तक्रारदार : तक्रारदार स्वतः हजर.
सामनेवाले : अन्य तक्रारींमध्ये एकतर्फा
त. क्रं. 241 मध्ये सामनेवाले हजर
*-*-*-*-*-**-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*
निकालपत्रः- मा. श्री.ज.ल.देशपांडे, अध्यक्ष ठिकाणः बांद्रा
*-*-*-*-*-*-*-*--*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*
न्यायनिर्णय
वरील सर्व तक्रारींमधील सामनेवाले हे समान आहेत. तक्रार क्रमांक 241/2011 यामध्ये सामनेवाले यांनी आपली कैफियत दाखल केली असून पुराव्याचे शपथपत्र व कागदपत्रे दाखल केले आहेत, तर अन्य तक्ररींमध्ये सामनेवाले यांनी हजर होऊन देखील कैफियत दाखल केली नसल्याने सामनेवाले यांचेविरूध्द एकतर्फा आदेश करण्यात आलेला आहे. सर्व तक्रारींमध्ये वादाचे मुद्दे व कागदोपत्री पुरावा समान असल्याने सर्व तक्रारी प्रस्तुतचे न्यायनिर्णयाने एकत्रीतपणे निकाली काढण्यात येत आहेत. न्यायनिर्णयाच्या सोयीकरीता तक्रार क्र. 241/2011 ज्यामध्ये सामनेवाले यांची कैफियत दाखल आहे त्यामधील उभयपक्षकारांची कथने येथे नमूद करण्यात येत आहेत.
सामनेवाले ही शिक्षण संस्था असून त्यांचे कांदिवली (पश्चिम) येथे कॉलेज आहे. तक्रारदरांचे तक्रारीतील कथनाप्रमाणे ऑगष्ट 2009 मध्ये सामनेवाले यांचेकडे एम.बी.ए. शिक्षण अभ्यासक्रम पूर्ण करण्याकारीता प्रवेश घेतला, व शिक्षण अभ्यासक्रमाचे पूर्ण शूल्क रुपये 1,50,000/- सामनेवाले यांचेकडे जमा केले. सामनेवाले यांनी तक्रारदारांना असे भासविले की, सामनेवाले यांचे संस्थेमधील एम.बी.ए. शिक्षण क्रमास इंदिरा गांधी राष्ट्रीय खुले विदयापीठ (IGNOU) या विदयापीठाची मान्यता आहे, व त्या आश्वासनावर विसंबून तक्रारदारानी सामनेवाले यांचेकडे वरील शिक्षण क्रमाकरीता प्रवेश घेतला. तक्रारदाराचे तक्रारीतील कथनाप्रमाणे सामनेवाले यांचे कार्यकारी व्यवस्थापक श्री. महेश कांबळे तक्रारदाराना असे आश्वासन देत होते की, डिसेंबर 2011 पर्यत तक्रारदाराचा एम.बी.ए. अभ्यासक्रम पूर्ण होईल. तथापि तक्रारदारांनी चौकशी केल्यानंतर तक्रारदाराला असे आढळून आले की, सामनेवाले यांचेकडील एम.बी.ए. अभ्यासक्रमास IGNOU ची मान्यता नाही याप्रकारे सामनेवाले यांनी तक्रारदारांची फसवणूक केली. त्यानंतर तक्रारदारांनी माहितीच्या अधिकारामध्ये पूर्ण माहिती मिळवीली, दरम्यान तक्रारदारांचा प्रथम सत्राचा कालावधी व्यर्थ गेला, याप्रकारे तक्रारदारांचे शैक्षणीक व आर्थिक नुकसान झाले, तक्रारदारानी सामनेवाले यांचेकडून जमा केलेले शूल्क रुपये 1,50,000/- या रक्कमेवर 24% व्याज, अधिक नुकसान भरपाई रुपये 2,00,000/- अशी मागणी केली आहे.
