(मंचाचे निर्णयान्वये, श्री. सादिक मोहसिनभाई झवेरी, सदस्य)
तक्रारकर्त्याने सदरची तक्रार ग्राहक संरक्षण कायदा 1986 चे कलम 12 अंतर्गत दाखल केलेली असुन तक्रारीचा आशय थोडक्यात खालिल प्रमाणे..
1. तक्रारकर्ता हा मयत श्री. यशवंतराव नारायण धकाते यांचा नातु असुन सध्या तो देसाईगंज, वडसा येथे राहतो. तक्रारकर्त्याचे आजोबा श्री. यशवंतराव नारायण धकाते यांचे नावे मौजा गडचिरोली शहरात दुर्गा मंदिर गल्लीजवळ घर आहे. सदर घरी विरुध्द पक्ष क्र.1 ते 3 यांचेकडून विज पुरवठा घेतला असुन त्यांचा ग्राहक क्रमांक 470120307106 व मीटर क्र. आरएलए-20 (Old Gadchiroli) असा असुन ब-याच वर्षांपासुन तेथे विज पुरवठा असुन तेथील विजेचे बिलांचा नियमीत भरणा करीत असतात.
2. तक्रारकर्त्याने आपल्या तक्रारीत नमुद केले आहे की, विरुध्द पक्ष क्र.1 ते 3 यांनी दि.22.09.2017 रोजी विज पुरवठा खंडीत केलेला आहे व विज पुरवठा खंडीत करतेवेळी विरुध्द पक्षांतर्फे कोणतीही पूर्व सुचना किंवा नोटीस देण्यांत आलेली नव्हती. त्यानंतर तक्रारकर्त्याने विरुध्द पक्षांकडे चौकशी केली असता त्यास रु.30,560/- ची थकबाकी असल्याचे सांगितले. तक्रारकर्त्याने पुढे नमुद केले आहे की, त्याने विरुध्द पक्षांकडे दि.05.10.2017 रोजी तक्रार करुन रु.15,794/- अधिकचा भुर्दंड व रु.15,871/- चे (Credit Bill) लावण्यांत आले आहे. तसेच मीटर सुरु असतांना Faulty Meter म्हणून सरासरी बिल विरुध्द पक्षातर्फे देण्यांत येत होते त्यात तक्रारकर्त्याचा काहीही दोष नाही. त्यानंतर तक्रारकर्त्याचे जूने मीटर दि.07.01.2017 रोजी बदलवुन नवीन मीटर विरुध्द पक्षांतर्फे लावण्यांत आले. तक्रारकर्त्याचे पुढे असे म्हणणे आहे की, विरुध्द पक्षांनी दि.07.01.2017 पर्यंतचे विज बिल फेब्रुवारी-2017 चे बिलात जोडून देणे गरजेचे होते, परंतु त्यांनी तसे न करता एप्रिल 2017 चे बिलात रु.22,357/- ची आकारणी करुन त्यामधुन रु.11,129.35 वजा करुन रु.11,220/- ची आकारणी केली. त्याचप्रमाणे तक्रारकर्त्याने दि.16.06.2017 रोजी रु.15,000/- विज बिलाचा भरणा केला, त्यानंतर विरुध्द पक्षाने जुन-2017 ला रु.59,380/- चे विज बिल दिले असता तक्रारकर्त्याने त्यांचे कार्यालयात जाऊन तोंडी तक्रार केली तेव्हा विरुध्द पक्षांनी अधिकचे रु 23,599/- ची आकारणी केली होती ही आकारणी कमी करुन रु.20,780/- चे विज बिल दिले. त्यानंतर तक्रारकर्त्यास जुलै-2017 मध्ये रु.25,270/- चे विज बिल दिले. तक्रारकर्त्याने नमुद केले आहे की, त्याने विरुध्द पक्षांचे कार्यालयात जाऊन आपली बाजू समजावुन सांगितली तेव्हा विरुध्द पक्षांनी काहीही न ऐकता बिलाची किस्त पाडून देण्याबाबत सांगितले. त्यानंतर तक्रारकर्त्याने बिलाची रक्कम भरण्याबाबत असमर्थता दर्शविल्यानंतर विरुध्द पक्षांनी ऑगष्ट—2017 चे विज बिल रु.28,110/- पाठविले ज्यात जुलै-2017 ची थकबाकी रु.25,325.67 दर्शविण्यात आलेली आहे. यानंतर पुन्हा तक्रारकर्त्या विरुध्द पक्षांचे कार्यालयात जाऊन जुन्या थकबाकीचा तपशिल मागितला असता त्यांनी तो देण्यास टाळाटाळ केली.
