(घोषित दि. 20.10.2014 व्दारा श्रीमती रेखा कापडिया, सदस्या)
अर्जदार हे गैरअर्जदार यांचे ग्राहक असून त्यांनी घरगुती वापरासाठी वीज पुरवठा घेतला आहे. गैअर्जदार यांनी दिलेल्या वाढीव वीज बिलाबाबत केलेल्या तक्रारीची दखल घेण्यात न आल्यामुळे अर्जदाराने ग्राहक संरक्षण कायदा अंतर्गत मंचात तक्रार दाखल केली आहे.
अर्जदाराने दाखल केलेल्या तक्रारीचा सारांश खालील प्रमाणे
अर्जदार हे नागेवाडी ता.जालना येथील रहिवासी असून त्यांनी गैरअर्जदार यांच्याकडून घरगुती वापरासाठी वीज पुरवठा घेतला आहे. त्यांचा ग्राहक क्रमांक 510850383733 असा असून मीटर क्रमांक 610058071 असा आहे. अर्जदाराच्या म्हणण्यानुसार ते नियमितपणे वीज बिल भरत होते. दिनांक 29.12.2012 ते 29.01.2013 या कालावधीचे रुपये 3,630/- वीज बिल त्यांनी दिनांक 21.01.2013 रोजी भरलेले आहे.
अर्जदाराने जुने मीटर क्रमांक 610058071 हे फॉल्टी असल्याबाबत केलेल्या तक्रारीवरुन गैरअर्जदार यांनी त्यांचे वरील मीटर बदलून त्या जागी 7600044690 या क्रमांकाचे नवीन मीटर दिनांक 29.01.2013 रोजी बसविले. गैरअर्जदार यांनी अर्जदारास दिनांक 01.02.2013 ते 21.02.2013 या कालावधीचे 3,870/- रुपये असे अवाजवी बिल दिले जे गैरअर्जदार यांनी दुरुस्त करुन 240/- रुपये करुन दिले. अर्जदाराच्या तक्रारीनुसार त्यांच्याकडे बसविण्यात आलेले नवीन मीटर फॉल्टी असून त्यांना दिनांक 21.05.2013 ते 21.06.2013 या कालावधीचे 89,160/- रुपयाचे वीज बिल आकारण्यात आले जे चुकीचे आहे. गैरअर्जदार यांनी दिलेले 48,100/- रुपयाचे सुधारीत बिल देखील चुकीचे आहे. गैरअर्जदार यांनी दिलेले 48,100/- रुपयाचे बिल रद्द करण्याची व नुकसान भरपाईची मागणी अर्जदाराने केली आहे.
अर्जदाराने तक्रारी सोबत गैरअर्जदार यांनी दिलेल्या वीज बिलाच्या प्रती गैरअर्जदार यांच्याकडे केलेली तक्रार इत्यादि कागदपत्रे दाखल केली आहेत.
दिनांक 30.12.2013 रोजी अर्जदाराने, गैरअर्जदार वीज पुरवठा खंडित करण्याची धमकी देत असल्यामुळे वीज पुरवठा खंडित न होण्यासाठी अंतरीम अर्ज मंचात दाखल केला. या अर्जावर दिनांक 21.03.2014 रोजी घेण्यात आलेल्या सुनावणीच्या वेळेस अर्जदाराने त्यांचा वीज पुरवठा खंडित केला असल्याचे सांगितले. अर्जदाराने गैरअर्जदार यांच्याकडे 15,000/- रुपये भरावे व दोन दिवसात वीज पुरवठा पुनर्रजोडणी करुन द्यावा असा अंतरीम आदेश मंचाने पारित केला.
गैरअर्जदार यांनी लेखी जवाब दाखल केला. त्यांच्या जवाबानुसार अर्जदाराचे जुने मीटर क्रमांक (61/00580171) दिनांक 30.01.2013 रोजी बदलण्यात आले व त्या जागी नवीन मीटर क्रमांक (76/000444690) बसविण्यात आले. मीटर बदलताना जुन्या मीटरवरील अंतिम रिडींग 8636 असल्याचे गैरअर्जदार यांचे म्हणणे आहे. त्यानंतर डिसेंबर 2013 मध्ये 76/00044690 हे बदलून त्या जागी 98/01928925 या क्रमांकाचे मीटर बसविण्यात आले जे मार्च 2014 मध्ये पुन्हा बदलून त्या जागी 47/110066027 या क्रमांकाचे मीटर लावण्यात आले. गैरअर्जदार यांच्या म्हणण्यानुसार अर्जदाराने वीज बिल न भरल्यामुळे एप्रिल 2013 च्या वीज बिलात त्यांना 7744 युनिट वीज वापराचे समायोजित रकमेचे बिल देण्यात आले. अर्जदाराने केलेल्या तक्रारीची दखल घेऊन ऑक्टोबर 2013 मध्ये त्यांना 51126.78 रुपये कमी करुन देण्यात आले. अर्जदारास देण्यात आलेले वीज बिल योग्य असून त्यांना देण्यात आलेल्या सेवेत कोणताही दोष नसल्याचे सांगून तक्रार खारीज करण्याची विनंती मंचास केली आहे.
