(घोषित दि. 16.01.2014 व्दारा श्रीमती रेखा कापडिया,सदस्या)
अर्जदार यांनी घरगुती वीज वापरासाठी गैरअर्जदार यांच्याकडून वीज पुरवठा घेतला आहे. त्यांना देण्यात आलेल्या वाढीव वीज बिलाच्या तक्रारीची दखल गैरअर्जदार यांनी न घेतल्यामुळे अर्जदाराने ग्राहक संरक्षण कायदा अंतर्गत मंचात तक्रार दाखल केली आहे.
अर्जदाराने दाखल केलेल्या तक्रारीनुसार त्यांनी घरगुती वापरासाठी गैरअर्जदार यांच्याकडून वीज पुरवठा घेतला आहे. त्यांचा जोडलेला वीजभार 710 वॅट असून महिन्याचा सरासरी वीज वापर 139 ते 169 युनिट असा आहे. गैरअर्जदार यांनी दिनांक 09.05.2012 रोजी त्यांना 3010 युनिट वीज वापराचे 26020/- रुपयाचे बिल आकारले. या वाढीव वीज बिला बाबत त्यांनी गैरअर्जदार यांच्याकडे दिनांक 24.05.2012, 17.08.2012, 14.12.2013 रोजी तक्रार दाखल करुन हे बिल रद्द करण्याची विनंती केली. गैरअर्जदार यांनी त्यांना वीज बिल दुरुस्त करुन दिले नाही व सदरील रक्कम न भरल्यास वीज पुरवठा खंडीत करण्याची धमकी दिली असे अर्जदाराने तक्रारीत म्हटले आहे. गैरअर्जदार यांनी सदरील बिल रद्द करण्याची तसेच सरासरी वीज वापराच्या आधारे बिल देण्याची व मानसिक त्रासापोटी नुकसान भरपाई देण्याची मागणी अर्जदाराने केली आहे.
अर्जदाराने मंचात दाखल केलेल्या तक्रारी सोबत वीज बिलाच्या प्रती, स्थळ पाहणी अहवाल व गैरअर्जदार यांच्याकडे केलेल्या तक्रारीच्या प्रती जोडल्या आहेत.
अर्जदाराने मंचात दाखल केलेल्या तक्रारी सोबत त्यांना देण्यात आलेल्या चुकीच्या वीज बिलापोटी विद्युत पुरवठा खंडीत करण्यात येऊ नये असा अंतरिम आदेश पारित करण्याची विनंती मंचास केली आहे. मंचाने अर्जदाराच्या या विनंती अर्जावर दिनांक 28.02.2013 रोजी सुनावणी घेतली व अर्जदाराने सात दिवसात 11,000/- रुपये भरल्यास त्यांचा वीज पुरवठा खंडीत करु नये असा अंतरिम आदेश पारीत केला.
गैरअर्जदार यांनी दिनांक 29.05.2013 रोजी मंचात जवाब दाखल केला. गैरअर्जदार यांच्या म्हणण्यानुसार अर्जदार ग्राहक नसून त्यांना तक्रार दाखल करण्याचा अधिकार नाही. त्यांच्याकडून अर्जदारास देण्यात आलेल्या सेवेत कोणतीही त्रुटी नसून वीज बिल भरण्याचे टाळण्याच्या उद्देशाने अर्जदाराने मंचात तक्रार दाखल केली असल्याचे सांगून तक्रार खारीज करण्याची विनंती केली आहे.
अर्जदार व गैरअर्जदार यांनी दाखल केलेल्या कागदपत्रांवरुन व सुनावणीवरुन असे दिसून येते की, अर्जदाराने श्री.भगवान लक्ष्मण पेरे यांच्या मार्फत गैरअर्जदार यांच्या विरुध्द मंचात तक्रार दाखल केली आहे व त्याप्रमाणे त्यांच्या नावाचे मुखत्यारपत्र सोबत जोडले आहे. त्यामुळे अर्जदार हे ग्राहक नाही हे गैरअर्जदार यांचे म्हणणे मंच मान्य करीत नाही.
