-ः निकालपत्र ः- द्वारा- मा.अध्यक्ष,श्री.आर.डी.म्हेत्रस. 1. तक्रारदार हे ज्येष्ठ नागरिक असून सामनेवाले हे ट्रॅव्हल पॅक्स हॉलिडेज कंपनीचे प्रोप्रायटर आहेत. तक्रारदारानी सामनेवाले कंपनीकडे 10 दिवसाची लंडन स्वीस पॅरिस अशी टूर बुक केली होती. त्याची रक्कम रु.30,000/- दि.18-3-10 रोजी त्यानी सामनेवालेस सुरुवातीस चेकने दिली, त्यानंतर त्यानी पुन्हा रु.2,17,550/- ही रक्कम 21-4-10 रोजी चेकने दिली. त्याच्या पावत्या त्यानी या कामी दाखल केल्या आहेत. प्रत्यक्षात ही टूर दोन वेळा पुढे ढकलण्यात आली व शेवटी ती सामनेवालेकडून रद्द करणेत आली. तक्रारदारास सामनेवालेकडून 28-4-10 रोजी असा फोन आला की, तुमच्या टूरमध्ये जाण्याच्या तारखेत बदल करणेत आला असून त्यानुसार ती 29-4-10 ते 6-5-10 अशी ठेवणेत आली असून त्यात 60 जणांनी भाग घेतला असून 49 लोकांचा व्हीसाचा अर्ज आला आहे. तक्रारदाराना पुन्हा 5-5-10 रोजी सामनेवालेचा फोन आला व 6-5-10 चे उड्डाण रद्द करणेत आले आहे, तेव्हा त्यानी असे सांगितले की, त्यानी लंडन शहर रद्द करुन अँमस्टरडॅम शहर ठेवले आहे. तसेच काही लोकांनी यु.के.व्हीसा परत मिळणेसाठी अर्ज केला आहे आणि ही टूर मुंबईऐवजी गोव्याहून जाईल त्याची अंदाजे दि.12-5-10 असेल. ज्या लोकांचा व्हीसा अदयाप मिळाला नाही त्यांचेकडून तो मिळाल्यावरच टूर जाईल. अशा प्रकारे त्यांनी मूळ टूर तीनदा बदलली. प्रथम टूर लंडन-स्वीस-पॅरीस अशी होती तीच पुन्हा जाणार होती व पुन्हा त्याऐवजी नवीन टूर स्वीस-पॅरीस-अँमस्टरडॅम अशी गोवा टु गोवा करण्यात आली. ही बाब तक्रारदाराना मान्य नसल्याने त्यांनी टूर रद्द करण्याचे ठरवले. तसे त्यांनी सामनेवालेस 8-5-10 रोजी पत्र दिले. त्यांनी असे कळवले की, आम्हाला नवीन टूर नको असून पैसे व मूळ पासपोर्टही परत दया. त्यापैकी त्यांना पासपोर्ट 8-5-10 ला परत मिळाला आहे ते पत्र याकामी दाखल आहे. 2. त्यांनी पैसे परत न दिल्याने त्यांनी त्यांचेकडे वारंवार मागणी केली त्याबाबत फोनही केले व स्वतः ऑफिसात भेटी दिल्या पण सामनेवालेनी मात्र फक्त पैसे परतीचे पोकळ आश्वासन दिले. पण केव्हा देऊ ते सांगितले नाही. पुन्हा पैसे न देता मात्र त्यांनी 23-7-10 रोजी नवीन टूर 26-8-10 ला युरोपला जाणार असल्याचे कळवले, नंतर पुन्हा असे कळवले की, ही टूरही त्यानी रद्द केली आहे म्हणून तक्रारदारानी सामनेवालेस असे कळवले की, तुम्ही आमचे पैसे 15 दिवसात परत दया अन्यथा तुमचेविरुध्द ग्राहक मंचाकडे जावे लागेल. तसे पत्र त्यांनी सामनेवालेस दिले. ते सामनेवालेना मिळूनही त्यांनी 28-8-10 ते 12-10-10 पर्यंत त्यांनी पैसे दिले नाहीत. म्हणून