न्या य नि र्ण य
(दि.23-04-2024)
व्दाराः- मा. श्री स्वप्निल मेढे, सदस्य
1) तक्रारदार यांनी प्रस्तुतचा तक्रार अर्ज हा सामनेवाला यांनी तक्रारदाराचा पार्सल बॉक्स कुरिअर सेवेमध्ये गहाळ करुन तक्रारदारास दयावयाचे सेवेत त्रुटी केलेने सामनेवाला विरुध्द ग्राहक संरक्षण कायदा-2019 चे कलम 35 अन्वये दाखल केला आहे. तक्रार अर्जातील कथने थोडक्यात पुढील प्रमाणे-
तक्रारदार हे रत्नागिरी येथील कायम रहिवासी असून त्या स्वयंरोजगाराचे माध्यमातून स्वत:च्या व कुटूंबाच्या उदरनिर्वाहकरिता पर्स तयार करुन त्याची विक्री करण्याचे काम करतात. सामनेवाला क्र.1 व 2 हे कुरिअरची सेवा देणारे आहेत. तक्रारदार यांना श्रीमती रचना गायकवाड, जर्मनी यांचेकडून दि.09/09/2022 रोजी मोबाईलवरील संभाषणाने व व्हॉटसॲप या सोशल मिडीयाच्या माध्यमाने एकूण 156 पर्सची ऑर्डर देण्यात आली होती. तसेच त्यांचेकडून तक्रारदार यांनी सामानाच्या मोबदल्यापोटीची संपूर्ण रक्कम स्विकारली होती. तक्रारदार यांनी मोठया 55 पर्सचा एक बॉक्स व छोटया 101 पर्सचा एक छोटा बॉक्स असे दोन बॉक्स तयार केले. दोन्ही बॉक्सचे वजन अनुक्रमे 15.690 किेलो आणि 6.800 किेलो असे होते. सदर दोन्ही बॉक्सचे रक्कम रु.43,030/- किंमतीचे चलन दि.13/09/2022 रोजी तयार केले. सामनेवाला क्र.1 यांनी सदरचे दोन्ही बॉक्स दि.13/09/2022 रोजी ताब्यात घेऊन सदरचे बॉक्स कुरिअरने जर्मनीच्या दिलेल्या पत्त्यावर पाठविण्याकरिता सामनेवाला क्र.2 यांचे ताब्यात दिले. तक्रारदार यांनी सदर दोन्ही बॉक्सची कुरिअरची होणारी एकूण रक्क्म रु.13,020/- यूपीआय आयडी वरुन सामनेवाला क्र.1 यांचे खातेवर दि.16/09/2022 रोजी जमा केली. सामनेवाला क्र.1 यांनी तक्रारदारास सदर दोन बॉक्सेसचे ट्रॅकिंग नंबर 02655043839464 आणि 02655043839463 असल्याचे कळविले. सदर दोन बॉक्सपैकी मोठा बॉक्स श्रीमती रचना गायकवाड जर्मनी यांना दि.22/09/2022 रोजी पोहोच झाला. परंतु दुसरा छोटा बॉक्स पोहोच झाला नाही. त्याबाबत तक्रारदार यांनी सामनेवाला क्र.1 व 2 यांचेकडे चौकशी केली असता तुमचा बॉक्स मिळून येत नाही, तो मिळाला की आम्ही तुम्हाला तो पोहोच करु अशी खात्री दिली. परंतु कालांतराने सामनेवाला हे तक्रारदारास गहाळ झालेल्या बॉक्सबद्दल उडवाउडवीची उत्तरे देऊ लागले. सामनेवालांनी तक्रारदारास सांगितले की, गहाळ झालेल्या बॉक्समधील सामानाचे त्याच किंमतीचे नग पुन्हा पाठवून दया आणि तोपर्यंत गहाळ झालेला बॉक्स आम्हाला मिळाला की तो परत करु आणि नाही मिळाला तर त्याची किंमत तुम्हाला अदा करु. सामनेवालांनी सांगितलेनुसार