सातारा जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच यांचेसमोर
उपस्थिती - मा.सौ.सविता भोसले,अध्यक्षा
मा.श्री.श्रीकांत कुंभार,सदस्य.
मा.सौ.सुरेखा हजारे, सदस्या.
तक्रार अर्ज क्र. 187/2013
तक्रार दाखल दि.02-12-2013.
तक्रार निकाली दि.10-08-2015.
श्री. गणेश नामदेव जाधव
रा. सर्वे नं. 155/अ,प्लॉट नं.16,
श्रीराम पार्क, विद्यानगर,(सैदापूर) कराड तथा,
मु.पो.वाघेश्वर, मसूर, ता.कराड, जि.सातारा. .... तक्रारदार.
विरुध्द
श्री. सुधीर शिवलींगजी सुकरे,
रा.मु.पो. नांदगांव,ता.कराड,जि.सातारा. .... जाबदार.
तक्रारदारातर्फे –अँड.पी.आर.इनामदार.
जाबदार तर्फे – अँड.व्ही.एम.फडतरे.
न्यायनिर्णय
(सदर न्यायनिर्णय मा.सौ.सविता भोसले, अध्यक्षा यानी पारित केला)
1. तक्रारदाराने प्रस्तुत तक्रार अर्ज ग्राहक संरक्षण कायदा कलम 12 नुसार दाखल केला आहे. तक्रारअर्जातील थोडक्यात मजकूर पुढीलप्रमाणे-
तक्रारदार हे सैदापूर,कराड तथा मसूर वाघेश्वर, ता. कराड, जि.सातारा येथील रहिवासी आहेत. तक्रारदाराचे कुटूंबियांचे पुर्नवसन कन्हेर धरणामुळे मौजे मसूर याठिकाणी झाले असून ते धरणग्रस्त आहेत. तर जाबदार हे व्यवसायाने बिल्डर आहेत. तर जाबदार हे व्यवसायाने बिल्डर आहेत. ते बिल्डिंग कन्स्ट्रक्शनची कामे करतात. तक्रारदाराने मौजे विद्यानगर (सैदापूर) येथील सि.स.नं. 155 (अ) प्लॉट नं.16 मधील 2500 स्क्वेअर फूटाचे बांधकाम करण्यासंदर्भात जाबदाराशी चर्चा करुन रु.650/- प्रति स्क्वेअर फूटाने बांधकाम करण्याचे ठरवून त्यास जाबदाराने मान्यता देवून प्रस्तुत बांधकाम रक्कम रु.18,00,000/- (अठरा लाख फक्त) या किंमतीस करणेस जाबदार तयार झाले. त्यामुळे जाबदाराला तक्रारदाराने अँडव्हान्स दिला. सन 2010 मध्ये प्रत्यक्ष बांधकामास सुरुवात केली त्यावेळी दर रक्कम रु.650/- प्रती स्क्वेअर फूट होता. जाबदार यांना तक्रारदाराने वेळोवेळी ठरलेप्रमाणे रक्कम रु.18,00,000/- (अठरा लाख फक्त) पूर्ण अदा करुनही जाबदाराने काम बंद ठेवणेच्यादृष्टीने कामात टाळाटाळ करुन निकृष्ठ दर्जाचे काम जाबदाराने केलेले आहे. कामात निष्काळजीपणा व हलगर्जीपणा केलेला आहे. उदा. स्लॅब गळका ठेऊन स्लोप वाकडे तिकडे काढून काम अर्धवट सोडून सदरचे काम पूर्ण करण्यास असमर्थता दर्शविली आहे. तसेच सदरचे काम करणे मला जमणार नाही. दुस-याकडून करुन घ्या, काम पूर्ण झालेवर किंवा माझी सैदापूरमधील स्कीम पूर्ण झालेवर रक्कम देईन नाहीतर फ्लॅट नावावर करुन देतो अशी खोटी आश्वासने तक्रारदारास देवून आजअखेर जाबदाराने काहीही रक्कम परत अदा केली नाही. बांधकामास तक्रारदार यांना जवळजवळ रक्कम रु.15,00,000/- (पंधरा लाख फक्त) जादा खर्च आला आहे. तक्रारदाराने बँकेतून कर्ज काढून सदर खर्च केला आहे. जाबदाराने उर्वरित डिफरन्सची रक्कम रु.500/- प्रतिस्क्वेअर फूटाने होणारी रक्कम तक्रारदाराला परत देणेचे आश्वासन दिले होते. त्याप्रमाणे जाबदाराने रक्कम अदा केली नाही व घराचे बांधकामही पूर्ण करुन दिलेले नाही. तक्रारदाराने जाबदाराला वारंवार भेटून ऊर्वरीत फरकाची रक्कम परत मागीतली असता जाबदाराने केवळ टोलवाटोलवी करुन आजअखेर रक्कम अदा केली नाही व तक्रारदारास नाहक त्रास दिलेने सदर जाबदाराने तक्रारदारास सदोष सेवा दिली आहे. त्यामुळे जाबदारकडून बांधकामाची उर्वरीत रक्कम तक्रारदाराला परत मिळावेत म्हणून तक्रारदार यांनी प्रस्तुत तक्रार अर्ज मे मंचात दाखल केला आहे.
