निकालपत्र :- (दि.19.10.2010)(द्वारा - श्री.एम्.डी.देशमुख, अध्यक्ष) (1) प्रस्तुतची तक्रार स्विकृत करुन सामनेवाला यांना नोटीसीचा आदेश झाला. सामनेवाला यांनी म्हणणे दाखल केले. सुनावणीचेवेळेस, तक्रारदारांच्या वकिलांनी लेखी युक्तिवाद दाखल केला आहे. सामनेवाला यांच्या वकिलांनी युक्तिवाद केला. (2) तक्रारदाराची थोडक्यात तक्रार अशी, कोल्हापूर महानगरपालिका हद्दीतील ई वॉर्ड, राजारामपूरी 6 वी गल्ली येथील सि.स.नं.1888/ब/2-अ ही मिळकत सामनेवाला बांधकाम व्यावसायिक यांनी विकसित करुन शकुंतला रेसिडेन्सी ही इमारत बांधलेली आहे. सदर इमारतीतील बेसमेंटमधील युनिट गाळा नं.बी-2 रक्कम रुपये 1 लाखास तक्रारदारांना विक्री करणेबाबत सामनेवाला यांनी मान्य केले. त्याप्रमाणे सामनेवाला यांना दि.01.10.2010 रोजी चेक नं.698993 रक्कम रुपये 75,000/- व दि.17.06.2004 रोजी चेक नं.696593 रक्कम रुपये 25,000/- अशा रक्कमा सामनेवाला यांना अदा केलेल्या आहेत. इमारतीचे बांधकाम पूर्ण झालेनंतर व भोगवटा प्रमाणपत्र मिळालेनंतर बेसमेंटचा कब्जा देतो असे सांगितले. पंरतु, तक्रारदार व सामनेवाला यांचेतील संबंधामुळे तक्रारदारांनी स्वतंत्रपणे संचकारपत्र लिहून घेतले नव्हते. (3) तक्रारदार त्यांच्या तक्रारीत पुढे सांगतात, सामनेवाला यांनी इमारतीचे बांधकाम पूर्ण झालेनंतर व भोगवटा प्रमाणपत्र मिळालेनंतर तक्रारदारांनी वारंवार विचारणा करुनही सदर बेसमेंटचा ताबा देवून खरेदीपत्र पूर्ण केलेले नाही. सबब, सामनेवाला यांनी भोगवटा प्रमाणपत्र मिळालेनंतर म्हणजेच जानेवारी 2007 मध्ये मिळकतीचा ताबा न दिल्याने प्रतिमाह रुपये 5,000/- प्रमाणे रक्कम रुपये 1,70,000/- इतके नुकसान झाले आहे. सबब, सामनेवाला यांनी सदर इमारतीतील युनिट गाळा नं.बी-2 चा तक्रारदारांना ताबा देवून खरेदीपत्र करुन देणेबाबतचा आदेश व्हावा. मानसिक, आर्थिक त्रासापोटी रुपये 1,70,000/- व तक्रारीचा खर्च देणेबाबत आदेश व्हावेत अशी विनंती केली आहे. (4) तक्रारदारांनी त्यांच्या तक्रारीसोबत सामनेवाला यांनी क्र.288 व 308 च्या दिलेल्या पावत्या, भोगवटा प्रमाणपत्र, तक्रारदारांनी दि.14.01.10 रोजी पाठविलेले पत्र, महानगरपालिकेने दिलेला सुधारित बांधकाम परवाना इत्यादीच्या प्रती व शपथपत्र दाखल केले आहे. (5) सामनेवाला यांनी तक्रारदारांची तक्रार नाकारली आहे. ते त्यांच्या म्हणण्यात पुढे सांगतात, तक्रारदारांनी युनिट गाळा नं.बी-2 चे वर्णन संदिग्ध दिलेले आहे. सदर गाळा रक्कम रुपये 1 लाख विक्री करणेस कधीही मान्यता दिलेली नव्हती. त्यामुळे तक्रारीस कोणतेही कारण घडलेले नाही. तक्रारीत उल्लेख केलेली मिळकत ही मुळची तारळेकर कुटुंबियांच्या मालकीची होती. तक्रारदारांच्या मातोश्री, शंकुतंलाबाई गणपतराव तारळेकर यांच्या मालकीची होती. त्यांनी सदर मिळकतीबाबत मृत्यूपत्र लिहून ठेवले होते. त्यानुसार तक्रारदारांचे चिरंजीव श्री.चैतन्य दिलीप तारळेकर यांचे मालकीची सदर मिळकत झाली. त्यानंतर सन 2004 मध्ये सदर चैतन्य यांनी तक्रारदारांचे संम्मतीने सदर मिळकत विकसनासाठी देणेचे ठरले. त्यानुसार तक्रारदार व चैतन्य तारळेकर यांचेमध्ये दि.02.11.2004 रोजी करार झाला. त्यास मान्यतादार म्हणून तक्रारदारांनी सही केली आहे. सदर विकसन करारपत्रामध्ये शकुंतला रेसिडेन्सी या मिळकतीत सर्वात वरच्या मजल्यावर 800 चौरस फूटाचा 2 बी.