तक्रारदार यांनी नवीन दुस-या बॉक्समध्ये रक्क्म रु.28,740/- किंमतीचे 101 नग पर्स वजन 6.530 असलेले भरुन पुन्हा त्याच पत्त्यावर श्रीमती रचना गायकवाड यांना सामनेवाला क्र.1 व 2 मार्फत दि.20/10/2022 रोजी पाठविले. सदर कुरिअरची रक्कम रु.5,650/- तक्रारदाराने सामनेवाला क्र.1 यांचेकडे दि.23/10/2022 रोजी यूपीआय वरुन जमा केले. सदरचा तिसरा बॉक्स ट्रॅकींग नंबर 02655043752084 असलेला श्रीमती रचना गायकवाड यांना दि.01/11/2022 रोजी पोहोच झाला. परंतु सामनेवाला क्र.1 व 2 यांनी तक्रारदारास दिलेल्या सेवेतील त्रुटीमुळे तक्रारदारास गहाळ झालेल्या बॉक्समधील असणा-या 101 वस्तु व त्यांची असणारी किंमत रक्कम रु.28,740/- तसेच सदर कुरिअरपोटी दिलेली रक्कम रु.3,260/- अशा एकूण रक्कम रु.32,000/- रकमेचे नुकसान झाले. तक्रारदारास सदरचा आर्थिक भुर्दंड हा सामनेवाला क्र.1 व 2 यांच्यामुळे सोसावा लागला. त्यामुळे तक्रारदार यांनी सामनेवाला क्र.1 व 2 यांना दि.15/02/2023 राजी वकीलांमार्फत रजिस्टर पोष्टाने नोटीस पाठवून नुकसान भरपाईची मागणी केली असता सामनेवाला क्र.1 यांनी सदर नोटीसला खोटी व खोडसाळ उत्तरे देऊन त्यांची जबाबदारी नाकारली आहे. तर सामनेवाला क्र.2 यांना त्यांचे नवीन पत्त्यावर नोटीस मिळूनदेखील त्यांनी सदर नोटीसचा कोणतेही उत्तर दिलेले नाही. सामनेवाला क्र.1 व 2 यांनी अनुचित व्यापारी प्रथेचा अवलंब करुन तक्रारदारास दयावयाचे सेवेत त्रुटी ठेवलेने सदरची तक्रार दाखल केली आहे. सबब तक्रारदारास सामनेवाला क्र.1 व 2 यांचेकडून नुकसान भरपाईपोटी रक्कम रु.37,650/- व मानसिक, शारिरीक व आर्थिक त्रासापोटी रक्कम रुं.50,000/- असे एकूण रक्कम रु.87,650/- देणेबाबत आदेश व्हावा अशी विनंती केली आहे.
2) तक्रारदाराने त्याचे तक्रारीच्या पुष्टयर्थ तक्रारीसोबत नि.6 कडे एकूण 13 कागदपत्रे दाखल केलेली आहेत. त्यामध्ये तक्रारदाराने सामनेवाला क्र.1 व 2 यांना पाठविलेली नोटीस, सदर नोटीसचा सामनेवाला क्र.2 यांना पाठविलेला परत आलेला लखोटा, सामनेवाला क्र.1 यांनी नोटीसला दिलेले उत्तर, सामनेवाला क्र.2 ला रजि.पोष्टाने पाठविलेली नोटीस, सामनेवाला क्र.1 यांना ऑनलाईन पेमेंट केलेची पावती, सामनेवाला क्र.1 यांनी तक्रारदारास पाठविलेले मेसेज, इत्यादी कागदपत्रे दाखल केली आहेत. नि.12 कडे तक्रारदाराचे पुराव्याचे प्रतिज्ञापत्र दाखल केले आहे. नि.13 कडे साक्षीदार कु.दीक्षा प्रमोद नागवेकर यांचे प्रतिज्ञापत्र दाखल केले आहे. नि.14 कडे पुरावा संपलेची पुरसिस दाखल केली आहे. तसेच नि.15 कडे लेखी युक्तीवाद दाखल केला आहे.
