ग्राहक तक्रार क्र. : 329/2014
अर्ज दाखल तारीख : 23/01/2015
अर्ज निकाल तारीख: 19/08/2015
कालावधी: 0 वर्षे 07 महिने 29 दिवस
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, उस्मानाबाद
1. शेख अब्दूल जब्बार अब्दूल सत्तार,
वय - 45 वर्षे, धंदा – व्यापार,
रा.दर्गाह समोर, गाजीपुरा, जि.उस्मानाबाद. ....तक्रारदार
वि रु ध्द
1. अधिक्षक अभियंता,
महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी लि.,
उस्मानाबाद, ता. जि. उस्मानाबाद.
2. कार्यकारी अभियंता,
महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी लि.,
उस्मानाबाद, ता.जि. उस्मानाबाद.
3. सहाय्यक अभियंता,
महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी लि.,
उस्मानाबाद, ता.जि. उस्मानाबाद. ..विरुध्द पक्षकार
कोरम : 1) मा.श्री.एम.व्ही.कुलकर्णी, अध्यक्ष.
2) मा.श्रीमती विद्युलता जे.दलभंजन. सदस्य.
3) मा.श्री.मुकुंद बी.सस्ते, सदस्य.
तक्रारदारातर्फे विधिज्ञ : श्री.जी.जी.चौधरी.
विरुध्द पक्षकारा तर्फे विधिज्ञ : श्री.व्हि.बी.देशमूख.
न्यायनिर्णय
मा. अध्यक्ष श्री.एम.व्ही.कुलकर्णी यांचे व्दारा :
अ) विरुध्द पक्षकार (विप) वीज कंपनीकडून आपले फोटो स्टूडीओसाठी वीज कनेक्शन घेतले मात्र विप यांनी अवास्तव बिल देऊन चुकीने कनेक्शन तोडले. ते चालू करावे व भरपाई द्यावी म्हणून तक्रारकर्ता (तक) याने ही तक्रार दिलेली आहे.
1) तक चे तक्रारीतील कथन थोडक्यात पुढीलप्रमाणे आहे. तक आपले कुटूंबाचे उपजिवीकेसाठी सुपर फोटो स्टूडीओ मिळकत क्र.23/93 पाथरुड गल्ली उस्मानाबाद येथे चालवतो. वाणिज्यिक वापराकरीता विप कडून वीज कनेक्शन घेतले त्याचा ग्राहक क्र. 590010419311 असा आहे. बिल महिन्याच्या महिन्याला मिळत नसल्याने व मिटर प्रमाणापेक्षा जास्त पळत असल्याने तक ने विप कडे दि.28/02/2012, दि.29/10/2013, दि.11/02/2014, दि.13/03/2014, दि.22/07/2014, दि.20/08/14, दि.01/09/2014 असे वेळोवेळी अर्ज दिले. जानेवारी 2014 ते ऑगस्ट 2014 पर्यंत बिलामध्ये मिटर रिडिंग दाखवले. दि.22/08/2014 रोजी वीज पुरवठा खंडीत करण्यात आला. त्यावेळेस मिटर रिडिंग 343 दाखविले मात्र जुलै मध्ये 377 युनिट पर्यंत बिलाची आकारणी केली होती. ती बेकायदेशीर आहे. वीज पुरवठा खंडीत करुन विप ने तक ला दुकान बंद करण्यास भाग पाडले. तक याला मानसिक शारीरिक व आर्थिक त्रासास सामोरे जावा लागत आहे. त्यासाठी त्याला रु.2,25,000/- विप कडून मिळणे जरुर आहे. या तक्रारीचा खर्च रु.20,000/- मिळणे जरुर आहे. तसेच वीज पुरवठा चालू करुन द्यावा म्हणून ही तक्रार दि.23/01/2015 रोजी दाखल करण्यात आली आहे.
2) तक ने तक्रारी सोबत दिलेली नोटीस, केलेले अर्ज, बिले दाखल केली आहेत तसेच कन्झूमर पर्सनल लिजर इत्यादी कागदपत्रांच्या प्रती हजर केल्या आहेत.
ब) विप यांनी हजर होऊन दि.03/03/2015 रोजी आपले लेखी म्हणणे दाखल केलेले आहे.
1) तक याला महिन्याच्या महिन्याला बिले दिली होती. तक याने वापरलेली 157 युनिटचे बिल सप्टेंबर 2013 मध्ये एकदम दिले होते. त्याची विभागणी पाच महिन्यात करुन जास्तीचे रु.1,059/- कमी करुन तक ला बिल दिले होते. तरीसुध्दा तक थकबाकीत राहिला. त्याने दि.11/11/2013 रोजी रु.2,000/- भरले बाकी थकबाकी भरली नाही म्हणून वीज पुरवठा खंडीत करुणे भाग पडले. जुलै पर्यंत 377 युनिटची चुकीची आकारणी केली हे मान्य नाही. थकबाकी न भरल्यामुळे दि.12/05/2014 ची नोटीस देऊन तक चा विद्युत पुरवठा खंडीत केला. काम बंद झाल्यामुळे तक चे रोजचे रु.3,000/- नुकसान झाले व त्यास विप जबाबदार आहेत ह कबूल नाही. जुलै 2014 मध्ये तक कडे रु.4,943/- थकबाकी होती. मागणी करुन थकबाकी न दिल्यामुळे विद्युत पुरवठा खंडीत करण्यात आलेला आहे. तक चा विद्यूत वापर अत्यंत कमी होता. म्हणजेच तो व्यवसाय करत नव्हता तसेच विद्युत पुरवठा व्यापारी कारणांसाठी दिल्यामुळे ही तक्रार चालणार नाही त्यामुळे तक्रार रद्द होण्यास पात्र आहे असे म्हणणे दिले आहे
क) तक यांची तक्रार त्याने दिलेली कागदपत्रे व विप चे म्हणणे यांचे अवलोकन करता आमचे विचारार्थ खालील मुद्दे निघतात त्यांची उत्तरे आम्ही त्यांच्या समोर खाली दिलेल्या कारणांसाठी लिहिली आहेत.
