जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्यायमंच,नांदेड. प्रकरण क्रमांक :- 174/2008. प्रकरण दाखल तारीख - 13/05/2008 प्रकरण निकाल तारीख - 27/08/2008 समक्ष - मा.श्री.विजयसिंह राणे. - अध्यक्ष. मा.श्रीमती.सुजाता पाटणकर - सदस्या. मा.श्री.सतीश सामते - सदस्य. प्रंशात काशिनाथराव ठाकरे वय 31 वर्षे धंदा नौकरी अर्जदार. रा.वसंतनगर माहूर ता. माहूर जि. नांदेड. विरुध्द. 1. अधिक्षक, डाकघर, शिवाजी नगर नांदेड विभाग नांदेड गैरअर्जदार. 2. उपविभागीय निरीक्षक, किनवट उपविभाग किनवट. अर्जदारा तर्फे वकील - अड.प्रवीण अयचित गैरअर्जदार क्र.1 व 2 तर्फे वकील - अड.ए.एस. बंगाळे निकालपञ (द्वारा - मा.श्री. विजयसिंह राणे, अध्यक्ष ) गैरअर्जदारांनी अर्जदार यांना ञूटीची सेवा दिली म्हणून अर्जदाराने ही तक्रार दाखल केली आहे. अर्जदार यांची आई नामे (मयत) श्रीमती स्नेहलता भ्र. काशिनाथराव ठाकरे यांचे पूर्वाश्रमीचे नांव स्नेहलता पि. विठठलराव कागदे असून तक्रारदार त्यांचा मूलगा आहे. त्यांनी गैरअर्जदार यांच्या कडे ग्रामीण डाक आयुर्विमा योजने अंतर्गत स्वतःच्या आयुष्याची पॉलिसी उतरविली आहे. सदर पॉलिसीचा नंबर MHARA 828248 असून सदर पॉलिसी स्नेहलता यांनी दि.25.2.2005 रोजी काढली होती. पॉलिसी ही 60 महिन्याची असून त्यांचा हप्ता रु.835/- असा होता व पॉलिसीची मूदत दि.25.2.2016 पर्यत होती. सदर पॉलिसीचे हप्ते मयत स्नेहलता यांनी वेळच्या वेळी भरलेले आहेत. दि.26.4.2006 रोजी अचानक स्नेहलता यांचा मृत्यू झाला. त्यांचा वारसदार त्यांचा मूलगा/तक्रारदार यांने गैरअर्जदार यांच्या कार्यालयात जाऊन दि.2.5.2006 रोजी सर्व कागदपञ दाखल करुन रु.1,00,000/- विमा पॉलिसीची रक्कम मागितली. पण गैरअर्जदार यांनी त्यांची दखल घेतली नाही व अर्जदारास काही लेखीही कळविले नाही. त्यामुळे त्यांने सदरची तक्रार दाखल केली व अशी मागणी केली आहे की, तक्रारदार यांच्या मयत आई स्नेहलता यांनी गैरअर्जदार यांच्याकडे काढलेली पॉलिसीची रक्कम रु.1,00,000/- 12 टक्के व्याजासह मिळावी अशी मागणी केली आहे. गैरअर्जदार क्र. 1 व 2 हे वकिलामार्फत हजर झाले व त्यांनी आपले लेखी म्हणणे सादर केले आहे. अर्जदार यांनी केलेले सर्व आरोप खोटे असून फेटाळले आहेत. त्यांना मयत ही त्यांची आई होती या बददल काहीही माहीती नाही, पण नॉमीनी म्हणून श्री. प्रशांत काशीनाथराव ठाकरे यांचे नांवे आहे हे मान्य केले आहे. मयताची पॉलिसी होती हे त्यांनी मान्य केले आहे पण मयत ही पॉलिसीची हप्ता बरोबर भरत नव्हती असे म्हटले आहे. त्यांनी रु.795/- हप्ता भरला जो की रु.835/- भरणे आवश्यक होते तिने प्रत्येक महिन्यात रु.40/- कमी भरले आहेत. त्यामूळे ते विमा रक्कम मागू शकत नाहीत. तसेच तिने स्वतःला अस्थमा हा आजार होता ही माहीती गैरअर्जदारापासून लपवून ठेवली आहे त्यामूळे त्यांना विमा रक्कम देता येणार नाही. तसेच त्यांनी क्लेम योग्य कारणावरुन फेटाळल्याचे पञ त्यांना पाठवले होते. पॉलिसीच्या नियमाप्रमाणे त्यांनी हप्ता भरलेला नाही, तसेच त्यांनी त्यांना असलेला अस्थमा हा रोग लपविला त्यामूळे पॉलिसीच्या नियमाप्रमाणे त्यांचा क्लेम नामंजूर केलेला आहे. त्यामुळे गैरअर्जदारानी कोणतीही ञूटीची सेवा दिलेली नाही. म्हणून सदर तक्रार फेटाळावी अशी मागणी त्यांनी केली आहे. अर्जदार यांनी पूरावा म्हणून स्वतःचे शपथपञ, तसेच दि.2.5.2006 चे गैरअर्जदार यांना दिलेले पञ, मृत्यू प्रमाणपञ, ग्रामीण डाक आयुर्विमा, गैरअर्जदार यांचे दि.12.7.2005चे पञ, पॉलिसीच्या पासबूकची प्रत, टी.सी.