3) प्रस्तुत प्रकरणी सामनेवाला क.1 व 2 यांना आयोगामार्फत नोटीस पाठविली असता त्यांना नोटीस मिळूनदेखील सामनेवाला क्र.1 व 2 हे याकामी हजर झालेले नाहीत किेंवा त्यांनी त्यांचे म्हणणेही दाखल केलेले नाही. सबब दि.11/01/2024 रोजी सामनेवाला क्र.1 व 2 यांचेविरुध्द एकतर्फा आदेश पारीत करण्यात आला.
4) वर नमुद तक्रारदार यांचा तक्रार अर्ज, दाखल कागदपत्रे व लेखी व तोंडी युक्तीवाद यांचे बारकाईने अवलोकन करता सदर आयोगाने सदर तक्रार अर्जाचे निराकरणार्थ खालील मुददे विचारात घेतले.
अ. क्र. | मुद्दे | उत्तरे |
1 | तक्रारदार व सामनेवाला हे नात्याने ग्राहक व सेवापुरवठादार आहेत काय ? | होय. |
2 | सामनेवाला यांनी तक्रारदाराकडून कुरिअरपोटी रक्कम स्विकारुन तक्रारदाराचा बॉक्स गहाळ करुन अनुचित व्यापारी प्रथेचा अवलंब करुन तक्रारदारास सदोष सेवा पुरविली आहे काय ? | होय. |
3 | तक्रारदार हे सामनेवाला यांचेकडून गहाळ झालेल्या बॉक्सची रक्कम व कुरिअरपोटी सामनेवाला यांनी स्विकारलेली रक्कम व्याजासह परत मिळणेस तसेच मानसिक व शारिरीक त्रासापोटी रक्कम मिळणेस तक्रारदार पात्र आहेत काय ? | होय. |
4 | अंतिम आदेश काय ? | खालील नमूद आदेशाप्रमाणे. |
-वि वे च न –
5) मुद्दा क्रमांकः 1 ते 3 –
तक्रारदार हया स्वत:च्या व कुटूंबाच्या उदरनिर्वाहकरिता स्वयंरोजगाराचे माध्यमातून पर्स तयार करुन त्याची विक्री करण्याचे काम करतात. तक्रारदार यांनी श्रीमती रचना गायकवाड यांना सामनेवाला क्र.1 व 2 यांचे कुरिअरमार्फत पाठविलेल्या वस्तुचे चलन नि.6/5 कडे दाखल केले आहे. तसेच नि.6/7 व 6/13 कडे तक्रारदाराने सामनेवाला क्र.1 यांना पार्सल चार्जेसची रक्कम रु.13,020/- व रु.5,650/- युपीआय व्दारे इंडियन ओव्हरसिज बँकेमार्फत अदा केलेची प्रत दाखल केली आहे. तसेच नि.6/10 कडे कुरिअरमाफ्रत पाठविलेल्या पार्सलचा ट्रॅक नंबरही दाखल केलेला आहे. यावरुन तक्रारदार यांनी सामनेवाला क्र.1 व 2 यांचेमार्फत श्रीमती रचना गायकवाड यांना पार्सलचे दोन बॉक्स पाठविलेचे स्पष्ट होते. त्यामुळे तक्रारदार हे सामनेवाला यांचे ग्राहक असलेचे व सामनेवाला हे विक्रेते/ सेवापुरवठादार असलेची बाब निर्विवादपणे सुस्पष्ट होते. सबब तक्रारदार व सामनेवाला हे नात्याने ग्राहक व सेवापुरवठादार आहेत या निष्कर्षाप्रत हे आयोग येत आहे. सबब मुददा क्र.1 चे उत्तर आम्ही होकारार्थी देत आहोत.
