जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्यायमंच बीड यांचे समोर
ग्राहक तक्रार क्रमांक –170/2010 तक्रार दाखल तारीख –08/12/2010
पवन पि.नामदेव वाघमारे
वय 26 वर्षे,धंदा मजूरी ..तक्रारदार
रा.शिवाजी नगर, टी.पी.एस.रोड,परळीवैजनाथ
ता.परळी वै., जि.बीड
विरुध्द
सुप्रिटेंडेंट ऑफ पोस्ट ऑफिसेस,
बीड डीव्हीजन, बीड ...सामनेवाला
को र म - पी.बी.भट, अध्यक्ष
अजय भोसरेकर, सदस्य.
तक्रारदारातर्फे :- अँड.एल.आर.बजाज
सामनेवालेतर्फे :- प्रतिनिधी
निकालपत्र
तक्रारदार यांनी प्रस्तुतची तक्रार ग्राहक संरक्षण कायदा 1986 कलम 12 प्रमाणे सामनेवाले विरुध्द दाखल केली आहे.
तक्रारदाराची तक्रार थोक्यात अशी की, तक्रारदार हा परळी वै.येथील रहीवाशी असुन त्यास प्रविण व प्रकाश दोन भावू आहेत. तक्रारदाराचे वडील ता.29.09.2009 रोजी मयत झाले. तक्रारदाराचे कुटूंबाच्या चरितार्थाचेमजूरी हे एकमेव साधन आहे. तक्रारदाराची आई नामे पार्वती नामदेव वाघमारे हीने पोस्टात एजन्ट म्हणुन काम करणा-या पोस्टाचे सेवत असणा-या अधिका-याने ग्रामीण पोस्टल जीवन विमा पत्र घेण्या बाबत प्रवृत केले. त्या अनुषंगाने तीने स्वतःच्या आयुष्यावर रक्कम रु.1,00,000/- चा विमा घेतला. त्याचा कालावधी ता. 3.2.2006 पासुन सुरु झाला. विमा कालावधी यामध्ये ईए- 60 नमुद केला आहे. प्रारंभी हाप्त्याची रक्कम रु.530/- सामनेवालेनी ता. 3.2.2006 रोजी देण्यात आला. मासिक हप्त्याची सवलत घेणा-यांना विम्याच्या हप्त्याची रक्कम त्या त्या महिन्याच्या शेवटी भरावयाची होती. सदर विमा पत्र क्र. आर-एमएच-एआर-ईए-737161 असा आहे.
तक्रारदाराचे आईने ता. 3.2.2006 पासुन 18 महिने हप्ते भरले आहेत. विम्याचे हप्ते मुदतीत न भरल्यामुळे खंडीत झालेल्याविमा पॉलीसीचे पूर्नजीवन करण्याचीतरतुद विमा पॉलसीत आहे. तरतुदीनुसार थकित हप्त्याची रक्कम अधिक त्यावरील व्याज दंड व्याज आकारल्यास पॉलीसीचे आपोआपच पुर्नजीवन होण्याची सोय विमापत्रात आहे.
दिनांक | हप्त्याची रक्कम | व्याज/ दंड | एकुण भरलेली रक्कम | हप्त्यांची संख्या |
03.02.2006 | 530/- | -- | 530/- | 01 |
22.06.2006 | 530/- | 15 | 545/- | 01 |
29.09.2006 | 3180/- | 75 | 3255/- | 06 |
29.11.2006 | 1060/- | 2 + 5 | 1067/- | 02 |
30.04.2007 | 2650/- | 50 + 10 | 2710/- | 05 |
25.09.2007 | 1590/- | 50 +6 | 1646/- | 03 |
रक्कम व्याज व दंडासह भरलेली असल्याने आपोआपच पुर्नजीवनाच्या तरतुदीनुसार सामनेवाले यांचेकडे रक्कम भरणा केली. सदरची रक्कम सामनेवालेंनी स्वीकारलेने सामनेवालेकडून विमा पत्र खंडीत झाले असे म्हणण्याचा अधिकार उरत नाही, व असा बचावाचा फायदाही सामनेवालेयांना घेता येणार नाही. शेवटच्या तीन हप्त्याची रक्कम ता.25.09.2007 रोजी सामनेवालेंनी स्वीकारला आहे.
