जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, धुळे.
ग्राहक तक्रार क्रमांक – १९२/२०१२
तक्रार दाखल दिनांक – ३१/१०/२०१२
तक्रार निकाली दिनांक – २३/१२/२०१३
नारायण रामू चौधरी
वय ७५, सेवानिवृत्त
रा.६१, शांतिनिवास,
प्रमोदनगर सेक्टर २,
देवपूर, धुळे – ४२४००२. ................ तक्रारदार
विरुध्द
अधिक्षक अभियंता
महाराष्ट्र राज्य वीज वितरण
कंपनी मर्यादित
सहयाद्री बिल्डींग, आनंदनगर, देवपूर,
धुळे. ............ सामनेवाले
न्यायासन
(मा.अध्यक्षा – सौ.व्ही.व्ही. दाणी)
(मा.सदस्या – सौ.एस.एस.जैन)
(मा.सदस्य – श्री.एस.एस.जोशी)
उपस्थिती
(तक्रारदारा तर्फे – स्वतः)
(सामनेवाला तर्फे – वकील श्री.एल.पी. ठाकूर)
निकालपत्र
(दवाराः मा.सदस्य – श्री.एस.एस. जोशी)
१. सामनेवाला वीज कंपनीने जुने वीज मिटर काढून नवीन वीज मीटर बसविले. त्यापोटी रूपये २००० मिटर कॉस्ट म्हणून वसूल केले. ही वसूल केलेली रक्कम बेकायदेशीरपणे घेण्यात आली. ती रोख स्वरूपात परत मिळावी यासाठी तक्रारदार यांनी सदरची तक्रार दाखल केली आहे.
२. तक्रारदार यांनी आपल्या तक्रारीत म्हटले आहे की, ते सामनेवाला यांचे ग्राहक आहेत. त्यांच्याकडे दोन वीज मिटर असून त्यांचे क्रमांक ०९१९७१०००४६१ व ०९१९७१०९३८२५ असे आहेत. सामनेवाला यांनी दि.१० मे २००२ रोजी तक्रारदार यांचे चालू स्थितीतील वीज मिटर्स काढून त्याऐवजी नवीन इलेक्ट्रॉनिक्स मिटर बसविले. त्यासाठी सामनेवाला यांनी प्रत्येकी रू.१०००/- या प्रमाणे रूपये २००० मिटर कॉस्ट म्हणून वसूल केले. ही घेतलेली रक्कम बेकायदेशीर असून ती रक्कम रोख स्वरूपात परत व्याजासह मिळावी यासाठी तक्रारदार यांनी दि.०७/०१/२०१२ रोजी अर्ज केला. त्याबाबत व्याजाचा उल्लेख न करता ती रक्कम वीज बिलातून वजावट करण्यात येईल, असे सामनेवाला यांनी तक्रारदारांना कळविले. मात्र वीज बिलातील वजावट मान्य नसून रूपये २००० ही रक्कम रोख स्वरूपात १५ टक्के व्याजासह आणि शारीरिक, मानसिक त्रास व तक्रारीचा खर्च रूपये १५००० मिळावा अशी मागणी त्यांनी तक्रारीत केली आहे.
तक्रारदार यांनी आपल्या तक्रारीच्या पुष्टयर्थ वीज कंपनीने (जुने नाव महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळ) दि.०२/०५/२००२ रोजी दिलेले वीज बिल, तक्रारदार यांनी सामनेवाला यांना दि.०७/०१/२०१२, दि.११/०४/२०१२,दि.०८/०५/२०१२, दि.१६/०५/२०१२, दि.०६/०६/२०१२ रोजी पाठविलेले पत्र आणि वीज कंपनीने तक्रारदार यांना पाठविलेले दि.३१/०३/२०१२ चे पत्र दाखल केले आहे. तक्रारदाराने तक्रारीसोबत पुरवठा संहितेची प्रतही दाखल केली आहे.
