निकालपत्र
तक्रार दाखल दिनांकः- 26/09/2011
तक्रार नोदणी दिनांकः- 03/10/2011
तक्रार निकाल दिनांकः- 23/04/2013
कालावधी 01 वर्ष.06 महिने.20 दिवस.
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्यायमंच, परभणी
अध्यक्ष श्री.पी.पी.निटूरकर.B.Com.LL.B.
सदस्य
श्री.आर.एच.बिलोलीकर.B.Tech, MBA, DCM, LLB.
------------------------------------------------------------------------------------------------------------
बालासाहेब विठ्ठलराव कदम. अर्जदार
वय 50 वर्षे. धंदा.शेती. अड.सुचिता गंगापूरकर.
रा.पालम जि.परभणी.
विरुध्द
1 शुक्लेश्वर कृषी सेवा केंद्र,नवा मोंढा. गैरअर्जदार.
पालम जि.परभणी. अड.जी.आर.सेलुकर.
2 यशोदा हॅब्रीड सीड,प्रा.लि.लक्ष्मी टॉकीज जवळ,
हिंगनघाट जि.वर्धा.
3 नंदकुमार कृषी केंद्र,नवा मोंढा, अड.डी.आर.काठुळे.
पालम जि.परभणी.
4 महाराष्ट्र राज्य बियाणे महामंडळ मर्यादित. अड.डी.यु.दराडे.
तर्फे जिल्हा व्यवस्थापक,जिंतूर रोड, परभणी.
------------------------------------------------------------------------------------
कोरम - 1) श्री.पी.पी.निटूरकर. अध्यक्ष.
2) श्री.आर.एच.बिलोलीकर सदस्य.
(निकालपत्र पारित व्दारा.श्री.पी.पी.निटुरकर.अध्यक्ष.)
अर्जदार श्री.बालासाहेब विठ्ठलराव कदम यांची गैरअर्जदारांनी निकृष्ट दर्जाचे बियाणे अर्जदारास विक्री करुन झालेली नुकसान भरपाई गैरअर्जदाराकडून मिळावी म्हणून प्रस्तुतची तक्रार दाखल केलेली आहे.
अर्जदाराचे थोडक्यात म्हणणे असे आहे की, अर्जदर हा मौजे पालम जि.परभणी येथील रहीवासी असून त्यास पालम येथे सर्वे नं.235/6 मध्ये 80 आर जमीन आहे. सदरच्या शेतामध्ये अर्जदाराने 2011 मध्ये तुर व सोयाबिनचे पिक घेण्याचे ठरवले त्याप्रमाणे अर्जदाराने गैरअर्जदार क्रमांक 1 यांच्या दुकानातून गैरअर्जदार क्रमांक 2 यांने उत्पादीत केलेले सोयाबिनचे 2 बॅग ( 25 किलोग्रॅम प्रत्येकी) पेरणीसाठी दिनांक 26/06/2011 रोजी खरेदी केले.ज्याचा लॉट नं. वाय.एच.बी./10-1305 असा आहे.तसेच दिनांक 07/07/2011 रोजी अर्जदाराने गैरअर्जदार क्रमांक 3 यांच्या दुकानातून गैरअर्जदार क्रमांक 4 यांनी उत्पादीत केलेले तुरीचे 2 पॉकीटे बियाणे पेरणरीसाठी खरेदी केले,ज्याचा वान डी.एन. 708 व लॉट नं. 4126 असा आहे.
अर्जदाराचे असे म्हणणे आहे की, त्याच्या शेतात चांगला पाऊस झाल्यानंतर दिनांक 12/07/2011 रोजी सदरील दोन्ही बियाणे त्याच्या शेतात पेरले,त्यासोबत त्याने थायरमची बिज प्रक्रिया केली व त्यासोबत डी.ए.पी. खतच्या 2 बॅग पेरल्या सदरची पेरणी झाल्यानंतर अर्जदाराने 3 – 4 दिवस बियाणे उगवण्याची वाट पाहिली, परंतु त्याच्या लक्षात आले की, सदर दोन्ही बियाणे सदोष असल्यामुळे उगवण झाले नाही. म्हणून अर्जदाराने 16/07/2011 रोजी कृषी अधिका-यांकडे तक्रार केली.तक्रारीची दखल घेत जिल्हा परीषद कृषी विभाग यांनी दिनांक 16/07/2011 रोजी संबंधीत समितीस सदरील सोयाबिन व तुर उगवणी बाबत तपासणी करण्याबाबत आदेश काढले त्यानंतर 19/07/2011 रोजी पंचा समक्ष संबंधीत अधिका-यांनी तक्रारदाराच्या शेतीस भेट देऊन पाहणी केली व त्याच दिवशी तपास अहवाल दिला. अहवाला मध्ये बियाणे उगवण सोयाबिन 7 टक्के व तुर 5 टक्के आढळून आले असा अहवाल दिला.