सदर विमापत्रात पुर्नजीवन करण्याची आनखीन एक तरतुद ठेवण्यात आली आहे. त्यानुसार विमाधारकानी त्याचे उत्तम स्वाथ्याचे स्वतःच्या व त्यांच्या मालकाच्या सहीने प्रमाणपत्र, जर तो नौकरीत असेल तर देण्याची तरतुद आहे. व विमाधारक नौकरीत नसल्यास अशा प्रमाणापत्राची आवश्यकता नाही. इतःपरही पॉलीसी धारकाने तिच्या चांगल्या स्वाथ्याचे प्रमाणपत्र वैद्यकीय अधिका-याचे स्वाक्षरीने व कौठाळी शाखेच्या पोस्टमास्तरच्या स्वाक्षरीचे सामनेवालेकडे सादर केले आहे.
दुर्दैवाने तक्रारदाराची आई ता.29.07.2009 रोजी अल्पशा कालावधीच्या आजारपणात मृत्यू पावल्या. विमाधारकास ताप आल्यामुळे ती शेवटी बिछाण्यात होती. तक्रारदार याबाबत कौठाळी येथील शाखा पोस्टमास्तर, अंबाजोगाई पोस्ट ऑफिस येथील निरिक्षक यांना उद्देशुन लिहिलेले पत्रात याबाबतचा खुलासा करण्यात आलेला आहे. विमाधारकाच्या मृत्यू नंतर तिच्या मृत्यूची नोंद सामनेवालेकडे केली व विमा रक्कमेची मागणी केली.
ब-याच दिवसाचे कालावधी नंतर सामनेवालेकडून ता.4.1.2008 रोजी तक्रारदाराना पत्र मिळाले त्यात कांही कागदपत्रांची मागणी केली होती. तक्रारदार नमुद करु इच्छितो की, सामनेवालेचे उपविभागीय निरिक्षक अंबाजोगाई यांनी वरील पत्रात नमुद केलेली सर्व कागदपत्रे देण्यात आली होती. ज्या कागदपत्राचे अस्तित्व नाही अशा कागदपत्रांच्या बाबतीत किंवा मुद्याचे बाबतीत सविस्तर खुलासा देण्यात आला आहे. तरीही तक्रारदारांनी दाखल केलेल्या मृत्यूच्या दाव्याचा विचार ब-याच मोठया कालावधी पर्यन्त केलेला नाही.
तक्रारदाराना सामनेवालेकडून अकस्मिकपणे एक पत्र प्राप्त झाले व त्यात नमुद करण्यात आले होते की, मार्च,06, एप्रिल ते ऑगस्ट,06, ऑक्टोबर,06, डिसेंबर,06 ते मार्च,07 व मे,07 व जुलै,07 अशी एकुण 13 हप्तेची रक्कम ग्रेसपिरेड मध्ये भरण्यात आलेली नाही. त्यामुळे मृत्यू दाव्याची रक्कम देता येणार नाही. त्यामुळे तक्रारदाराना मानसिक त्रास झाला त्यापोटी रक्कम रु.25,000/-खिशातुन सोसावा लागला. खर्च रक्कम रु.25,000/- अधिक त्यावरील व्याज 12 टक्के प्रमाणे विमापत्राची रक्कम पूर्णतः दिली जाईपर्यन्त व्याजासह मिळणे न्यायाचे होईल.
विनंती की, विमाधारकाचे मृत्यूच्या विमा दाव्याची रक्कम रु.1,00,000/- अधिक त्यावरील सर्व लाभासह रक्कम व स्वतः खर्च केलेली रक्कम रु.25,000/-, मानसिक त्रासापोटी बाबत रक्कम रु.25,000/- त्यावर द.सा.द.शे. 12 टक्के व्याजासह व तक्रारीचा खर्च सामनेवालेनी तक्रारदाराना देण्याबाबत आदेश व्हावा.
सामनेवालेंनी त्यांचा खुलासा नि.9 वर ता.10.2.2011 रोजी दाखल केला. खुलाशात तक्रारीतील सर्व आक्षेप सामनेवाले यांनी नाकारली आहेत. विमाधारकानी जुलै,07 पर्यन्त ( फेब्रुवारी 06 ते जुलै,07) एकुण 18 हप्ते रक्कम रु.530/- प्रमाणे भरलेली आहेत. परंतु त्यात कांही हप्ते मार्च,06 एप्रिल,06 ते ऑगस्ट 06,ऑक्टोबर 06, डिसेंबर 06 ते मार्च 07, मे 07 ते जुलै 07, एकुण 14 हप्ते ग्रेस पिरेडमध्ये विमा करारातील अट क्रं.5 प्रमाणे भरलेली नाहीत. सदर हप्ते ग्रेस पिरेडनंतर भरलेली आहेत. यासंदर्भात हप्ते भरताना तीच्या चांगल्या स्वाथ्यासंबंधी विमाधारकानी करारातील कलम 7 व पीओआयटी रुल 39(3) प्रमाणे प्रमाणपत्र देणे आवश्यक होते.
