(मंचाचे निर्णयान्वये, श्री मनोहर गो. चिलबुले, अध्यक्ष)
(पारीत दिनांक : 3 ऑगष्ट 2013)
1. अर्जदार मुकूंदा गोपाळा सुरकर यांनी सदरची फिर्याद ग्राहक संरक्षण कायदा 1986 चे कलम 12 प्रमाणे दाखल केली.
2. अर्जदाराचे म्हणणे असे की, त्याचे मालकीची मौजा वेलतुर रीठ, ता. चामोर्शी, जि. गडचिरोली येथे 4.77 हे.आर. शेत जमीन आहे. सदर शेतात पाणी-पुरवठ्यासाठी त्यांनी बँक ऑफ महाराष्ट्र, चामोर्शी यांचेकडून द.सा.द.शे. 14.5 % व्याज दराने रुपये 99,000/- कर्ज घेतले आणि सदर कर्जातून दि.24.6.2011 रोजी गैरअर्जदाराकडून सीआरआय. कंपनीचे ओपनवेल पंपसेट विकत घेतले. सदर पंपसेटची एक वर्षाची वॉरंटी गैरअर्जदाराने दिली होती.
3. अर्जदार सदर मोटार पंपाने दि.20.8.2011 रोजी त्याचे शेतात पाण्याचे रोवण्यासाठी पाणी-पुरवठा करीत असतांना ईलेक्ट्रीक मोटार पूर्णपणे जळाली आणि पाणी पुरवठा करता आला नाही. अर्जदाराने सदरची मोटार दुरुस्तीसाठी गैरअर्जदाराकडे नेली असता, ती गैरअर्जदराने दुरुस्त करुन दिली नाही, त्यामुळे अर्जदाराचे त्या वर्षाचे धानाचे पिक घेता आले नाही, म्हणून रुपये 2,90,000/- चे नुकसान झाले. तसेच, ईलेक्ट्रीक मोटार पंपसाठी बँकेकडून घेतलेले कर्ज रुपये 99,000/- आणि त्यावरील व्याज रुपये 10,766/- असे एकूण रुपये 3,99,766/- चे नुकसान झाले. अर्जदाराने दि.13.1.2012 रोजी अधि.अनिल चौधरी यांचे मार्फत नोटीस पाठवून सदर नुकसानभरपाईची मागणी केली. परंतु, गैरअर्जदाराने त्याची पुर्तता केली नाही, म्हणून सदरची फिर्याद दाखल केली आहे.
4. गैरअर्जदाराने निशाणी क्र.11 प्रमाणे लेखी जबाब दाखल केला आणि अर्जदाराची मागणी नाकारली आहे. अर्जदाराने गैरअर्जदाराकडून ईलेक्ट्रीक मोटार पंप खरेदी केला ही बाब गैरअर्जदाराने मान्य केली आहे. माञ, सदर ईलेक्ट्रीक मोटार जळाल्याने अर्जदारास रोवण्यासाठी पाणीपुरवठा करता आला नाही व त्यामुळे त्याचे धानाचे पिक बुडाले आणि रुपये 2,90,000 चे नुकसान झाले हे नाकारले आहे. त्याचे म्हणणे असे की, अर्जदाराने विकत घेतलेली मोटार कधीही जळाली नाही आणि ती अर्जदाराने त्याचेकडे दुरुस्तीस आणली नाही किंवा ती दुरुस्त करुन देण्याचे गैरअर्जदाराने कधीही नाकारले नाही. त्याचे पुढे म्हणणे असे की, अर्जदाराने गैरअर्जदाराच्या दुकानातून रुपये 5,014/- च्या वस्तु उधारीवर खरेदी केल्या होत्या, त्या पैशाची मागणी केली असता, पैसे न देता गैरअर्जदारास ञास देण्यासाठी खोटी नोटीस पाठविली आणि सदरची खोटी तक्रार दाखल केली आहे.
5. अर्जदार व गैरअर्जदार यांचे परस्परांचे विरोधी कथनावरुन खालील मुद्दे मंचासमोर विचारार्थ घेण्यात आले आहे. त्यावरील मंचाचे निष्कर्ष आणि त्याबाबतची कारण मिमांसा पुढील प्रमाणे.
मुद्दे व निष्कर्ष :-
(1) अर्जदाराने, गैरअर्जदाराकडून खरेदी केलेली र्इलेक्ट्रीक :
मोटार दि.20.8.2011 रोजी जळाली आणि ती दुरुस्त
करुन देण्याचे गैरअर्जदाराने नाकारले हे अर्जदाराने
सिध्द केले आहे काय ? नाही.
(2) अर्जदाराची ईलेक्ट्रीक मोटार जळाल्याने व ती :
गैरअर्जदाराने दुरुस्त करुन न दिल्याने धान पिकाचे
रुपये 2,90,000/- नुकसान झाल्याचे, तसेच ईलेक्ट्रीक
मोटार पंपची किंमत रुपये 99,000/- आणि कर्जावरील
व्याज रुपये 10,766/- चे नुकसान झाल्याची अर्जदाराने
सिध्द केले आहे काय ? नाही.
(3) अर्जदार मागणी प्रमाणे नुकसानभरपाई मिळण्यास पाञ :
आहे काय ? नाही.
(4) अंतिम आदेश काय ? : अंतीम आदेशाप्रमाणे
अर्ज खारीज.
कारण मिमांसा
6. सदर प्रकरणात अर्जदार मुकूंदा गोपाळा सुरकर यांनी स्वतःचा पुरावा शपथपञ नि.क्र.14 प्रमाणे दिला आहे. गैरअर्जदाराने नि.क्र.16 प्रमाणे पुरसीस दाखल करुन त्याचा लेखी जबाब हाच पुरावा समजावा असे कळविले आहे.