6) तक्रारदार हया स्वयंरोजगाराचे माध्यमातून स्वत:च्या व कुटूंबाच्या उदरनिर्वाहकरिता पर्स तयार करुन त्याची विक्री करण्याचे काम करतात. तक्रारदार यांना श्रीमती रचना गायकवाड, जर्मनी यांचेकडून दि.09/09/2022 रोजी सोशल मिडीयाच्या माध्यमाव्दारे एकूण 156 पर्सची ऑर्डर देण्यात आली होती व त्यांनी तक्रारदारास ऑर्डरच्या मोबदल्यापोटीची संपूर्ण रक्कम अदा केली होती. त्यानुसार तक्रारदार यांनी श्रीमती गायकवाड यांचे ऑर्डरनुसार मोठया 55 पर्सचा एक बॉक्स व छोटया 101 पर्सचा एक छोटा बॉक्स असे दोन बॉक्स तयार करुन सदर दोन्ही बॉक्सचे रक्कम रु.43,030/- किंमतीचे चलन दि.13/09/2022 रोजी तयार केले. सदरचे चलन याकामी तक्रारदार यांनी नि.6/5 कडे दाखल केलेले आहे. त्याच दिवशी सामनेवाला क्र.1 यांचेमार्फत सदरचे दोन्ही बॉक्स कुरिअरने जर्मनीच्या दिलेल्या पत्त्यावर पाठविण्याकरिता सामनेवाला क्र.2 यांचे ताब्यात दिले. तक्रारदार यांनी सदर दोन्ही बॉक्सची कुरिअरची होणारी एकूण रक्क्म रु.13,020/- यूपीआय आयडी वरुन सामनेवाला क्र.1 यांचे खातेवर दि.16/09/2022 रोजी जमा केलेचे नि.6/7 कडील कागदपत्रावरुन सिध्द होते. तसेच सामनेवाला क्र.1 यांनी तक्रारदारास सदर दोन बॉक्सेसचे ट्रॅकिंग नंबर 02655043839464 आणि 02655043839463 असल्याचे कळविलेचे तक्रारदाराने व्हॉटसॲपची मेसेजची प्रत नि.6/10 कडे दाखल केली आहे. तसेच तक्रारदाराने नि.6/8 व 6/9 कडे सामनेवाला क्र.2 यांची पावती दाखल केली असून सदर पावतीचे अवलोकन करता पार्सल पाठविणार या कॉलममध्ये तक्रारदार यांचे नांव दिसून येते व ज्यांना पार्सल पाठविले आहे. त्यांचे नांव रचना गायकवाड- बर्लिन-जर्मनी असे दिसून येते. चार्ज करण्यायोग्य वजन 22.00 कि.व 7.00 कि. असे नमुद असलेचे दिसून येते. यावरुन तक्रारदार यांनी सामनेवाला क्र.1 व 2 मार्फत कुरिअरने जर्मनीला दोन बॉक्स पाठविलेचे सिध्द होते. परंतु सदर दोन बॉक्सपैकी मोठा बॉक्स श्रीमती रचना गायकवाड, यांना दि.22/09/2022 रोजी बर्लिन जर्मनी येथे पोहोच झाला. परंतु दुसरा छोटा बॉक्स पोहोच झाला नाही. त्याबाबत तक्रारदार यांनी सामनेवाला क्र.1 व 2 यांचेकडे चौकशी केली असता त्यांनी तक्रारदारास गहाळ झालेल्या बॉक्सबद्दल उडवाउडवीची उत्तरे दिली. त्यामुळे तक्रारदार यांनी सामनेवाला यांच्या सांगण्यावरुन नवीन दुस-या बॉक्समध्ये रक्कम रु.28,740/- किंमतीचे 101 नग पर्स वजन 6.530 असलेले भरुन पुन्हा त्याच पत्त्यावर श्रीमती रचना गायकवाड यांना सामनेवाला क्र.1 व 2 मार्फत दि.20/10/2022 रोजी पाठविले. सदर कुरिअरची रक्कम रु.5,650/- तक्रारदाराने सामनेवाला क्र.1 यांचेकडे दि.23/10/2022 रोजी यूपीआय वरुन जमा केलेबाबतची झेरॉक्स प्रत