निकालपत्र
तक्रार दाखल दिनांकः- 07/06/2012
तक्रार नोदणी दिनांकः- 15/06/2012
तक्रार निकाल दिनांकः- 12/12/2013
कालावधी 01वर्ष.05महिने.27 दिवस.
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्यायमंच, परभणी
अध्यक्ष श्री.पी.पी.निटूरकर.B.Com.LL.B.
सदस्या
सौ.अनिता ओस्तवाल. M.Sc.LLB.
---------------------------------------------------------------------------------------------------------
मंगेश बापुराव दराडे. अर्जदार
वय 30 वर्षे, धंदा शेती. अॅड.एस.एन.वेलणकर.
रा.लिंबाळा ता.जिंतूर जि.परभणी.
विरुध्द
कार्यकारी अभियंता. गैरअर्जदार.
महा.राज्य विद्युत वितरण कंपनी लि. अॅड.एस.एस.देशपांडे.
विभागीय /मंडळ कार्यालय, जिंतूर रोड, जि.परभणी.
______________________________________________________________________
कोरम - 1) श्री.पी.पी.निटूरकर. अध्यक्ष.
2) सौ.अनिता ओस्तवाल. सदस्या.
(निकालपत्र पारित व्दारा.श्री.पी.पी.निटुरकर.अध्यक्ष.)
गैरअर्जदाराच्या त्रुटीच्या व निष्काळजीपणाच्या सेवेमुळे अर्जदाराची म्हैस मरण पाऊन झालेल्या नुकसान भरपाई मिळण्याकरीता सदरची तक्रार अर्जदाराने दाखल केली आहे.
अर्जदाराची थोडक्यात तक्रार अशी आहे की, अर्जदार हा मौजे लिंबाळा ता.जिंतूर जि.परभणी येथील रहिवाशी असून तो शेतकरी आहे. या व्यतिरिक्त अर्जदार दुधाचा व्यवसाय करतो, गैरअर्जदाराने गावा लगतच्या डि.पी.व्दारे गावात लाईनव्दारे विद्युत पुरवठा दिलेला आहे व याच लाईनव्दारे अर्जदाराच्या कुटूंबात घरगुती दिलेला शेती वापराकरीता विद्युत पुरवठा गैरअर्जदाराकडून घेतला आहे.
अर्जदाराचे म्हणणे की, दिनांक 16/07/2011 रोजी अर्जदाराने त्याची म्हैसी शेतात चारावयास नेली होती व त्यात काजळी नावाची म्हैस होती, सदर दिवशी साधारण चार वाजता अर्जदार जनावरे घराकडे आणत असतांना गावाच्या डि.पी. जवळ आले असता, अर्जदाराची काजळी म्हैस इलेक्ट्रीक पोलला चिटकली व खांबात विद्युत प्रवाह उतरला असले कारणाने शॉक लागुन जागीच मरण पावली. अर्जदाराने सदर घटनेची माहिती जिंतूर पोलीस स्टेशनला कळवली, त्यानंतर Crime No. 12/2011 अन्वये तक्रार नोंदविण्यात आली. त्यानंतर पोलीसानी दिनांक 17/07/2011 रोजी घटनास्थळ पंचनामा केला. व मरणोत्तर पंचनामा केला. व पोलीसानी मरण पावलेली म्हैस वैद्कीय अधिकारी( जनावराचा दवाखाना ) पोस्टमार्टेम करता पाठविली व पोस्टमार्टेम केले व त्यात Electric Shock लागल्याने म्हैस मरण पावली असा अहवाल दिला.
अर्जदाराचे म्हणणे की, त्यानंतर मयत म्हशीचे नुकसान भरपाई 50,000/- रु. मिळावे म्हणून सर्व कागदपत्रांसह गैरअर्जदाराकडे अर्ज केला, परंतु त्याचा काहीही उपयोग झाला नाही, म्हणून अर्जदाराने नुकसान भरपाई मिळावी म्हणून वकीला मार्फत गैरअर्जदारास नोटीस पाठविली व नोटीस मिळून देखील गैरअर्जदाराने अर्जदारास नुकसान भापाई दिलेली नाही, पण त्याच वेळेस विद्युत निरीक्षक, विद्युत निरीक्षण विभाग परभणी यांनी अर्जदाराच्या वकीलाना बोलावुन रिपोर्ट देण्या विषयी पत्र देण्यास सांगीतले, त्याप्रमाणे जा.क्रमांक 49/2011 अन्वये 01/02/2012 रोजी अर्जदाराच्या वकीलाच्या नावे पत्र दिले व स्पष्ट केले की, खांबात विद्युत प्रवाह उतरल्याने शॉक लागुन म्हैस मरण पावली आहे. अर्जदाराचे म्हणणे की, सदरचे कृत्य हे गैरअर्जदाराच्या निष्काळजीपणामुळे अर्जदाराचे 50,000/- नुकसान झाले. व ती न दिल्याने अर्जदारास सदरची तक्रार दाखल करणे भाग पडले व मंचास विनंती केली आहे की, अर्जदाराचा अर्ज मंजूर करावा व गैरअर्जदारास आदेश करावा की, अर्जदाराचा म्हशीचा नुकसान भरपारई पोटी अर्जदारास 50,000/- रु. 10 टक्के ने द्यावे व मानसिक त्रासापोटी 5000/- व तक्रार अर्ज खर्चापोटी 2500/- गैरअर्जदाराने अर्जदारास देण्याचा आदेश व्हावा, अशी मागणी केली आहे.
