::: नि का ल प ञ:::
(मंचाचे निर्णयान्वये, मा. सौ. कल्पना जांगडे (कुटे) मा.सदस्या)
(पारीत दिनांक :- 06/11/2019)
1. तक्रारकर्त्याने सदर तक्रार ग्राहक संरक्षण कायदा 1986 चे कलम 12 अन्वये दाखल केली आहे. सदर तक्रारीचा थोडक्यात आशय खालील प्रमाणे.
2. विरूध्द पक्ष हे महिला बचत गट असून सदर बचत गट चालविण्यासाठी सदस्यांकडून दरमहा ठरावीक रक्कम स्विकारतात. तक्रारकर्त्याचे पत्नीलादेखील विरूध्द पक्षाने सदस्य करून घेतले होते व तिचे नांवे 3 पासबुक होते. तक्रारकर्त्याची मय्यत पत्नी शोभा दहिवले यांनी ऑक्टोबर,2011 पासून दिनांक 23/3/2015 पर्यंत एकूण 42 महिन्याकरीता दरमहा रू.250/- प्रमाणे एकूण रू.10,500/- दुस-या पासबुकमध्ये ऑक्टोबर,2011 पासून दिनांक 20/3/2015 पर्यंत एकूण 42 महिन्याकरीता दरमहा रू.250/- प्रमाणे एकूण रू.10,500/- आणी तक्रारकर्त्याची पत्नी मय्यत शोभा दहिवले व बबीता रामटेके हयांचे संयुक्त नांवे असलेल्या तिस-या पासबुकमध्ये प्रत्येकी रू.125/- प्रमाणे दरमहा एकूण रू.250/- प्रमाणे जुलै,2012 पासून दि.20/3/2015 पर्यंत एकूण 33 महिन्यांकरीता एकूण रक्कम रू.8250/- याप्रमाणे तिनही पासबुक मिळून एकूण रक्कम रू.29,250/- जमा केली. सदर तिन खात्यांची परिपक्वता रक्कम अनुक्रमे रू.15,000/-, रू.15,000/- तसेच रू.12,000/- एकूण रू.42,000/- अशी आहे. त्यानुसार विरूध्द पक्ष यांनी दोन पासबुक तक्रारकर्त्याच्या मयत पत्नीचे नांवे तर तिसरे पासबूक तक्रारकर्त्याची मय्यत पत्नी व सौ.बबिता रामटेके यांचे संयुक्त नांवाने दिलेले आहे. वरील संपूर्ण परिपक्वता रक्कम रू.42,000/- दिनांक 31/3/2015 रोजी परिपक्व झाल्यानंतर मय्यत शोभा व सौ.बबिता यांनी विरूध्द पक्षाकडे रकमेची मागणी केली असता इतर सदस्यांकडून रकमा जमा व्हावयाच्या आहेत त्या जमा झाल्यानंतर देऊ असे सांगून टाळाटाळ केली. तक्रारकर्त्याची पत्नी मय्यत शोभा दहिवले यांचे दिनांक 1/9/2018 रोजी अपघाती निधन झाले. त्यामुळे तक्रारकर्त्याने पती व वारसदार म्हणून रकमेबाबत पाठपूरावा केला असता वि.प.यांनी दिनांक 10/2/2019 पर्यंत सदर रक्कम नुकसान भरपाईसह देण्याचे आश्वासन श्री.सुभाष गुडे, सौ.बबिता रामटेके व इतर साक्षीदारांसमक्ष आश्वासन दिले. परंतु वि.प.ने पुर्तता न केल्यामुळे तक्रारकर्त्याने अधिवक्ता श्री.जयपाल पाटील यांचेमार्फत वि.प.ला नोटीस दिला मात्र वि.प.ने नोटीस घेण्यांस नकार दिल्याने सदर नोटीसचा लिफाफा परत आला. विरूध्द पक्षाने सदर परिपक्वता रक्कम परत न करून तक्रारकर्त्याप्रति न्युनतापूर्ण सेवा दिल्यामुळे तक्रारकर्त्याने प्रस्तूत तक्रार मंचासमक्ष दाखल करून अशी मागणी केली आहे की, तक्रारकर्त्याची पत्नी मय्यत शोभा दहिवले हिचे नांवाने असलेल्या दोन खात्यांची परिपक्वता रक्कम तसेच तक्रारकर्त्याची पत्नी मय्यत शोभा दहिवले व बबीता रामटेके हयांचे संयुक्त नांवे असलेल्या तिस-या पासबुक खात्याची परिपक्वता रक्कम मधील अर्धी रक्कम अशा दोन्ही रक्कम व त्यावर परिपक्वता तिथीपासून द.सा.द.शे.18 टक्केव्याजासह देण्यांत यावेत तसेच तक्रारखर्च रू.10,000/- देण्यांचे आदेश व्हावेत अशी प्रार्थना केली आहे.
