तक्रारदारातर्फे :- वकील -अँड. आर एस पोकळे.
सामनेवाले :- स्वत:
निकालपत्र
तक्रारदार यांनी प्रस्तुतची तक्रार ही ग्राहक संरक्षण कायदा 1986 चे कलम 12 प्रमाणे सामनेवाले विरुध्द दाखल केली आहे.
तक्रारदाराच्या डाव्या पायाला गँगरीन झाल्यामुळे डॉ. मोडक यांनी त्यास ऑपरेशन करण्याचा सल्ला दिला. तारीख 18/4/2009 रोजी तक्रारदार डॉ.मोडक यांच्या दवाखान्यात भरती होवून 18 दिवस उपचार घेतले. त्यानुसार डॉक्टरांनी डाव्या पायाचे ऑपरेशन करुन तक्रारदाराचा डावा पाय गुडघ्यापासून काढून टाकला.
तक्रारदारास नंतर डॉ. मोडक यांनी डॉ. सारंग यांच्याकडे रेफर करुन कशा प्रकारचा ‘डायनॅमिक सॅच फुट’ घ्यायला पाहिजे, या विषयी डॉ. सारंग यांनी सल्ला दिला व सदरील पायाची किंमत रु. 55,000/- आहे, असे सांगितले. तक्रारदारास खात्री दिली की, हा पाय वापरुन तक्रारदार हा 15 दिवसात व्यवस्थीत चालू शकेल.
डॉ. सारंग यांनी दिलेल्या सल्याप्रमाणे तारीख 02/05/2009 रोजी डॉ. सुर्यकांत के. सावंत यांच्याकडून कृत्रिम पाय खरेदी केला, ज्याची किंमत रु. 55,000/- होती.
सदरचा पाय डॉक्टराच्या सल्ल्याप्रमाणे वापरला, परंतू तक्रारदार सदरील कृत्रिम पाय नीट वापरु शकत नव्हते, सदरील पाय वापरतांना तक्रारदारांना खुप त्रास होत असे. याबाबत सामनेवालेंना तक्रारदाराने वेळोवेळी सांगूनही त्यांनी त्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले व कृत्रिम पाय बदलून दिली नाही.
कृत्रिम पाय वापरण्याच्या सुरुवातीपासून डॉक्टरांच्य सल्ल्याप्रमाणे तो वापरला होता परंतू तक्रारदाराचे असे लक्षात आले की, सदरील कृत्रिम पायास वापरलेले साहित्य हे निकृष्ट दर्जाचे आहे. त्यामुळे तक्रारदाराने तो पाय वापरला नाही व तक्रारदारास दुसरा कृत्रिम पाय विकत घ्यावा लागला.
तक्रारदाराने सामनेवालेंना सदरील पाय बदलून देण्यास किंवा त्याचे रु.55,000/- परत करण्यास विनंती केली. परंतू सामनेवालेंनी कसल्याही प्रकारची दखल घेतली नाही व पैसेही परत केले नाही. तारीख 09/02/2010 रोजी तक्रारदाराने वकिलामार्फत सामनेवालेंना नोटीस पाठवली. सदर नोटीसला सामनेवाले यांनी तारीख 25/02/2010 रोजी खोटे उत्तर दिले.
सामनेवालेच्या कृत्यामुळे तक्रारदारास शारिरीक, आर्थिक व मानसिक त्रास झाला. त्यामुळे तक्रारदार खालील प्रमाणे नुकसान भरपाई मिळण्यास पात्र आहे.
अ. कृत्रिम पायाची किंमत. रु. 55,000/-
ब. कृत्रिम पाय बदलून मिळणेसाठी वारंवार येण्या-जाण्याचा
प्रवास खर्च व इतर खर्च. रु. 20,000/-
क. शारिरीक व मानसिक त्रासाबद्दल रु. 30,000/-
ड. नोटीसचा खर्च. रु. 1,000/-
इ. प्रस्तुत तक्रारीचा खर्च. रु. 5,000/-
एकूण :- रु. 1,11,000/-
सामनेवालेंनी कृत्रिम पाय देतांना त्यात त्रुटी ठेवल्यामुळे तो वापरण्यास गैरसोईचा असल्यामुळे तसेच त्याचे साहित्य उच्च प्रतीचे नसल्यामुळे तो पाय तक्रारदारास वापरता आला नाही.
विनंती की, वर नमूद केल्याप्रमाणे तक्रारदारांना नुकसान भरपाईची रक्कम रु. 1,00,000/- देण्याबाबत आदेश व्हावा.
सामनेवालेंनी त्यांचा खुलासा निशाणी-6 तारीख 06/10/2010 रोजी दाखल केला. खुलाशात तक्रारीतील सर्व आक्षेप नाकारलेले आहेत. तक्रारदार हे न्याय मंचात स्वच्छ हाताने आलेला नाही. त्याने खरी माहिती लपवून ठेवलेली आहे.