तक्रार अर्जाच्या पुष्टयर्थ नि.क्रमांक 2 वर अर्जदाराने आपले शपथपत्र दाखल केले आहे.
अर्जदाराने पुराव्यासाठी नि.क्रमांक 4 वर 9 कागदपत्रांच्या यादीसह 9 कागदपत्रे दाखल केलेली आहेत. ज्यामध्ये सहाय्यक अभियंताने विद्युत निरीक्षकास लिहिलेले पत्र, अर्जदाराने पोलीस स्टेशन मध्ये दाखल केलेला तक्रार अर्ज, घटनास्थळ पंचनामा, मरणोत्तर पंचनामा, पी.एम. साठी लिहिलेले पत्र, पी.एम. रीपोर्ट, ग्रामपंचायत लिंबाळा याचा पशु दाखला, विद्युत निरीक्षकाने वकीलास दिलेले पत्र, अर्जदाराने वकीला मार्फत पाठवलेली नोटीसीची प्रत दाखल केले आहे. व तसेच अर्जदाराने नि.क्रमांक 11 वर 8 कागदपत्रांच्या यादीसह 8 कागदपत्रे दाखल केले आहेत, ज्यामध्ये अर्जदाराच्या वडीलाचे शपथपत्र, लाईट बील, 160 रु. भरल्याची पावती, अर्जदाराच्या नावे शेतीची विज जोडणीची प्रत, 7/12 उतारा, गट क्रिमांक 61 चा 7/12 उतारा, रेशन कार्ड दाखल केले आहे.
तक्रार अर्जास लेखी निवेदन सादर करण्यासाठी गैरअर्जदारांना मंचातर्फे नोटीस काढण्यात आली, गैरअर्जदार वकिला मार्फत मंचासमोर हजर, गैरअर्जदारास लेखी निवेदन सादर करण्यासाठी अनेक संधी देवुनही मुदतीत लेखी जबाब सादर न केले मुळे त्यांचे विरुध्द विनाजबाबाचा आदेश पारीत करण्यात आला.
तक्रार अर्जावरुन व दाखल केलेल्या कागदपत्रांवरुन निर्णयासाठी उपस्थित होणारे मुद्दे खालील प्रमाणे आहेत.
मुद्दे. उत्तर.
1 गैरअर्जदाराने अर्जदारास सेवेत त्रुटी दिली आहे काय ? होय.
2 अर्जदार त्याच्या मयत म्हशीची नुकसान भरपाई रु. 50,000/-
गैरअर्जदाराकडून मिळवणेस पात्र आहेत काय ? होय.
3 आदेश काय ? अंतिम आदेशा प्रमाणे.
कारणे.
मुद्दा क्रमांक 1 व 2.
अर्जदाराचे काजळी नावाच्या म्हशीचा दिनांक 16/07/2011 रोजी मौजे लिंबाळा ता.जिंतूर जि.परभणी येथील गावा लगतच्या गैरअर्जदाराच्या डि.पी. जवळ इलेक्ट्रीक पोलला शॉक लागुन चिटकली व त्यात म्हशीचा मृत्यू झाला ही बाब नि.क्रमांक 4/2 वरील अर्जदाराने पोलीस स्टेशन येथे दिनांक 16/07/2011 रोजी दिलेल्या अर्जावरुन व तसचे नि.क्रमांक 4/3 Crime No 12/11 च्या एफ.आय.आर. च्या प्रतवरुन दिसून येते व सदरची बाब नि.क्रमांक 4/4 वरील इन्क्वेस्ट पंचनामावरुन दिसू येते.
अर्जदाराच्या काजळी नावाच्या म्हशीचा मृत्यू दिनांक 16/07/2011 रोजी इलेक्ट्रीक शॉक लागुन झाला होता ही बाब नि.क्रमांक 4/6 वरील दाखल केलेल्या पोस्ट मार्टेम रिपोर्ट वरुन सिध्द होते.