त्यांनी कंझ्युमर गायडन्स सोसायटी ऑफ इंडियाकडे 12-12-10 रोजी तक्रार केली. त्याचा परिणाम म्हणून सामनेवालेकडून त्याना एक पत्र मिळाले व त्यातून त्यांनी असे कळवले की, तुम्हाला रु.1,73,285/-चे क्रेडिट देऊ किंवा रु.1,10,412/- ही रक्कम परत देऊ पण कंझ्युमर गायडन्स सोसायटीने त्यास नकार दिला तसेच तक्रारदारानीही 20-10-10 रोजी सामनेवालेस त्याचा प्रस्ताव अमान्य असल्याचे कळवले. 3. अशा प्रकारे सामनेवालेनी तक्रारदारास दोषपूर्ण सेवा दिली आहे. सामनेवालेनी स्टँडर्ड गाईडलाईन्स यु.के.कॉन्सलेट यांनी दिल्या होत्या त्याचा वापर केला नाही, तसेच व्हीसा अँप्लीकेशन फीज मधील मार्गदर्शक तत्वाचा वापर कला नाही. त्यांनी कशा प्रकारे दुर्लक्ष केले याबाबत सविस्तर म्हणणे पान 4 व 5 मध्ये ए पासून ई पर्यंत नमूद केले आहे. 4. सामनेवालेनी कॉसमॉस को.ऑप.बँक ठाणे यांचेवरील डीमांड ड्राफ्ट सर्व प्रवाशांना दिला होता ही रक्कम यु.के.ला जाणा-या व्हीसाबाबत होती. पण व्हीसा देतेवेळीच्या इंटरव्यूमध्ये त्यांचा व्हीसा नाकारण्यात आला. तक्रारदाराना या बाबींचा खूप त्रास झाला, तसेच त्यांचा खोळंबाही झाला, मानसिक त्रास झाला, व्हीसासाठी उन्हात थांबावे लागले. इतके होऊनही टूर दोनदा रद्द करण्यात आली होती. हा सर्व प्रकार सामनेवालेंच्या Mismanagement मुळे झाला आहे. सबब सामनेवालेना दोषपूर्ण सेवेबाबत जबाबदार धरुन त्यांना रक्कम 18 टक्के व्याजाने परत मिळावी व झालेल्या मानसिक त्रासाबाबत रु.50,000 व न्यायिकखर्चापोटी रु.10,000 मिळावेत अशी त्यांची मागणी आहे. 5. तक्रारदारानी तक्रारीसोबत प्रतिज्ञापत्र नि.2 अन्वये दिले आहे. नि.3 ला यादीसह कागदपत्रे दाखल केली आहेत. त्यात एकूण 15 कागदांचा समावेश असून ते 12 ते 81 अखेर आहेत. हे सर्व त्यांनी नि.ए ते ओ पर्यंत केले आहे. त्यात बुकींग फॉर्म, पावत्या, ईमेल यांची पत्रे, पोच, व यादीतील नमूद कागदांचा समावेश आहे. 6. तक्रार प्राप्त झाल्यावर सामनेवालेना मंचातर्फे नोटीस पाठवण्यात आली. ती त्यांना प्राप्त झाल्याची पोच नि.5 अन्वये दाखल आहे. सामनेवाले मंचापुढे हजर झाले नाहीत म्हणून मंचाने त्यांचेविरुध्द एकतर्फा चौकशी आदेश पारित केला. नंतर प्रकरण अंतिम सुनावणीसाठी ठेवणेत आले. नेमलेल्या तारखेस तक्रारदारांचा युक्तीवाद ऐकून प्रकरण अंतिम निकालासाठी ठेवण्यात आले. 