तक्रारीस कोणतेही कारण घडलेले नाही. केवळ सामनेवालेंना त्रास देण्याच्या उद्देशाने सदरची तक्रार दाखल केलेली आहे, ती खर्चासह रद्द व्हावी. तक्रारदार आणि सामनेवाले यांच्यात ग्राहक संबंध नाहीत. सामनेवालेंनी तक्रारदारांना दयावयाच्या सेवेत कोणताही कसूर केलेला नाही. सामनेवाले हे त्या विषयातील तज्ञ आहेत व त्यांनी योग्य प्रकारचा पाय तक्रारदारांना तयार करुन दिलेला आहे. सदरच्या कृत्रिम पायाबाबत तक्रारदारांना 15 दिवस त्याबाबतची माहिती व प्रशिक्षण दिलेले आहे व त्यानंतर तक्रारदारांना गेट ट्रेनिंगसाठी बोलावण्यात आलेले होते परंतू तक्रारदार त्यासाठी आलेले नाही व त्यांनी नियमित संपर्क ठेवलेला नाही. 6 फेब्रुवारी-2010 म्हणजेच 9 महिन्यानंतर कुठलेही योग्य कारण न देता तक्रारदाराने कृत्रिम पायाची रक्कम परत मागितलेली आहे.
सामनेवालेचा पत्ता हा कल्याण जि. ठाणे येथील आहे. तो तक्रारदाराने तक्रारीत नमूद केलेला आहे. कोटेकोरपणे सांगावयाचे तर कृत्रिम पाय देण्याचा व्यवहार हा सांगली येथे डॉ. मोडक यांच्या दवाखान्यात झाला. न्याय मंचाच्या अधिकार क्षेत्रात कुठलाही व्यवहार झालेला नाही. त्यामुळे सदरची तक्रार न्याय मंचात चालू शकत नाही.
तक्रारीत तक्रारदाराने डॉ. सारंग यांचा उल्लेख केलेला आहे परंतू डॉ. सारंग यांना तक्रारदाराने तक्रारीत पार्टी केलेले नाही, त्यामुळे त्याची बाधा तक्रारदाराच्या तक्रारीस येते. तारीख 25/2/2010 रोजी सामनेवालेंनी नोटीसचे उत्तर दिलेले आहे, ते योग्य आहे. तक्रारदार हे कृत्रिम पायाची रक्कम मिळण्यास पात्र नाहीत किंवा तक्रारीत मागणी केल्याप्रमाणे कोणतीही रक्कम तक्रारदारांना मिळू शकत नाही. तक्रार खर्चासह रद्द करावी.
तक्रारदाराची तक्रार, दाखल कागदपत्रे, तक्रारदाराचे शपथपत्र, युक्तिवाद, सामनेवालेचा खुलासा, शपथपत्र, युक्तिवाद, दाखल कागदपत्रे यांचे सखोल वाचन केले. तक्रारीतील कागदपत्रे पाहता तक्रारदाराने सामनेवालेकडून रक्कम रु. 55,000/- ला कृत्रिम पाय विकत घेतलेला आहे व त्याबाबतची पावती सामनेवालेंनी तक्रारदारांना दिलेली आहे.
तक्रारदाराने सदरचा पाय तारीख 02/05/2009 रोजी विकत घेतलेला आहे व त्याबाबतची पहिली तक्रार तारीख 09/02/2010 रोजी सामनेवालेंना नोटीस पाठवून सदरचा कृत्रिम पाय तक्रारदार योग्य त-हेने वापरु शकत नसल्याबाबत कळविलेले आहे.
तारीख 02/05/2009 ते 09/02/2010 या 9 महिन्याच्या कालावधीमध्ये तक्रारदाराने केवळ वेळोवेळी सामनेवालेकडे कृत्रिम पाय बदलून देण्याची किंवा रक्कम परत देण्याची मागणी केली, अशी विधाने केलेली आहेत. यासंदर्भात तक्रारदाराची नोटीस पाहता नोटीसमध्येही तक्रारीप्रमाणे आक्षेप आहेत. यासंदर्भात तक्रारदार हे एकमेव उत्तम साक्षीदार आहेत की, त्यांना सदरचा पाय योग्यरितीने वापरता येतो किंवा नाही, हे सांगण्यासाठी. परंतू तारीख 02/05/2009 रोजी पाय विकत घेतल्यानंतर व त्याबाबतचे 15 दिवसांचे प्रशिक्षण घेतलेले असतांना 9 महिन्याच्या कालावधीमध्ये तक्रारदाराने कोणकोणत्या तारखेला सामनेवालेकडे सदर पायाचा त्रास होत असल्याबाबत तक्रार केल्याचा कोठेही स्पष्ट उल्लेख नाही किंवा पाय वापरण्यास काय त्रास होत होता याचा तक्रारीत किंवा नोटीसीमध्ये उल्लेख नाही. यासंदर्भात सामनेवाले हे त्यातील तज्ञ आहेत. असे त्यांच्या खुलाशावरुन व शपथपत्रा वरुन दिसते. त्यांनी त्यासंदर्भातील माहिती परिपूर्णपणे दिलेली आहे. ती विचारात घेता व सामनेवालेंचा खुलासा विचारात घेता तक्रारदार हे गेट ट्रेनिंगसाठी न गेल्याचे आलेल्या पुराव्यावरुन दिसते.