गैरअर्जदार यांनी तक्रारी सोबत अर्जदाराचा मीटर बदली अहवाल व सी.पी.एल जोडले आहे.
अर्जदार व गैरअर्जदार यांनी मंचात दाखल केलेल्या कागदपत्रांवरुन तसेच मंचा समोर झालेल्या सुनावणी वरुन असे आढळून येते की, अर्जदाराने गैरअर्जदार यांच्याकडून घरगुती वापरासाठी वीज पुरवठा घेतला असून त्यांचा ग्राहक क्रमांक 510850382733 असा आहे. अर्जदाराने दाखल केलेल्या तक्रारीत डिसेंबर 2012 पर्यंतच्या वीज बिलाबाबत त्यांचा वाद नव्हता. पण त्या नंतर गैरअर्जदार यांनी दिलेल्या वाढीव वीज बिलाबाबत त्यांची मूळ तक्रार आहे.
गैरअर्जदार यांनी त्यांच्या जवाबासोबत सी.पी.एल व दिनांक 05.02.2013 रोजीचा मीटर बदली अहवाल दाखल केला आहे. जानेवारी 2013 ते एप्रिल 2014 या कालावधीचे सी.पी.एल चे अवलोकन केल्यावर असे दिसून येते की, डिसेंबर 2012 मध्ये अर्जदारास मागील रिडींग 1352 व चालू रिडींग 1394 असे दर्शवून 42 युनिट वीज वापराचे व मागील थकबाकीसह 3867.30 रुपयाचे वीज बिल देण्यात आले ज्याचा भरणा अर्जदाराने दिनांक 28.01.2013 रोजी केलेला आहे. या वेळेस अर्जदाराकडे लावण्यात आलेल्या मीटरचा क्रमांक 61/00580171 असा होता. दिनांक 05.02.2013 रोजी या मीटर वरील अंतिम रिडींग 8636 असे नमूद केलेले आहे. डिसेंबर 2012 च्या वीज बिलात दिनांक 21.12.2012 रोजीचे रिडींग 1352 असून मीटर नॉर्मल स्टेटस असल्याचे नमूद केलेले आहे. यावरुन दिनांक 21.12.2012 ते मीटर बदले पर्यंत म्हणजेच दिनांक 05.02.2013 या 45 दिवसाच्या कालावधीत अर्जदाराचा वीज वापर 8636 - 1352 = 7284 युनिट असल्याचे दिसून येते. हा वीज वापर अर्जदाराने जोडलेला वीजभार 1.6 के डब्ल्यु लक्षात घेता चुकीचा असल्याचे स्पष्टपणे दिसून येते.
दिनांक 05.02.2013 रोजी लावण्यात आलेल्या नवीन मीटरचा क्रमांक 7600044690 असा असून दिनांक 05.12.2013 ते नोव्हेंबर 2013 या 10 महिन्याच्या कालावधीत अर्जदाराचा एकुण वीज वापर 1834 – 1 = 1833 युनिट असा असल्याचे दिसून येते. ज्याची सरासरी 184 युनिट प्रतिमाह असल्याचे स्पष्ट होते. डिसेंबर 2013 तसेच मार्च 2014 या महिन्यात गैरअर्जदार यांनी पुन्हा अर्जदाराचे मीटर बदलले ज्याचे कारण त्यांनी मंचात दाखल केलेल्या जवाबात दिलेले नाही. गैरअर्जदार यांनी अर्जदाराचे जानेवारी 2013 च्या अगोदरच्या कालावधीचे सी.पी.एल दाखल केलेले नाही. त्यामुळे मीटर व्यवस्थित असतांना दिनांक 05.02.2013 ते नोव्हेंबर 2013 या कालावधीत अर्जदाराचा सरासरी वीज वापराच्या आधारावर एप्रिल 2013 चे वीज बिल आकरणे योग्य ठरेल. गैरअर्जदार यांनी ऑक्टोबर 2013 मध्ये अर्जदाराच्या वीज बिलात 51126.78 रुपयाची वजावट केल्याचे दिसून येते. पण ही रक्कम कशी आकारली या बाबत कोणताच खुलासा त्यांच्या जवाबात केलेला नाही.
वरील सर्व निरीक्षणावरुन मंच खालील आदेश पारीत करीत आहे.
आदेश
- अर्जदाराची तक्रार अंशत: मान्य करण्यात येते.
- गैरअर्जदार यांनी अर्जदारास एप्रिल 2013 मध्ये आकारलेले 84697 = 40 रुपयाचे व त्यापुढील वीज बिले रद्द करण्यात येत आहे.
- गैरअर्जदार यांनी अर्जदारास एप्रिल 2013 या महिन्याचे सरासरी 184 युनिट प्रमाणे वीज वापराची आकारणी करुन 30 दिवसात सुधारीत वीज बिल द्यावे व त्यात व्याज व दंडाचा समावेश करु नये.
- खर्चा बद्दल आदेश नाही.