जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, धुळे.
ग्राहक तक्रार क्रमांक – १८०/२०१२
तक्रार दाखल दिनांक – २२/१०/२०१२ तक्रार निकाली दिनांक – १३/०८/२०१४
सौ.रेखा सयाजी पाटील, उ.व.५५,
धंदा – घरकाम,
राहणार – प्लॉट नं.२७, तुळशीराम नगर,
देवपूर, धुळे, तो.जि. धुळे - तक्रारदार
विरुध्द
महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी लि.
नोटीसची बजावणी – म.अधिक्षक अभियंता,
महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी लि.,
सहयाद्री बिल्डींग, आनंदनगर, देवपूर, धुळे,
तो.जि. धुळे. यांचेवर व्हावी. - सामनेवाले
न्यायासन
(मा.अध्यक्षा – सौ.व्ही.व्ही.दाणी)
(मा.सदस्य – श्री.एस.एस.जोशी)
उपस्थिती
(तक्रारदारातर्फे – अॅड.श्री.डी.डी. जोशी)
(सामनेवालेतर्फे – अॅड.श्री.एल.पी. ठाकूर)
निकालपत्र
(द्वाराः मा.सदस्य – श्री.एस.एस.जोशी)
१. सामनेवाले यांनी परत केलेल्या मिटर कॉस्टवरील व्याज मिळावे यासाठी तक्रारदार यांनी सदरची तक्रार दाखल केली आहे.
२. तक्रारदार यांनी आपल्या तक्रारीत म्हटले आहे की, सामनेवाले यांनी सन २००२ मध्ये त्यांच्या घराचे जुने वीज मीटर बदलून त्याजागी नविन मिटर लावले. त्याबदल्यात तक्रारदार यांच्याकडून रूपये १,०००/- मिटरकॉस्ट वसूल करण्यात आली. त्याबाबत तक्रारदार यांनी वीज नियामक आयोगाकडे तक्रार केल्यानंतर आयोगाने मिटरकॉस्ट तक्रारदार यांना परत करण्यात यावी असे आदेश दिले. त्यानुसार सामनेवाले यांनी तक्रारदार यांच्या वीज बिलात ती रक्कम वर्ग केली. तथापि, त्या रकमेवर १५ टक्केप्रमाणे व्याज मिळावे अशी मागणी तक्रारदार यांनी केली होती. त्या मागणीवर आयोगाने कोणताही निर्णय दिला नाही. व्याजाची ही रक्कम सामनेवाले यांच्याकडून मिळावी अशी मागणी तक्रारदार यांनी केली आहे. त्यासोबत शारीरिक व मानसिक त्रासापोटी रूपये १५,०००/- भरपाई मिळावी अशी मागणी केली आहे.
३. आपल्या तक्रारीच्या पुष्ट्यर्थ तक्रारदार यांनी सामनेवाले यांना आणि सामनेवाले यांनी तक्रारदार यांना पाठविलेल्या पत्रांच्या प्रती दाखल केल्या आहेत.
४. सामनेवाले यांनी हजर होवून आपला खुलासा दाखल केला. त्यात म्हटले आहे की, या मेहरबान मंचास सदर तक्रारीवर न्यायनिवाडा करण्याचे अधिकार नाही. तक्रारदार यांना त्यांच्या मिटरकॉस्टची रक्कम मिळाली आहे. त्याबाबतच्या आदेशात वीज नियामक आयोगाने व्याज देण्यासंदर्भात कोणताही उल्लेख केलेला नाही. त्यामुळे तक्रारदार यांना व्याज मागण्याचा अधिकार नाही. तक्रारदार यांची तक्रार खर्चासह रदद करावी अशी मागणी सामनेवाले यांनी केली आहे.
५. आपल्या खुलाश्याच्या पुष्ट्यर्थ सामनेवाले यांनी वीज नियामक आयोगाने दिलेल्या आदेशाची प्रत दाखल केली आहे.
६. तक्रारदार यांची तक्रार त्यासोबत त्यांनी दाखल केलेली कागदपत्रे, सामनेवाले यांचा खुलासा, त्यासोबत त्यांनी दाखल केलेली कागदपत्रे आणि उभयपक्षांच्या विद्वान वकिलांनी केलेला युक्तिवाद यावरून आमच्यासमोर निष्कर्षासाठी पुढील मुददे उपस्थित होतात.
