जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्यायमंच लातूर यांचे समोर
ग्राहक तक्रार क्रमांक – 132/2013 तक्रार दाखल तारीख – 28/08/2013
निकाल तारीख - 17/03/2015
कालावधी - 01 वर्ष , 06 म. 19 दिवस.
सुदाम शिवाजीराव जाधव,
वय -35 वर्षे, व्यवसाय – नौकरी,
रा. श्रीराम नगर, येणकी रोड,
उदगीर, ता. उदगीर, जि. लातुर. ....अर्जदार
विरुध्द
1) अधिक्षक अभियंता,
महाराष्ट्र राज्य विदयुत मंडळ,
महावितरण कंपनी विभाग,
लातुर पावर हाऊस, साळे गल्ली,
लातुर.
2) कार्यकारी अभियंता कार्यालय,
महावितरण कंपनी विभाग, मोंढा रोड,
उदगीर ता. उदगीर जि. लातुर. ..गैरअर्जदार
को र म - श्रीमती ए.जी.सातपुते, अध्यक्षा.
श्री अजय भोसरेकर, सदस्य
श्रीमती रेखा जाधव, सदस्या.
तक्रारदारातर्फे :- अॅड. बाळासाहेब नवटके.
गैरअर्जदारातर्फे :- अॅड. के.जी.साखरे.
निकालपत्र
(घोषितव्दारा – श्रीमती रेखा जाधव,मा.सदस्या )
अर्जदार यांनी प्रस्तुतची तक्रार ग्राहक संरक्षण कायदा 1986 कलम 12 प्रमाणे गैरअर्जदारा विरुध्द दाखल केली आहे.
अर्जदाराचा मीटर क्र. 622010154571 असून, सन – 2011 पासुन गैरअर्जदाराचा ग्राहक आहे. अर्जदारास दि. 30/12/2012 रोजी रक्कम रु. 8,410/- चे विदयुत बिल गैरअर्जदाराने दिले आहे. गैरअर्जदाराने वेळोवेळी अवाजवी व अवास्तव विदयुत बिल अर्जदारास दिेले आहे. अर्जदारास दि. 06/07/2013 रोजी रक्कम रु. 17,178/- विदयुत बिल दिले आहे. अर्जदाराने सदरची माहिती कनिष्ठ अभियंता, उदगीर यांना दिली असता दि. 31/07/2013 रोजी विदयुत मीटरचा स्थळ तपासणी अहवाल मागवला व सध्याची चालू मीटर रिडींग घेतली. अर्जदारास दि. 07/08/2013 रोजी 133.74 चे विदयुत बिल दिले आहे. अर्जदाराने सदरची बाब गैरअर्जदाराच्या लक्षात आणुन दिली असता, दि. 23/08/2013 रोजी रक्कम रु. 13,000/- चे अंदाजे बिल केलेले आहे. सदरचे बिल भरले नाहीतर विदयुत पुरवठा बंद करण्याची लाईनमेनने अर्जदारास दि. 24/08/2013 रोजी धमकी दिली आहे. त्यामुळे सदरचे प्रकरण दाखल करण्यास कारण प्राप्त झाले.
अर्जदाराने तक्रारी अर्जात गैरअर्जदाराने दिलेले बेकायदेशीर बिल रद्द करुन दयावे अशी मागणी केली आहे. अर्जदाराने तक्रारी अर्जासोबत पुरावा म्हणून शपथपत्र दिले आहे. व त्यासोबत कागदपत्रे दाखल केली आहेत. तक्रारी अर्जासोबत अंतरिम अर्ज अर्जदाराने दिला आहे. सदरचा अर्ज दि. 31/08/2013 रोजी मंजुर करण्यात आला आहे.
गैरअर्जदाराने लेखी म्हणणे दाखल केले आहे. अर्जदाराने दि. 29/12/2011 रोजी घरगुती विदयुत कनेक्शनची मागणी गैरअर्जदारास केली आहे, त्यानंतर अर्जदारास ग्राहक क्र. 622010154571 देण्यात आला. अर्जदाराने त्या तारखेपासुन डिसेंबर – 2012 पर्यंत विदयुत बिल भरले नाही. अर्जदारास विदयुत वापराप्रमाणे रक्कम रु. 8,410/- चे विदयुत बिल दिले आहे. अर्जदाराने गैरअर्जदाराकडे विनंती केल्यानंतर सदर बिलाचे पार्ट पेमेंट रक्कम रु. 4,500/- दि. 28/12/2012 रोजी करुन देण्यात आले आहे. अर्जदाराचे जुन – 2013 पर्यंत रु. 17,178/- इतके विदयुत बिल आहे. गैरअर्जदार हा अर्जदाराचे विदयुत मीटरचे रिडींग घेण्यासाठी नियमीत जात होता. त्याठिकाणी विदयुत मीटर नव्हते. म्हणून अर्जदारास दिलेले विदयुत बिले हे सरासरी बिल देण्यात आले आहे. अर्जदाराच्या विदयुत मीटरची रिडींग जुन – 2013 मध्ये 1767 असुन त्याचे विदयुत बिल रक्कम रु. 17,660/- इतके होते. गैरअर्जदाराचे कनिष्ठ अभियंता यांनी दि. 31/07/2013 रोजी अर्जदाराच्या मीटरची स्थळ तपासणी केली आहे. त्याचा अहवाल अर्जदारास दिला आहे. अर्जदाराने सदरचा अहवाल गैरअर्जदार क्र. 2 यांना दिला असता, त्यांनी Slab tariff benefit आणि इतर चार्जेस वगळून अर्जदारास नवीन बिल रक्कम रु. 13,000/- चे दिले आहे. अर्जदाराने सदरचे विदयुत भरले नाही. अर्जदाराने गैरअर्जदाराविरुध्द कोणतेही कारण घडलेले नसताना सदरची तक्रार घडलेली आहे.