3. तक्रारकर्त्याने पुढे नमुद केले आहे की, विरुध्द पक्ष क्र. 1 ते 3 यांनी कोणतीही नोटीस न देता किंवा तक्रारकर्त्यास बचावाची कोणतीही संधी न देता दि.22.09.2017 रोजी विज पुरवठा बंद केला. त्यामुळे तक्रारकर्त्याचे घरी राहणा-या भाडेकरुंना अंधारात रहावे लागले व कालांतराने ते रुम सोडून निघून गेल्यामुळे तक्रारकर्त्याला दरमहा रु.6,500/- मिळणा-या किरायापासुन वंचित रहावे लागत आहे. त्यामुळे तक्रारकर्त्याने विरुध्द पक्ष क्र. 1 ते 3 यांना दि.29.02.2018 रोजी वकीलामार्फत कायदेशिर नोटीस पाठवुन बंद केलेला विज पुरवठा सुरु करण्याबाबत कळविले असता विरुध्द पक्ष क्र. 1 ते 3 यांनी विज बिलाची दुरुस्ती करुन रु.19,650/- भरण्यासंबंधी फोनव्दारे कळविले, त्याप्रमाणे तक्रारकर्त्याने दि.22.03.2018 रोजी सदर बिलाचा भरणा केला व विरुध्द पक्षांनी तक्रारकर्त्याचा बंद केलेला विज पुरवठा सुरु करुन दिला.
4. विरुध्द पक्षांच्या चुकीच्या कारवार्इव बिलाच्या आकारणीमुळे तक्रारकर्त्याचा विज पुरवठा बंद केल्यामुळे दि.22.09.2017 ते मार्च-2018 या कालावधीत तक्रारकर्त्याचे घरी रहात असलेले भाडेकरु हे रुम सोडून गेल्यामुळे तक्रारकर्त्याला रु.6,500/- प्रतिमाह याप्रमाणे सहा महिन्यांचे रु.39,000/- चे नुकसान झालेले आहे. तसेच विरुध्द पक्षांच्या बेकायदेशिर कृत्यामुळे त्याला शारीरिक, मानसिक व आर्थीक त्रास सहन करावा त्यामुळे नुकसान भरपाई दाखल रु.25,000/- व नोटीसचा खर्चाबाबत रु.5,000/-मिळावा अश्या मागण्या केलेल्या आहेत.
5. तक्रारकर्त्याच्या तक्रारीचे अनुषंगाने विरुध्द पक्ष क्र. 1 ते 3 यांना नोटीस बजावण्यात आली असता विरुध्द पक्ष क्र. 1 ते 3 यांनी प्रकरणात हजर होऊन निशाणी क्र.7 वर आपले लेखीउत्तर दाखल केले. विरुध्द पक्षाने आपल्या लेखीउत्तरात तक्रारकर्त्याचे तक्रारीला खोडून काढून आपल्या विशेष कथनात नमुद केले आहे की, सदरचा विज पुरवठा हा तक्रारकर्त्याचे नावाने नसल्यामुळे तो ग्राहक संरक्षण अधिनियमानुसार ग्राहक या व्याख्येत नसल्यामुळे तक्रारकर्त्याची तक्रार खारिज होण्यास पात्र आहे.
