ग्राहक तक्रार क्र. 331/2014
अर्ज दाखल तारीख : 29/12/2014
अर्ज निकाल तारीख: 04/09/2015
कालावधी: 0 वर्षे 08 महिने 05 दिवस
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, उस्मानाबाद
1. राहूल नारायणराव लोखंडे,
वय - 29 वर्षे, धंदा – वकील,
रा.श्री. दत्त निवास, शिवाजीराव साळूंके नगर,
ता.जि. उस्मानाबाद. ....तक्रारदार
वि रु ध्द
1. मा. मुख्य अधिक्षक,
मुख्य पोष्ट ऑफिस,
रेल्वे स्टेशन जवळ, सोलापूर,
2. मा. पोष्ट मास्तर,
शाखा- गुरुनानक नगर,
पोष्ट ऑफिस, सोलापूर.
3. मा. हेड पोष्ट मास्तर,
मुख्य पोष्ट कार्यालय, उस्मानाबाद,
शाखा- उस्मानाबाद. ता. जि. उस्मानाबाद. ..विरुध्द पक्षकार
कोरम : 1) मा.श्री.एम.व्ही.कुलकर्णी, अध्यक्ष.
2) मा.श्रीमती विद्युलता जे.दलभंजन. सदस्या.
3) मा.श्री.मुकुंद बी.सस्ते, सदस्य.
तक्रारदारातर्फे विधीज्ञ : श्री.एम.बी.इनामदार.
विरुध्द पक्षकार तर्फे विधीज्ञ : श्री.डी.डब्लू.पाटील.
न्यायनिर्णय
मा. अध्यक्ष श्री.एम.व्ही.कुलकर्णी यांचे व्दारा :
आपल्याला रजिस्टर पोस्टाने अपील सुनावणीची तारीख कळविली असताना विरुध्द पक्षकार (विप) पोस्ट ऑफीस यांनी नोटीस तारीख झाल्यानंतर दिल्यामुळे नुकसान भरपाई मिळणेसाठी तक्रार कर्ता (तक) यांनी ही तक्रार दिलेली आहे.
तक चे तक्रारीतील कथन थोडक्यात पुढीलप्रमाणे
1) तक हा उस्मानाबादचे रहिवाशी आहे. त्याने माहितीच्या अधिकाराखाली छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालय सोलापूर यांच्याकडे अर्ज केलेला होता मात्र तो अर्ज मंजूर झाला नाही. त्यामुळे तक यांनी अपीलीय अधिका-याकडे अपील केले. अपीलीय अधिकारी यांनी तक यांना सुनावणीची तारीख रजिस्टर पोस्टाने जा.क्र.4228/29/14 दि.23.04.2014 अन्वये पाठविली. रजिस्ट्रेशनचा नं.271956157 आयएन असा होता. अपीलाच्या सुनावणीची तारीख 29.04.2014 दुपारी 4 वाजता अशी कळविली. विप 1 ते 3 यांचे कर्मचारी यांच्या बेशिस्त व बेजबाबदार कारभारामुळे ते पत्र तक ला दि.03.05.2014 रोजी मिळाले. त्या दिवशी अपीलाच्या सुनावणीची तारीख निघून गेलेली होती. त्यानंतर तक ने रुग्णालय सोलापूर येथे जावून चौकशी केली. तक गैरहजर असल्यामुळे अपील निकाली काढण्यात आल्याचे त्याला कळाले. त्यामुळे तक चे मोठे आर्थिक, मानसिक व शारिरिक नुकसान झालेले आहे. हे नुकसान रु.70,000/- चे झालेले आहे. तसेच मानसिक त्रासापोटी रु.25,000/- मिळणे जरुरी आहे. तसेच तक्रारीचा खर्च रु.5,000/- मिळणे जरुरी आहे. ही भरपाई मिळण्यासाठी तक ने दि.29.12.2014 रोजी ही तक्रार दाखल केलेली आहे.
2) तक्रारीसोबत तक ने अपीलीय अधिका-याचे दि.22.04.2014 ची नोटीस, दि. 30.04.2014 चे पत्र, विप यांना पाठविलेली दि.11.06.2014 ची नोटीस, तसेच पोस्टाच्या पावत्या इत्यादी कागदपत्रे दाखल केलेली आहेत.
