घोषित द्वारा – श्रीमती अंजली देशमुख, अध्यक्ष-- तक्रारदाराची थोडक्यात तक्रार खालीलप्रमाणे आहे. तक्रारदारानी गैरअर्जदार अड सुर्यकांतराव देशपांडे यांना वडिलोपार्जीत शेतीसंबंधी दिवाणी व फौजदारी गुन्हे दाखल करण्यासाठी रु 41,000/- दिले होते. ही रक्कम घेऊनही गैरअर्जदारानी कोणतेही काम केले नाही. म्हणून तक्रारदारानी ही रक्कम मागितली व अनेकवेळा पाठपुरावा केल्यानंतर दिनांक 10/1/2010 रोजी रु 20,000/- चा चेक दिला परंतु राहिलेली रक्कम रु 21,000/- दिले नाहीत म्हणून सदरील तक्रार. तक्रारदार गैरअर्जदाराकडून एकूण रु 41,000/- व्याजदराने मागतात. तक्रारदाराने शपथपत्र आणि कागदपत्रे दाखल केली आहेत. गैरअर्जदारानी त्यांच्या लेखी जवाबाद्वारे तक्रारदाराच्या मागणीस विरोध दर्शविला आहे. तक्रारदार म्हणतात त्याप्रमाणे त्यांची आणि गैरअर्जदाराची 40 ते 45 वर्षापासून ओळख आहे. शेतीवादाच्या अनेक कामामध्ये गैरअर्जदारानी तयांना कायदेशिर सल्ला दिला होता. त्यासाठी तक्रारदारानी त्यांना फिस सुध्दा दिलेली आहे व अनेक वेळा दिलेली सुध्दा नाही. तक्रारदाराना गट क्रमांक 93/1 मधील उत्तरेकडील 15 एकर हिस्सा कोर्टाच्या आदेशानुसार दिनांक 26/4/1956 प्रमाणे मिळालेला आहे परंतु जानेवारी 2009 पासून सातबाराच्या रेकॉर्डवर फेरफाराप्रमाणे 47 चा आधारे तक्रारदाराच्या हिस्सात फक्त 87 आर एवढीच जमिन शिल्लक राहिलेली आहे व त्याच संदर्भात तक्रारदार कोर्टामध्ये केस दाखल करण्यासाठी गैरअर्जदाराकडे आलेले होते. या संदर्भातील जमिनीतील आणि खरेदी खताच्या नकला केस तयार करण्यासाठी लागतील म्हणून गैरअर्जदाराने तक्रारदारास सांगितले असता तक्रारदारास ते शक्य नसल्याचे व गैरअर्जदारानीच ते काढून घेतल्यास बरे पडेल असे तक्रारदारानी त्यांना सांगितले. त्या नकला काढल्यानंतर फौजदारी व दिवाणी दावे दाखल करावेत असेही गैरअर्जदारांना सांगण्यात आले होते. यासाठी तक्रारदारानी त्यांना दिनांक 18/3/2009 रोजी रु 21,000/- व दिनांक 24/9/2009 रोजी रु 20,000/- चेकने दिले होते. या कामासाठी गैरअर्जदार यांनी औरंगाबादहून भोकरदन, उमरखेड, राजूर येथे जाऊन कागदपत्रे जमा केली. तक्रारदाराचे यासर्व ठिकाणच्या जमिनीचे वाद मा. उच्च न्यायालयामध्ये 19 वर्षापासून प्रलंबीत आहेत त्याचा आजही निकाल लागलेला नाही. ही बाब गैरअर्जदाराने तक्रारदाराच्या निदर्शनास आणून दिल्यानंतर त्यांनी दाखल करावयाच्या दिवाणी आणि फौजदारी खटल्यात सुध्दा तोच वेळ लागेल असे तक्रारदाराचे मत झाले त्यामुळे तक्रारदारास कुठलाही फौजदारी व दिवाणी खटला दाखल करावयाचा नाही असे सांगितले. त्यामुळे गैरअर्जदाराने तकारदाराचा दावा दाखल केला नाही. त्यानंतर दिनांक 10/1/2010 रोजी तक्रारदार त्यांच्या कार्यालयात आले . गैरअर्जदारानी तक्रारदाराच्या जमिनी बाबतचे जमा केलेले सर्व कागदपत्रे व त्यावर झालेला सर्व खर्च व योग्य तो मोबदला घेऊन त्यांना उर्वरीत रक्कम परत करावी अशी मागणी केली. तक्रारदारास रकमेची अत्यंत गरज असल्यामुळे त्या दिवशीच रकमेची त्यांनी मागणी केली. तक्रारदार आणि गैरअर्जदारामध्ये मित्रत्वाचे नाते असल्यामुळे गैरअर्जदारानी त्यांना रु 