6. विरुध्द पक्ष क्र.1 ते 3 यांनी आपल्या उत्तरात नमुद केले आहे की, त्यांनी ग्राहकाने विजेची देयके भरली नाही त्यावेळेस रितसर नोटीस देऊन विज पुरवठा खंडीत केलेला आहे. तसेच श्री. यशवंत नारायण धकाते यांना ऑक्टोबर-2016 ते फेब्रुवारी-2017 पर्यंत सरासरी 458 युनिटचे देयक देण्यात आीले. त्यानंतर ऑक्टोबर-2016 रु.11,604/-, नोव्हेंबर-2016 रु.8,256/-, डिसेंबर-2016 रु.12,717/- अश्याप्रकारे देयके देण्यात आली. त्यानंतर जानेवारी 2017 मध्ये रु.24,795/- वजा करण्यात आले व रु.15,812/- चे देयक देण्यात आले. विरुध्द पक्षांनी पुढे नमुद केले आहे की, फेब्रुवारी-2017 मध्ये 11,418/- व मार्च-2017 मध्ये रु.11,129/- चे देयक देण्यांत आले. त्यानंतर माहे जानेवारी 2017 मध्ये मीटर बदलवुन सरासरी 458 युनिटचे देयक देण्यात आलेले आहे, तसेच एप्रिल-2018 मध्ये जुन्या मीटरचे ऑक्टोबर-2016 ते जानेवारी-2017 या चार महिन्यांच्या सरासरी युनिटपैकी 1325 वजा करण्यात आले व फेब्रुवारी-2017 ते एप्रिल-2017 या तिन महिण्याचे 1945 युनिटचे देयक देण्यात आले आहे. विरुध्द पक्षाने पुढे असे म्हटले आहे की, त्यांनी माहे मे-2017 व जुन-2017 चे देयक जुलै-2017 मध्ये रु.23,599/- वजा करुन दुरुस्त करण्यांत आले व त्यानंतर ऑगष्ट-2017 ते फेब्रुवारी-2018 पर्यंत युनिटप्रमाणे देयके देण्यात आलेली असुन ग्राहमाचे मागील थकबाकीमुळे सदरची देयके जास्त दिसुन येते. तसेच माहे डिसेंबरमध्ये तक्रारकर्त्याचा विज पुरवठा पुर्ववत सुरु केल्यानंतरचे सर्व देयक वेळोवेळी दुरुस्त करण्यात आलेले आहे त्यामुळे विरुध्द पक्षांनी सेवेत कोणतीही न्युनता दिलेली नाही. म्हणून तक्रारकर्त्याचे कोणतेही नुकसान झालेले नसल्यामुळे सदरची तक्रार खारिज होण्यास पात्र आहे.
7. तक्रारकर्त्याव्दारे दाखल तक्रार, विरुध्द पक्षाव्दारे दाखल लेखीउत्तर, शपथपत्र, लेखी व तोंडी युक्तीवादाचे अवलोकन केले असता मंचसमक्ष खालील मुद्दे निघतात.
मुद्दे निष्कर्ष
1) तक्रारकर्ता विरुध्द पक्षाची ग्राहक आहे काय ?
2) विरुध्द पक्षाने तक्रारकर्त्याप्रती सेवेत त्रुटी देऊन अनुचित
व्यापारी प्रथेचा अवलंब केल्याचे दिसुन येते काय ?
3) आदेश काय ? अंतिम आदेशाप्रमाणे
- // कारण मिमांसा // –
8. मुद्दा क्र.1 बाबतः- तक्रारकर्ता हा मयत श्री. यशवंतराव नारायण धकाते यांचा नातु असुन तक्रारकर्त्याचे आजोबा श्री. यशवंतराव नारायण धकाते यांचे नावे मौजा गडचिरोली शहरात दुर्गा मंदिर गल्लीजवळ घर आहे. सदर घरी विरुध्द पक्ष क्र.1 ते 3 यांचेकडून विज पुरवठा घेतला असुन त्यांचा ग्राहक क्रमांक 470120307106 व मीटर क्र. आरएलए-20 (Old Gadchiroli) असा असुन ब-याच वर्षांपासुन तेथे विज पुरवठाहोत आहे. तसेच सदर घराचा ताबा हा तक्रारकर्त्याकडे असल्यामुळे व तो तेथील विज बिलांचा नियमीत भरणा करीत असल्यामुळे तक्रारकर्ता हा विरुध्द पक्ष क्र. 1 ते 3 चा ग्राहक आहे हे सिध्द होते.