३. तक्रारदार यांच्या तक्रारीवर सामनेवाला यांनी मंचात हजर होवून खुलासा दाखल केला आहे. त्यात म्हटले आहे की, तक्रारदार यांची तक्रार खोटी आहे. या मंचास तक्रार चालविण्याचे व न्यायनिवाडा करण्याचे अधिकार क्षेत्र नाही. तक्रारीस मुदतीची बाधा येते. तक्रारदाराकडून बेकायदेशीर रक्कम वसूल केलेली नाही. अधिका-यांची दिशाभूल करून, दुस-या प्रकरणातील निर्णय दाखवून तक्रारदाराने सामनेवाला यांच्याकडून बेकायदेशीर पत्र घेतले आहे. सामनेवाला यांना वीज मिटर बदलण्याचे व त्याची रक्कम वसूल करण्याचे अधिकार आहेत. तक्रारदाराच्या मिटरचा वापर बरोबर नव्हता व रिडींगमध्ये सातत्य नव्हते यामुळेही मिटर बदलावे लागले आहे, असे सामनेवाला यांनी खुलाशात म्हटले आहे. तक्रारदाराची तक्रार खर्चासह रद्द करावी अशी मागणी सामनेवाला यांनी केली आहे.
सामनेवाला यांनी आपल्या खुलाशाच्या पुष्टयर्थ वीज वितरण कंपनीचे दि.०३/०९/२००७ चे परिपत्रक आणि दि. ३० ऑक्टोबर २०१३ रोजीचे वीज देयक दाखल केले आहे. या देयकांत तक्रारदाराला देय असलेली रक्कम वजा करण्यात आली आहे.
४. तक्रारदाराची तक्रार, सामनेवाला यांचा खुलासा, तक्रारदाराने दाखल केलेली कागदपत्रे, सामनेवाला यांनी दाखल केलेली कागदपत्रे पाहता, तक्रारदाराने स्वतः केलेला युक्तिवाद आणि सामनेवालाच्या विद्वान वकिलांनी केलेला युक्तिवाद ऐकल्यावर मंचासमोर खालील मुद्दे उपस्थित होतात. त्यांची उत्तरे आम्ही सकारण देत आहोत.
मुददे निष्कर्ष
अ. तक्रारदार हे सामनेवाला यांचे
ग्राहक आहेत काय का ? होय
ब. तक्रार मुदतीत दाखल आहे का ? होय
क. तक्रारदार यांना द्यावयाच्या सेवेत सामनेवाले
यांनी कसूर केली आहे का ? होय
ड. तक्रारदार हे त्यांची रक्कम परत
मिळण्यासपात्र आहेत का? होय
इ. आदेश काय ? अंतिम आदेशाप्रमाणे
विवेचन
५. मुद्दा ‘अ’ - तक्रारदार यांनी सामनेवाला यांच्याकडून वीज जोडणी घेतली आहे. ते सामनेवाला यांचे अधिकृत ग्राहक आहेत. त्याबाबत सामनेवाला यांच्याकडूनही कोणताही वाद नाही. त्यामुळे मुद्दा ‘अ’ चे उत्तर आम्ही होय देत आहोत.
६. मुद्दा ‘ब’ - सामनेवाले यांनी आपल्या खुलाशात तक्रार मुदतीत दाखल केलेली नाही असा मुद्दा उपस्थित केला. मात्र दाखल कागदपत्रे पाहता सन २००२ पासून तक्रारदार यांचा पाठपुरावा सुरू होता हे दिसते. दि.३१ मार्च २०१२ रोजी सामनेवाला यांनी तक्रारदार यांची रक्कम बिलातून वजावट करण्याची तयारी दर्शविली. हे आपणास मान्य नसल्याचे तक्रारदार यांनी ११ एप्रिल २०१२ रोजी कळविले. तेथूनच वादास कारण घडले असे मंचाला वाटते.महणूनच मुद्दा ‘ब’ चे उत्तर आम्ही होय असे देत आहोत.