2. तक्रारदार यांनी प्रस्तुत कामी जाबदार यांचेकडून घराचे बांधकामासाठी बांधकामाची डिफरन्सची 2500/- स्क्वेअर फूटाची रु.500/- प्रति स्क्वेअर फूट प्रमाणे होणारी रक्कम रु.12,50,000/- वसूल होऊन मिळावेत, तक्रारदार यांना झाले मानसिक त्रासापोटी जाबदार यांचेकडून तक्रारदार यांना रक्कम रु.5,00,000/- (पाच लाख मात्र) मिळावेत. तसेच तक्रारदाराने स्वखर्चाने वॉल कंपाऊंड व गेटचे काम करावे लागले त्याचे रक्कम रु.1,00,000/- जाबदारांकडून मिळावेत प्रस्तुत रकमेवर द.सा.द.शे. 16 टक्के व्याज मिळावे, अर्जाचा खर्च म्हणून रक्कम रु.25,000/- जाबदारांकडून मिळावेत अशी विनंती तक्रारदाराने याकामी केली आहे.
3. तक्रारदार यांनी याकामी नि. 2 कडे प्रतिज्ञापत्र, नि.5 चे कागदयादीसोबत नि. 5/1 ते 5/6 कडे अनुक्रमे तक्रारदाराने जाबदाराला दिलेली नोटीस, वकीलामार्फत जाबदाराला दिलेली नोटीसची स्थळप्रत, तक्रारदाराने जाबदाराना दिले रकमेबाबत पावत्यांची झेरॉक्स प्रत, रेनबो कन्स्ट्रक्शनचा व्हॅल्यूएशन रिपोर्ट, इमारत बांधकामाचे फोटो मूळ प्रती, वास्तुशांत झालेबाबतची पत्रीका नि. 14 कडे, नि. 26 कडील कागदयादीसोबत नि.26/1 ते नि. 26/12 कडे अनुक्रमे तक्रारदार यांनी कर्ज काढलेबाबतचा कर्ज उतारा प्रत, कर्जाचे दाखल्याची प्रत, श्री. सप्लायर्स, सैदापूर कराड यांचे बीलाची प्रत, खर्चाची पावती, कलर ग्रीलींगची पावती, पेन्टर्सची पावती/बील, राजवर्धन ट्रेडर्सचे बील, रामचंद्र हुलवान यांचे प्लंबींगचे बील, महादेव खुडे यांचे बील, बांधकामाचे फोटो, फोटो काढलेल्या बीलाची प्रत,नि. 28 कडे लेखी युक्तीवाद, नि. 27 कडे तोंडी युक्तीवाद करणेचा नाही म्हणून पुरसीस वगैर कागदपत्रे दाखल केली आहेत.