तक्रारदार व त्यांच्या बंधुनी विमा दावा मंजूरी बाबत विचारणा केली. तक्रारदारांनी मयत विमाधारकाच्या चांगल्या स्वाथ्याचे प्रमाणपत्राची झेरॉक्स प्रती ता.1.1.2010 रोजी दाखल केल्या. सर्व प्रमाणपत्रात कार्यालयाला विमाधारकाचे मृत्यूनंतर जानेवारी,2010 मध्ये मिळाले. त्यानंतर आवश्यक ती चौकशी करण्यात आली. श्री.पवन वाघमारे व श्री प्रकाश वाघमारे तक्रारदाराचे भाऊ यांनी बीपीएम कौठाळी(बीओ) यांनी डिसेंबर,2009 मध्ये रजेवर गेले आणि बीपीएम यांच्या सहया आणि रबर स्टँप चांगल्या आरोग्याच्या को-या प्रमाणपत्रावर मारुन घेतल्या. विमाधारक पार्वतीबाई तीच्या सहया बीपीएम यांच्या समक्ष करण्यात आल्या नाहीत. सदरच्या सहया मूळ विमापत्रातील अर्जाशीजुळत नाहीत. बीपीएम कौठाळी यांनी त्यांच्याजबाबात तारखेच्या शिक्के कौठाळी बीओ मधून डिसेंबर,09 मध्येमारुन घेतल्याची बाबत नमुद केले आहे. आणि वास्तवात सदरचे शिक्के हे ता.22.6.2006, 29.9.2006, 29.11.2006, 30.4.2007 आणि 29.9.2007ला मारण्यात आलेले नाही. तसेच बीपीएम च्या सहया आणि नाव डिसेंबर,2009 मध्ये लिहिन्यात आल्या आहेत. अशा त-हेने तक्रारदाराने मयत विमेदाराचे प्रमाणपत्र वेळीचसादर न करता नंतर सादर केले आहे. म्हणुन तक्रारदाराचादावा नियमाप्रमाणे नाकारण्यात आला आहे. तक्रार खर्चासह रद्द करण्यात यावी.
तक्रारदाराची तक्रार, दाखल कागदपत्र, तक्रारदाराचे शपथपत्र, सामनेवाले यांचा खुलासा, शपथपत्र सामनेवाले यांचा लेखी युक्तीवाद दाखल याचे सखोल वाचन केले. तक्ररदाराचा युक्तीवाद ऐकला.
तक्रारीतील कागदपत्रे पाहता, पार्वतीबाई नामदेव वाघमारे हीने तीचे जीवनावर पोस्टल विमापत्र रक्कम रु.1,00,000/-चा घेतला आहे. सदर विम्याचा कालावधी ता.3.2.2006 पासुन सुरु झाला. सदर विम्याचा हप्ता दरमहा रु.530/- प्रमाणे भरावयाचा होता.
विमाधारकानी एकुण 18 हप्ते भरलेले आहेत. दुर्दैवाने ता.29.9.2007 रोजी अल्पशा आजारात त्यांचा मृत्यू झाला. विमाधारक मजूरी करत होते, त्यामुळे त्यांचेकडून विम्याचे हप्ते वेळेत भरले गेले नाहीत. तक्रारीत नमुद असलेल्या हप्त्यांचा तपशिल सामनेवाले यांना मान्य आहे. विमाधारकाने नियमीत हप्ते भरले नसल्यामुळे थकीत हप्ते दंड व्याजासह भरलेले आहे.
विमापत्रातील अटीनुसार सामनेवाले यांचे म्हणने की, खुलाशात नमुद केलेली 14 हप्ते विमाधारकानी ग्रेस पिरेड नंतर भरलेली आहेत. सदर हप्ते भरते वेळी विमाधारकानी त्यांच्या चांगल्या तब्येतीबाबत प्रमाणपत्र देणे आवश्यक होते. परंतु तसे प्रमाणपत्र देण्यात आले नाही. त्यामुळे विमापत्रातील अट क्रं.5 प्रमाणे विमाधारकाचे मृत्यूनंतर कोणतीही रक्कम देणे होत नाही.
