::: आ दे श :::
( पारित दिनांक : 27/07/2017 )
माननिय सदस्य श्री. कैलास वानखडे, यांचे अनुसार : -
1) तक्रारकर्ता यांनी सदरहू तक्रार, ग्राहक संरक्षण कायदा 1986 चे, कलम 12 अन्वये, विरुध्द पक्षाने द्यावयाच्या सेवेत त्रुटी ठेवली व अनुचित व्यापार प्रथेचा अवलंब केला, म्हणून दाखल केली आहे.
तक्रारकर्ते यांची तक्रार थोडक्यात अशी की, तक्रारकर्त्याचा ग्राहक क्र. 326010326101 असून विरुध्द पक्षाची देयके वाटपाची पध्दत सदोष आहे. देयके वितरीत करतांना ग्राहकांची पोच घेण्यात येत नाही. देयके घरात किंवा घराबाहेर टाकण्यात येतात व ती कधी प्राप्त होतात व कधी होत नाहीत. माहे एप्रिल-2016 ची देयके अजिबात वितरीत केली नाहीत. तक्रारकर्त्याचे दि. 02/01/2016 ते 02/02/2016 पर्यंतचे माहे फेब्रुवारी 16 चे देयक रुपये 360/- चा भरणा दिनांक 25/02/2016 ला केला. या देयकात मिटर रिडींग चालुमध्ये फॉल्टी दर्शविलेले आहे, तर युनिट 65 दाखविले आहे. मिटर फॉल्टी नाही. त्या देयकात मागील रिडींगचे रकान्यात 2790 दर्शविले असून नंतर प्राप्त झालेल्या देयकात देखील 2790 च दर्शविले आहेत. या देयकात एकुण युनिट 178 असून रक्कम 1240/- आहे. प्रत्यक्षात भरणा विचारात घेतला नाही. 65 युनिटचे देयक नंतर, तसेच कायम ठेवले. म्हणून 65 युनिटचे बिल कमी करुन देण्याबाबत तक्रारकर्त्याने दिनांक 16/04/2016 ला अर्ज केला. परंतु त्याचा काही परिणाम झाला नाही. दिनांक 19/05/2016 रोजी रुपये 340/- चे देयक देण्यात आले, यामध्ये युनिट किंवा तारीख नमूद नाही. त्याबाबत तक्रारकर्त्याने दिनांक 20/05/2016 रोजी विरुध्द पक्षाची भेट घेतली. त्यांनी आकडेमोड करुन रुपये 571.38 होणार म्हणून निर्देशीत केले. त्याप्रमाणे रुपये 340/- भरणा वजा जाता तक्रारकर्त्याकडे थकबाकी रुपये 231.38 शिल्लक राहील. त्याचे देयक अद्याप दिले नाही. मे महिन्याचे देयकात थकबाकी व्याजासह 1265.47 पैसे निर्देशीत केले. त्या देयकात युनिट 126 असून, थकबाकी तसेच युनिट तक्रारकर्त्यास मान्य नाही. विरुध्द पक्षाने दिलेली देयके चुकीची आहे, त्याची दुरुस्ती करण्यात यावी व प्रार्थनेनुसार तक्रार मंजूर करावी, अशी तक्रारकर्त्याची विनंती आहे.
2) विरुध्द पक्षाचा लेखी जबाब / लेखी युक्तिवाद ः –
विरुध्द पक्षाने निशाणी क्र. 3 नुसार त्यांचा लेखी जबाब / लेखी युक्तिवाद दाखल केला व तक्रारकर्त्याच्या तक्रारीतील रिडींगबाबत व फॉल्टी रिडींगबाबतचा मजकूर तसेच तक्रारकर्ता यांचे मे महिन्याच्या देयकाबाबत, थकबाकी व्याजासह 1265.47 व 231.38 शिल्लक राहील, हा मजकूर अमान्य केला. तक्रारकर्त्याने बिनबुडाचे व खोटे आरोप केल्याचे नमूद केले. विरुध्द पक्षाने पुढे अधिकचे कथनात नमूद केले की, तक्रारकर्ता यानी एप्रिल 2016 चे देयक विरुध्द पक्ष यांच्याकडे जावून घेण्यात यावे व त्या देयक रक्कमेचा भरणा करावा. तक्रारकर्त्यास नियमानुसार व घरगुती वापरानुसार देयके देण्यात आली आहेत, ती बरोबर असून, तक्रारकर्ता यांनी न भरल्यास, तक्रारकतर्याचा विद्युत पुरवठा खंडित करण्याचा आदेश व्हावा. विरुध्द पक्षास तक्रारकर्त्याकडून नुकसान भरपाई व खर्च रुपये 5,000/- वसूल करुन देण्याबाबत आदेश व्हावा.
प्रकरण चालू असतांना तक्रारकर्त्याने विरुध्द पक्षाच्या विद्युत कायदा 2003 च्या कलम – 56 (1) नुसार दिलेल्या दिनांक 25/01/2017 च्या नोटीसला स्थगनादेश दयावा, असा अर्ज केला असता मा. सदस्य यांनी दिनांक 21/02/2017 रोजी त्यावर आदेश पारित केला होता. परंतु अंतिम निकाल पारित करतांना, तक्रारकर्त्याच्या प्लिडींगचा विचार केल्यामुळे, तक्रारीच्या प्रार्थनेनुसार अंतिम आदेश पारित केला.
