न्या य नि र्ण य
(व्दाराः- मा. सौ. सविता प्र. भोसले, अध्यक्षा)
1. तक्रारदाराने प्रस्तुत तक्रार अर्ज ग्राहक सरंक्षण कायदा, 1986 चे कलम 11 व 12 प्रमाणे दाखल केला आहे. तक्रार अर्जातील थोडक्यात कथन पुढीलप्रमाणे—
तक्रारदार हे तक्रारीत नमुद पत्त्यावर राहतात. वि प हे ग्राहकांकडून मोबदला स्विकारुन राष्ट्रीय व अंतरराष्ट्रीय सहलींचे आयोजन करत असलेली नामांकीत कंपनी आहे. सन-2015 मध्ये वि प कंपनीने थायलंड बँकॉक पटाया मलेसिया या सहलीचे आयोजन केलेले होते. वि प यांनी तक्रारदारास दिलेल्या हमीनुसार तक्रारदार यांनी कोल्हापूर येथून रक्कम रु.11,000/- चे अॅडव्हान्स पेमेंट दि.13/05/2015 रोजी वि प यांना केलेले आहे. तदनंतर वि प यांनी तक्रारदारास सभासद आयडी नं.71008 दिेलेला आहे. उर्वरित रक्कम तक्रारदार हे सदैव भागविण्यास तयार होते. तथापि, तक्रारदाराने वि प यांना वारंवार विचारणा करुनदेखील आजतागायत वि प यांनी तक्रारदारास पुढील पॅकेज टूरबाबत अदयाप कळविलेले नाही किंवा त्यास प्रतिसाद दिलेला नाही. वि प कंपनीने तक्रारदार यांचेकडून पॅकेज टूरसाठी अॅडव्हान्स पेमेंटची रक्कम रु.11,000/- स्विकारुनही तक्रारदारास पॅकेज टूरची पूर्तता केलेली नाही. अगर अॅडव्हान्सपोटी स्विकारलेली रक्कमरु.11,000/- परत केलेली नाही. तक्रारदाराने दि.23/01/2020 रोजी वकीलांमार्फत वि प कंपनीला कायदेशीर नोटीस पाठविली होती. सदर नोटीस वि प कंपनीला मिळूनही वि प यांनी नोटीसीप्रमाणे कोणतीही कार्यवाही केलेली नाही. अशाप्रकारे वि प यांनी तकारदारास व्यापारी अनुचित प्रथेचा अवलंब करुन सेवेत अक्षम्य कसूर केलेला आहे.त्यामुळे तक्रारदारास प्रस्तुतची तक्रार दाखल करणे भाग पडले आहे.
तक्रारदाराने याकामी टूर बुकींगसाठी दिलेली अॅडव्हान्स रक्कम रु.11,000/- त्यावर दि.13/05/2015 पासून 18 टक्के व्याजाने होणारी रक्कम रु.9,405/-, मानसिक त्रासापोटी रक्कम रु.50,000/- कायदेशीर नोटीसीचा खर्च रु.2,000/- व तक्रार अर्जाचा खर्च रु.10,000/-असे एकूण रक्कम रु.82,405/- वि.प. यांचेकडून वसूल होवून मिळावेत अशी विनंती याकामी केली आहे.
3. तक्रारदाराने सदरकामी कागदयादी सोबत वि प यांनी तक्रारदारास दिलेले पमेंट रिसीट कार्ड, मेंबरशिप कार्ड, तसेच वि प यांनी आयोजीत टूर पॅकेजचे माहितीपत्रक, वि प यांना पाठविलेली कायदेशीर नोटीस व त्याची पोहोच इ. कागदपत्रे दाखल केली आहेत. तसेच तक्रार अर्ज, शपथपत्र व कागदपत्रे हाच पुरावा व लेखी युक्तीवाद समजावा अशी पुरसिस दाखल केली.
4. वि.प. यांना सदर कामी नोटीस लागू होऊनही ते सदर कामी हजर न झालेने प्रस्तुतचे प्रकरण त्यांचेविरुध्द एकतर्फा चालविणेचा आदेश नि.1 वर दिऋ.13/01/2022 रोजी पारीत करण्यात आला.
5. वर नमूद तक्रारदार यांनी दाखल केलेल्या सर्व कागदपत्रांचे काळजीपूर्वक अवलोकन करुन मे. मंचाने सदर तक्रार अर्जाचे निराकरणार्थ पुढील मुद्दे विचारात घेतले.