2. तक्रार क्रमांक 241/2011 यामध्ये सामनेवाले यांनी हजर होऊन आपली कैफीयत दाखल केली व त्यामध्ये असे कथन केले आहे की, सामनेवाले यांचे एम.बी.ए. शिक्षण क्रमास इंदिरा गांधी राष्ट्रीय खुले विश्वविदयालय (IGNOU) न्यू दिल्ली या विदयापीठाची मान्यता होती. तक्रारदार यांना सामनेवाले यांनी IGNOU च्या दिनांक 4/11/2009 रोजीच्या बैठकीचे इतिवृत्त प्राप्त करुन दिले त्यामध्ये देखील सामनेवाले यांना व्यवस्थापन शास्त्रातील अभ्यासक्रम सुरु करण्याची परवानगी देण्यात आली होती. याप्रमाणे सामनेवाले यांच्या संस्थेला IGNOU ची मान्यता असल्याने सामेनवाले यांनी जुलै-ऑगस्ट 2009 मध्ये PGPM-MBA या अभ्यासक्रमासाठी जाहिरात दिली व तो अभ्यासक्रम दिनांक 26/8/2009 रोजी सुरु केला. मुळातच तक्रारदारांनी केवळ MBA या अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेतला नाही तर पदवीधर व्यवस्थापन शास्त्र (PGPM) व MBA अशा दुहेरी अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेतलेला होता. त्यानंतर तक्रारदार यांना सप्टेंबर 2009 मध्ये लॅप टॉप पुरविण्यात आला, तसेच शैक्षणिक सहल योजण्यात आली त्यात तक्रारदारांनी भाग घेतला.
3. सामेनवाले यांच्या कथनाप्रमाणे तक्रारदारांनी जमा केलेले रुपये 1,50,000/- शूल्क हे PGPM व MBA अशा एकत्रित अभ्यासक्रमासाठी होते, ते केवळ MBA अभ्यासक्रमासाठी नव्हते. याप्रमाणे तक्रारदाराची कोणतीही फसवणूक झालेली नसून तक्रारदारांनी सदर तक्रार आकसाने व सूडबुध्दीने, तसेच जादा पैस वसूल करण्याच्या हेतूने दाखल करण्यात आलेली आहे असे सामेनवाले यांनी कथन केले आहे.
4. सामेनवाले यांच्या कैफीयतीतील कथनाला तक्रारदार यांनी प्रतिउत्तराचे शपथपत्र दाखल करुन उत्तर दिले. त्यानंतर सामेनवाले यांचे प्रतिनिधी श्री. महेश कांबळे यांनी पुराव्याचे शपथपत्र व कागदपत्रे दाखल केले. दोन्ही बाजूंनी लेखी युक्तीवाद दाखल केला. तक्रारदारांचे प्रतिनिधी व सामनेवाले यांचे प्रतिनिधीं यांचा तोंडी युक्तीवाद तक्रार क्रमांक 241/2011 यामध्ये ऐकला. तक्रार क्रमांक 421/2011, 423/2011 ते 428/2011, 454/2011 व 455/2011 या सर्व तक्रारींमध्ये सामनेवाले हजर होऊन त्यांनी कैफीयत दाखल करण्यासाठी मुदत मिळावी अशी विनंती केली. परंतु कैफीयत दाखल केली नसल्याने सामनेवाले यांचेविरुध्द एकतर्फा आदेश करण्यात आला.
5. प्रत्येक तक्रारदारांनी त्यांच्या प्रत्येक तक्रारींमध्ये पुराव्याचे शपथपत्र व कागदपत्रे दाखल केले.
6. प्रस्तुत मंचाने तक्रार क्रमांक 241/2011 यातील तक्रार, कैफीयत, पुराव्याचे शपथपत्रे, कागदपत्रे, व लेखी युक्तीवाद यांचे वाचन केले आहे, तर अन्य एकतर्फा तक्रारींमध्ये तक्रारीसोबतचे कागदपत्रे व शपथपत्र यांचे वाचन केले. त्यावरुन तक्रारींच्या न्यायनिर्णयाकामी पुढील मुद्दे कायम करण्यात येतात.