मुददे निष्कर्ष
- सदर तक्रारीवर न्यायनिवाडा करण्याचे
या मंचास अधिकार आहे काय ? नाही
ब. आदेश काय ? अंतिम आदेशाप्रमाणे
७. मुद्दा ‘अ’ - तक्रारदार यांचा ग्राहक क्रमांक ०९१९७१०२२६८५ असा आहे. सामनेवाले यांनी सन २००२ मध्ये तक्रारदार यांचे जुने वीज मिटर बदलून त्या जागी नवे वीज मिटर बसवले. त्यापोटी सामनेवाले यांनी तक्रारदार यांच्याकडून रूपये १००० मिटरकॉस्ट म्हणून वसूल केले. त्याबददल तक्रारदार यांनी महाराष्ट्र वीज नियामक आयोगाकडे दाद मागून वसूल केलेली मिटरकॉस्ट आणि त्यावर १५ टक्के प्रमाणे व्याज परत मिळावे अशी मागणी केली होती. तक्रारदार यांच्या या तक्रारीवर वीज नियामक आयोगाने दिनांक २०/०४/२००५ रोजी निर्णय दिला आहे. त्या निर्णयात तक्रारदार यांना रूपये १०००/- पुढील वीज बिलात वर्ग करून परत करावे असे नमूद करण्यात आले आहे. या निकालाची प्रत सामनेवाले यांनी सदर तक्रारीच्या सुनावणीप्रसंगी दाखल केली आहे. सामनेवाले यांच्याकडून मिटरकॉस्टची रक्कम वीज बिलात वर्ग झाल्यानंतर तक्रारदार यांनी त्यांच्या व्याजाच्या मागणीसाठी या मंचात तक्रार दाखल केली आहे. याबाबत सामनेवाले यांच्या विद्वान वकिलांनी त्यांच्या युक्तिवादात काही मुददे उपस्थित केले. तक्रारदार यांनी मिटरकॉस्ट परत मिळावी आणि त्यावर १५ टक्के व्याज मिळावे या मागणीसाठी वीज नियामक आयोगाकडे दाद मागितली होती. आयोगाने दिनांक २०/०४/२००५ रोजी दिलेल्या निकालानुसार तक्रारदार यांना केवळ मिटरकॉस्टची रक्कम वीज बिलात वर्ग करून परत करण्याचे आदेश दिले आहेत. त्यात तक्रारदार यांना १५ टक्के व्याज देण्यात यावे याबाबतचे आदेश नाही. त्यामुळे केवळ व्याजाच्या मागणीसाठी तक्रारदार यांना या मंचात दाद मागता येणार नाही किंवा मंचाला तक्रारदार यांची मागणी मंजूर करता येणार नाही, असा मुददा सामनेवाले यांच्या वकिलांनी युक्तिवादात उपस्थित केला होता.
सामनेवाले यांच्या वकिलांनी उपस्थित केलेल्या मुद्यावर, वीज नियामक आयोगाने मिटरकॉस्ट परत करण्याचे आदेश दिलेले असतांना केवळ त्यावरील व्याजाच्या मागणीसाठी या मंचात तक्रारदार यांना दाद मागता येते काय, त्याचप्रमाणे ती मागणी मंजूर करण्याचा या मंचाला अधिकार आहे काय, याबाबतचा कोणताही खुलासा तक्रारदार यांनी केलेला नाही. तक्रारदार यांना अशा प्रकारचा अधिकार कोणत्या तरतुदीनुसार प्राप्त होतो, याबाबतचे स्प्ष्टीकरण तक्रारदार यांनी केलेले नाही किंवा त्यांच्या मागणीच्या पुष्ट्यर्थ दाखला, पुरावा दाखल केलेला नाही.
वरील मुद्याचा विचार करता सामनेवाले यांच्या वीज नियामक आयोगाने दिलेल्या निकालावर भाष्य करण्याचा, वेगळे मत व्यक्त करण्याचा किंवा त्या निकालाबाबत अधिकचा निर्णय देण्याचा या मंचाला अधिकार नाही, असे आमचे मत बनले आहे. तक्रारदार यांनी त्यांच्या मागणीसाठी सामनेवाले यांच्या वीज नियामक आयोगाकडे दाद मागितली होती. त्याबाबत आयोगाने निकालही दिला आहे. त्या निकालाबाबत तक्रारदार यांना आक्षेप असल्यास, अधिकची काही मागणी असल्यास, तो निकाल असमाधानकारक वाटत असल्यास तक्रारदार यांनी त्याच आयोगाकडे किंवा वरिष्ठ आयोगाकडे दाद उचित होईल असेही आम्हाला वाटते. म्हणून मुद्दा ‘अ’ चे उत्तर आम्ही नकारार्थी देत आहोत.
८. मुद्दा ‘ब ’- वरील सर्व मुद्यांचा आणि विवेचनाचा विचार करता वीज नियामक आयोगाने दिलेल्या निकालावर पुन्हा नव्याने आदेश करण्याचे या मंचाला कसे अधिकार आहेत, याबाबतचे स्पष्टीकरण तक्रारदार यांनी केलेले नाही, त्यामुळे तक्रारदार यांची तक्रार मंजूर करता येणार नाही असे आमचे मत बनले आहे. याच कारणामुळे आम्ही पुढीलप्रमाणे आदेश पारीत करीत आहोत.
आ दे श
- तक्रारदार यांचा तक्रार अर्ज नामंजूर करण्यात येत आहे.
- खर्चाबाबत कोणतेही आदेश नाही.
-
-
(श्री.एस.एस. जोशी) (सौ.व्ही.व्ही. दाणी)
सदस्य अध्यक्षा
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, धुळे.