निकालपत्र
तक्रार दाखल दिनांकः- 07/07/2012
तक्रार नोदणी दिनांकः- 23/07/2012
तक्रार निकाल दिनांकः- 10/07/2013
कालावधी 11 महिने. 17 दिवस.
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्यायमंच, परभणी
अध्यक्ष श्री.पी.पी.निटूरकर.B.Com.LL.B.
सदस्य
श्री.आर.एच.बिलोलीकर.B.Tech, MBA, DCM, LLB.
------------------------------------------------------------------------------------------------------------
मोईजोद्दीन बियाबानी. अर्जदार
वय 38 वर्षे. धंदा.वकिला व्यवसाय. अड.डि.यु.दराडे.
रा.पठाण मोहल्ला.पाथरी जि.परभणी.
विरुध्द
1 सुरभी कम्युनिकेशन. गैरअर्जदार.
व्दारा किसान हॉटेल,स्टेशन रोड.परभणी. अड.अमोल देशमुख.
2 श्री.साई सर्व्हिसेस.स्पाईस मोबाईल एजन्सी.
राजाराम सभागृह कॉम्प्लेक्स,गांधी पार्क,परभणी.
3 कस्टमर केअर एक्झीक्युटीव्ह. अड.बी.ए.मोदाणी.
व्दारा स्पाईस मोबाईलीटी,लि.
डी-1, सेक्टर 03, नोऐडा (उत्तर प्रदेश)
इंडीया पिनकोड 201 301
------------------------------------------------------------------------------------
कोरम - 1) श्री.पी.पी.निटूरकर. अध्यक्ष.
2) श्री.आर.एच.बिलोलीकर सदस्य.
(निकालपत्र पारित व्दारा.श्री.पी.पी.निटुरकर.अध्यक्ष.)
गैरअर्जदाराने अर्जदारास सदोष मोबाईलची विक्री करुन दुरुस्तीच्या वेळेस सदरचा मोबाईल परत न करता दुसराच मोबाईल परत दिला, म्हणून नुकसान भरपाई मिळणे बाबतची तक्रार आहे.
अर्जदाराचे थोडक्यात म्हणणे असे आहे की,अर्जदार हा पाथरी येथील रहिवाशी असून परभणी येथे वकिली व्यवसाय करतो.अर्जदाराने गैरअर्जदार यांच्याकडून एक स्पाईस कंपनीचा मोबाईल मॉडेल क्रमांक M - 5170 ज्याचा IMEI No. 910560000312076 असा असून बिल क्रमांक 1155 नुसार अर्जदाराने गैरअर्जदार क्रमांक 1 यांच्याकडून खरेदी केला, सदरच्या मोबाईलची किंमत 2,500/- रुपये अर्जदाराने गैरअर्जदार क्रमांक 1 ला दिली.अर्जदाराचे असे म्हणणे आहे की, सदर हँडसेट खरेदी केल्यानंतर 3 महिन्याच्या आत त्यात बॅटरी बॅकअप समस्या व लो नेटवर्कची समस्या सुरु झाली, त्यामुळे अर्जदाराने गैरअर्जदार क्रमांक 1 यांच्याकडे सदर मोबाईल वॉरंटी पिरीयेड मध्ये दुरुस्तीसाठी आणून दिला, त्यावेळेस गैरअर्जदार क्रमांक 1 गैरअर्जदार क्रमांक 2 यांच्याकडे सदर मोबाईल हँडसेट घेवुन जाण्यास सांगीतले, सदर मोबाईल 30/12/2010 रोजी अर्जदाराने गैरअर्जदार क्रंमांक 1 यांच्याकडून खरेदी केला होता अर्जदाराचे असे म्हणणे आहे की, सदरचा मोबाईल हँडसेट फेब्रुवारी 2011 मध्ये गैरअर्जदार क्रमांक 2 कडे दुरुस्तीसाठी दिला त्यावेळेस गैरअर्जदार क्रमांक 2 ने अर्जदारास सांगीतले की, सदरचा मोबाईल हँडसेट परभणी येथे दुरुस्त होत नाही, त्यास गैरअर्जदार क्रमांक 3 कडे पाठवावे लागते,व त्यासाठी एक महिन्याचा कालावधी लागतो असे सांगीतले त्यामुळे अर्जदाराने सदर दिवशी गैरअर्जदार क्रमांक 2 यांच्याकडे मोबाईल दुरुस्तीसाठी जमा केले व गैरअर्जदार