) व प्रकरणाच्या खर्चापोटी रु. 3000/- ( रुपये तिन हजार ) द्यावे.
- उपरोक्त आदेशाची पुर्तता, निकालाची प्रत मिळाल्यापासून 45 दिवसाच्या आंत विरुध्दपक्षांनी करावी.
सदर आदेशाच्या प्रती उभयपक्षांना नि:शुल्क देण्यात याव्या.