3) विप यांनी हजर होऊन दि.05.05.2014 रोजी लेखी म्हणणे दाखल केलेले आहे. सोलापूर रुग्णालयाने पाठविलेले पत्र तक ला दि.03.05.2014 रोजी मिळाले हे कबूल आहे. त्या पत्रात काय होते हे विप ला माहित नाही. इंडीयन पोस्ट ऑफीस अॅक्ट कलम 6 प्रमाणे पत्र उशिरा मिळाल्यास विप जबाबदार राहू शकत नाही. तक चे रु.70,000/- ची नुकसान भरपाईची मागणी चुकीची आहे. विप चे नियम व अटी तक वर बंधनकारक आहे. फक्त रजिस्टर पत्र असेल तरच विप वर जबाबदारी येते. साधे पत्र असेल तर कसलीही जबाबदारी विप वर येत नाही. त्यामुळे तक्रार रदद होणेस पात्र आहे.
4) तक ची तक्रार त्याने दाखल केलेली कागदपत्रे व विप चे म्हणणे यांचे अवलोकन करता आमचे विचारार्थ खालील मुददे निघतात त्यांची उत्तरे आम्ही त्यांचेसमोर खाली दिलेल्या कारणासाठी लिहिली आहेत.
मुद्दे उत्तर
1) विप ने सेवेत त्रुटी केली आहे काय ? होय.
2) तक अनुतोषास पात्र आहे काय ? होय.
3) आदेश कोणता ? शेवटी दिल्याप्रमाणे.
कारणमिंमासा
मुद्दा क्र.1 व 2 ः-
5) विप क्र.1 व 2 ने आपले म्हणणे असे मांडले की, जर रजिस्टर पत्र असेल तरच तो ग्राहक होऊ शकतो. साधे पत्र पाठविले तर तो ग्राहक होऊ शकणार नाही. तक ने रुग्णालय सोलापूरच्या दि.22.04.2014 चे पत्र हजर केले आहे, त्यावर डाक नोंद पोष्ट देय हे लिहीलेले आहे. त्या पत्राप्रमाणे तक याला दि.29.04.2014 रोजी दुपारी 4 वाजता अपीलीय अधिकारी यांच्या कक्षात वेळेवर उपस्थित राहण्यास सांगण्यात आले होते. तकचे म्हणणे आहे की, त्याला ते पत्र दि.03.05.2014 रोजी मिळाले. विप ने रजिस्टर पत्राचा नंबर आर.एन.272956157 तकला दि.03.05.2014 रोजी मिळाल्याचे मान्य केले आहे. या पत्राची तारीख विप ने दि.29.04.2014 अशी दिलेली आहे. हे लक्षात घेतले पाहिजे की, हे पत्र रुग्णालय सोलापूर यांनी तक याला पाठविले होते. ते रजिस्टर पत्र असल्याचे विप च्या म्हणण्यावरुनच शाबीत होते. त्यामुळे विपचे म्हणणे की, साधे पत्र असल्यामुळे तक ग्राहक या संज्ञेत येत नाही हे अमान्य करावे लागेल. हे खरे आहे की, पत्र रुग्णालय सोलापूर यांनी पाठविल्याने विप मार्फत जायचे होते. मात्र तक हा लाभदार होता, कारण पत्र त्याला मिळायचे होते. बेनिफिशयरी असल्यामुळे तक हा सुध्दा विप चा ग्राहक होतो.