क्रमांक 2 ने सदर मोबाईल जमा केले, म्हणून मुळ पावतीवर शिक्का मारुन व सही करुन दिली. त्यानंतर अर्जदाराने गैरअर्जदार क्रमांक 2 व 3 यांच्याकडून मोबाईल परत येण्याची वाट बघीतली. वेळोवेळी गैरअर्जदार क्रमांक 2 यांच्याकडे जावून मोबाईल हँडसेट परत आला का यांची विचारणा केली, त्यावेळेस थोड्याच दिवसात परत येईल, असे सांगीतले त्यानंतर दिनांक 10/11/2011 रोजी गैरअर्जदार यांनी अर्जदार यांना एक मोबाईल हँडसेट दिला, त्यानंतर सदर मोबाईल हँडसेट मॉडेल क्रमांक M – 5170 हाच होता, पण मोबाईल अर्जदार याचा नव्हता. अर्जदार याने गैरअर्जदार क्रमांक 2 यांच्या दुकानात मोबाईल चालू करुन बघीतले असता तो सुध्दा चालला नाही, व त्याला पण नेटवर्क नव्हते. सदर मोबाईल गैरअर्जदार यांच्याकडे दुकानात समक्ष उघडून पाहिले असता त्याचा IMEI No. 910560001359894 असा होता. त्यावेळी अर्जदार यांने गैरअर्जदार क्रमांक 2 यांना सांगीतले की, हा मोबाईल माझा नाही व दुस-याचाच मोबाईल मला देण्यात आला. त्यावेळी गैरअर्जदार क्रमांक 2 यांनी तो मोबाईल हँडसेट अर्जदारास बळजबरीने देण्याचा प्रयत्न केला व तो मोबाईल अर्जदार घेत नसतांना गैरअर्जदार क्रमांक 2 यांने तो मोबाईल बळजबरीने अर्जदाराच्या खिशात कोंबुन अर्जदारास दुकाना बाहेर काढले. अर्जदार यांच्या ओळखीचे व इतर लोक जमा झाले. अर्जदार व्यवसायाने वकिल असल्याने समाजात चांगली प्रतिष्ठा व पत आहे,परंतु गैरअर्जदार क्रमांक 2 यांच्या तशा वागण्याने अर्जदाराची बेअब्रु झाली. अर्जदाराचे असे म्हणणे आहे की, गैरअर्जदाराने अर्जदाराला शारिरीक व मानसिकत्रास दिला. त्यावेळी अर्जदारास आर्थिक नुकसान सोसावे लागले तेव्हा अर्जदार यांने 05/03/2012 रोजी गैरअर्जदार क्रमांक 1 व 2 व 3 यांना आर.पी.ए.डी.व्दारे नोटीसा पाठविल्या मोबाईल हँडसेट परत करण्याची मागणी केली, परंतु गैरअर्जदाराने अर्जदारास त्या नोटीसीचे उत्तर दिले नाही.त्यामुळे सदरची तक्रार दाखल करण्याचे भाग पडले.म्हणून अर्जदाराने मंचास विनंती केली आहे की, गैरअर्जदार क्रमांक 1 ते 3 यांना असा आदेश द्यावा की, त्यांनी अर्जदारास मोबाईल हँडसेटची किंमत रु. 2500/- परत करावी.व अर्जदारास झालेल्या शारिरीक व मानसिकत्रासा करीता गैरअर्जदाराकडून 25,000/- रुपये देण्यात यावे, व तक्रार अर्जाच्या खर्चापोटी 10,000/- रुपये गैरअर्जदार क्रमांक 1 ते 3 कडून देण्याचा आदेश व्हावा, अशी मंचास विनंती केली आहे.
तक्रार अर्जाच्या पुष्टयर्थ नि.क्रमांक 2 वर अर्जदाराने आपले शपथपत्र दाखल केलेले आहे.नि.क्रमांक 4 वर 4 कागदपत्रांच्या यादीसह 4 कागदपत्रे दाखल केलेली आहेत.ज्यामध्ये 4/1 वर अर्जदाराने गैरअर्जदार क्रमांक 1 यांच्याकडून खरेदी केलेल्या मोबाईलची पावती (दिनाक 30/12/2010), 4/2 वर अर्जदाराने वकिला मार्फत गैरअर्जदारास पाठविलेल्या नोटीसची प्रत, 4/3 वर आर.पी.ए.डी.ची प्रत, 4/4 वर पोष्ट एक्नॉलेजमेंटची प्रत, ई.कागदपत्रे दाखल केलेली आहेत.