यासंदर्भात तक्रारदाराने मयत विमेदाराचे मृत्यूनंतर ता.1.1.2010 रोजी विमाधारकाचे चांगल्या प्रकृतीबाबत प्रमाणपत्राच्या झेरॉक्स प्रती दाखल केल्या आहेत. त्याबाबत चौकशी केली असता सदरचे प्रमाणपत्र हे डिसेंबर,2009 मध्ये संबंधीत बीपीएम यांच्यासहया व शिक्के को-या फॉर्मवर घेतल्याचे संबंधीत बीपीएमने त्यांचे जबानीत सांगीतल्याने उघड झाले. त्यामुळे प्रमाणपत्र वेळेत नसल्याने सदरचे हप्ते हे विमाधारकाचे खात्यात जमा करण्यात आले नाही. त्यामुळे तक्रारदाराना विमाधारकाचे विमाचे मृत्यूचा लाभ मिळणे शक्य नाही.
वरील सामनेवालेचे विधान लक्षात घेता, तक्रारदारानी सदरचे विधानही स्पष्टपणे नाकारलेले नाही. तसेच वेळोवेळी विमाधारकाचे चांगल्या तब्यतीचे प्रमाणपत्र वेळीच सादर केले असेही तक्रारदाराचे म्हणने नाही. याउलट तक्रारदाराचे म्हणने की, सामनेवालेनी विम्याचे हप्ते दंड, व व्याजासह स्विकालेले असल्याने विमाधारकाचे विमापत्र आपोआपच पूर्नजीवीत झाले आहे. वरील सर्व वस्तुस्थिती लक्षात घेता विमाधारकाचा मृत्यू हा अजाराने झालेला आहे. त्यामुळे विमाधारकाचे मृत्यूनंतर तक्रारदारांना विमा भरलेली रक्कम मिळणे आवश्यक आहे. सामनेवालेनी विमाधारकाकडून 18 हपते घेतले आहे व सामनेवालेचे म्हणने प्रमाणे सदरचे विमापत्रात हे बंद अवस्थेत आहे. अशा परिस्थितीत तक्रारदाराना सामनेवालेंनी तक्रारदाराना रु.530/- प्रमाणे एकुण 18 हप्त्याची रक्कम रु.9,540/- देणे उचित होईल, असे न्यायमंचाचे मत आहे.
विमापत्र बंद असल्याने हप्ता रक्कम दंड व्याजासह स्विकारत असतांना त्याबरोबर आवश्यक असणारे जिवंतचा दाखला वेळीच घेण्याची जबाबदारी सामनेवालेची आहे. परंतु ठेवीचेवेळीच सदर दाखले न घेतल्याने आणि पूढील हप्ते स्विकारल्याने सामनेवालेची विमा पत्रचालू करणेसंबंधीची कार्यवाही वेळीच पूर्ण न करुन विमाधारकास दयावयाचे सेवेत कसुर केल्याची बाब स्पष्ट होते. त्यामुळे भरलेली रक्कम ही सामनेवालेकडे असल्याने ती तक्रारदाना देणे उचित होईल, असे न्यायमंचाचे मत आहे.
सबब, न्यायमंच खालील प्रमाणे आदेश देत आहे.
आदेश
1. तक्रारदाराची तक्रार अंशतः मंजूर करण्यात येते.
2. सामनेवाले यांना आदेश देण्यात येते की, तक्रारदारास मयत पार्वतीबाई नामदेव वाघमारे यांचे मृत्यू दाव्यात विम्या पोटी जमा असलेली रक्कम रु.9,540/- ( अक्षरी रुपये नऊ हजार पाचशे चाळीस फक्त) आदेश मिळाले तारखेपासुन 30 दिवसाचे आत अदा करावी.
3. सामनेवाले यांना आदेश देण्यात येते की, वरील आदेशातील रक्कम विहित मुदतीत अदा न केल्यास त्यावर द.सा.द.शे.9 टक्के व्याज तक्रार दाखल तारखेपासुन ता.8.12.2010 पासुन व्याज देण्यास सामनेवाले जबाबदार राहतील.
4. सामनेवाले यांना आदेश देण्यात येते की, तक्रारदारास झालेल्या मानसिक त्रासाची रक्कम रु.1,000/- (अक्षरी रुपये एक हजार फक्त) व तक्रारीचे खर्चापोटी रक्कम रु.1,000/-(अक्षरी रुपये एक हजार फक्त) आदेश मिळाल्या पासुन 30 दिवसाचे आत तक्रारदारास अदा द्यावी.
5. ग्राहक संरक्षण कायदा 1986 अधिनियम 2005 मधील कलम 20(3) प्रमाणे तक्रारीतील सदस्यांचे संच तक्रारदारास परत करावेत.
( अजय भोसरेकर ) ( पी.बी.भट )
सदस्य, अध्यक्ष,
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्यायमंच,बीड जि.बीड