अर्जदारांचे हे म्हणणे आहे की, गैरअर्जदार क्रमांक 2 व 4 यांनी निर्मित केलेले बियाणे सदोष होते, सदर बियाणे न उगवल्यामुळे अर्जदाराचे 20 क्विंटल सोयाबिन व 5 क्विंटल तूरीचे उत्पन्न बुडाले.म्हणून मंचास विनंती केली आहे की, गैरअर्जदार क्रमांक 1 ते 4 यांनी नुकसान भरपाई पोटी 75,000/- रुपये 12 टक्के व्याजासहीत अर्जदारास द्यावे,व मानसिक त्रासापोटी 10,000/- व खर्चापोटी 5,000/- रुपये अर्जदारास द्यावे,असे आदेशीत करावे.
अर्जदाराने त्याच्या तक्रार अर्जाच्या पुष्टयर्थ नि.क्रमांक 2 वर आपले शपथपत्र दाखल केले आहे व तसेच नि.4 वर दिलेल्या यादी प्रमाणे एकुण 13 कागदपत्राच्या छायाप्रती दाखल केलेल्या आहेत.
तक्रार अर्जावर लेखी म्हणणे सादर करणेसाठी गैरअर्जदारांना मंचातर्फे नोटीसा पाठवल्या होत्या व त्या प्रमाणे गैरअर्जदार क्रमांक 1, 3 व 4 हे वकिला मार्फत हजर व गैरअर्जदार क्रमांक 2 यांनी नोटीस घेण्यास इनकार केल्यामुळे दिनांक 03/01/2012 रोजी त्यांच्या विरुध्द एकतर्फा आदेश पारीत करण्यात आला.
गैरअर्जदार क्रमांक 1 याने नि.क्रमांक 24 वर आपला लेखी जबाब दाखल केला आहे त्याचे असे म्हणणे आहे की, सदरची तक्रार खोटी व बनावटी आहे केवळ रक्कम मिळवण्यासाठी हि तक्रार दाखल केलेली आहे व त्याचे असेही म्हणणे आहे की, सदरील बियाणे हे गैरअर्जदार क्रमांक 2 यांनी उत्पादीत केलेले आहे, म्हणून नुकसानीसाठी गैरअर्जदार क्रमांक 2 हे जबाबदार आहे. तसेच नि.क्रमांक 26 वर गैरअर्जदार क्रमांक 4 यांनी आपला लेखी जबाब दाखल केला आहे, त्याचे असे म्हणणे आहे की, सदरची तक्रार संपूर्ण खोटी व बनावटी आहे. त्याचे असे म्हणणे आहे की, बियाण्यांची उगवण ही अनेक घटकांवर अवलंबुन असते, जसे जमिनीतला ओलावा, पेरण्याची पध्दत, बियाणे किती खोलवर पेरले, जमिनीची प्रत इत्यादी, त्यामुळे प्रयोगशाळेच्या विश्लेषणा शिवाय बियाणे सदोष आहे असे गृहीत धरता येणार नाही.
व त्याचे असे म्हणणे आहे की,गैरअर्जदार क्रमांक 4 यांनी उत्पादीत केलेले बियाणे न पेरता अर्जदाराने स्वतःच्या घरचे बियाणे पेरले आहे व तसेच त्याचे असे म्हणणे आहे की, अर्जदाराने गैरअर्जदार क्रमांक 4 कडे कोणत्याही प्रकारची नुकसान भरपाई मागीतली नाही,म्हणून गैरअर्जदार क्रमांक 4 यांनी कोणत्याही प्रकारची फसवणुक केलेली नाही. म्हणून तक्रार अर्ज फेटाळण्यात यावा असे मंचास विनंती केली आहे.
तसेच नि.क्रमांक 27 वर गैरअर्जदार क्रमांक 3 यांनी आपला लेखी जबाब दाखल केला आहे, त्याचे थोडक्यात असे म्हणणे आहे की, सदरची तक्रार खोटी व बनावटी आहे व तसेच त्यांचे असे म्हणणे आहे की, अर्जदाराने 12/07/2011 रोजी पेरणी केल्या संबंधी कसल्याही प्रकारची माहिती नाही, तसेच 16/07/2011 रोजी कृषी अधिकारी यांच्याकडे तक्रार केल्याची माहिती त्याला नाही व तसेच त्याचे असे म्हणणे आहे की, मंचास जर असे वाटले की, सदरचे बियाणे निकृष्ट होते, तर गैरर्जदार क्रमांक 1, 2 व 4 यांना जबाबदार धरावे.