क्र. | मुद्दे | उत्तर |
1 | सामनेवाले यांनी तक्रारदारांना MBA अभ्यासक्रमा संदर्भात खोटे आश्वासन देऊन त्यांच्या सेवा संदर्भात कसूर केली, ही बाब तक्रारदार सिध्द करतात काय ? | होय |
2 | तक्रारदार हे सामनेवाले यांचेकडून मूळ रक्कम व्याजासह वसूल करण्यास पात्र आहेत काय ? | होय. |
4 | अंतीम आदेश? | सर्व तक्रारी अंशतः मंजूर करण्यात येतात. |
कारण मिमांसा
7. तक्रारदारांनी प्रत्येक तक्ररींमध्ये सामनेवाले यांचेकडे MBA अभ्यासक्रमाकरीता शूल्क जमा केल्याबद्दलची पावती दाखल केलेली आहे, त्याचे वाचन केले असतांना असे दिसून येते की, तक्रारदारांनी सुरुवातीला रुपये 1,00,000/- व त्यानंतर रुपये 50,000/- असे एकूण रुपये 1,50,000/- शूल्क MBA अभ्यासक्रमासाठी सामनेवाले यांचेकडे जमा केले. तक्रारदारांनी सामनेवाले यांचेकडे रुपये 1,50,000/- शूल्क जमा करुन MBA अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेतला याबद्दल वाद नाही.
8. तक्रारदारांचे सर्व तक्रारींत मुख्य कथन असे आहे की, प्रत्येक तक्रारदारांनी सामनेवाले यांचेकडे MBA अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेतला व सामनेवाले यांनी दिलेल्या जाहिरातीमध्ये शैक्षणिक माहिती पत्रात तसेच सामनेवाले यांच्या प्रतिनिधीने दिलेल्या तोंडी आश्वासनामध्ये तक्रारदार यांना सांगण्यात आले की, सामनेवाले यांचेकडे MBA अभ्यासक्रमासाठी IGNOU ची मान्यता आहे.
9. या संदर्भात सामनेवाले यांनी आपल्या कैफीयतीच्या परिच्छेद क्रमांक 1(क) यामध्ये शिक्षण क्रमास इंदिरा गांधी राष्ट्रीय मुक्त विश्वविद्यालय (IGNOU) न्यू दिल्ली या विदयापीठाच्या दिनांक 4/11/2009 रोजीच्या बैठकीच्या इतिवृत्ताचा संदर्भ दिलेला आहे, व त्यामध्ये MBA अभ्यासक्रमासाठी IGNOU ची मान्यता देण्यात आलेली होती असे कथन केलेले आहे. कैफीयतीच्या परिच्छेद क्रमांक 1(क) याचे वाचन केले असतांना असे स्पष्ट दिसून येते की, तक्रारदारांनी सामनेवाले यांचेकडे जून-जुलै 2009 मध्ये प्रवेश घेत असतांना सामनेवाले यांचेकडील MBA अभ्यासक्रमासाठी IGNOU ची मान्यता नव्हती. त्यातही दिनांक 4/11/2009 रोजीच्या बैठकीमध्ये सामनेवाले यांचेकडे जो अभ्यासक्रम IGNOU ने मान्य केला त्यामध्ये इतर अभ्यासक्रमा व्यतिरिक्त पदव्युत्तर व्यवस्थापन शास्त्रातील अभ्यासक्रम PGDIBO व MP या अभ्यासक्रमासाठी मान्यता दिली, त्या बैठकीच्या इतिवृत्तामध्ये MBA अभ्यासक्रमाला मान्यता देण्याबद्दल उल्लेख नाही. सामनेवाले यांनी इतिवृत्ताची प्रत, व IGNOU कडून प्राप्त झालेले दिनांक 11/7/2011 रोजीचे पत्र पृष्ठ क्रमांक 117 व 118 यावर दाखल केलेले आहेत त्याचे वाचन केले असतांना ही बाब स्पष्ट होते की, सामनेवाले यांचेकडील MBA अभ्यासक्रमासाठी IGNOU ची मान्यता नव्हती. त्याचप्रमाणे ती PGPM या अभ्यासक्रमाला देखील मान्यता नव्हती.
