निकालपत्र
तक्रार दाखल दिनांकः- 26/09/2012
तक्रार नोदणी दिनांकः- 28/09/2012
तक्रार निकाल दिनांकः- 24/01/2014
कालावधी 01वर्ष. 03 महिने.27 दिवस
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्यायमंच, परभणी
अध्यक्ष श्री.पी.पी.निटूरकर.B.Com.LL.B.
सदस्या
सौ.अनिता ओस्तवाल.M.Sc. L.L.B.
---------------------------------------------------------------------------------------------------------
ललीतकुमार नेमलाल कळमकर, अर्जदार
वय 55 वर्षे. व्यवसाय. शेती,व्यापार. अॅड.एस.एन.वेलणकर.
रा.सटवाई मंदिराजवळ,बलसा रोड,जिंतूर जि.परभणी.
विरुध्द
1 अधिक्षक अभियंता, गैरअर्जदार.
महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी लि. अॅड.एस.एस.देशपांडे.
परभणी मंडळ, जिंतूर रोड, परभणी.
2 सहाय्यक अभियंता,
महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी लि.
उपविभाग जिंतूर ता.जिंतूर जि.परभणी.
______________________________________________________________________
कोरम - 1) श्री.पी.पी.निटूरकर. अध्यक्ष.
2) सौ.अनिता ओस्तवाल. सदस्या.
(निकालपत्र पारित व्दारा.सौ.अनिता ओस्तवाल.सदस्या.)
गैरअर्जदार क्रमांक 1, व 2 यांनी सेवात्रुटी केल्याच्या आरोपावरुन अर्जदाराने प्रस्तुतची तक्रार दाखल केली आहे.
अर्जदाराची थोडक्यात तक्रार अशी आहे की, अर्जदार हा जिंतूर येथील रहीवाशी असून एकत्र कुटूंब पध्दतीने राहतो, सदरील घरास घरगुती वापरासाठी गैरअर्जदाराकडून दिनांक 01/01/1987 रोजी विद्युत प्रवाह घेतलेला आहे. सदर विज जोडणी अर्जदाराचा मोठा भाऊ श्री. चंद्रकांत नेमलाल कळमकर यांच्या नावे घेतलेली आहे, परंतु त्यानंतर सदरील घराचा व विजेचा वापर अर्जदाराच करीत आहे. अर्जदाराचे घरास दिलेला विद्युत पुरवठा ग्राहक क्रमांक 540010164847 अन्वये दिलेला आहे. अर्जदाराने सुरवाती पासून सर्व देयके नियमीत भरलेली आहेत. पुढे गैरअर्जदाराने अर्जदाराचे जुने मिटर क्रमांक 10933046 बदलले व त्या जागी दुसरे मीटर बसवले, परंतु त्यावेळेस पहिल्या मीटरची शेवटची रिडींग काय होती, कोणता नंबर होता या बाबत अर्जदारास काहीच कल्पना देण्यात आली नाही व मीटर बदली अहवाल ही देण्यात आला नाही. मार्च 2012 मध्ये अर्जदाराचे पुन्हा मीटर बदलले व त्यावेळेस जुना मीटर क्रमांक 12900795 असा दाखवला, व त्याची मीटर रिडींग 44405 दाखवली, व नवीन मीटर क्रमांक 01652524 असे नमुद करुन व त्याची सुरवातीची रिडींग 001 दाखवून हे नवीन मिटर बसवले तदनंतर गैरअर्जदाराने दिनांक 31/03/2012 रोजी रु. 50,000/- चे देयक अर्जदारास दिले व ते न भरल्यास विज प्रवाह खंडीत करु असे अर्जदारास सांगीतले, म्हणून अर्जदाराने नाईलाजाने दिनांक 31/03/2012 रोजी रु. 50,000/- चा भरणा केला, पुढे गैरअर्जदाराने दिनांक 10/07/2012 रोजी अर्जदारास महिन्याच्या वापराचे रक्कम रु. 1012.39 व थकबाकी रु. 3,13,897.87 दाखवुन व समायोजित रक्कम रु. 44,223.52 दाखवुन एकदम रक्कम रु. 2,70,760/- चे देयक दिले, ही बाब अर्जदारासाठी धक्का दायक होती. अर्जदाराने वारंवार देयक दुरुस्त करुन देण्याची विनंती केली, व सदरचे देयक भरावयाची अंतीम तारीख 30/07/2012 असतांना देखील कोणतीही पुर्व सुचना वा नोटीस न देता गैरअर्जदाराने अचानक दिनांक 23/07/2012 रोजी अर्जदाराचा विद्युत प्रवाह खंडीत केला, तदनंतर ही गैरअर्जदाराने पुढील देयक देणे चालुच ठेवले. त्याप्रमाणे दिनांक 07/08/2012 रोजी रु. 2,78,000/- दिनांक 17/09/2012 रोजी रु. 2,80,000/- चे देयक दिले. म्हणून ही सर्व देयके रद्द होणे आवश्यक आहे. म्हणून अर्जदाराने मंचात तक्रार दाख्ल करुन अर्जदाराचा विद्युत पुरवठा पुन्हा सुरु करण्यात यावा व गैरअर्जदाराने अर्जदाराचे ग्राहक क्रमांक 540010164847 ला दिनांक 10/07/2012 रोजी देण्यात आलेले रु. 2,70,760/- चे देयक व त्यावर आधारीत पुढील सर्व देयक रद्द ठरविण्यात येवुन सर्व देयके योग्य रितीने Revision करुन दुरुस्त करावीत व भरलेल्या रु. 50,000/- चे त्यात समायोजन करुन मगच सुधारीत देयक अर्जदारास द्यावीत, तसेच अर्जदारास सुमारे 2 महिने अंधारात रहावे लागले, म्हणून झालेल्या मानसिक त्रासापोटी रक्कम रु. 25,000/- व तक्रार अर्जाच्या खर्चापोटी रक्कम रु. 5,000/- व आर्थिक नुकसानीपोटी रक्कम रु. 20,000/- व तक्रारीच्या खर्चापोटी रक्कम रु. 5,000/- मिळावेत अशा मागण्या अर्जदाराने मंचासमोर केल्या आहेत.