7. तक्रारदारानी सामनेवालेकडे टूर बुक केली होती त्यापोटी त्यांनी पैसेही दिले आहेत. ही बाब सामनेवालेनी कोठेही नाकारलेली नाही. तसेच तक्रारदारांच्या कागदपत्राचे अवलोकन केले असता असे दिसते की, सामनेवालेकडूनच त्यांना दोषपूर्ण सेवा मिळाली आहे. त्यांनी टूर बुक करुन पैसे दिले होते व टूर रदद करण्यात आल्याचे दिसून येत आहे. तक्रारदारानी सामनेवालेस टूरसाठी मोबदलाही दिला आहे. जर टूर रद्द केली आहे तर त्यांचे पैसे परत देणेची जबाबदारी त्यांचेवर आहे. तक्रारदारानी अनेकदा सूचना व पत्रे देऊनही त्यांनी दखल घेतली नाही, उलट क्रेडिट नोट मात्र जादा रकमेची तर रिफंड रक्कम कमी देण्याचा त्यांचा प्रस्ताव आहे, यावरुन तक्रारदारांची रक्कम परत न करण्याची व त्रास देण्याची वृत्ती दिसून येत आहे. तक्रारदारांच्या म्हणण्याप्रमाणे त्यांच्या Mismanagement मुळे ते टूर करु शकले नाहीत हे उघड आहे. अपेक्षित टूर आपण ठरवलेल्या वेळेत मिळत नसल्यास ती रद्द करण्याचा व पैसे परत मागण्याचा अधिकार तक्रारदारास आहे. 8. तक्रारदारानी या कामी सोशिकपणा दाखवलेला दिसतो. पण जेव्हा मुंबई ते मुंबई अशी टूर मिळत नसल्याचे दिसल्यावरच त्यांनी टूर रद्द करणेचा निर्णय घेतला आहे. तक्रारदार हे ज्येष्ठ नागरिक आहेत. सामनेवालेच्या कृतीमुळे त्यांना सर्व प्रकारचा त्रास सोसावा लागून आर्थिक नुकसानही झाले आहे. तक्रारदारानी जी तक्रार दाखल केली आहे ती सामनेवालेनी नाकारलेली नाही. अशा परिस्थितीत तक्रारदारांची तक्रार अमान्य करण्याचे काहीच कारण नाही, त्यामुळे ही तक्रार त्यांचे मागणीप्रमाणे मंजूर करावी या निष्कर्षाप्रत मंच आले आहे. त्यांनी न्यायिक खर्चापोटी रु.दहा हजार मागितले आहेत, त्याऐवजी त्यांना रु.5,000/- दयावेत व त्यांच्या इतर मागण्या मंजूर करण्याच्या निष्कर्षाप्रत मंच आले आहे. 9. सबब खालीलप्रमाणे अंतिम आदेश पारित करण्यात येत आहे. -ः आदेश ः- तक्रारदारांची तक्रार खालीलप्रमाणे मंजूर करण्यात येत आहे. सामनेवालेनी खालील आदेशाचे पालन आदेश पारित तारखेपासून 45 दिवसाचे आत करावे-‘ 1. तक्रारदाराना सामनेवालेनी त्यांचकडून घेतलेली रक्कम रु.2,47,550/- त्यांनी दिलेल्या तारखेपासून 18 टक्के व्याजाने परत करावी. 2. शारिरीक, मानसिक त्रासापोटी तक्रारदाराना एकूण रु.50,000/- (प्रत्येकी रु.25,000/-प्रमाणे) दयावेत. ही रक्कम विहीत मुदतीत सामनेवालेनी न दिल्यास ती 10 टक्के व्याजाने वसूल करणेचा अधिकार तक्रारदारास राहील. 3. सामनेवालेनी तक्रारदारास न्यायिक खर्चापोटी रु.5,000/- दयावेत. 4. सदर आदेशाच्या सत्यप्रती सर्व पक्षकाराना पाठवण्यात याव्यात. ठिकाण- कोकण भवन, नवी मुंबई. दि. 8-4-2011. (ज्योती अभय मांधळे) (आर.डी.म्हेत्रस) सदस्या अध्यक्ष अति.ठाणे जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, नवी मुंबई.
| Hon'ble Mrs.Jyoti A.Mandhle, MEMBER | Hon'ble Mr. R. D. Mhetras, PRESIDENT | , | |