10. वरील निष्कर्ष तक्रारदार यांनी त्यांना माहितीच्या अधिकारात IGNOU कडून प्राप्त झालेल्या पत्राची प्रत तक्रार क्रमांक 241/2011 मध्ये पृष्ठ क्रमांक 46 वर दाखल केलेली आहे, व त्यातील मजकुरावरुन पुष्टी मिळते. त्या पत्रातील दिनांक 30/4/2010 रोजीची असून सदर दिनांक ही पत्राच्या खालच्या भागात म्हणजेच स्वाक्षरीखाली नमूद आहे. सदर पत्रातील प्रत्येक वाक्य महत्वाचे आहे. पत्रातील मजकुरावरुन असे दिसते की, प्रस्तुत तक्रारीतील एका तक्रारदाराने IGNOU कडे माहितीच्या अधिकाराखाली माहिती मागविली व सदरील पत्र पृष्ठ क्रमांक 46 दिनांक 30/4/2010 द्वारे IGNOU ने असे कळविले की, काही अभ्यासक्रमास फक्त सामनेवाले यांच्या संस्थेस IGNOU ची मान्यता होती. त्यानंतर दिनांक 4/1/2010 रोजीच्या IGNOU च्या परिपत्रकाद्वारे ही मान्यता फक्त BPP, B.A., B.com या तीन अभ्यासक्रमाकरीता होती, व IGNOU ने ही बाब त्यांच्या दिनांक 4/1/2010 रोजीच्या पत्राद्वारे कळविली होती. सदरील पत्रातील कॉलम 4 अतशिय महत्वाचा असून त्यामध्ये IGNOU ने असे स्प्ष्टपणे नमूद केले आहे की, एल.एन.कॉलेज (सामनेवाले) यांना PGPM-MBA या अभ्यासक्रमाकरीता IGNOU ची मान्यता नाही. सामनेवाले यांच्या कैफीयतीमध्ये IGNOU कडून दिनांक 30/4/010 रोजीचे पत्र देण्यात आले होते त्याबद्दल कुठलाही खुलासा आढळून येत नाही. मुळातच सामनेवाले यांचे कैफीयतीतील कथन असे स्पष्ट दर्शविते की, तक्रारदारांनी सामनेवाले यांचेकडे MBA अभ्यासक्रमाकरीता जेव्हा जून-जुलै 2009 मध्ये प्रवेश घेतला होता त्यावेळेस त्यांच्या संस्थेस IGNOU कडून MBA अथवा PGPM या अभ्यासक्रमास मान्यता नव्हती.
11. तक्रारदारांकडून वरील पुरावा दाखल झाल्यानंतर सामनेवाले यांनी तक्रार क्रमांक 241/2011 यामध्ये असे सिध्द करण्याचा प्रयत्न केला की, तक्रारदारांनी प्रवेश केवळ MBA अभ्यासक्रमाकरीता घेतला नव्हता तर तो प्रवेश PGPM-MBA असा संयुक्त अभ्यासक्रमासाठी घेतला होता. सामनेवाले यांनी या कथनाच्या पुष्टयर्थ तक्रार क्रमांक 241/2011 मध्ये एक अन्य प्रशिक्षणार्थी निरव उनाडकत यांच्या शपथपत्राची प्रत दाखल केलेली आहे, ज्यामध्ये त्या विद्यार्थ्याने सामनेवाले यांचेकडे PGPM-MBA या अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेतला असे नमूद केले होते. मुळातच ते शपथपत्र तक्रार क्रमांक 241/2011 मधील तक्रारदार सुरेंद्र पुस्पकर यांचे नव्हे तर अन्य विद्यार्थ्यांचे आहे. सामनेवाले यांनी शैक्षणिक अभ्यासक्रमाच्या प्रथम सत्राच्या दरम्यान हजेरीपटाच्या प्रती हजर केलेल्या आहेत, त्या देखील सामनेवाले यांच्या कथनास पुष्टी देत नाहीत. मुळातच सामनेवाले यांनी तक्रारदार यांना दिनांक 14/7/2009 रोजी शैक्षणिक कर्ज मिळणेकामी प्रमाणपत्र दिले होते, त्याची प्रत तक्रारदार यांनी त्यांच्या लेखी युक्तीवादासोबत पृष्ठ क्रमांक 130 वर दाखल केलेली आहे त्यामध्ये सामनेवाले यांनी कुठेही PGPM अभ्यासक्रमाचा उल्लेख केलेला नव्हता, तर केवळ MBA अभ्यासक्रमाचा उल्लेख आहे. तक्रारदार यांनी सामनेवाले यांचेकडे दिनांक 9/7/2009 रोजी रुपये 1,00,000/- व दिनांक 29/9/2009 रोजी रुपये 50,000/- जमा केले त्या शूल्काच्या सामनेवाले यांनी दिलेल्या पावतीच्या प्रती तक्रारदारांनी हजर केलेल्या आहेत. त्यामध्ये देखील सामनेवाले यांनी तक्रारदारांचा अभ्यासक्रम MBA असे नमूद केलेले आहे. त्या पावतीमध्ये कुठेही PGPM अभ्यासक्रमाचा उल्लेख नाही. या सर्व पुराव्यावरुन असे दिसून येते की, सामनेवाले यांनी आपल्या कथनातील आक्षेपता लपविण्याच्या हेतूने व बचावाचा एक भाग म्हणून प्रत्येक तक्रारदाराने PGPM-MBA या अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेतला होता असे कथन केले मुळातच तक्रारदारांचा प्रवेश केवळ MBA अभ्यासक्रमाकरीता होता, व त्या करीताच त्यांनी शैक्षणिक शूल्क जमा केलेले होते व अन्य अभ्यासक्रमाकरीता नव्हते. त्यातही सामनेवाले यांनी नमूद केलेल्या PGPM-MBA या अभ्यासक्रमाचा उल्लेख (IGNOU) कडून प्राप्त झालेल्या पत्रामध्ये नाही.