3. तक्रारकर्त्याची तक्रार स्विकृत करुन विरूध्द पक्षा विरुध्द नोटीस काढण्यात आले. मात्र विरूध्द पक्षास नोटीस प्राप्त होवूनही ते मंचासमक्ष हजर न झाल्याने तसेच त्यांनी कोणताही बचाव प्रस्तूत न केल्यामुळे विरूध्द पक्षाविरूध्द प्रकरण एकतर्फी चालविण्याचे आदेश मंचाने दिनांक 27/8/2019 रोजी नि.क्र.1 वर पारीत केले.
4. तक्रारकर्त्याची तक्रार, दस्तावेज, तक्रारकर्त्याची तक्रार व दस्तावेज यालाच तक्रारकर्त्याचे शपथपत्र समजण्यात यावे अशी नि. क्र.7 वर पुर्सीस दाखल व तोंडी युक्तीवाद तसेच तक्रारीतील कथनावरुन खालील मुद्दे मंचाच्या विचारार्थ घेण्यात आले. त्याबाबतची कारणमिमांसा आणी निष्कर्ष पुढील प्रमाणे.
मुद्दे निष्कर्ष
1) तक्रारकर्ता विरूध्द पक्षांचा ग्राहक आहे काय ? : होय
2) विरूध्द पक्षाने तक्रारकर्त्याप्रति न्युनता पूर्ण सेवा दिली आहे
काय ? : होय
3) तक्रारकर्ता मागणीप्रमाणे दाद मिळण्यास पाञ आहे
काय ? : अंतिम आदेशाप्रमाणे.
कारण मिमांसा
मुद्दा क्रं. 1 बाबत ः-
5. विरूध्द पक्ष हे महिला बचत गट असून सदर बचत गट चालविण्यासाठी सदस्यांकडून दरमहा ठरावीक रक्कम स्विकारतात. तक्रारकर्त्याची पत्नी ही विरूध्द पक्षाची सदस्य होती व तिने तिचे नांवे असलेल्या पासबुक खात्यामध्ये दरमहा रू.250/- प्रमाणे तसेच तक्रारकर्त्याची पत्नी मय्यत शोभा दहिवले व बबीता रामटेके हयांचे संयुक्त नांवे असलेल्या दुस-या पासबुक मध्ये दरमहा रू.125/- प्रमाणे रकमा जमा केल्या होत्या हे तक्रारकर्त्याने प्रकरणात नि.क्र.5 वर दाखल केलेल्या उपरोक्त दोनही खात्यांचे पासबूकचे अवलोकन केले असता निदर्शनांस येते. तक्रारकर्त्याची पत्नी मय्यत शोभा दहिवले यांचे दिनांक 1/9/2018 रोजी अपघाती निधन झाले. त्यामुळे तक्रारकर्ता हे मयत ठेवीदाराचे पती व वारसदार म्हणून विरूध्द पक्ष यांचे ग्राहक या संज्ञेत मोडतात असे मंचाचे मत आहे. सबब मुद्दा क्रं. 1 चे उत्तर हे होकारार्थी नोंदविण्यात येते.