गैरअर्जदार क्रमांक 3 यांनी नि.क्रमांक 28 वर आपले शपथपत्र दाखल केले आहे नि.क्रमांक 29 व 30 वर गैरअर्जदार क्रमांक 4 व गैरअर्जदार क्रमांक 1 यांनी आपले शपथपत्र दाखल केले आहे.
दोन्ही पक्षांच्या कैफियती वरुन खालील मुद्दे उपस्थित होतात.
मुद्दे उत्तर
1 गैरअर्जदार क्रमांक 1 व 3 यांनी गैरअर्जदार क्रमांक 2 व 4
यांनी उत्पादीत केलेले सोयाबिन व तुरीची निकृष्ट बियाणे
अर्जदारास विक्री करुन त्याला झालेल्या नुकसानीस
जबाबदार आहेत काय ? नाही.
2 आदेश काय ? अंतिम आदेशा प्रमाणे.
कारणे
मुद्दा क्रमांक 1 व 2
अर्जदाराने गैरअर्जदार क्रमांक 1 यांच्याकडून दिनांक 26/06/2011 रोजी सोयाबिनचे बियाणे खेरदी केले आहे हे नि. 4/1 या कागदपत्रावरुन सिध्द होते व तसेच गैरअर्जदार क्रमांक 3 यांच्याकडून अर्जदाराने दिनांक 07/07/2011 रोजी तुरीची बियाणे खरेदी केले होते,हे नि.क्रमांक 4/2 वरुन सिध्द होते.तसेच गैरअर्जदार क्रमांक 1 याने विक्री केलेले सोयाबिनचे बियाणे हे गैरअर्जदार क्रमांक 2 यांने उत्पादीत केले होते हे सिध्द होते व गैरअर्जदार क्रमांक 3 यांने विक्री केलेले तुरीचे बियाणे हे गैरअर्जदार क्रमांक 4 यांनी उत्पादीत केले होते हे सिध्द होते अर्जदाराने दिनांक 12/07/2011 रोजी बियाणे पेरले याचा कोठलाही पुरावा अर्जदाराने मंचासमोर आणला नाही.
तसेच बियाणे दिनांक 12/07/2011 ला पेरणी केली व 16/07/2011 ला समितीस तपास करण्याचा आदेश झाला व 19/07/2011 ला समितीने तपासणी करुन लगेचच 19/07/2011 रोजी अहवाल दिला.तसेच अर्जदाराने नि.क्रमांक 4/12 वर दाखल केलेल्या पाहणी पंचनामावर दिनांक 28/08/2011 असा उल्लेख आहे, सदरचा पंचनामा व समितीचा अहवाल जे की, नि. क्रमांक 4/13 वर आहे यांत बरीच तफावत आढळून येते त्याचे कारण सदरचा अहवाल हा दिनांक 19/07/2011 रोजी तयार केलेला आहे व तसेच त्यांच्या म्हणणे नुसार सदर बियाणे पेरणीची पाहाणी त्याच दिवशी केली,परंतु अर्जदाराने दाखल केलेला पाहणी पंचनामा जे की, नि.क्रमांक 4/12 आहे तो तारखेतील तफावतीमुळे व त्यावर संबंधीत कार्यालयाचा शिक्का नसल्यामुळे मंचास सदरची अर्जदाराची तक्रार योग्य वाटत नाही,पेरणी दिनांक 12/07/2011 ला करुन लगेचच तक्रार 16/07/2011 ला केली व लगेच 19/07/2011 ला अहवाल प्राप्त झाला हे सर्व सुसंगत वाटत नसल्यामुळे पुर्वनियोजीत व संशयास्पद वाटतात.म्हणून सदरची तक्रार हि मंचास योग्य वाटत नाही.
अर्जदार त्याची तक्रार सिध्द करण्यास कायदेशिरदृष्टया असमर्थ ठरला आहे,तसेच तुरीची व सोयाबिनचे बियाणे उत्पादीत करणा-या कंपन्या ह्या वेगळया आहेत तरी दोन्ही उत्पादने एकाच वेळी ऊगवण झाले नसल्यामुळे अर्जदाराच्या म्हणणे नुसार निकृष्ट आहेत, हे मंचास योग्य वाटत नाही व तसेच समितीच्या अहवालात दिलेला अभिप्राय वरील सबब कारणास्तव योग्य वाटत नाही, म्हणून मुद्दा क्रमांक 1 चे उत्तर नकारार्थी देवुन मंच पुढील प्रमाणे आदेश देत आहे.
आदेश
1 अर्जदाराचा सदरचा तक्रार अर्ज फेटाळण्यात येते
2 दाव्याचा खर्च ज्याचा त्यांनी सोसावा.
3 पक्षकारांना आदेशाच्या प्रती मोफत पुरवाव्यात
श्री.आर.एच.बिलोलीकर. श्री.पी.पी.निटूरकर
मा.सदस्य मा.अध्यक्ष