12. वर चर्चा केल्याप्रमाणे सामनेवाले यांनी तक्रारदारांना इंदिरा गांधी राष्ट्रीय मुक्त विश्वविद्यालय (IGNOU) न्यू दिल्ली यांची मान्यता होती असे भासविले व त्या आश्वासनावर विसंबून तक्रारदारांनी सामनेवाले यांचेकडे MBA अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेतला, व प्रथम सत्राची MBA च्या वर्गामध्ये हजेरी लावली. त्यानंतर तक्रारदारांना असे आढळून आले की, सामनेवाले यांना MBA अभ्यासक्रमास इंदिरा गांधी राष्ट्रीय मुक्त विश्वविद्यालय (IGNOU) न्यू दिल्लीची मान्यता नाही. जर एखादी शैक्षणिक संस्था विशिष्ट अभ्यासक्रमासाठी एखाद्या विद्यापिठाची मान्यता आहे असे भासवून अभ्यासक्रम सुरु करीत असेल तर ती विद्यार्थ्याची फसवणूक ठरते. कारण विद्यापिठाची मान्यता असल्याशिवाय त्या अभ्यासक्रमास व्यवहारीक दृष्टया काहीच महत्व नसते. या प्रकारचे खोटे प्रतिनिधित्व अथवा फसवणूक ही ग्राहक संरक्षण कायद्याचे कलम 2(1)(R) प्रमाणे अनुचित व्यापार प्रथा ठरते. तसेच सेवा सुविधा पुरविण्यात कसूर केली असेही सिध्द होते. प्रस्तुतच्या प्रकरणातील प्रत्येक तक्रारदारांचे एक शैक्षणिक वर्ष व्यर्थ गेले म्हणजेच पर्यायाने त्यांच्या आयुष्यातील एक वर्ष निरुपयोगी ठरले. याप्रकारे सामनेवाले यांनी तक्रारदारांना MBA अभ्यासक्रमाची मान्यता आहे असे भासवून अनुचीत व्यापारी प्रथेचा अवलंब केला व सेवा देण्यात कसूर केली असे सिध्द होते.