ची प्रत,ग्रामपंचायत माहूर यांचे प्रमाणपञ इत्यादी कागदपञ दाखल केली आहेत. गैरअर्जदार यांनी पूरावा म्हणून पॉलिसी बॉन्ड, प्रपोजल फॉर्म, कॉन्फेडेन्शीयल रिपोर्ट किनवट यांचा, स्टेटमेंट दि.19.9.2006 चे, पासबूकाची प्रत इत्यादी कागदपञ दाखल केली आहेत. अर्जदार यांच्या तर्फे अड.अयाचित यांनी तर गैरअर्जदार यांचे तर्फे अड.बंगाळे यांनी यूक्तीवाद केला. यातील वाद फार थोडा आहे. गैरअर्जदाराने घेतलेले आक्षेप दोन आहेत. पहिला, अर्जदाराने पॉलिसी घेताना आपला आजार लपवून ठेवला त्यांना अस्थमा हा आजार होता परंतु या संबंधीचा आवश्यक तो वैद्यकीय अधिका-याचा पूरावा, आधीच्या उपचारा संबंधीचे दस्ताऐवज आणि संबंधीताचे प्रतिज्ञालेख हे गैरअर्जदाराने दाखल केलेले नाहीत. तसेच मृत्यूचे कारण व अस्थमाचा आजार यांचा संबंध दर्शवीणारे दस्ताऐवज दाखल केले नाहीत. त्यामुळे त्यांचा आक्षेप पूराव्या अभावी पूर्णतः निरर्थक आहे. गैरअर्जदाराचा दूसरा आक्षेप असा आहे की, मयताचा पॉलिसीचा हप्ता रु.835/- असताना प्रत्यक्षात रक्कम दरमहा रु.795/- एवढी जमा करण्यात आली ती कमी होती. पॉलिसीचा हप्ता बरोबर भरला नाही म्हणून आम्ही ती रक्कम देणे लागत नाही. यासंबंधी ज्याद्वारे पॉलिसीच्या हप्त्याची रक्कम वसूल केली गेली ते पासबूक अर्जदाराने दाखल केलेले आहे. त्यावर हप्त्याच्या रक्कमेचा उल्लेख रु.795/- एवढी केलेली आहे आणि त्याप्रमाणे प्रत्येक महिन्याला रु.795/- जमा करण्यात आलेले आहेत. गैरअर्जदारानेच पॉलिसी संबंधीच्या अर्जाची प्रत दाखल केलेली आहे. त्यामध्ये सूध्दा पॉलिसीचा हप्ता रु.795/- दाखविण्यात आलेला आहे. मृतक दरमहा रु.795/- भरीत होती आणि त्यामूळे ती रु.835/- भरु शकत नव्हती असा मूददा नव्हता. तिला जेवढी रक्कम भरण्यास सांगितली होती पॉलिसीप्रमाणे ती रक्कम बरोबर मयत भरत होती हे दस्तऐवजावरुन स्पष्ट आहे. थोडक्यात यामध्ये पॉलिसीचा हप्ता ठरविताना व स्विकारताना जर काही चूक झाली असेल तर ती गैरअर्जदाराची चूक आहे. अर्जदारास त्यासाठी दोषी धरता येणार नाही किंवा त्यांच्या पॉलिसीमूळे निर्माण झालेला हक्क नाकारता येणार नाही. गैरअर्जदाराने अर्जदारास दरम्यानच्या काळात कधीही रु.40/- कमी भरण्यात येत आहेत ते तूम्ही जमा करा अन्यथा पॉलिसी रदद होईल असे कळविले नाही. गैरअर्जदाराचा दिनांक 12.07.2005 या पञावर संबंधीत अधिका-यानी रु.40/- Short, Recover असा शेरा दिलेला आहे माञ ती कारवाई पूढे पूर्ण केलेली आहे असे दिसत नाही. थोडक्यात रु.40/- प्रिमियमची रक्कम कमी भरलेली वसूली करणे योग्य आहे. ती वसूल करण्याची गैरअर्जदाराची जबाबदारी होती. ही गैरअर्जदाराची सेवेतील ञूटी आहे. यास्तव आम्ही खालील प्रमाणे आदेश पारीत करीत आहोत. आदेश 1. अर्जदाराचा तक्रार अर्ज अंशतः मंजूर करण्यात येतो. 2. अर्जदार यांस रु.1,00,000/- एवढी पॉलिसीची रक्कम तीवर मागणी अर्ज दाखल तारीख दि.02.05.2006 पासून दोन महिन्यानंतर म्हणजे दि.02.07.2006 पासून ते रक्कमेच्या प्रत्यक्ष अदाईपावेतो द.सा.द.शे 12 टक्के व्याज दराने मिळून येणारी रक्कमत्या रक्कमेतून पॉलिसीचे हप्ते भरल्याचे काळात दरमहा रु.40/- प्रमाणे कमी भरलेली रक्कम वगळून येणारी रक्कम देण्यासाठी गैरअर्जदारानी न्यायमंचात आदेश मिळाल्याचे एक महिन्याचे आंत जमा करावेत. त्यानंतर सदर रक्कमेच्या विनीयोगासंबंधी आदेश पारीत करण्यात येईल. 3. अर्जदाराने मयत स्नेहलता ठाकरे यांचे सर्व वारसाची नांवे मंचास प्रतिज्ञालेखावर दयावेत. 4. गैरअर्जदार यांनी अर्जदारास तक्रार खर्चापोटी रु.1000/- दयावेत. 5. आदेशाचे पालन एक महिन्यात करावे. 6. पक्षकाराना आदेश कळविण्यात यावा. श्री.विजयसिंह राणे श्रीमती सुजाता पाटणकर श्री.सतीश सामते अध्यक्ष सदस्या सदस्य जे. यु. पारवेकर लघूलेखक |