6) पत्र रुग्णालय सोलापूरने पाठविल्यामुळे ते केव्हा पाठविले याबददलचा पुरावा तक कडे असणार नाही. विप चे म्हणणेप्रमाणे त्या पत्राची तारीख 29.04.2014 आहे. म्हणजेच विप कडे ते पत्र दि.29.04.2014 रोजी आले. रुग्णालय सोलापूर ही संस्था असल्यामुळे कार्यालयीन विलंब होऊ शकतो. मात्र पत्रावर तारीख 22.04.2014 आहे. पत्राप्रमाणे तक ला अपीलाच्या कामी दि.29.04.2014 रोजी बोलाविलेले होते. मात्र ते पत्र विप कडे दि.29.04.2014 रोजीच रजिस्टर करण्यासाठी आले हे दाखवायला विप ला आपले रेकॉर्ड दाखल करता आले असते. विप ने आपले रेकॉर्ड दाखल न केल्यामुळे विपचे विरुध्द निष्कर्ष काढावा लागेल. दि.22.04.2014 चे पत्र दि.23.04.2014 रोजी विप कडे रजिस्टर होणे अपेक्षित आहे. त्यानंतर दि.29.04.2014 पर्यंत तक ला मिळणे सुध्दा अपेक्षित आहे. अगदी 7 दिवसाचा कालावधी धरला तरी, दि.30.04.2014 रोजी तरी ते पत्र मिळायला पाहिजे होते. विपचे म्हणणे आहे की, पोस्टाचा कायदा कलम 6 प्रमाणे पत्र उशिरा मिळाले तरी, विप जबाबदार राहू शकणार नाही. मात्र रजिस्टर पोस्टाने पत्र जाण्यास 7 दिवसापेक्षा जास्त कालावधी लागत असेल तर पत्र मिळणा-याचे नुकसान होणार हे उघड आहे. प्रत्यक्ष या कामी सुमारे 10 दिवसाने ते पत्र मिळाल्याचे दिसते.
7) तक चे म्हणणेप्रमाणे माहिती अधिकाराचा अर्ज रुग्णालय सोलापूर यांनी नामंजूर केला होता. तक हे वकील आहेत. मात्र रुग्णालय सोलापूर कडून कोणती माहिती पाहिजे होती व त्याचे काय महत्व होते याबददल तक यांनी काहीही खुलासा केला नाही. तक यांचा अर्ज प्रथम फेटाळण्यात आला होता त्यानंतर तक यांनी अपील केले होते. मात्र या सर्व प्रकारामध्ये त्या गोष्टीचे काय महत्व होते याबददल तक यांनी मौन बाळगले. तकचे म्हणणे आहे की, त्यांचे रु.70,000/- चे नुकसान झाले. तसेच मानसिक त्रासाबददल रु.25,000/- मिळणे जरुर आहे. मात्र या दाव्याच्या पुष्टयर्थ काहीही पुरावा दिलेला नाही. अगर खुलासा पण दिलेला नाही.
8) विप यांनी रजिस्टर पत्र वेळेत न दिल्यामुळे तक यांना अपीलाच्या कामी वेळेवर हजर राहता आले नाही. त्यामुळे अपील निकाली काढण्यात आले. यामुळे तकचे काही नुकसान नक्की झाले आहे. त्यासाठी विप यांनी भरपाई रु.5,000/- देणे योग्य ठरेल असे आमचे मत आहे. म्हणून आम्ही मुददा क्र.1 व 2 चे उत्तर होकारार्थी देतो व खालीलप्रमाणे आदेश करतो.
आदेश
तक ची तक्रार अंशतः खालीलप्रमाणे मंजूर करण्यात येत आहे.
1) विप क्र.1 ते 3 यांनी तक याला सेवेतील त्रुटी बद्दल रु.5,000/- (रुपये पाच हजार फक्त) द्यावे.
2) विप क्र.1 ते 3 यांनी या तक्रारीचा खर्च म्हणून रु.500/- (रुपये पाचशे फक्त) द्यावे.
3) वरील प्रमाणे भरपाई 30 दिवसामध्ये द्यावी न दिल्यास तक्रार दाखल तारखेपासून
द.सा.द.शे. 9 दराने रक्कम फिटेपर्यंत व्याज द्यावे.
4) ग्राहक संरक्षण कायदा 1986 चे अधिनियम 2005 मधील कलम 20 (3) प्रमाणे तक्रारीतील सदस्यांचे संच तक्रारदाराने परत न्यावेत.
5) विरुध्द पक्षकार क्र.1 ने वरील आदेशाचे पालन आदेशाच्या प्रमाणीत प्रती मिळाल्यापासून येत्या तीस दिवसात करावी अन्यथा त्यानंतरच्या कालावधी करीता द.सा.द.शे. 9 टक्के व्याजदर सदर रक्कम प्रत्यक्ष अदा होईपर्यंत लागू राहील.
6) उभय पक्षकारांना आदेशाच्या प्रमाणित प्रती निशु:ल्क देण्यात याव्यात.
(श्री. एम.व्ही. कुलकर्णी)
अध्यक्ष
(श्री.मुकूंद.बी.सस्ते) (सौ.विद्युलता जे.दलभंजन)
सदस्य सदस्या
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, उस्मानाबाद