3) कारणे व निष्कर्ष :-
तक्रारकर्ते यांची तक्रार व दाखल दस्त, विरुध्द पक्ष यांचा लेखी जबाब, तक्रारकर्त्याचे प्रतिऊत्तर व उभय पक्षांचा लेखी युक्तिवाद, या सर्वांचे काळजीपूर्वक अवलोकन करुन, खालील निष्कर्ष कारणे देवून पारित केला, तो येणेप्रमाणे.
तक्रारकर्त्याने दाखल केलेल्या दस्तातील (दस्त क्र. 13) विद्युत देयकावरुन, तक्रारकर्त्याने विरुध्द पक्षाकडून विज मिटर घेतलेले आहे. ते विरुध्द पक्षाने मान्य केल्याचे दिसून येते. यावरुन तक्रारकर्ता विजय श्रीरामआप्पा पटूकले हे विरुध्द पक्षाचे ग्राहक आहेत, ही बाब विरुध्द पक्षाला मान्य आहे. त्यामुळे तक्रारकर्ते विरुध्द पक्षाचे ग्राहक आहे, या निष्कर्षाप्रत मंच आले आहे. अर्जदार श्रीरामआप्पा पटूकले यांना तक्रारकर्ते क्र. 2 विजय श्रीरामआप्पा पटूकले यांनी ही केस दाखल करण्यासाठी रितसर अधिकार पत्र दिले आहे. तसेच तक्रारकर्ते क्र. 3 यांना तक्रारकर्ते क्र. 1 यांनी प्रकरणातून वगळले आहे.
तक्रारकर्ते यांनी दाखल केलेल्या दस्तावरुन असा बोध होतो की, विरुध्द पक्षाने फेब्रुवारी 2016 चे दिलेले विज देयक हे चालू रिडींग 2/2/2016 बाबत फॉल्टी असे त्यात नमूद आहे. सदर देयकात मागील रिडींग हे 2790 दिनांक 2/1/2016 रोजी असे नमूद आहे तर एकूण विज वापर 65 युनिट इतका नमूद आहे. त्यामुळे विरुध्द पक्षाने चालू रिडींग फॉल्टी असे नमूद असतांना देखील एकूण विज वापर कसा काढला, याबद्दलचे स्पष्टीकरण विरुध्द पक्षाच्या युक्तिवादात नाही. तसेच दाखल विज देयक मार्च-2016 वर चालू रिडींग 3/3/2016 चे 2968 असे नमूद असून दिनांक 2/2/2016 रोजीचे 2790 ईतके नमूद आहे ( मात्र फेब्रुवारी 16 च्या देयकात 2/2/2016 चे फॉल्टी रिडींग नमूद होते ) त्यामुळे विरुध्द पक्ष वापरानुसार किंवा दाखल युनिटप्रमाणे देयक देत नव्हते, असे दिसते. तक्रारकर्त्याने दाखल केलेल्या दस्तांवरुन असा बोध होतो की, तक्रारकर्ते यांनी स्वतःही रिडींगची नोंद ठेवली आहे. दाखल दस्तावरुन विरुध्द पक्षाने एप्रिल 2016 चे देयक वाटप केले नव्हते, असे दिसते, मात्र त्यापुढील देयकात थकबाकी व्याज / दंड लावून आकारणी केली असे दर्शविण्यात आले आहे. विशेष म्हणजे विरुध्द पक्षाने एकही दस्त दाखल केलेले नाही, त्यामुळे त्यांचा बचाव सिध्द होत नाही तसेच विरुध्द पक्षाने तक्रारकर्ते यांचे मुद्दे सकारण खोडून काढलेले नाही. त्यामुळे तक्रारकर्ते यांची प्रार्थना मंजूर करण्यात मंचाला काहीही गैर वाटत नाही.
सबब, अंतिम आदेश पुढीलप्रमाणे पारित केला.
:: अंतिम आदेश ::
- तक्रारकर्त्याची तक्रार अंशत: मंजूर करण्यात येते.
- विरुध्द पक्ष क्र. 1 ते 3 यांनी संयुक्तपणे वा वेगवेगळे तक्रारकर्त्याकडील मिटरचे रिडींग नियमीत वाचून त्याप्रमाणे वापराप्रमाणे विद्युत देयके द्यावी.
- विरुध्द पक्ष क्र. 1 ते 3 यांची सेवा न्युनता सिध्द झाल्यामुळे, त्यांनी त्यापोटीची नुकसान भरपाई म्हणून प्रकरण खर्चासह तक्रारकर्त्यास रुपये 3,000/- ( रुपये तीन हजार फक्त ) द्यावे.
- विरुध्द पक्ष यांनी या आदेशाचे पालन, आदेशाची प्रत मिळाल्यापासून 45 दिवसाचे आत करावे.
- उभय पक्षकारांना आदेशाची प्रत निःशुल्क देण्यात यावी.
( श्री. कैलास वानखडे ) ( सौ. एस.एम. उंटवाले )
सदस्य. अध्यक्षा.
svGiri जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्याय मंच, वाशिम.