40,000/- व सर्व कागदपत्रे परत केले. त्या दिवशी गैरअर्जदाराकडे फक्त रु 20,000/- रोख होते म्हणून रोख रु 20,000/- आणि 20,000/- चा चेक त्यांना दिला. त्या संदर्भात तक्रारदाराने गैरअर्जदारास रक्कम व कागदपत्रे मिळाल्याची पावती लिहून दिली. त्यानंतर पुन्हा तक्रारदार 15 दिवसांनी गैरअर्जदाराकडे आले आणि त्या पावतीची मागणी केली. परंतु ती पावती सापडत नव्हती व सापडल्यानंतर देऊ असे सांगितले. असे असतानाही गैरअर्जदाराच्या विरुध्द ही तक्रार दाखल केली आहे. वरील सर्व कारणावरुन तक्रारदाराची तक्रार नामंजूर करावी अशी मागणी ते करतात. गैरअर्जदारानी त्यांच्या लेखी जवाबात त्यांचे स्वत:चे शपथपत्र आणि पावती तसेच रक्कम आणि कागदपत्रे ज्या दिवशी दिली त्या दिवशी असलेले साक्षीदार लियाकत अली शौकत अली खान आणि रमेश मधुकर कुलकर्णी यांचे शपथपत्र दाखल केले आहेत. दोन्हीही पक्षकारांनी दाखल केलेल्या कागदपत्रांची मंचाने पाहणी केली. तक्रारदारानी त्यांच्या दिवाणी व फौजदारी खटल्याससाठी म्हणून गैरअर्जदारास रु 40,000/- तसेच कागदपत्रे दावा दाखल करण्यासाठी दिले होते. त्यानंतर त्यांचा दावा दाखल करण्याचा विचार बदलला म्हणून तक्रारदारानी गैरअर्जदाराकडून या संदर्भात त्यांची असलेली फीस आणि कागदपत्रे त्यांना परत मागितली. गैरअर्जदारानी तक्रारदारास त्यांचे कागदपत्रे परत दिली तसेच रु 20,000/- चा चेक आणि रु 20,000/- रोख दिल्याचे गैरअर्जदार म्हणतात. तक्रारदार त्यांचे कागदपत्रे व रु 20,000/- चा चेक मिळाल्याचे मान्य करतात. परंतु त्यांना रु 20,000/-रोख मिळाल्याचे ते अमान्य करतात. गैरअर्जदारानी त्या संदर्भात दिनांक 10/1/2010 ची पावती दाखल केलेली आहे परंतु ती पावती तक्रारदारास मान्य नाही , त्यावरील त्यांची सही मान्य आहे परंतु गैरअर्जदारानी अनेक को-या कागदपत्रावर खटले दाखल करण्यासाठी म्हणून त्यांच्या सहया घेतलेल्या होत्या. त्याचा गैरवापर करुन गैरअर्जदारानी ही पावती बनविल्याचे ते म्हणतात. गैरअर्जदारानी साक्षीदार लियाकत अली शौकत अली खान आणि रमेश मधुकर कुलकर्णी यांचे शपथपत्र दाखल केले आहेत. त्यामुळे त्या पावतीस दुजोरा मिळतो. तक्रारदाराने त्यांना रक्कम मिळाली नसल्याचे त्यांनी कुठल्याही दुस-या कागदोपत्री पुराव्याने सिध्द केलेले नाही. या प्रकरणामध्ये दावा दाखल करण्यासाठी आणि कागदपत्रे जमा करण्यासाठी किती फीस ठरलेली होती याबद्दलचा कुठलाही पुरावा दोन्हीही बाजुंनी दाखल करण्यात आलेला नाही. गैरअर्जदार म्हणतात त्याप्रमाणे त्यांनी जे कागदपत्रे जमा करावयाचे काम केलेले आहे त्यासाठी काही फीस घेतलेली असावी आणि तक्रारदार खटला दाखल करण्यास इच्छुक नसल्यामुळे फीस परतही केलेली आहे हे दिसून येते. पुराव्याअभावी तक्रारदाराची तक्रार नामंजूर करण्यात येत आहे. वरील विवेचनावरुन व कागदपत्रावरुन मंच खालीलप्रमाणे आदेश देत आहे. आदेश तक्रारदाराची तक्रार नामंजूर करण्यात येत आहे. (श्रीमती ज्योती पत्की) (श्रीमती रेखा कापडिया) (श्रीमती अंजली देशमुख) सदस्य सदस्य अध्यक्ष युएनके
| [ Smt.Rekha Kapadiya] MEMBER[ Smt. Anjali L. Deshmukh] PRESIDENT[ Smt.Jyoti H.Patki] MEMBER | |