मुद्दा क्रं. 2 बाबत ः-
6. तक्रारकर्त्याने नि.क्र.5 वर दाखल केलेल्या दस्तावेजांचे अवलोकन केले असता असे निदर्शनांस येते की, तक्रारकर्त्याची मय्यत पत्नी शोभा दहिवले यांनी ऑक्टोबर,2011 पासून दिनांक 23/3/2015 पर्यंत एकूण 42 महिन्याकरीता दरमहा रू.250/- प्रमाणे एकूण रू.10,500/- आणी तक्रारकर्त्याची पत्नी मय्यत शोभा दहिवले व बबीता रामटेके हयांचे संयुक्त नांवे असलेल्या दुस-या पासबुकमध्ये प्रत्येकी रू.125/- प्रमाणे दरमहा एकूण रू.250/- प्रमाणे जुलै,2012 पासून दि.20/3/2015 पर्यंत एकूण 33 महिन्यांकरीता एकूण रक्कम रू.4125/- याप्रमाणे एकूण रक्कम रू.14,625/- जमा केली. मात्र तक्रारकर्त्याने मयत शोभाचे चे नांवे तिसरे वैयक्तीक खाते होते व त्याखात्यात रक्कम जमा केली होती हे कोणतेही दस्तावेज वा पुरावा मंचासमक्ष दाखल करून सिध्द केलेले नाही. त्यामुळे सदर खाते व त्या खात्यातील रकमेबाबत तक्रारकर्त्याचे म्हणणे ग्राहय धरता येत नाही. परंतु उर्वरीत दोन खाते दिनांक 31/3/2015 रोजी परिपक्व झाल्यानंतर त्यांची परिपक्वता रक्कम मय्यत शोभा यांनी विरूध्द पक्षाकडे उपरोक्त रकमेची मागणी केली असता ती देण्यांस वि.प.यांनी टाळाटाळ केली. तक्रारकर्त्याची पत्नी मय्यत शोभा दहिवले यांचे दिनांक 1/9/2018 रोजी अपघाती निधन झाले. त्यामुळे तक्रारकर्त्याने पती व वारसदार म्हणून रकमेबाबत पाठपूरावा केला असता वि.प.यांनी दिनांक 10/2/2019 पर्यंत सदर रक्कम नुकसान भरपाईसह देण्याचे आश्वासन श्री.सुभाष गुडे व सौ.बबिता रामटेके व इतर साक्षीदारांसमक्ष दिले असे तक्रारकर्त्याने शपथेवर नमूद केले आहे. विरूध्द पक्षाने प्रस्तूत प्रकरणी मंचात उपस्थीत होवून तक्रारकर्त्याचे आक्षेप कोणताही बचाव दाखल करून खोडून काढलेले नाहीत. यावरून तक्रारकर्त्याचे विरूध्द पक्षांकडे असलेल्या दोन्ही खातेपुस्तकांतील जमा रक्कम परिपक्वता तिथीनंतर त्यांचे पत्नीने व तिचे निधनानंतर त्यांनी स्वतः मागणी करूनही न दिल्यामुळे वि.प.यांनी तक्रारकर्त्याप्रती न्युनतापूर्ण सेवा दिल्याचे सिध्द होते. त्यामुळे तक्रारकर्ता विरूध्द पक्ष यांचेकडून उपरोक्त दोन खात्यांची जमा रक्कम व्याजासह मिळण्यांस तसेच रक्कम वेळेवर न मिळाल्यामुळे झालेल्या शारिरीक व मानसीक त्रासापोटी नुकसान भरपाई मिळण्यांस पात्र आहे. सबब मुद्दा क्रं. 2 चे उत्तर होकारार्थी नोंदविण्यात येते.
मुद्दा क्रं. 3 बाबत ः-
7. मुद्दा क्रं. 1 व 2 च्या विवेचनावरुन मंच खालील प्रमाणे आदेश पारीत करीत आहे.
अंतीम आदेश
(1) तक्रारकर्त्याची तक्रार क्र.52/2019 अंशतः मंजूर करण्यात येते.
(2) विरूध्द पक्ष यांनी तक्रारकर्त्यांस, त्याच्या तक्रारकर्त्याची पत्नी मय्यत शोभा दहिवले यांचे नांवे असलेल्या बचत पुस्तक खात्यात ऑक्टोबर,2011 पासून दिनांक 23/3/2015 पर्यंत जमा केलेली रक्कम रू.10,500/- तसेच तक्रारकर्त्याची पत्नी मय्यत शोभा दहिवले व बबीता रामटेके हयांचे संयुक्त नांवे असलेल्या दुस-या पासबुकमध्ये जुलै,2012 ते दि.20/3/2015 या कालावधीत जमा केलेल्या रकमेपैकी निम्मी रक्कम रू.4125/- याप्रमाणे एकूण रक्कम रू.14,625/- व त्यावर तक्रार दाखल केल्याचा दिनांक 9/4/2019 पासून तक्रारकर्त्यास रक्कम प्राप्त होईतो द.सा.द.शे.9 टक्के व्याजासह परत करावी.
(3) विरूध्द पक्ष यांनी तक्रारकर्त्यांस झालेल्या शारिरीक व मानसीक त्रासापोटी तक्रारकर्त्यांस नुकसान भरपाई दाखल रू.3,000/- व तक्रारखर्चापोटी रू.2,000/- द्यावेत.
(4) उभय पक्षांना आदेशाची प्रत तात्काळ पाठविण्यात यावी .
(श्रीमती.कल्पना जांगडे(कुटे)) (श्रीमती. किर्ती वैदय (गाडगीळ)) (श्री. श्री.अतुल डी. आळशी)
सदस्या सदस्या अध्यक्ष
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्यायमंच, चंद्रपूर.