अर्जदाराचा तक्रारी अर्ज व त्यासोबत दाखल केलेली कागदपत्रे, व पुरावा म्हणून दिलेले शपथपत्र तसेच गैरअर्जदाराचे लेखी म्हणणे याचे अवलोकन केले असता खालील मुद्दे उपस्थित होतात.
मुद्दे उत्तरे
- अर्जदार हा गैरअर्जदाराचा ग्राहक आहे काय ? होय
- गैरअर्जदाराने अर्जदाराच्या सेवेत त्रूटी केली आहे काय ? नाही
- अर्जदार अनुतोष मिळण्यास पात्र आहे काय ? नाही
- काय आदेश ? अंतिम आदेशाप्रमाणे
मुद्दा क्र. 1 चे उत्तर :- अर्जदाराने गैरअर्जदाराकडुन विदयुत पुरवठा घेतला आहे. त्यासाठी लागणारा मोबदला गैरअर्जदारास दिला आहे. म्हणून अर्जदार हा ग्राहक या संज्ञेत येतो. म्हणून मुद्दा क्र. 1 चे उत्तर होय असे आहे.
मुद्दा क्र. 2 चे उत्तर :- अर्जदाराचा ग्राहक क्र; 62201015471 आहे. अर्जदारास डिसेंबर - 2012 चे विदयुत बिल रक्कम रु. 8,410/- असल्याचे दिसुन येते. सदरील बिलावर चालु रिडींग ही 800 असून सदरील बिलावर गैरअर्जदाराने पार्ट पेमेंट रु. 4,500/- करुन दिल्याचे दिसुन येते, उर्वरीत राहिलेली विदयुत बिलाची रक्कम अर्जदाराने गैरअर्जदाराकडे भरली असल्याचा पुरावा दिलेला नाही. अर्जदाराने सदरचे पार्टपेमेंट पावती क्र. 5606104 रु. 4,500/- भरल्याचे दिसुन येते. अर्जदाराने दि. 06/07/2013 रोजीचे विदयुत बिल रु. 17,178/- चे असल्याचे दाखल केलेल्या विदयुत बिलावरुन दिसुन येते. अर्जदाराने सहाय्यक अभियंता यांना विज बिल दुरुस्त करण्यासाठी अर्ज दिला आहे पण त्यामध्ये कोणत्या कारणास्तव विज बिल दुरुस्त करुन दयावे, त्याचे कारण दिले नाही. सदरचा अर्ज किती तारखेला दिला आहे त्यावर तारीख नाही. सदरचा अर्ज गैरअर्जदारास मिळाला याबद्दलचा पुरावा नाही. अर्जदारास जुन – 2013 मध्ये रक्कम रु. 17,180/- विदयुत बिल आले आहे. सदरचे विदयुत बिल मीटर रिडींगप्रमाणे दिल्याचे दिसुन येते. अर्जदाराच्या मीटरची तपासणी दि. 31/07/2013 रोजी केली असता, सदरचे मीटर चालू असून मीटरचे सील व टर्मिनल कव्हरशिल बरोबर असल्याचा शेरा सदर तपासणी अहवालावरुन दिसुन येतो. सदरच्या तपासणी अहवालावर ग्राहकाची सही आहे. यावरुन सदरचे मीटर अर्जदाराच्या उपस्थितीत तपासल्याचे सिध्द होते. गैरअर्जदाराने अर्जदारास अवास्तव विज बिल दिल्याचे दिसुन येत नाही. अर्जदाराने विदयुत बिल नियमीत भरल्याचे दिसुन येत नाही. गैरअर्जदाराने रु. 17,180/- चे विदयुत बिल अर्जदारास Slab tariff benefit आणि इतर चार्जेस वगळून दुरुस्त करुन रक्कम रु. 13,000/- चे दिल्याचे दिसुन येते. अर्जदाराने सदरील वादग्रस्त बिलापोटी रु. 3,000/- अंतरिम आदेशाप्रमाणे गैरअर्जदाराकडे भरलेले आहेत, याबद्दलचा पुरावा अर्जदाराने दिलेला नाही. गैरअर्जदाराने अर्जदारास त्याच्या वापराप्रमाणे विदयुत बिल दिले असल्यामुळे गैरअर्जदाराने सेवेत त्रुटी केल्याचे दिसुन येत नाही. म्हणून मुद्दा क्र. 2 चे उत्तर नाही असे आहे.
मुद्दा क्र. 3 चे उत्तर :- अर्जदाराने कागदोपत्री पुरावा देवून सदरचा तक्रारी अर्ज सिध्द केला नसल्यामुळे व गैरअर्जदाराने अर्जदारास त्याच्या विदयुत वापराप्रमाणे दिलेले विदयुत बिल नियमित भरले नसल्यामुळे, अर्जदार हा अनुतोषास पात्र नसल्याचे स्पष्ट होते. म्हणून मुद्दा क्र. 3 चे उत्तर नाही असे आहे.
सबब हे न्यायमंच खालील प्रमाणे आदेश पारित करत आहे.
आदेश
1) अर्जदाराची तक्रार रद्द करण्यात येत आहे.
2) खर्चाबाबत काही आदेश नाही.
(श्री. अजय भोसरेकर) (श्रीमती ए.जी.सातपुते) (श्रीमती रेखा जाधव)
सदस्य अध्यक्षा सदस्या जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, लातूर.