सदरच्या कृत्रिम पायाच्या संदर्भात सामनेवालेंनी कोणतीही हमी अथवा आश्वासन गॅरंटी वॉरंटी दिल्याचे तक्रारदाराचे म्हणणे नाही. तक्रारदाराने दुसरा पाय विकत घेतलेला आहे. तसेच यासंदर्भात तक्रारदाराने डॉ. सारंग यांच्या नावाचा उल्लेख केलेला आहे व त्यांच्या सल्ल्यानुसार तक्रारदाराने सामनेवालेकडून कृत्रिम पाय विकत घेतलेला आहे. यासंदर्भात डॉ. सारंग किंवा डॉ. मोडक यांच्यात सदर पायाच्या संदर्भात तक्रारी केल्याबातचे तक्रारदाराचे म्हणणे नाही किंवा डॉक्टर सारंग यांना सदर तक्रारीत पार्टी केलेले नाही. डॉ. सारंग यांच्याकडे तक्रारदाराने तक्रार न करणे म्हणजेच सदर पायात कांही दोष नाही, असाच त्याचा अर्थ होतो. सदरचा कृत्रिम पाय डॉ. सारंग यांच्या सल्यानुसार विकत घेतल्यानंतर डॉ. सारंग यांच्याकडे त्यासंदर्भात होणा-या त्रासाबद्दल निश्चितच तक्रारदाराने तक्रार करणे अपेक्षीत होते परंतू त्याबाबतची कोणतीही तक्रार नाही.
सामनेवालेंचा पत्ता कल्याण जि. ठाणे येथील आहे व कृत्रिम पाय विकत घेण्याचा व्यवहार हा सांगली येथे झालेला आहे. बीड न्याय मंचाच्या अधिकार कक्षेत सदरचा व्यवहार झालेला नाही. त्यामुळे बीड न्याय मंचास सदरची तक्रार चालविण्याचा अधिकार नाही, अशी हरकत सामनेवालेंनी घेतलेली आहे. यासंदर्भात तक्रारदाराचा कोणताही खुलासा नाही. तथापि, तक्रारदार यांनी सदरचा कृत्रिम पाय विकत घेतल्यानंतर ते बीड येथे वापरत असतांना त्यांना तक्रारीस कारण घडलेले आहे, त्यामुळे ग्राहक संरक्षण कायदयातील कलम-11 (2) (सी) प्रमाणे पूर्णत: किंवा अंशत: कारण ज्या अधिकार क्षेत्रात घडले असेल त्या न्याय मंचात तक्रार दाखल करता येते, ही कायदयातील तरतुद लक्षात घेता तक्रारदाराची तक्रार या न्याय मंचात चालू शकते, असे न्याय मंचाचे मत आहे, त्यामुळे सामनेवालेंची सदरची हरकत ग्राहय धरणे उचित होणार नाही, असे न्याय मंचाचे मत आहे.
तक्रारदाराने कृत्रिम पाय निट वापरता येत नाही व त्याचे साहित्य हे निकृष्ट दर्जाचे आहे, असे दोन आक्षेप तक्रारीत घेतलेले आहेत. यासंदर्भात पाय वापरतांना होणारा त्रास याचा कोणताही उल्लेख तक्रारीत नाही. वर नमूद केलेले साहित्य निकृष्ट असल्याबाबतचा तक्रारदाराचा कोणताही पुरावा नाही. साहित्याच्या संदर्भात तक्रारदार हे तज्ञ नाहीत, त्यामुळे वापरलेले साहित्य हे निकृष्ट दर्जाचे आहे हे शाबीत करण्याची पूर्ण जबाबदारी तक्रारदाराची होती. सदर साहित्यात निकृष्टपणा असल्याची बाब कोठेही स्पष्ट होत नाही, असे न्याय मंचाचे मत आहे.
सबब, न्याय मंच खालील प्रमाणे आदेश देत आहे.
आ दे श
1. तक्रारदाराची तक्रार रदृ करण्यात येत आहे.
2. सामनेवालेंच्या खर्चाबाबत आदेश नाही्.
(सौ.एम.एस.विश्वरुपे) ( पी.बी.भट )
सदस्या, अध्यक्ष,
चुनडे/- स्टेनो जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्यायमंच, बीड जि.बीड