6. मुद्दा क्र.1 व 2 बाबतः- सदर प्रकरणात विरुध्द पक्ष क्र.1 ते 3 यांनी तक्रारकर्त्यास वारंवार विज देयके वजा-बाकी करुन दिलेले असल्यामुळे तसेच प्रत्येक विज देयकासाठी तक्रारकर्त्यास स्वतः वारंवार विरुध्द पक्षांकडे जाऊन व पत्रव्यवहार करुन दुरुस्ती करावी लागली असल्याचे दिसुन येते. विरुध्द पक्ष विज कंपनीच्या नियमानुसार विज देयके हे युनीटच्या आधारे काढण्यात येत असतात. विरुध्द पक्षांच्या चुकीमुळे युनीट जास्त लावण्यात आले असल्यास ग्राहकास जास्त युनीटचे दरानुसार विज आकारणी केल्या जाते म्हणजेच जास्त युनीटचा फटका हा ग्राहकास पडतो व त्यावर व्याज, पेनॉल्टी इत्यादी जे नंतर विज देयक दुरुस्तीमध्ये विरुध्द पक्ष कंपनी कपात करीत नाही. एकंदरीत विरुध्द पक्ष विज कंपनीने तक्रारकर्त्यास सतत चुकीची विज देयक देऊन व नंतर दुरुस्ती करुन मानसिक, शारीरिक त्रास दिला असल्याचे दिसुन येते.
7. विरुध्द पक्षांनी आपल्या लेखीउत्तरातील विशेष कथनात स्वतःच कबुल केलेले आहे की, ‘माहे डिसेंबर मध्ये विज पुरवठा सुरु केल्यानंतरची सर्व देयके ग्राहकास वेळोवेळी दुरुस्त करुन देण्यात आलेली आहेत’. म्हणजे विरुध्द पक्ष विज कंपनीने ग्राहकास/ तक्रारकर्त्यास न्युनतापूर्ण सेवा दिली आहे, ही बाब सिध्द होते. तक्रारकर्त्याने आपल्या तक्रारीत विरुध्द पक्षाने त्याचा विज पुरवठा खंडीत केल्यामुळे त्याचे घरी राहणारे किरायदार हे रुम सोडून गेले व त्यामुळे त्याला प्रतिमहा रु.6,500/- प्रमाणे सहा महिन्यांचे रु.39,000/- ची मागणी केलेली आहे. परंतु तक्रारकर्त्याने याबाबत कुठलाही कागदोपत्री पुरावा सादर केला नाही त्यामुळे तक्रारकर्त्याची सदरची मागणी मान्य करता येत नाही. सबब हे मंच खालिल प्रमाणे आदेश पारित करीत आहे.
- // अंतिम आदेश // -
1. तक्रारकर्त्याची ग्राहक संरक्षण कायदा 1986 चे कलम 12 अंतर्गत दाखल विरुध्द पक्ष क्र. 1 ते 3 विरुध्दची तक्रार अंशतः मंजूर करण्यांत येते.
2. विरुध्द पक्ष क्र. 1 ते 3 यांनी तक्रारकर्त्यास झालेल्या शारीरिक, मानसिक व आर्थीक त्रासापोटी रु.5,000/- व तक्रारीचा खर्च रु.2,000/- अदा करावा.
3. विरुध्द पक्ष क्र. 1 ते 3 यांनी वैयक्तिक किंवा संयुक्तरित्या वरील आदेशाची अंमलबजावणी आदेशाची प्रत मिळाल्याचे दिनांकापासुन 30 दिवसांचे आंत करावी.
4. दोन्ही पक्षांना आदेशाची प्रथम प्रत विनामुल्य द्यावी.
5. तक्रारकर्त्यास प्रकरणाची ‘ब’ व ‘क’ फाईल परत करावी.