मुद्दे उत्तरे
1) विप यांनी सेवेत त्रुटी केली आहे काय ? नाही.
2) तक अनुतोषास पात्र आहे काय ? नाही.
3) आदेश कोणता ? शेवटी दिल्याप्रमाणे
ड) कारणमिमांसा
मुद्दा क्र.1 व 2 :
1) सदर कामी विप ने तक चा वीज पुरवठा बंद केला आहे. मात्र तक ने तातडीचा हुकूम होऊन वीज पुरवठा चालू करुन द्यावा म्हणून मागीतलेला नाही. वीज पुरवठा दि.22/08/2014 रोजी खंडीत करण्यात आला. मात्र एक वर्ष होऊनही तक ला वीज पुरवठा चालू करण्याची निकड दिसुन येत नाही. तक ची तक्रार मुख्यत: जानेवारी 2014 ते ऑगस्ट 2014 या कालावधी मधील बिलाबद्दल आहे. मात्र जानेवारी फेब्रूवारी व मार्च 2014 ची बिले तक ने हजर केलेली नाहीत.
2) एप्रिल, मे 2014 च्या बिलाप्रमाणे मागील रिडिंग 300 चालू 321 वापर 21 युनिट मागील महिन्यांमध्ये वापर 27, 15, 33, 21, 19, 11, 19, 157, 50, 34, 34 युनिट असा होता. जून 2014 मध्ये 23 युनिट वापर तर जुलै 2014 मध्ये 11 युनिट वापर दाखवला आहे. हे खरे आहे की रिडिंग योग्य प्रकारे दाखविली नाही. मात्र तक चा वीज वापर कमी होता म्हणजेच तो व्यवसायासाठी वीज वापरत नव्हता. एप्रिल 2014 मध्ये रु.3,655/- थकबाकी होती.
3) विप ने म्हंटले आहे की सप्टेंबर 2013 मध्ये 157 युनिटचे बिल तक ला देण्यात आले. मात्र एकदम दिलेले बिल पाच महिन्यात विभागून रु.1,059/- वजा करण्यात आले. त्यानंतर तक ने फक्त दि.11/18/20।3 रोजी रु.2,000/- भरले पण थकबाकी पुर्णपणे भरली नाही. कंझ्यूमर पर्सनल लिजरचा उतारा तक नेच हजर केला आहे. असे दिसते की तक ने 11/02/2014 पासून विप कडे अर्ज देण्यास सुरुवात केली. मात्र ऑगस्ट 2014 मध्ये त्याचा वीज पुरवठा खंडीत करण्यात आला. सी.पी.एल. चे अवलोकन केले असता जानेवारी 2013 पासून 43, 43, 26, 16, 34, 34, 34, 50, 157, 19, 11, 19 असा दरमहाचा वीज वापर दाखवला आहे. सुरवातीस थकबाकी रु.654/- होती सप्टेंबर 2013 मध्ये थकबाकी रु.2,285/- झाली. दि.08/04/2013 नंतर तक ने बिल भरल्याचे दिसून येत नाही. नंतर दि.18/11/2013 रोजी रु.2,000/- भरल्याचे दिसुन येते. त्यामुळे थकबाकी रु.9,194/- झाली त्यानंतर थकबाकी वाढत गेली व जुलै मध्ये रु.4,943/- थकबाकी झाली.
4) तक ने दि.17/04/2013 चा मिटर बदली अहवाल हजर केला आहे. सि.पी.एल. प्रमाणे ऑगस्ट 2013 पर्यंत मिटर रिडिंग मिळाले नाही. म्हणून सप्टेंबर 2013 मध्ये 155 रिडिंग मिळाले व 157 युनिटचे बिल देण्यात आले. मात्र तो वापर पाच महिन्यात पसरवीला व जास्तीचे रु.1,059/- कमी करण्यात आले. मात्र नोव्हेंबर 2013 नंतर तक ने काहीही रक्कम भरली नाही. या पुर्वीच्या बिलाबद्दल जर तक ला आक्षेप होता तर त्याने त्याचे योग्य ते समर्थन करणे जरुर होते. वर म्हंटल्या प्रमाणे सि.पी.एल. प्रमाणे अवास्तव वापर नोंदवला गेला नाही. शिवाय मिटर बदलून दिले. केव्हाही अवास्तव वापर नोंदवलेला दिसत नाही. कमी वापर असल्यामुळे तक चा व्यवसाय होता हे पटण्यासारखे नाही. तसेच बिल न भरल्यामुळे विद्युत पुरवठा तोडला याबद्दल विप ला दोष देता येणार नाही. त्यामुळे विप ने सेवेत त्रुटी केली असे आम्हाला वाटत नाही. म्हणून मुद्दा क्र.1 व 2 चे उत्तर नकारार्थी देतो व खालीलप्रमाणे आदेश करतो.
आदेश
1) तक ची तक्रार रद्द करण्यात येते.
2) खर्चाबद्दल कोणताही आदेश नाही.
3) उभय पक्षकारांना आदेशाच्या प्रमाणित प्रती निशु:ल्क देण्यात याव्यात.
(श्री. एम.व्ही. कुलकर्णी)
अध्यक्ष.
(श्री.मुकूंद.बी.सस्ते) (सौ.विद्युलता जे.दलभंजन)
सदस्य सदस्या
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, उस्मानाबाद.