या कामात नि.6/13 कडे दाखल केलेली आहे. सदरचा तिसरा बॉक्स श्रीमती रचना गायकवाड यांना दि.01/11/2022 रोजी पोहोच झाला. परंतु सामनेवाला क्र.1 व 2 यांनी तक्रारदारास दिलेल्या सेवेतील त्रुटीमुळे तक्रारदारास गहाळ झालेल्या बॉक्समधील असणा-या 101 वस्तु व त्यांची असणारी किंमत रक्कम रु.28,740/- तसेच सदर कुरिअरपोटी दिलेली रक्कम रु.3,260/- अशा एकूण रक्कम रु.32,000/- रक्कमेचे नुकसान झाले. तक्रारदारास सदरचा आर्थिक भुर्दंड हा सामनेवाला क्र.1 व 2 यांच्यामुळे सोसावा लागला. त्यामुळे तक्रारदार यांनी सामनेवाला क्र.1 व 2 यांना दि.15/02/2023 राजी वकीलांमार्फत रजिस्टर पोष्टाने नोटीस पाठवून नुकसान भरपाईची मागणी केली असता सामनेवाला क्र.1 यांनी सदर नोटीसला खोटी व खोडसाळ उत्तरे देऊन त्यांची जबाबदारी नाकारली आहे. तर सामनेवाला क्र.2 यांना त्यांचे नवीन पत्त्यावर नोटीस मिळूनदेखील त्यांनी सदर नोटीसचा कोणतेही उत्तर दिलेले नाही. सामनेवाला क्र.1 व 2 यांनी अनुचित व्यापारी प्रथेचा अवलंब करुन तक्रारदारास दयावयाचे सेवेत त्रुटी ठेवलेने सदरची तक्रार दाखल केली आहे.
7) तसेच प्रस्तुत सामनेवाला यांनी तक्रारदाराला कुरिअरची रक्कम भरुनही योग्य ती सोयी-सुविधा पुरविली नाही हे स्पष्ट होते कारण तक्रारदाराने दाखल केले तक्रार अर्जातील कोणतेही कथन सामनेवाला क्र.1 व 2 यांनी याकामी हजर होऊन खोडून काढलेले नाही अथवा या कामी आक्षेप नोंदवलेले नाहीत. सबब तक्रारदाराने तक्रार अर्जात केले कथनावर विश्वासार्हता दाखवणे न्यायोचित वाटते. सबब तक्रारदाराचे कथनाप्रमाणे सामनेवाला क्र.1 व 2 यांनी तक्रारदाराचा कुरिअरमार्फत पाठविलेला बॉक्स गहाळ करुन तक्रारदारास दयावयाचे सेवेत त्रुटी ठेवलेने तक्रारदाराची मोठी गैरसोय होऊन अनेक अडचणींना तक्रारदाराला तोंड दयावे लागले. सबब सामनेवाला क्र.1 व 2 यांनी तक्रारदाराला दयावयाचे सेवेत त्रुटी ठेवली हे दाखल कागदपत्रांवरुंन स्पष्ट व सिध्द होते. तसेच तक्रारदाराने वकीलांमार्फत सामनेवाला यांना नोटीस पाठविली होती. ती नोटीस सामनेवाला क्र.2 यांना मिळूनदेखील सामनेवाला क्र.2 यांनी सदर नोटीसला उत्तरही दिले नाही म्हणजेच नोटीसमधील मजकूर सामनेवाला क्र.2 यांना मान्य आहे असा अर्थ होतो. तसेच सामनेवाला क्र.1 यांनी तक्रारदाराच्या नोटीसीला पाठविलेल्या दि.03/03/2023 रोजीच्या उत्तरामध्ये तक्रारदाराने त्यांचेमार्फत जर्मनीला दोन बॉक्स पाठविलेचे व त्यातील लहान बॉक्स गहाळ झालेचे मान्य केलेले आहे. सबब, तक्रारदार यांना तक्रार अर्जात नमुद केलेप्रमाणे सामनेवाला क्र.1 व 2 यांनी सेवात्रुटी दिलेचे स्पष्ट व सिध्द झाले आहे. सबब मुद्दा क्र.2 चे उत्तर हे आयोगाने होकारार्थी दिले आहे.