4. जाबदारांनी प्रस्तुत कामी नि. 15 कडे म्हणणे, नि.17 चे कागदयादीसोबत नि. 17/1 ते नि. 17/13 कडे अनुक्रमे जाबदाराने तक्रारदाराला दिलेली नोटीस, नोटीसची पोहोचपावती, तक्रारदाराकडून येणे रकमेची देयके, तक्रारदाराने जाबदार यांना दिले रकमांचा तपशील, तक्रारदाराचे बांधकामाचा मंजूर प्लॅन, तक्रारदाराचे इमारतीचे वेळोवेळी केले आर.सी.सी. डिझाईनेचे प्लॅन, जाबदाराने दिलेली स्टीलची बीले, वीट बील, सिमेंट बील, फरशी बील, उर्वरीत कामाचे कोटेशन, नि. 19 कडे बांधकामावर देखरेख करणारे इसमाचे अँफीडेव्हीट, नि.20 कडे साक्षीदाराचे अँफीडेव्हीट, नि. 21 कडे साक्षीदार महादेव खुडे चे शपथपत्र, नि.22 कडे साक्षीदाराचे अँफीडेव्हीट, नि. 23 कडे साक्षीदाराचे अँफीडेव्हीट, नि. 24 कडे साक्षीदारा शपथपत्र, नि. 29 कडे लेखी युक्तीववाद वगैरे कागदपत्रे जाबदाराने दाखल केली आहेत. प्रस्तुत कामी जाबदाराने त्यांचे म्हणणे/कैफीयत तक्रारदाराचे तक्रार अर्जातील कथने फेटाळली आहेत.
जाबदाराने तक्रारदाराचे तक्रार अर्जावर पुढीलप्रमाणे आक्षेप घेतले आहेत.
i तक्रारदाराचे अर्जातील मजकूर मान्य व कबूल नाही, तक्रारदाराचा अर्ज बेकायदेशीर बांधकामाबाबत असलेने तो कायद्याने मान्य व कबूल नाही. तक्रारदाराचा अर्ज बेकायदेशीर बांधकामाबाबत असलेने तो कायद्याने चालणेस पात्र नाही. तक्रारदाराने निर्णयास आवश्यक बाबी कोर्टापासून लपवून ठेवल्या आहेत. तक्रारदारास बांधकामाचा प्लॅन फक्त 147.2 चौ.मी. क्षेत्राबाबत म्हणजेच 1554 चौ.फूट एवढेच मंजूर असताना मंजूर प्लॅनपेक्षा 1200 चौ.फूट बेकायदेशीरपणे जादा बांधकाम करुन त्याबाबतचा खर्च मागीतला आहे. तक्रारदाराला जाबदाराने ग्राहक या नात्याने कोणतीही सेवात्रुटी दिलेली नाही. तक्रारदाराने खर्चाची कल्पना (बांधकामाच्या खर्चाची) कल्पना, दिलेले अंदाजपत्रक सदर कामी दाखल केलेले नाही, प्रत्यक्ष काम कसे करावे याबाबत चर्चा झाली होती. जाबदाराने तक्रारदाराला प्रत्यक्ष साईट कंडिशननुसार खालील बाबी निदर्शनास आणले होते, काळया-चिकट मातीमुळे पाया 7-8 फूट खोल घ्यावा लागतो, प्लींथची उंची नेहमीपेक्षा जास्त ठेवावी लागेल, तक्रारदाराला प्रत्यक्ष पाहीले रो-हाऊस प्रमाणे अंदाजपत्रकात नमूद अँटम व स्पेसिफिकेशन खालीलप्रमाणे बदल हवे होते.
अ. भुकंपरोधक आर.बी.सी.स्ट्रक्चर
भिंती – अ. बाहेरील - 6 इंच जाडीचे वीट बांधकाम
ब. आतील - 4.5 इंच जाडीचे वीट बांधकाम
प्लॅस्टर- बाहेरील सॅड फोस्ड प्लॅस्टर (स्पंज प्लॅस्टर)
ब. किचन ओटा – ग्रॅनाईड प्लॅटफॉर्म किचन ओटा, स्टिललिंक (7 फूट लांब)
लिंटेल लेव्हलपर्यंतच्या सिरॅमिका टाईल डॅडो.