अ.क्र. | मुद्दा | उत्तरे |
1 | तक्रारदार व वि.प.हे नात्याने ग्राहक व सेवापुरवठादार आहेत काय? | होय. |
2 | वि.प. यांनी तक्रारदाराला दयावयाचे सेवेत त्रुटी/कमतरता दिली आहे काय? | होय. |
3 | तक्रारदार वि.प. यांचेकडून टूर पॅकेजच्या अॅडवहान्सपोटी दिलेली रक्कम व नुकसान भरपाई मिळणेस पात्र आहेत काय ? | होय, अंशतः. |
4 | अंतिम आदेश काय ? | खालील नमूद आदेशाप्रमाणे. |
मुद्दा क्र.1 ते 4
6. प्रस्तुत प्रकरणी तक्रारदार यांनी कागदयादीसोबत अ.क्र.1 कडे दाखल केलेल्या वि प यांनी तक्रारदारास दिलेल्या दि.13/05/2015 रोजीच्या रिसीटमध्ये तक्रारदाराचे नांव नमुद असून आय डी क्र.71008 असा आहे व थायलंड बँकॉक पटाया मलेसिया या सहलीसाठी रक्कम रु.11,000/- अॅडव्हान्स मिळालेचे नमुद आहे. तसेच वि प यांनी प्रस्तुत कामी हजर होऊन सदरची रिसीट नाकारलेली नाही. यावरुन तक्रारदार हे वि प यांचे ग्राहक असलेचे सिध्द होते. तक्रारदार व वि प यांचेमध्ये ग्राहक व सेवापुरवठादार असे नाते असलेने स्पष्ट होते. सबब मुद्दा क्र.1चे उत्तर आम्ही होकारार्थी दिले आहे.
7. तक्रारदार यांनी कागद यादीसोबत अ.क्र.1 ला दाखल केलेल्या वि प कंपनीच्या रिसीट वरुन असे दिसते की, तक्रारदाराने दि.13/05/2015 रोजी थायलंड बँकॉक पटाया मलेसिया या सहलीसाठी रक्कम रु.11,000/- वि प कंपनीकडे अॅडव्हान्स म्हणून भरलेले होते. तसेच उर्वरित रक्कम ट्रीप जाणार त्यापूर्वी 45 दिवसात वि प यांचेकडे जमा करणेची होती. यावरुन तक्रारदाराने वि प यांचेकडे दि.13/05/2015 रोजी आय डी क्र.71008 नुसार थायलंड बँकॉक पटाया मलेसिया या सहलीसाठी रक्कम रु.11,000/- अॅडव्हान्स जमा केलेले होते. तक्रारदार यांचे कथनानुसार, सदर ट्रीपसाठीची उर्वरित रक्कम तक्रारदारास भरणेस तयार होते, परंतु वि प यांचेकडे सदर ट्रीपबाबत तक्रारदाराने वारंवार विचारणा केली असता वि प यांनी त्यास कोणतेही प्रतिउत्तर दिले नाही. किंवा तक्रारदाराने वकीलांमार्फत पाठविलेल्या कायदेशीर नोटीसला कोणतेही उत्तर दिलेले नाही. यावरुन वि प कंपनीने तक्रारदारास दयावयाचे सेवेत त्रुटी ठेवून अनुचित व्यापार प्रथेचा अवलंब केलेचे सिध्द होते. तक्रारदाराने सादर केलेला पुरावा हा त्याची संपूर्ण केस शाबीत करण्याकरिता पुरेसा आहे. हा सर्व पुरावा जसाच्या तसा मान्य करण्यासारखा आहे, कारण वि प यांनी प्रस्तुत प्रकरणात हजर राहून तक्रारदाराचे तक्रारअर्जातील कोणतीही कथने नाकारलेली नाहीत किंवा त्याचा पुरावा देखील नाकारलेला नाही. वि.प. यांनी तक्रारदाराचे टूरसाठी अॅडव्हान्स रक्कम स्विकारुनही तक्रारदारास टूर पॅकेज दिलेले नाही ही वि प यांनी तक्रारदारास दयावयाच्या सेवेत त्रुटी केली आहे. वि.प. यांनी प्रस्तुत प्रकरणामध्ये वर नमूद केल्याप्रमाणे आपली लेखी कैफियत दाखल केलेली नाही आणि तक्रारदाराचे कोणतेही कथन अमान्य केलेले नाही. त्यामुळे वि.प. यांना तक्रारदाराची संपूर्ण कथने मान्य आहेत असेच गृहित धरावे लागेल. यावरुन तक्रारदार यांना टूर पॅकेज देणेमध्ये वि.प. असमर्थ ठरले आहेत ही बाब सिध्द होते. सबब, तक्रारदाराने आपली केस पूर्णतया शाबीत केलेली असून वि.प. यांनी तक्रारदारास सेवेत त्रुटी दिलेली आहे असा या मंचाचा निष्कर्ष आहे. सबब मुद्दा क्र.2 चे उत्तर हे मंच होकारार्थी देत आहे.