आपले लेखी जबाब दाखल करण्याकरीता गैरअर्जदारांना मंचातर्फे नोटीसा पाठविण्यात आल्यानंतर गैरअर्जदार क्रमांक 3 वकिला मार्फत हजर व नि.क्रमांक 19 वर गैरअर्जदार क्रमांक 3 यांनी आपला लेखी जबाब सादर केलेला आहे.व त्यात त्यांचे असे म्हणणे आहे की, सदरची तक्रार ही खोटी बनावटी आहे व ती खारीज होणे योग्य आहे व तसेच त्यांचे म्हणणे आहे की, गैरअर्जदार क्रमांक 3 तर्फे कोणत्याही प्रकारची अर्जदारास सेवेत त्रुटी दिलेली नाही व त्यात त्यांचे असे म्हणणे आहे की, सदरचा मोबाईल खरेदी करते वेळी कायद्या प्रमाणे अर्जदारास सर्व गोष्टींची पाहणी करुन मोबाईल खरेदी करुन घेणे गरजेचे आहे. ( Rule of CAVEAT EMPTOR ) म्हणून सदरची तक्रार ही गैरअर्जदार क्रमांक 3 विरुध्द फेटाळण्यात यावी व त्याचे असे म्हणणे आहे की, सदरच्या अर्जदाराचा मोबाईल गैरअर्जदार क्रमांक 3 कडे केव्हाही आला नाही, त्यामुळे त्यांनी सेवेत कोणत्याही प्रकारची त्रुटी दिलेली नाही,म्हणून सदरची तकार ही खर्चासह खारीज करण्यात यावी, अशी मंचास विनंती केली आहे.
तक्रार अर्जाच्या पुष्टर्थ नि.क्रमांक 20 गैरअर्जदार क्रमांक 3 यांनी आपले शपथपत्र दाखल केलेले आहे.
गैरअर्जदार क्रमांक 1 व 2 यांनी नि.क्रमांक 23 वर आपले लेखी जबाब सादर केले आहे. त्यात त्यांचे असे म्हणणे आहे की, अर्जदाराने दाखल केलेली तक्रार ही खोटी व कोणत्याही तथ्याचा आधार नसल्यामुळे सरळपणे फेटाळणे योग्य आहे.गैरअर्जदार क्रमांक 1 व 2 यांनी अर्जदारास कोणतीही त्रुटीची वा निष्काळजीपणाची सेवा दिलेली नसल्यामुळे सदरची तक्रार ग्राहक संरक्षण कायद्यात बसत नाही. म्हणून फेटाळणे योग्य आहे,तसेच गैरअर्जदार क्रमांक 1 व 2 यांचे म्हणणे आहे की, गैरअर्जदार क्रमांक 1 व 2 सदर वादग्रस्त मोबाईलचे उत्पादक नसून केवळ किरकोळ व ठोक विक्रेता आहे.ज्या गैरअर्जदार क्रमांक 3 यांच्याकडून उत्पादीत होवुन आलेले मोबाईल हँडसेट आहे. त्या परिस्थिती मध्ये विक्री केलेली आहे. त्यामुळे गैरअर्जदार कमांक 1 व 2 यांच्याकडून अर्जदारास कोणत्याही प्रकारची त्रुटीची व निष्काळजीपणाची सेवा दिली नाही. गैरअर्जदार क्रमांक 1 व2 यांचे असे म्हणणे आहे की, अर्जदार हा वकिल आहे व त्याने गैरअर्जदार क्रमांक 1 यांच्याकडून स्पाईस कंपनीचा M - 5170 मोबाईल विकत घेतला ज्याचा IMEI No. 910560000312076 असा आहे.हे गैरअर्जदारास मान्य आहे.