अर्जदाराची मरण पावलेली काजळी म्हैस ही 50,000/- रु. ची होती ही बाब अर्जदाराने दाखल केलेल्या नि.क्रमांक 4/7 वरील म्हशीच्या दाखला क्रमांक 69 अन्वये ग्रामपंचायत कार्यालय लिंबाळा ता.जिंतूर जि. परभणी याने दिलेल्या दाखल्यावरुन सिध्द होते.
अर्जदाराचे म्हणणे की, सदरच्या झालेल्या नुकसानीस गैरअर्जदार जबाबदार आहेत, हे म्हणणे मंचास योग्य वाटते, कारण नि.क्रिमांक 4/8 वरील विद्युत निरीक्षण विभाग परभणी येथील विद्युत निरीक्षक परभणी याने अर्जदाराच्या वकीलास लिहिलेल्या खुलासा पत्रावरुन हे सिध्द होते की, संबंधीत निरीक्षकाने अर्जदाराच्या म्हशीच्या अपघाताची चौकशी कार्यालया मार्फत करुन अभिप्राय दिला की, अपघाता स्थळी मध्यम दाब वाहीणीच्या लोखंडी खांबावरील 3 फेजचा जंपर तार खांबास लागला, त्यामुळे खांब विद्युत भारीत झाला मध्यम दाब वाहिणीस भुसंबंधन नसल्यामुळे व डि.पी. मध्ये जास्त क्षमतेचे फ्युजेस असल्यामुळे खांब विद्युत भरीतच राहिला व त्याच्या संपर्कात अर्जदाराची म्हैस आली तिला शॉक लागला व अपघात घडला.
यावरुन हे सिध्द होते की, गैरअर्जदाराचा निष्काळजीपणा होता, म्हणून सदर खांबात विद्युत प्रवाह उतरला. गैरअर्जदाराने योग्य ती काळजी वेळेवर घेतली असती तर सदरचा अपघात घडला नसता व अर्जदाराच्या म्हशीचा मृत्यू झाला नसता अर्जदारास सदर झालेल्या नुकसानिस गैरअर्जदारच जबाबदार आहेत, असे मंचास वाटते.
अर्जदाराने त्याची झालेली नुकसान भरपाई मिळावी म्हणून गैरअर्जदारास वकीला मार्फत दिनांक 16/11/2011 रोजी नोटीस दिली होती, ही बाब नि. क्रमांक 4/8 वरील कागदपत्रावरुन सिध्द होते.गैरअर्जदाराने प्रस्तुत प्रकरणात लेखी जबाब दाखल न करुन अप्रत्यक्षपणे अर्जदाराची तक्रार मान्यच केली असा निष्कर्ष निघतो.
अर्जदाराचे म्हणणे की, त्याचे कुटूंब एकत्रित रहाते त्याच्या अजोबाने व वडीलाने त्यांचे नावे गैरअर्जदाराकडून विद्युत पुरवठा घेतला आहे. ही बाब नि.क्रमांक 11/1 वरील अर्जदाराच्या वडीलच्या शपथपत्रावरुन दिसून येते व या बाबत नि.क्रमांक 11/2 व 11/4 वरील लाईट बिलावरुन दिसून येते.
निश्चितच गैरअर्जदाराने अर्जदारास निष्काळजीपणाची सेवा देवुन सेवेत त्रुटी दिली आहे. अर्जदार हा गैरअर्जदाराकडून त्याच्या काजळी म्हैशीच्या नुकसान भरपाई पोटी 50,000/- रु. मिळवण्यास पात्र आहे, असे मंचास वाटते. म्हणून मुद्दा क्रमांक 1 व 2 चे होकारार्थी उत्तर देवुन मंच खालील प्रमाणे आदेश पारीत करीत आहे.
आदेश
1 अर्जदाराचा तक्रार अर्ज अंशतः मंजूर करण्यात येत आहे.
2 गैरअर्जदाराने आदेश तारखे पासून 30 दिवसांच्या आत म्हशीची नुकसान
भरपाई पोटी रु. 50,000/- फक्त ( अक्षरी रु. पन्नासहजार फक्त )
अर्जदारास द्यावेत.
3 तक्रारीचा खर्च ज्याचा त्यांनी सोसावा.
4 आदेशाच्या प्रती पक्षकारांना मोफत पुरवाव्यात.
सौ.अनिता ओस्तवाल. श्री. पी.पी.निटूरकर
मा.सदस्या. मा.अध्यक्ष.