ग्राहक तक्रार अर्ज क्र.225/2011
ग्राहक तक्रार अर्ज दाखल दि.30/09/2011
आदेश दि.31/01/2012
नाशिक जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्यायमंच, नाशिक
श्री.सलिम फकिर महंम्मद मदारी,
रा.घर नं.3076, बागवान पुरा, तक्रारदार
मोठा राजवाडा, जुने नाशिक. नाशिक. (अँड.सौ.विजया माहेश्वरी)
विरुध्द
1. अधिक्षक अभियंता,
महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कं.मर्या.,
शहर विभाग-1, दुसरा मजला,
प्रोस्पर पार्क, मधुमिलन मंगल कार्यालयजवळ,
शिंगाडा तलाव, नाशिक. सामनेवाला
2. कनिष्ठ कार्यकारी अभियंता, (अँड.अरविंद कुलकर्णी)
शहर उपविभाग, नाशिक.
महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कं.मर्या.,
द्वारका-1 कक्ष, नाशिक.
(मा. अध्यक्ष,श्री.आर.एस.पैलवान यांनी निकालपत्र पारीत केले)
नि का ल प त्र
सामनेवाला यांनी अर्जदार यांचे राहात्या घरात मंजूर विद्युत मिटर बसवून द्यावे असा आदेश सामनेवाला यांना व्हावा, त्याकामी जरुर वाटल्यास पोलीस संरक्षण घेवून मिटर बसवून द्यावे असा आदेश सामनेवाला यांना व्हावा, दाव्याचा खर्च मिळावा व इतर न्यायाचे हुकूम व्हावेत या मागणीसाठी अर्जदार यांचा तक्रार अर्ज आहे.
तक्रार क्र.225/2011
सामनेवाला क्र.2 यांनी पान क्र.17 लगत लेखी म्हणणे व पान क्र.18 लगत प्रतिज्ञापत्र सादर केलेले आहेत. सामनेवाला क्र.1 यांनी सामनेवाला क्र.2 यांनी दाखल केलेला जबाब हाच सामनेवाला क्र.1 यांचा जबाब समजण्यात यावा अशी पुरसीस पान क्र.23 लगत दाखल केलेली आहे.
अर्जदार व सामनेवाले यांनी दाखल केलेले सर्व कागदपत्रांचा विचार होऊन पुढीलप्रमाणे मुद्दे विचारात घेतलेले आहेतः
मुद्देः
1. अर्जदार हे सामनेवाला यांचे ग्राहक आहेत काय?-होय.
2. सामनेवाला यांनी अर्जदार यांना सेवा देण्यात कमतरता केली आहे काय?-
नाही
3. अंतीम आदेश?- अर्जदार यांचा तक्रार अर्ज नामंजूर करणेत येत आहे.
विवेचनः
याकामी अर्जदार यांनी पान क्र.25 लगत लेखी युक्तीवाद सादर केलेला आहे. सामनेवाला व त्यांचे वकिल हे युक्तीवादाचे वेळी गैरहजर राहीलेले आहेत.
सामनेवाले यांनी त्यांचे लेखी म्हणणे व प्रतिज्ञापत्र कलम 5 मध्ये, “अर्जदार यांनी विज कनेक्शन मिळण्यासाठी सामनेवाला यांचेकडे अर्ज केला व त्याप्रमाणे त्यासाठीची रक्कमसुध्दा भरलेली आहे.” असे म्हटलेले आहे. अर्जदार यांनी पान क्र.6 लगत फर्म कोटेशन व पान क्र.7 लगत दि.23/4/2011 रोजीची सामनेवाला यांनी दिलेली रक्कम रु.1051/- इतक्या रुपयांची पावती झेरॉक्स प्रती हजर केलेल्या आहेत. सामनेवाला यांचे लेखी म्हणणे व पान क्र.6 व 7 चे कागदपत्रे यांचा विचार होता अर्जदार हे सामनेवाला यांचे ग्राहक आहेत असे या मंचाचे मत आहे.
सामनेवाला यांनी त्यांचे लेखी म्हणणे व प्रतिज्ञापत्रामध्ये “सामनेवाला यांचे कर्मचारी अर्जदार यांचे जागेत विजपुरवठा देण्यासाठी गेले असता त्याठिकाणी त्याच मिळकतीचे बाजुस राहाणारे हुसनोद्दीन बशिरोद्दीन शेख यांनी हरकत घेतली. त्यामुळे विजपुरवठा करता आला नाही. श्री शेख यांनी सर्वे नं.4031/ड याक्षेत्रात विज कनेक्शन न देण्याबाबत दि.18/04/2011 रोजी लेखी अर्ज दिलेला आहे.