8. तक्रारदाराने टूर बुकींगसाठी दिलेली अॅडव्हान्स रक्कम रु.11,000/- त्यावर दि.13/05/2015 पासून 18 टक्के व्याजाने होणारी रक्कम रु.9,405/-, मानसिक त्रासापोटी रक्कम रु.50,000/- कायदेशीर नोटीसीचा खर्च रु.2,000/- व तक्रार अर्जाचा खर्च रु.10,000/-असे एकूण रक्कम रु.82,405/- वि.प. यांचेकडून वसूल होवून मिळावेत अशी मागणी केली आहे. तक्रारदाराने वि.प. यांचेकडे थायलंड बँकॉक पटाया मलेसिया या सहलीच्या अॅडव्हान्सपोटी भरलेली रक्कम रु.11,000/- दि.13/05/2015 पासून रक्कम हाती पडेपर्यंत द.सा.द.शे.6 टक्के दराने व्याजासह परत मिळणेस तक्रारदार पात्र आहेत असा या आयोगाचा निष्कर्ष आहे. तक्रारदाराने वि प यांना दिलेल्या अॅडव्हान्स रक्कम रु.11,000/- वर दि.13/05/2015 पासून 18 टक्के व्याजाने होणारी रक्कम रु.9,405/-, मानसिक त्रासापोटीची रक्कम रु.50,000/-, तक्रारीचा खर्च रु.10,000/- ची मागणी ही अवास्तव व अवाजवी वाटते. प्रस्तुत प्रकरणाचा एकूण सारासार विचार करता तक्रारदार हे वि प कडून तक्रारदाराने वि प यांचेकडे जमा केलेली अॅडव्हान्स रक्कम रु.11,000/- तसेच सदर रक्कमेवर दि.13/05/2015 पासून रक्कम हाती पडेपर्यंत द.सा.द.शे.6 टक्के व्याजासह वसूल होऊन मिळणेस तक्रारदार पात्र आहेत तसेच तक्रारदाराला मानसिक व आर्थिक व शारिरीक त्रासापोटी नुकसान भरपाई म्हणून रक्कम रु.5,000/- व तक्रार अर्जाचा खर्च रु.3,000/- वि.प. कंपनीने अदा करणे न्यायाचित वाटते. म्हणून हे आयोग मुद्दा क्र.3 चे उत्तर होय अंशत: असे देऊन प्रस्तुत कामी आम्ही पुढीलप्रमाणे अंतिम आदेश पारीत करीत आहोत. सबब, आदेश.
- आ दे श –
1) तक्रारदाराचा तक्रार अर्ज अंशत: मंजूर करणेत येतो.
2) वि.प.यांनी तक्रारदाराने थायलंड-बँकॉक-पटाया-मलेसिया या सहलीच्या अॅडव्हान्सपोटी भरलेली रक्कम रु.11,000/- तक्रारदाराला अदा करावी.
3) वि.प. यांनी तक्रारदाराला मानसिक, आर्थिक व शारिरिक त्रासापोटी रक्कम रु.5,000/- (रक्कम रुपये पाच हजार फक्त) व तक्रारअर्जाचे खर्चापोटी रक्कम रु.3,000/- (रक्कम रुपये तीन हजार फक्त) अदा करावी.
4) वर नमूद सर्व आदेशांची पुर्तता वि.प. यांनी आदेश पारीत तारखेपासून 45 दिवसांत करावी.
5) विहीत मुदतीत आदेशांची पुर्तता न केलेस ग्राहक सरंक्षण कायदा, 1986 चे कलम 25 व 27 प्रमाणे वि.प. विरुध्द कारवाई करणेची मुभा तक्रारदाराला देणेत येते.
6) आदेशाच्या सत्यप्रती उभय पक्षकारांना विनामुल्य पाठवाव्यात.