एच्.के. फलॅट श्री.चैतन्य यांचेसाठी ठेवणेबाबत तरतूद होती. त्यानंतर तळघरातील जागा घेणेबाबत तक्रारदार इच्छुक आहेत का अशी विचारणा केली असता तक्रारदारांनी काही रक्कम देवून ठेवतो व नंतर निर्णय घेवू असे सांगितले. त्याप्रमाणे रुपये 1 लाख सामनेवाला यांचेकडे देवून ठेवली. श्री.चैतन्य यांनी गोवा राज्यामध्ये नोकरी पत्करली असल्याने तारळेकर कुटुंबियांना कोल्हापूर येथील जागेबाबत स्वारस्य राहिलेले नाही. त्यामुळे दि.02.11.2007 रोजी मुळ विकसन करारपत्रात पुरवणी लेख लिहून फलॅट खरेदी रद्द करुन त्याऐवजी रोख रक्कम स्विकारली. त्यावेळेस तळघरातील जागा घेणेबाबत कोणताही तपशील ठरविला नाही. (6) सामनेवाला पुढे सांगतात, अचानकपणे दि.14.01.2010 रोजी लेखी पत्र पाठवून बेसमेंटमधील गाळा खरेदीबाबत मागणी केली. परंतु, जुने व्यावहारिक संबंध विचारात घेवून सामनेवाला यांनी लेखी उत्तर न देता तक्रारदारांची समक्ष भेट घेतली. त्यावेळेस तक्रारदारांनी फलॅट नसेल तर तळघर ठेवण्यात स्वारस्य नाही व रक्कम परत करणेची मागणी केली असता सामनेवाला यांनी दि.25.03.2010 रोजीचा रत्नाकर बँक लि., शाखा शाहुपूरी, कोल्हापूर येथील चेक नं.140778 रक्कम रुपये 1 लाखाचा चेक तक्रारदारांना दिला व सदर चेकची रक्कम तक्रारदारांनी वसुल केली आहे. सबब, तक्रारदारांची तक्रार नामंजूर करुन रुपये 10,000/- कॉम्पेनसेटरी कॉस्ट देणेबाबत आदेश व्हावा अशी विनंती केली आहे. (7) सामनेवाला यांनी त्यांच्या म्हणण्यासोबत विकसन करारपत्र, पुरवणी विकसनपत्र, वटमुखत्यारपत्र, रत्नाकर बँकेची रिसीट इत्यादीच्या प्रती दाखल केलेल्या आहेत. (8) या मंचाने तक्रारदारांची तक्रार, सामनेवाला यांचे म्हणणे, उपलब्ध कागदपत्रांचे अवलोकन केले आहे. तक्रारदारांनी त्यांच्या तक्रारीमध्ये युनिट गाळा नं.बी-2 याबाबत असंदिग्धपणे वर्णन केले आहे. सदर गाळयाबाबत कोणताही करार केलेला नाही. या मंचाने प्रस्तुत प्रकरणी दाखल केलेले विकसन करारपत्र तसेच पुरवणी करारपत्र याचे अवलोकन केले असता सदर युनिट गाळा नं.बी-2 याबाबत कोणताही उल्लेख दिसून येत नाही. सामनेवाला बांधकाम व्यावसायिक यांनी तक्रारदारांच्याकडून स्विकारलेली रक्कम रुपये 1 लाख चेक द्वारे सदर रक्कम तक्रारदारांना परत केली आहे व सदर रक्कम तक्रारदारांच्या खाती जमा झालेली आहे. उपरोक्त विवेचन विचारात घेता तक्रारदार व सामनेवाला यांचेमध्ये युनिट गाळानं. बी-2 याबाबत कोणताही करार झालेला नाही. तसेच, विकसन करारपत्र, पुरवणी करारपत्र यांमध्येही काहीही उल्लेख दिसून येते. इत्यादी विवेचनाचा विचार करता तक्रारदारांच्या तक्रारीमध्ये या मंचास कोणतीही गुणवत्ता दिसून येत नाही. सबब, आदेश. आदेश 1. तक्रारदारांची तक्रार फेटाळणेत येते. 2. खर्चाबाबत आदेश नाहीत.
| [HONABLE MRS. Mrs.P.J.Karmarkar] MEMBER[HONABLE MR. Mr.M.D.Deshmukh] PRESIDENT[HONABLE MRS. Mrs.V.N.Shinde] MEMBER | |