क. बाथरुम व शौचालय/बाथरुम- नॉन स्लीपरी सईल्ड फ्लोरिंग,
मिक्सर,गिझर, पॉईंट, लिंटेल लेव्हल पर्यंत सिरॅमीक टाईल्स
ड. फ्लोअरिंग – रुम्स-मार्बोनाईट अथवा तत्सम अन्य कंपनीच्या टाईत्स-
पाय-या लोडींग/तंदूर फरशी
इ. दरवाजे- मुख्य दरवाजा – सागवानी फेम, सागवान पायनलचा दरवाजा-
ब्रास फिटींग्ज
आतील दरवाजे- ग्रीन मार्बल फेम (फक्त बेडरुम दरवाजा) वॉटरप्रुफ फ्लॅश
डोअर शटर, स्टील फिटींग्ज, पाठीमागील दरवाजे सिमेंट क्रॉंकीट फेम व
गॅलरी दरवाजा- वॉटरप्रुफ फ्लॅश डोअर शटर, बाथ व डब्ल्यू सी- सीमेंट
काँक्रीट फेम बायसन पॅनेज शटर
ई. खिडकी- थ्री ट्रॅक अल्युमिनियम स्लायडिंग विंडो मास्क्युरोनेट विंडो सिल-
ग्रीन मार्बलमध्ये
फ. रंगकाम- आतील बाजूस ऑईल बॉन्ड डिस्टेंपर
बाहेरील बाजूस अँपेक्स पेंट व सिमेंट पेंट अथवा तत्सम
वर नमूद बाबींनुसार तक्रारदाराचे बांधकामाचा दर 100 ते 125 फूट जादा येईल असे तक्रारदाराला जाबदाराने सांगीतले होते. तक्रारदाराचे घराचे बांधकामाचा त्यावेळचा दर प्रति चौ.फूट रक्कम रु.850/- ठरविला होता तो कधीही रु.650/- प्रतिफूट ठरविला नव्हता.
2. तक्रारदाराने जाबदाराला दि.8/3/2010 रोजी रक्कम रु.1,00,000/- (रुपये एक लाख फक्त) विसारत म्हणून दिली. मार्च,2011 अखेरीस एकूण रक्कम रु.4,00,000/- (रुपये चार लाख मात्र) जाबदारांना तक्रारदाराकडून मिळावी. तर एप्रील,2011 ते मार्च,2012 या आर्थिक वर्षात तक्रारदारकडून जाबदार यांना रक्क्म रु.11,35,000/- (रुपये अकरा लाख पस्तीस हजार फक्त) मिळावे. मारुती मेस्त्री यांचे बील 2,21,000/-इतके झाले होते, पैकी रक्कम रु.37,300/- एवढी रक्कम तक्रारदाराने दिली होती व उर्वरित रक्कम रु.1,,83,700/- मारुती सिस्त्री यांना जाबदार यांनी अदा केले आहे. एप्रील 2011 नंतर जुलै 2012 पर्यंत एकूण रक्कम रु.1,60,000/- तक्रारदाराने जाबदारांना रोखीने दिली.
दरम्यान एप्रील 2011 ते मार्च 2012 या वर्षात दुस-या मजल्याचे स्लॅबचे काम चालू करताना जाबदार यांनी दोन रुम जादा बांधणेचा निर्णय घेतला व आकर्षक इमारत दिसणेसाठी काही रुमचे स्लॅब उतरत्या छपराचे करावे असे ठरले. स्लोपींग स्लॅबचे काम स्पेसीफिकेशनच्यावेळी समाविष्ट नव्हते. तसेच बांधकामाचे सर्व मटेरियल फरशी, कलर वगैरे चांगल्या प्रतीचे वापरणेबाबत तक्रारदाराने ठरविले. रामपाल याचे फरशी मजूरीचे बील जाबदाराने हिशोब करुन तक्रारदारसमोर दिले आहे. त्याला दिलेली रक्कम ही त्यांनी सांगीतलेले ग्रॅनाईड तसेच कॉन्ट्रॅक्टरला जाबदाराने दिलेल्या रकमा तक्रारदाराने दिलेचे दाखवले आहे.