13. प्रत्येक तक्रारदारांनी सामनेवाले यांचेकडून जमा केलेल्या शूल्काची रक्कम 24 टक्के व्याजासह परत मागितलेली आहे, त्या व्यतिरिक्त नुकसानभरपाई देखील मागितलेली आहे. मूळची शूल्काची रक्कम सामनेवाले यांनी अनाधिकाराने जमा केल्याने सामनेवाले यांनी ती रक्कम तक्रारदारांना व्याजासह परत करणे आवश्यक आहे. तक्रारदारांना मूळ रक्कमेवर व्याज मिळत असल्याने वेगळा नुकसानभरपाईचा आदेश करण्याची आवश्यकता नाही. त्यातही साधारणपणे मंचाकडून परत फेडीच्या रक्कमेवर 9 टक्के व्याज दिले जाते, परंतु व्याजाचा दर 12 टक्के असा निश्चित केल्यास तक्रारदारांच्या नुकसानभरपाईच्या मागणीचा देखील त्यात अंतर्भाव होऊ शकेल, व तक्रारदारांचे झालेले आर्थिक नुकसान, शैक्षणिक वर्षाचे नुकसान व तक्रारदारांना झालेला मनस्ताप व कुचंबना याची देखील भरपाई होऊ शकेल. प्रत्येक तक्रारीतील मूळ रक्कम सामनेवाले यांनी तक्रारदारांना व्याजासह परत करावी असा आदेश करीत असतांना त्या रक्कमेवर 12 टक्के दराने शेवटची रक्कम म्हणजेच दुसरा हप्ता अदा केल्यापासून व्याज आकारण्यात यावे असा आदेश देणे योग्य व न्याय्य राहील असे मंचाचे मत आहे. रक्कमेच्या व व्याजाच्या बाबतीत गोधळ होऊ नये व पुढील गुंतागुंत टाळण्याच्या हेतूने न्याय निर्णयाच्या पुढील भागात आम्ही एक तालिका (Table) देत आहेत, व त्यातील नोंदीप्रमाणे सामनेवाले यांनी तक्रारदारांना रक्कम परत करण्यात यावी असा अंतिम आदेश न्याय निर्णयाच्या आदेशाच्या भागात देण्यात येईल.
अ.क्रं. | तक्रार क्रमांक | एकूण रक्कम रुपये | शेवटची देय दिनांक | व्याजाचा दर | तक्रारीचा खर्च |
1. | 241/2011 | 1,50,000/- | 29/9/009 | 12 टक्के | 5,000/- |
2. | 421/2011 | 1,50,000/- | 1/12/2009 | 12 टक्के | 5,000/- |
3 | 423/2011 | 1,50,000/- | 3/12/2009 | 12 टक्के | 5,000/- |
4 | 424/2011 | 1,50,000/- | 8/12/2009 | 12 टक्के | 5,000/- |
5 | 425/2011 | 1,50,000/- | 17/7/2009 | 12 टक्के | 5,000/- |
6 | 426/2011 | 1,50,000/- | 14/12/2009 | 12 टक्के | 5,000/- |
7 | 427/2011 | 1,50,000/- | 3/12/2009 | 12 टक्के | 5,000/- |
8 | 428/2011 | 1,50,000/- | 3/12/2009 | 12 टक्के | 5,000/- |
9 | 454/2011 | 1,50,000/- | 2/12/2009 | 12 टक्के | 5,000/- |
10 | 455/2011 | 1,50,000/- | 3/12/2009 | 12 टक्के | 5,000/- |
13. वरील चर्चेनुरुप व निष्कर्षानुरुप पुढीलप्रमाणे आदेश करण्यात येतो.
आदेश
1. तक्रार क्रमांक 241/2011, 421/2011, 423/2011, 424/2011, 425/2011, 426/2011, 427/2011, 428/2011, 454/2011 व 455/2011 या सर्व तक्रारी अंशतः मंजूर
करण्यात येतात.
2. वरील सर्व तक्रारीतील तक्रारदारांना सामनेवाले यांनी सेवा सुविधा पुरविण्यात कसूर केली व अनाधिकाराने शूल्क वसूल करुन अनुचित व्यापार प्रथेचा अवलंब केला आहे असे जाहिर करण्यात येते.
3. सामनेवाले यांनी वरील सर्व तक्रारदार यांना न्याय निर्णयातील तालिका (Table) मध्ये नमूद केल्याप्रमाणे रक्कम व त्यावरील व्याज यासह अदा करावी असा सामनेवाले यांना आदेश देण्यात येतो.
4. सामनेवाले यांनी या व्यतिरिक्त प्रत्येक तक्रारदार यांना तक्रारीच्या खर्चाबद्दल तालिकेत नमूद केल्याप्रमाणे रुपये 5,000/- अदा करावेत असाही आदेश सामनेवाले यांना देण्यात येतो.
5. आदेशाच्या प्रमाणित प्रती उभय पक्षकारांना विनामुल्य पाठविण्यात
याव्यात.
ठिकाणः मुंबई.
दिनांकः 20/07/2013
( एस. आर. सानप ) (ज.ल.देशपांडे)
सदस्य अध्यक्ष
एम.एम.टी./-