गैरअर्जदाराने हे मान्य केले आहे की, अर्जदार गैरअर्जदार क्रमांक 1 यांच्याकडे गेल्यावर त्याने त्यास गैरअर्जदार क्रमांक 2 कडे मोबाईल घेवुन जाण्यास सांगीतले तसेच गैरअर्जदार कमांक 1 व 2 यांचे म्हणणे आहे की, अर्जदाराने सदरचा मोबाईल खरेदी केल्यानंतर सहा ते सात महिन्यानंतर त्यांच्याकडे आला व हँडसेटला बॅटरी बॅकअपची समस्या असल्याचे सांगीतले त्यावेळी गैरअर्जदार क्रमांक 1 ने गैरअर्जदार क्रमांक 2 कडे जाण्यास सांगीतले व अर्जदार गेल्यानंतर गैरअर्जदार कमांक 2 ने त्यास मोबाईल विकत घेतल्याची पावती मागीतली ती पाहिल्या नंतर गैरअर्जदार क्रमांक 2 ने सदर मोबाईची बॅटरीची समस्या पाहून अर्जदाराच्या मोबाईल मध्ये नविन बॅटरी बसून सदर मोबाईल चालू करुन दिले, वस्तुतः कोणत्याही मोबाईलची बॅटरी व चार्जरची वॉरंटी ही सहा महिने पर्यंत असते, गैरअर्जदार नंबर 2 यांनी अर्जदारास ग्राहक या नात्याने चांगली सेवा दिली आहे. त्यात कोणत्याही प्रकारची त्रुटी दिलेली नाही व गैरअर्जदार क्रमांक 1 व 2 यांचे असे म्हणणे आहे की, गैरअर्जदार क्रमांक 2 यांच्या दुकानावर अर्जदार पुन्हा फेब्रुवारी 2012 मध्ये स्पाईस कंपनीचा M - 5170 मोबाईल घेवुन आला व त्यात बँटरीची दुरुस्ती करण्याची मागणी केली व गैरअर्जदार क्रमांक 2 ने अर्जदारास मोबाईल विकत घेतल्याची पावती मागीतली त्यावेळी त्याने दाखविले असता दिनांक 30/12/2010 ची होती व सदर मोबाईल हँडसेटची नव्हती. कारण पावती वरील IMEI No. व मोबाईल हँडसेट वरील IMEI No. सारखा नव्हता. त्यामुळे गैरअर्जदार क्रमांक 2 ने अर्जदारास सांगीतले की, सदर मोबाईल या पावती नुसार खरेदी केलेला नाही, व पावती नुसार घेतलेल्या मोबाईलची वॉरंटी देखील संपलेली आहे.त्यामुळे सदरील मोबाईल दुरुस्त करु शकत नाही, त्यावेळी अर्जदाराने गैरअर्जदार क्रमांक 2 यांना धमकावले व आपण वकिल असल्याचे सांगून मोबाईल दुरुस्त करुन दिले नाही तर महागात पडेल असे सांगीतले. गैरअर्जदार क्रमांक 2 चे असे म्हणणे आहे की, गैरअर्जदार क्रमांक 2 हा परभणी शहरातील नामवंत व्यापारी आहे व त्याने अर्जदारास कसलेही प्रकारची त्रुटीची व निष्काळजीपणाची सेवा दिली नाही, उलट अर्जदाराच व्यावसायिक पोझिशनचा गैरवापर करुन एका प्रसिध्द व्यापा-याच्या प्रतिष्ठेला डाग लावण्याचा प्रयत्न करीत आहे.म्हणून अर्जदाराची तक्रार खर्चासह खारीज करण्यात यावी.
नि.क्रमांक 24 वर राघवेन्द्र राजेश्र्वरराव कत्रुवार यांनी आपले शपथपत्र दाखल केलेले आहे.
दोन्ही बाजुंच्या कैफियतीवरुन निर्णयासाठी उपस्थित होणारे मुद्दे.
मुद्दे उत्तर
1 गैरअर्जदार क्रमांक 1 व 2 ने अर्जदाराचा मोबाईल दुरुस्ती
काळात बदलून दुसराच IMEI No. असलेला मोबाईल परत
दिला म्हणून, सेवेत त्रुटी दिली आहे काय ? होय.
2 आदेश काय ? अंतिम आदेशा प्रमाणे.