तक्रारदार यांनी जाबदार यांना फक्त घराचे तळमजल्यामधील चार खोल्यांचे बांधकाम करणेबाबत सांगीतले होते व बांधकामाचा दर त्याप्रमाणात जाबदाराने सांगितला होता. तसेच तक्रारदाराने तक्रार अर्ज क्र. 2 मध्ये जाबदार यांनी स्लॅब गळका ठेवून स्लोप वाकडेतिकडे काढून निष्काळजीपणा केलेचे नमूद आहे. मात्र अर्ज कलम 4 मध्ये इमारतीचे काम दुसरे कॉन्ट्रॅक्टरकडून करुन घेतलेचे म्हटले आहे. तक्रारदार हे जाणूबुजून खोटी विधाने करुन खोटया तक्रारी करीत आहेत.
तक्रारदाराने हजर केलेली बीले खोटी आहेत. त्याबाबत जाबदाराने संबंधीतांचे अँफीडेव्हीट दाखल केले आहे. सदर तक्रारदार यांचे इमारतीसाठी जाबदाराने केले खर्चाचा तपशील व जाबदाराला तक्रारदाराकडूनच येणे रकमेचा तपशील देत आहेत. त्याची शहानिशा करणेत यावी व प्रस्तुत तक्रार अर्ज या मे. मंचाचे अधिकारक्षेत्रात येत नाही. त्यामुळे तक्रारअर्ज खर्चासह फेटाळण्यात यावा असे आक्षेप कैफीयतीमध्ये जाबदाराने घेतले आहेत.
5. वर नमूद केलेप्रमाणे तक्रारदार व जाबदार यांनी दाखल केलेली सर्व कागदपत्रे, पुराव्याची शपथपत्रे, लेखी व तोंडी युक्तीवाद वगैरे बाबींचे अवलोकन करुन प्रस्तुत तक्रारअर्जाचे निराकरणार्थ मे मंचाने पुढील मुदद्यांचा विचार केला.
अ.क्र. मुद्दा उत्तर
1. तक्रारदार हे जाबदारांचे ग्राहक आहेत काय? होय.
2. जाबदार यांनी तक्रारदार यांना सदोष सेवा दिली आहे काय? होय.
3. अंतिम आदेश काय? खाली नमूद
आदेशाप्रमाणे.
विवेचन-
6. वर नमूद मुद्दा क्र.1 चे उत्तर आम्ही होकारार्थी देत आहोत. कारण- तक्रारदाराने जाबदार यांचेकडे मौजे विद्यानगर येथील सर्व्हे नं. 155 (अ) प्लॉट नं. 16 मधील 2500 स्क्वे.फूटाचे बांधकाम करण्यासाठी रक्कम रु.17,45,000/- अदा केलेच्या पावत्या मे. मंचात दाखल आहेत. तसेच जाबदाराने तक्रारदाराकडून रक्कम रु.11,35,000/- मिळालेचे मान्य केले आहे. यावरुन तसेच जाबदाराने तक्रारदाराचे घराचे बांधकामाचे काम घेतलेचे मान्य व कबूल केले आहे. सबब तक्रारदार हे जाबदारांचे ग्राहक आहेत ही बाब सिध्द होते. त्यामुळे मुद्दा क्र. 1 चे उत्तर आम्ही होकारार्थी दिले आहे.