मुद्दा क्रमांक 1 बाबत :-
7. अर्जदाराने, गैरअर्जदाराकडून रुपये 99,000/- देऊन ईलेक्ट्रीक मोटार पंप व पाईप लाईन विकत घेतली आहे हे गैरअर्जदाराने कबूल केले आहे. अर्जदाराने दाखल केलेली यादी नि.क्र.4 मधील दस्त क्र.1 कोटेशन व दस्त क्र.5 बील नं.220 दि.24.6.2011 मध्ये फक्त ईलेक्ट्रीक मोटार पंपची किंमत रुपये 15,800/- दर्शविली असून, रुपये 99,000/- पैकी उर्वरीत किंमत पाईप लाईन व त्यासंबंधीत वस्तुची आहे.
8. दि.20.8.2011 रोजी ईलेक्ट्रीक मोटार जळाली याबाबत अर्जदाराने तज्ञांचा अहवाल किंवा प्रत्यक्ष दर्शी शेजारच्या शेतक-यांचा पुरावा दाखल केलेला नाही. तसेच, पाणीपुरवठा करता आला नाही, म्हणून शेत पडीत राहिल्याबाबत कोणताही पंचनामा, अगर शेजारच्या शेतक-यांचा पुरावा दाखल केला नाही. अशापरिस्थितीत, अर्जदाराची ईलेक्ट्रीक मोटार जळाली व त्यामुळे शेतात धानाचा रोवणा करता आला नाही, त्यामुळे पिकांचे नुकसान झाले ही अर्जदाराची तोंडी साक्ष पुष्टीकारक पुराव्या अभावी ग्राह्य धरता येत नाही. अर्जदाराने आजपर्यंत जळालेली मोटार अन्य तज्ञ व्यक्तीकडून तपासणी अगर दुरुस्त केल्याबाबत आणि त्यासाठी आलेल्या खर्चाबाबत काहीही सांगितले नाही. अर्जदाराची मोटार जळाली व ती गैरअर्जदाराकडे नेवून ही त्याने दुरुस्त करुन दिली नाही ही बाब अर्जदाराने योग्य पुराव्याव्दारे सिध्द केली नसल्याने, गैरअर्जदाराने वारंटी काळात मोटार दुरुस्तीची सेवा दिली नाही व त्याव्दारे सेवेत ञुटीपूर्ण व्यवहार केल्याचे सिध्द होत नाही. म्हणून मुद्दा क्र.1 वरील निष्कर्ष नकारार्थी नोंदविला आहे.
मुद्दा क्रमांक 2 बाबत :-
9. ईलेक्ट्रीक मोटार जळाल्यामुळे शेतात धानाचे रावणे करता आले नाही हे दर्शविण्यासाठी अर्जदाराने शेताचा पंचनामा किंवा शेजारच्या शेतक-यांची साक्ष सादर केली नाही. त्यामुळे, त्या वर्षी अर्जदाराचे शेत पडीत राहून त्याचे रुपये 2,90,000/- च्या उत्पन्नाचे नुकसान झाले हे अर्जदार सिध्द करु शकला नाही. बिल क्र.220 प्रमाणे ईलेक्ट्रीक मोटारची किंमत केवळ रुपये 15,800/- दर्शविली आहे. सदर ईलेक्ट्रीक मोटार जळाली हे तज्ञ व्यक्तीकडून तपासणी करुन त्याचा अहवाल अर्जदाराने दाखल केला नसल्याने त्याचे ईलेक्ट्रीक मोटार किंमत रुपये 99,000/- आणि व्याजाचे रुपये 10,766/- चे नुकसान झाले हे देखील अर्जदार सिध्द करु शकलेला नाही, म्हणून मुद्दा क्र.2 वरील निष्कर्ष नकारार्थी नोंदविला आहे.
मुद्दा क्रमांक 3 बाबत :-
10. वरील विवेचनाप्रमाणे दि.28.8.2011 रोजी अर्जदाराने गैरअर्जदाराकडून खरेदी केलेली मोटार जळाली हे अर्जदार सिध्द करु न शकल्यामुळे, तसेच सदर मोटार जळाल्यामुळे रोवणी करता आली नाही आणि त्याचे धान पिकाचे रुपये 2,90,000/- चे नुकसान झाले हे देखील अर्जदार सिध्द करु शकला नाही, म्हणून गैरअर्जदाराने विक्रेता म्हणून द्यावयाच्या सेवेत कोणताही ञुटीपूर्ण व्यवहा केला नसल्याने, अर्जदार मागणीप्रमाणे धान पिकांची नुकसानभरपाई रुपये 2,90,000/-, ईलेक्ट्रीक मोटार खरेदीची किंमत रुपये 99,000/- आणि कर्जावरील व्याजाबाबत नुकसानभरपाई रुपये 10,766/- मिळण्यास पाञ नाही, म्हणून मुद्दा क्र.3 मधील निष्कर्ष नकारार्थी नोंदविला आहे.
वरील निष्कर्षास अनुसरुन मंचाचा खालीलप्रमाणे आदेश पारीत करीत आहे.
अंतिम आदेश
(1) अर्जदाराचा अर्ज खर्चासहीत खारीज करण्यात येत आहे.
(2) अर्जदाराने, गैरअर्जदारास या कार्यवाहीचा खर्च रुपये 2000/-,
1 महिन्याचे आत द्यावे.
(3) या निकाल पञाची प्रत अर्जदार व गैरअर्जदारास पाठविण्यात यावी.
गडचिरोली.
दिनांक :- 3/8/2013