8) वरील सर्व विवेचन, दाखल कागदपत्रे या बाबींचा ऊहापोह करता तक्रारदाराने तक्रार अर्जात नमुद केलेल्या बाबी निर्विवादपणे सिध्द केल्या आहेत. सबब, तक्रारदार यांना सामनेवाला क्र.1 व 2 यांचेकडून तक्रारदाराच्या गहाळ झालेल्या बॉक्स व त्यातील सामानाची नुकसान भरपाईपोटी रक्कम रु.37,650/- (रक्कम रुपये सदतीस हजार सहाशे पन्नास मात्र), मानसिक त्रासापोटी रक्कम रु.10,000/-(रक्कम रुपये दहा हजार मात्र) व तक्रार अर्जाचा खर्च रक्कम रु.5,000/- (रक्कम रु.पाच हजार मात्र) सामनेवाला क्र.1 व 2 यांचेकडून वैयक्तिक व संयुक्तिकरित्या मिळणेस तक्रारदार पात्र आहेत असे या आयोगाचे स्पसष्ट मत आहे. सबब मुद्रदा क्र.3 चे उत्तर होकारार्थी देत आहे.
9) मुद्दा क्रमांकः 4 –
सबब, वरील सर्व विवेचनांचा विचार करता प्रस्तुत कामी हे आयोग खालीलप्रमाणे अंतिम आदेश पारीत करीत आहे.
आदेश
1) तक्रारदाराचा तक्रार अर्ज अंशत: मंजूर करण्यात येतो.
2) सामनेवाला क्र.1 व 2 यांनी वैयक्तिक व संयुक्तिकरित्या तक्रारदारास त्याचे गहाळ झालेल्या बॉक्समधील सामानाच्या नुकसानीपोटी रक्कम रु.37,650/- (रक्कम रुपये सदतीस हजार सहाशे पन्नास मात्र) अदा करावी. तसेच सदर रक्कमेवर तक्रार दाखल तारखेपासून ते संपूर्ण रक्कम अदा होईपर्यंत द.सा.द.शे.9% दराने व्याज अदा करावे.
3) सामनेवाला क्र.1 व 2 यांनी वैयक्तिक व संयुक्तिकरित्या तक्रारदारास मानसिक त्रासापोटी रक्कम रु.10,000/- (रुपये दहा हजार फक्त) व तक्रार अर्जाचा खर्च रक्कम रु.5,000/-(रक्कम रुपये पाच हजार फक्त) अदा करावेत.
4) वर नमुद सर्व आदेशांची पूर्तता सामनेवाला क्र.1 व 2 यांनी वैयक्तिक व संयुक्तिकरित्या आदेशाची प्रत मिळाले तारखेपासून 45 दिवसांत करावी.
5) विहीत मुदतीत सामनेवाला यांनी आदेशाची पूर्तता न केलेस ग्राहक संरक्षण कायदयातील तरतुदीनुसार कारवाई करणेची मुभा तक्रारदाराला देणेत येते.
6) आदेशाच्या सत्यप्रती उभयपक्षकारांना विनामुल्य पाठवाव्यात.