७. मुद्दा ‘क’ - तक्रारदार यांनी कोणतीही मागणी केलेली नसतांना त्यांचे वीज मिटर बदलण्यात आले. त्याची मिटर कॉस्ट रूपये २००० सामनेवाला यांनी तक्रारदार यांच्याकडून वसूल केली. ही रक्कम बेकायदेशीरपणे वसूल करण्यात आली. ती रोखीने १५ टक्के व्याजासह परत मिळावी अशी तक्रारदार यांची मागणी आहे. त्याबाबत वारंवार पत्र व्यवहार करूनही सामनेवाला यांनी तक्रारदार यांना रक्कम परत केली नाही.
वीज वितरण कंपनीच्या दि. ३१ मार्च २०१२ च्या पत्रानुसार सामनेवाला यांनी वरील रक्कम तक्रारदार यांच्या वीज बिलात वजावट करण्याची तयारी दर्शविली आहे. तथापि, हा निर्णय तक्रारदार यांना मान्य नाही. आपल्याला रक्कम रोखीनेच मिळाली पाहिजे असे तक्रारदार यांनी दि.०८/०५/२०१२ रोजी सामनेवाला यांना लेखी कळविले आहे. तक्रारदार यांचे ०९१९७१०००४६१ व ०९१९७१०९३८२५ या दोन्ही ग्राहक क्रमांकाचे वीज मिटर सामनेवाला यांनी १० मे २००२ रोजी चालू स्थितीत असतांना बदलले. मिटर बदलण्यामागे कोणतेही सबळ कारण सामनेवाला यांनी दिले नाही. हे मिटर बदलण्याची कॉस्ट प्रत्येकी रूपये १००० म्हणजेच एकूण रूपये २००० तक्रारदार यांच्याकडून वसूल केले. ही वसुली बेकायदेशीर आहे, असे तक्रारदाराचे म्हणणे आहे. त्याच्या पुष्टयर्थ त्यांनी पुरवठा संहितेची (supply code) प्रत दाखल केली आहे. त्यात मिटरचा पुरवठा व किंमत या कलमात ‘मिटरचे हरवणे किंवा जळणे सोडल्यास, वितरण परवानाधारक वीजपुरवठा ग्राहकाला चालू असतानाच्या कालावधीत एका पेक्षा अधिक वेळा मिटरची किंमत वसूल करू शकणार नाही’ असे म्हटले आहे. यावरून सामनेवाला यांनी तक्रारदार यांना मिटर बदलण्याची कोणतीही पूर्वसूचना दिली नाही किंवा संबंधित नवीन मिटरची कॉस्ट त्यांच्याकडून वसूल केली जाणार आहे याचीही पूर्वसूचना त्यांना दिली नाही, हे स्पष्ट होते. यामुळे सामनेवाला यांनी तक्रारदार यांना द्यावयाच्या सेवेत त्रुटी केली असे दिसून येते. म्हणूनच मुद्दा ‘क’ चे उत्तर आम्ही होय असे देत आहोत.
८. मुद्दा ‘ड’ - तक्रारदार यांनी आपल्या मिटरबाबत कोणतीही तक्रार सामनेवाला यांच्याकडे केली नव्हती किंवा मिटर बदलवून देण्याची मागणीही केली नव्हती. मग त्यांनी त्याची कॉस्ट का भरावी ? हा तक्रारदार यांचा प्रश्न आहे. तो रास्त आहे असे मंचाला वाटते. म्हणूनच तक्रारदार हे त्यांची रक्कम परत मिळण्यास पात्र आहेत असे मंचाचे मत बनले आहे. त्याचमुळे मुद्दा ‘ड’ चे उत्तर आम्ही होय असे देत आहोत.