अर्जदाराने तक्रार अर्जासोबत शपथपत्र नि. 2 वर व पुराव्यातील कागदपत्र नि. 6 वर व नि.10 वर मंचासमोर दाखल केली आहेत.
मंचाची नोटीस गैरअर्जदार क्रमांक 1, व 2 यांना तामील झाल्यानंतर लेखी निवेदन दाखल करण्यासाठी संधी मागीतली, परंतु संधी देवुनही मंचासमोर लेखी निवेदन दाखल न केल्यामुळे त्यांच्या विरोधात विना लेखी जबाबचा आदेश पारीत करण्यात आला.
निर्णयासाठी खालील मुद्दे उपस्थित होतात.
मुद्दे. उत्तर.
1 अर्जदार हा गैरअर्जदार विद्युत वितरण कंपनीचा
ग्राहक आहे काय ? नाही.
2 आदेश काय.? अंतिम आदेशा प्रमाणे.
कारणे.
मुद्दा क्रमांक 1.
सदर प्रकरणात कायदेशिर मुद्दा असा उपस्थित होतो की, अर्जदार हा गैरअर्जदार कंपनीचा ग्राहक म्हणून दाद मागण्यास पात्र आहे काय ? याचे उत्तर नकारार्थी द्यावे लागेल, कारण सदरचे मीटर हे चंद्रकांत नेमलाल कळमकर यांच्या नावे आहे.
अर्जदाराचे म्हणणे असे आहे की, त्याचे एकत्र कुटूंब असल्यामुळे तो सदर विज जोडणीचा उपभोग घेत असल्यामुळे उपभोक्ता म्हणून त्यास मंचासमोर दाद मागण्याचा अधिकार आहे, यावर मंचाचे असे मत आहे की, जर एकत्र कुटूंबा मध्ये अर्जदार राहत असेल व मीटर मोठ्या भावाचे नावे असेल तर मग अर्जदाराच्या मोठ्या भावाने तक्रार दाखल करावयास काहीच हरकत नव्हती, किंवा त्याच्या वतीने अधिकारपत्र घेवुन अर्जदाराने मंचासमोर तक्रार दाखल करावयास हवी होती, परंतु तशा आशयाचे अधिकारपत्र अर्जदाराने मंचासमोर दाखल केलेले नाही, त्यामुळे अर्जदारास तक्रार करण्यासाठी Locus standi नाही. म्हणून गैरअर्जदारा विरुध्द दाद मागण्याचा अधिकार अर्जदारास पोहंचत नाही.
मा. राष्ट्रीय आयोगाने रिपोर्टेड केस. Amrita sharma V/s M/s BHEL
& Others मध्ये असे मत व्यक्त केले आहे की, There is nothing on record to show that petitioners husband had been incapacitated in any manner or was prevented in any manner what so ever from filing the Complaint More ever in the complaint it is no where pleaded that petitioner had been authorized by her husband to file complaint on his behalf. Thus Ms Amrita is not a consumer as per provision of this act.
मा. राष्ट्रीय आयोगाने वरील प्रमाणे व्यक्त केलेले मताचा ही या ठिकाणी आधार घेण्यात आलेला आहे. सबब मुद्दा क्रमांक 1 चे उत्तर नकारार्थी देवुन आम्ही खालील प्रमाणे आदेश पारीत करीत आहोंत.
आदेश
1 अर्जदाराचा तक्रार अर्ज नामंजूर करण्यात येत आहे.
2 दोन्ही पक्षांना निकालाच्या प्रती मोफत पुरवाव्यात.
सौ.अनिता ओस्तवाल. श्री. पी.पी.निटूरकर
मा.सदस्या. मा.अध्यक्ष.