तक्रार क्र.225/2011
सामनेवाला यांनी पोलिसाकडे अर्ज देवून पोलिस मदत घेवून अर्जदारास विज कनेक्शन देण्याचा प्रयत्न केला. परंतु सदर मिळकतीचे मालक यांनी त्याठिकाणी तिव्र हरकत घेतल्याने आजपर्यंत विजपुरवठा देता आलेला नाही. अर्जदार यांनी ज्या कागदपत्रांची पुर्तता केली आहे त्यामध्ये दि.19/04/2011 रोजी प्रतिज्ञापत्र दिले आहे व या प्रत्रिज्ञापत्रामध्ये “सदरहु जागेवर कुठलेही लाईटमिटर घेण्यास हरकत आल्यास त्याचे निवारण मी करुन देईन.” असे लिहून दिलेले आहे. सामनेवाला यांनी जाणूनबुजून निष्काळजीपणा केलेला नाही. सेवा देण्यात कमतरता केली नाही. अर्ज रद्द करण्यात यावा.” असे म्हटलेले आहे.
या कामी सामनेवाला यांनी पान क्र.20 लगत हुसनोद्दीन बशिरोद्दीन शेख यांचे दि.18/04/2011 रोजीचे पत्र झेरॉक्स प्रत दाखल केली आहे. या पत्रामध्ये शेख यांनी सर्वे नं.4031/ड या जागेवर विद्युत कनेक्शन देवु नये अशी हरकत घेतली आहे असे दिसून येत आहे. अर्जदार यांनीच पान क्र.28 लगत मा.सिव्हील जज्ज, ज्युनियर डिव्हीजन, नाशिक यांचे कोर्टातील रेग्युलर दिवाणी मुकदमा नं.260/2011 या दाव्याची सही शिक्क्याची प्रत व पान क्र.29 लगत याच दाव्यातील सामनेवाला यांचे कैफियतीची प्रत दाखल केलेली आहे. पान क्र.28 चे दिवाणी दाव्याचा विचार करीता अर्जदार यांनी हुसनोद्दीन बशिरोद्दीन शेख वगैरे पाच या लोकांचे विरुध्द त्यांचे स्वतःचे घराकरीता विद्युत मिटर घेण्याकरीता प्रतिवादी क्र.1 ते 5 यांनी हरकत करु नये, याबाबत हुकूम व्हावेत, अशी मागणी दाव्यामध्ये केलेली आहे हे स्पष्ट होत आहे.
पान क्र.20 चे पत्राचा विचार होता, अर्जदार हे ज्या जागेमध्ये विद्युत कनेक्शन मागत आहेत, त्या जागेमध्ये विद्युत कनेक्शन देण्यास हुसनोद्दीन बशिरोद्दीन शेख यांनी विरोध केलेला आहे हे स्पष्ट होत आहे. पान क्र.28 चे दिवाणी दाव्याचा विचार होता अर्जदार यांनीच हुसनोद्दीन बशिरोद्दीन शेख वगैरे पाच लोकांविरुध्द विद्युत मिटर घेण्याकामी या पाच लोकांनी हरकत करु नये यासाठी दिवाणी कोर्टामध्ये दाद मागीतली आहे हे स्पष्ट होत आहे. या सर्व कारणांचा विचार होता जरी सामनेवाला हे अर्जदार यांना विद्युत कनेक्शन देण्यास तयार असले तरीसुध्दा जागेच्या मुळ मालकांचा विद्युत कनेक्शन देण्यास विरोध आहे व त्याबाबत अर्जदार यांनीच दिवाणी कोर्टात दाद मागितली आहे हे स्पष्ट होत आहे.
तक्रार क्र.225/2011
वरील सर्व कारणांचा विचार होता सामनेवाला यांनी अर्जदार यांना विद्युत कनेक्शन देण्यामध्ये जाणूनबुजून टाळाटाळ केलेली नाही असे स्पष्ट होत आहे. वरील सर्व कारणांचा विचार होता सामनेवाला यांनी अर्जदार यांना सेवा देण्यामध्ये कमतरता केलेली नाही असे या मंचाचे मत आहे.
अर्जदार यांचा अर्ज, प्रतिज्ञापत्र त्यांनी दाखल केलेली सर्व कागदपत्रे, लेखी युक्तीवाद तसेच सामनेवाला यांचे लेखी म्हणणे, प्रतिज्ञापत्र, त्यांनी दाखल केलेली सर्व कागदपत्रे आणि वरील सर्व विवेचन यांचा विचार होऊन पुढीलप्रमाणे आदेश करण्यात येत आहेः
आ दे श
अर्जदार यांचा तक्रार अर्ज नामंजूर करण्यात येत आहे.
(आर.एस.पैलवान) (अँड.सौ.व्ही.व्ही.दाणी)
अध्यक्ष सदस्या
ठिकाणः- नाशिक.