९. मुद्दा ‘इ’ – तक्रारदार यांच्या मिटरचा वापर बरोबर नव्हता व रिडींगमध्ये सातत्य नव्हते या कारणामुळे तक्रारदार यांचे मिटर बदलावे लागले असे सामनेवाला यांनी खुलाशात म्हटले आहे. पण त्याच्या पुष्टयर्थ त्यांनी कोणताही पुरावा दाखल केलेला नाही. शासनाच्या निर्देशानुसार वीज चोरी रोखण्यासाठी डिस्क मिटर बदलून इलेक्ट्रॉनिक मिटर बसविण्याचे काम सन २००२ मध्ये करण्यात आले. त्याचाच एक भाग म्हणून तक्रारदाराचे मिटर बदलण्यात आले. सामनेवाला यांना वीज मिटर बदलविण्याचा व त्याची रक्कम वसूल करण्याचा अधिकार आहे, असेही खुलाशात म्हटले आहे. मात्र मिटरची कॉस्ट वीज ग्राहकांकडून वसूल करावी याचा उल्लेख नाही. त्याच्या पुष्टयर्थ सामनेवाला यांनी त्यांचे नियम व अटी दाखल केलेल्या नाहीत. या मुद्यांचा विचार करता सामनेवाला यांनी तक्रारदार यांच्याकडून कोणतेही सबळ कारण न देता वीज मिटरची रक्कम वसूल केली असे मंचाला वाटते. तक्रारदार यांच्या तक्रारीनंतर आणि मोठ्या पाठपुराव्यानंतर सामनेवाला यांनी त्यांची रक्कम परत करण्याची तयारी दाखविली आहे. मात्र ही रक्कम रोख स्वरूपात परत करता येणार नाही, असे परिपत्रक (दि.०३ स्प्टेंबर २००७) सामनेवाला यांनी दाखल केले आहे. त्यात ‘Meter cost shall be refunded to all such consumers through energy bills by giving credit of amount recovered against cost of meter’ असे नमूद केले आहे. परंतु सामनेवाला यांनी आपल्या खुलाश्यात शासनाचे निर्देशनानुसार वीज चोरी बंद करण्याचे हेतुने डिस्कमिटर बदलवून इलेक्ट्रॉनिक मिटर बसवण्यात आले होते त्याचा भाग म्हणून तक्रारदारचे मिटर बदलले आहे असे नमुद आहे. त्यामुळे वरील परिपत्रक येथे लागु होत नाही आणि परिपत्रकाचा आधार घेवून तक्रारदार यांना देय असलेली रक्कम वीज बिलात ‘अॅडजस्ट’ करता येणार नाही, असे मंचाचे मत बनले आहे. सामनेवाला हे सदरची रक्कम दि.१० मे २००२ पासून वापरीत आहेत. हे गैर आहे. त्यामुळे सदर रक्कम व्याजासह परत मिळणे, हा तक्रारदाराचा अधिकार आहे. त्याचमुळे आम्ही पुढीलप्रमाणे आदेश पारित करीत आहोत.
आ दे श
१. तक्रारदार यांची तक्रार अंशतः मंजूर करण्यात येत आहे.
२. सामनेवाला यांनी निकालापासून ३० दिवसाच्या आत,
(अ) तक्रारदार यांच्याकडून वसूल करण्यात आलेली मिटर कॉस्टची
रक्कम रूपये २०००/- (अक्षरी रूपये दोन हजार मात्र) त्यांना दि.१० मे २००२ पासून द.सा.द.शे. ६ टक्के व्याजासह रोखीने परत करावी.
(ब) तक्रारदार यांना मानसिक त्रासापोटी रूपये ५०० (अक्षरी रूपये पाचशे मात्र) व तक्रारीचा खर्च रूपये ५००/- (अक्षरी रूपये पाचशे मात्र) द्यावा.
धुळे.
दि.२३/१२/२०१३
(श्री.एस.एस. जोशी) (सौ.एस.एस. जैन) (सौ.व्ही.व्ही. दाणी) सदस्य सदस्या अध्यक्षा
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, धुळे.