कारणे
मुद्दा क्रमांक 1
अर्जदार हा गैरअर्जदार क्रमांक 1 चा ग्राहक आहे ही बाब नि.क्रमांक 4/1 वरील कागदपत्रावरुन सिध्द होते,तसेच अर्जदाराने गैरअर्जदार 1 यांच्याकडून स्पाईस कंपनीचा M - 5170 ज्याचा IMEI No. 910560000312076 दिनांक 30/12/2010 रोजी रु. 2500/- ला खरेदी केला होता ही बाब नि.क्रमांक 4/1 वरील पावती ज्याचा क्रमांक 1155 वरुन सिध्द होते, तसेच सदर मोबाईल मधील बॅटरी ही नादुरुस्ती होती व दुरुस्तीसाठी अर्जदाराने गैरअर्जदार क्रमांक 1 तर्फे गैरअर्जदार क्रमांक 2 कडे टाकला होता ही बाब नि.क्रमांक 4/1 वरील कागदपत्रावरुन सिध्द होते व तसेच सदरच्या मोबाईल मधील बॅटरी गैरअर्जदार क्रमांक 2 ने अर्जदारास बदलून दिली ही बाब देखील नि.क्रमांक 4/1 वरील कागदपत्रावरुन सिध्द होते या सर्व गोष्टीवरुन खरेदी केलेला मोबाईल हा व्यवस्थित नव्हता व तसेच गैरअर्जदार क्रमांक 2 ने अर्जदाराचा मोबाईल दुरुस्तीसाठी आल्यानंतर अर्जदाराचा M - 5170 ज्याचा IMEI No. 910560000312076 असलेला मोबाईल दुरुस्ती काळात त्या ऐवजी बदलून 910560001359894 असा मोबाईल बदलून अर्जदारास दिला.हे अर्जदाराचे म्हणणे मंचास खोटे वाटत नाही, कारण अर्जदाराने गैरअर्जदार क्रमांक 1 ते 3 यांस 05/03/2012 रोजी वकिला मार्फत कायदेशिर नोटीस पाठविली होती व त्या सदरच्या नोटीसीस गैरअर्जदार क्रमांक 1 ते 3 ने समर्पकपणे उत्तर दिल्याचे गैरअर्जदार क्रमांक 1 ते 3 ने मंचासमार कोणताही पुरावा आणला नाही.व तसेच गैरअर्जदार क्रमांक 2 व 3 हे IMEI No. 910560001359894 चा मोबाईल कोणत्या विक्रेत्या मार्फत कोणत्या ग्राहकास विकला हे शोधून काढू शकले असते तसे करणे त्यांना सहज जमले असते, परंतु तसे करण्याचे त्यांनी टाळून अर्जदार हा खोटी तक्रार करीत आहे एवढेच म्हणणे मंचासमोर मांडले.यावरुन हे सिध्द होते की, गैरअर्जदार क्रमांक 1 व 2 ने अर्जदाराचा त्याचा मालकीचा मोबाईल बदलून दुसराच मोबाईल देवून सेवेत त्रुटी व निष्काळजीपणा दाखविला आहे व या संपूर्ण गोष्टीस गैरअर्जदार क्रमांक 1 व 2 हेच जबाबदार आहेत.व तसेच गैरअर्जदार क्रमांक 2 ने अर्जदाराच्या मालकीचा मोबाईल बदलुन दुसरा मोबाईल त्यास दिला आहे. म्हणून अर्जदाराचे म्हणणे की, मोबाईलचे 2500/- रुपये मला परत मिळावे हे म्हणणे मंचास योग्य वाटत नाही, कारण दुसरा मोबाईल गैरअर्जदार क्रमांक 2 ने अर्जदारास दिलेला आहे व त्या तारखे पासून अर्जदार त्याचा वापर करीत आहे.गैरअर्जदार क्रमांक 2 ने अर्जदारास सदरचे मोबाईल बदलून देवून अर्जदारास मानसिक व शारिरीकत्रास दिला आहे हे सिध्द होते. म्हणून मंच मुद्दा क्रमांक 1 चे उत्तर होकारार्थी देवुन खालील प्रमाणे आदेश पारीत करीत आहे.
आ दे श
1 अर्जदाराचा तक्रार अर्ज अंशतः मंजूर करण्यात येत आहे.
2 गैरअर्जदार क्रमांक 1 व 2 ने वैयक्तिक व संयुक्तिकरित्या ( Joint & Severally )
मानसिकत्रासापोटी रु. 5,000/- फक्त ( अक्षरी रु.पाचहजार फक्त) व तक्रार
अर्जाचा खर्च म्हणून रु.2,500/- फक्त ( अक्षरी रु.दोनहजार पाचशे फक्त)
अर्जदारास निकाल तारखेपासून 30 दिवसांच्या आंत द्यावे.
3 आदेशाच्या प्रती पक्षकारांना मोफत पुरवाव्यात.
श्री.आर.एच.बिलोलीकर. श्री. पी.पी.निटूरकर
मा.सदस्य मा.अध्यक्ष