अर्जदाराने गैरअर्जदार यांच्याकडून दिनांक 21.09.2000 रोजी घरगुती वापरासाठी वीज पुरवठा घेतला असून त्यांचा ग्राहक क्रमांक 510030338535 असा आहे. गैरअर्जदार यांनी जवाबा सोबत जानेवारी 2010 ते जुलै 2013 या कालावधीचे सी.पी.एल दाखल केले आहे. सदरील सी.पी.एल चे निरीक्षण केले असता जानेवारी 2010 मध्ये अर्जदाराकडे लावण्यात आलेल्या मीटरचा क्रमांक 10846393 असा असल्याचे दिसून येते. सदरील मीटर वरील नोंदी प्रमाणे अर्जदारास नोव्हेंबर 2010 पर्यंत वीज बिल आकारणी करण्यात आलेली दिसून येते. डिसेंबर 2010 मध्ये अर्जदाराचे मीटर बदलण्यात आल्याची नोंद सी.पी.एल वर दिसून येते. अर्जदाराने देखील तक्रारीमध्ये डिसेंबर 2010 मध्ये त्यांचे मीटर बदलण्यात आल्याचे म्हटले आहे. गैरअर्जदार यांनी जुने मीटर बदलल्या नंतर नवीन मीटर प्रमाणे वीज बिल आकारणी न करता जानेवारी 2011 ते जानेवारी 2012 या कालावधीत जुनाच मीटर नंबर दर्शवून सरासरीवर आधारीत वीज बिल आकारणी केली असल्याचे दिसून येते जी पूर्णत: चुकीची असल्याचे व अर्जदाराच्या प्रत्यक्ष वीज वापराप्रमाणे नसल्याचे स्पष्ट होते. गैरअर्जदार यांनी फेब्रूवारी 2012 मध्ये नवीन मीटरची (क्रमांक 14675868) नोंद घेऊन फेब्रूवारी 2012 व मार्च 2012 या दोन महिन्यात पुन्हा सरासरीवर आधारीत वीज बिल आकरणी केली असल्याचे दिसून येते. एप्रिल 2012 मध्ये रिडींग 1 व चालू रिडींग 3031 असे दर्शवून अर्जदारास 3030 युनिट वीज वापराचे बिल दिले असल्याचे सी.पी.एल वरुन दिसून येते.
वरील सर्व निरीक्षणावरुन गैरअर्जदार यांनी डिसेंबर 2010 मध्ये अर्जदाराचे जुने मीटर (क्रमांक 10846393) बदलून त्याजागी नवीन मीटर (क्रमांक 14675868) बसविले असल्याचे स्पष्ट होते. या मीटर बदलाची नोंद न घेता गैरअर्जदार यांनी अर्जदारास डिसेंबर 2010 ते एप्रिल 2012 या कालावधीत चुकीचा वीज वापर दर्शवित वीज बिल आकारणी केली असल्याचे दिसून येते जी सेवेतील त्रुटी मानण्यात येते. गैरअर्जदार यांनी आपल्या जवाबासोबत अर्जदाराच्या तक्रारीवर कोणतेही मुद्देसूद उत्तर दिलेले नसून मीटर बदली अहवाल देखील मंचात दाखल केलेला नाही.
गैरअर्जदार यांनी अर्जदाराचे मीटर डिसेंबर 2010 मध्ये बदलल्यानंतर जानेवारी 2012 पर्यंत अर्जदारास जुन्या मीटरचा क्रमांक दर्शवित वीज बिल आकारले आहे. एप्रिल 2012 च्या वीज बिलात मात्र नवीन मीटर वरील रिडींग 3031 दर्शविण्यात आले आहे. यावरुन अर्जदाराच्या डिसेंबर 2010 ते एप्रिल 2012 या कालावधीतील एकूण वीज वापर 3030 युनिट असल्याचे स्पष्ट होते. त्यामुळे सदरील वीज बिल हे या कालावधीसाठी विभागून देणे आवश्यक असल्याचे मंचाचे मत आहे. अर्जदाराने दाखल केलेली तक्रार मान्य करण्यात येत असून ते नुकसान भरपाई मिळण्यास पात्र आहे.
आदेश
- गैरअर्जदार यांनी अर्जदारास डिसेंबर 2010 नंतर देण्यात आलेली सर्व वीज बिले रद्द करण्यात येत आहे.
- गैरअर्जदार यांनी डिसेंबर 2010 ते एप्रिल 2012 या 17 महिन्याच्या कालावधीसाठी 3030 युनिट वीज वापराचे बिल विभागून अर्जदारास 30 दिवसात सुधारीत वीज बिल द्यावे.
- वरील प्रमाणे देण्यात येणा-या सुधारीत वीज बिलामध्ये व्याज व दंड आकारण्यात येऊ नये तसेच अर्जदाराने भरलेल्या रकमेची वजावट या सुधारीत वीज बिलातून करावी.
- गैरअर्जदार यांनी अर्जदारास सेवेतील त्रुटी पोटी रुपये 1,000/- (रुपये एक हजार फक्त) व खर्चापोटी रुपये 2,500/- (रुपये दोन हजार पाचशे फक्त) 30 दिवसात द्यावे.