2. वर नमूद मुद्दा क्र. 2 चे उत्तर होकारार्थी देत आहोत. कारण- जाबदाराने तक्रारदाराकडून रक्कम रु.17,45,000/- (रुपये सतारा लाख पंचेचाळीस हजार फक्त) रक्कम स्विकारुनही तक्रारदाराचे घराचे बांधकाम पूर्णपणे करुन दिले नाही. अर्धवट कामे सोडून काम बंद पाडलेचे आहे. आणि जाबदाराने काम वेळेवर केले नसलेने बांधकामाचे दर वाढत गेले व तक्रारदाराला दुस-या कॉन्ट्रॅक्टरकडून काम करुन घेणेस जास्त रक्कम खर्च करावी लागली. तसेच जाबदार यांनी प्रस्तुत सर्व रक्कम बांधकाम करणेसाठी खर्च केली हे शाबीत केलेले नाही. तसेच जाबदाराने याकामी नि. 17 चे कागदयादीसोबत दाखल केलेली नि. 17/9 ते 17/12 कडील बीलांवर तक्रारदाराचे नाव आहे. तसेच प्रस्तुत बीले ही मूळ नसून त्याचे झेरॉक्स प्रती दाखल केल्या आहेत. त्यामुळे जाबदाराने सदरची रक्कम खर्च केलेबाबतची सदरची बीले ही पुराव्यात वाचता येणार नाहीत. म्हणजेच जाबदाराने मान्य केलेप्रमाणे जरी रक्कम रु.11,35,000/- रुपये अकरा लाख पस्तीस हजार फक्त) जाबदाराला तक्रारदाराकडून मिळालेचे गृहीत धरले. तरीही प्रस्तुत सर्व रक्कम जाबदाराने सदर तक्रारदाराचे बांधकामासाठी खर्च केली आहे हे सिध्द केलेले नाही. तसेच जाबदाराने दाखल केलेले सर्व कागदपत्रे झेरॉक्स प्रतीत असलेने पुराव्यात वाचता येणार नाहीत. तसेच जाबदाराने दाखल केलेले साक्षीदारांची शपथपत्रांवरुनही प्रस्तुत जाबदाराने तक्रारदाराचे घराचे बांधकाम पूर्ण केलेचे सिध्द होत नाही. तसेच प्रस्तुत तक्रारदाराने जाबदाराला अदा केलेली रक्कम पूर्णपणे बांधकामासाठी खर्च केलेचे स्पष्ट होत नाही. तसेच जाबदाराने नि. 20 कडे दाखल केले साक्षीदाराचे अँफीडेव्हीटमध्ये नमूद आहे की, तक्रारदार व जाबदार यांचेत मतभेद झालेने काम तहकूब ठेवणेत आले. म्हणजेच जाबदाराने तक्रारदाराचे घराचे काम पूर्ण करुन दिलेले नाही हे स्पष्ट होते. आणि प्रस्तुत अर्धवट काम तक्रारदाराने दुस-यांकडून करुन घेतलेचे स्पष्ट होते. तक्रारदाराने नि.26 चे कागदयादीसोबत मजूरीची बीले, बांधकाम साहीत्याची बीले, कलरची बीले, प्लंबींग मटेरियलची मूळ बिले दाखल केली आहेत. तसेच अर्धवट बांधकामाचे फोटो, अर्धवट प्लंबींगचे फोटो, फोटोची पावती वगैरे मूळ कागदपत्रे दाखल केली आहेत. तसेच अर्धवट बांधकामाचे फोटो, अर्धवट प्लंबींगचे फोटो, फोटोची पावती वगैरे मूळ कागदपत्रे दाखल केली आहेत. वरील सर्व बाबींचा विचार करता तक्रारदाराने त्याचा तक्रार अर्जातील कथने सिध्द करणेसाठी मूळ पावत्या दाखल केल्या आहेत. त्या पुराव्यात वाचणे न्यायोचीत होणार आहे. तसेच जाबदाराने एकही मूळ पावती किंवा कागदपत्र मे. मंचात दाखल केलेले नाही. सबब जाबदार यांचे कथनावर विश्वास ठेवणे न्यायोचीत वाटत नाही. तरीसुध्दा तक्रारदाराने किंवा जाबदाराने त्याकामी सर्व्हेअर यांचा रिपोर्ट/कमिशन अहवाल दाखल केलेला नाही. तसेच तक्रारदार यांनी रिपोर्ट/कमिशन अहवाल दाखल केला नसल्यामुळे तक्रारदार यांनी केलेले सर्वच कथन व बांधकामासाठी जादा आलेला खर्च हा योग्य आहे असे म्हणणे न्यायोचित होणार नाही. तरीही नैसर्गिक न्यायतत्वाचा विचार करुन व ग्राहकहित लक्षात घेवून जाबदार यांनी तक्रारदाराचे घराचे काम अर्धवट सोडून तक्रारदाराला सदोष सेवा दिली आहे असे म्हणणे न्यायहितार्थ होईल. तसेच जाबदार यांचेकडून तक्रारदार यांना रक्कम रु. 5,00,000/- (रुपये पाच लाख फक्त) अदा करणे न्यायोचीत होणार आहे असे या मे. मंचाचे मत आहे. तसेच मानसिकत्रास म्हणून रक्कम रु.50,000/- -रुपये पन्नास हजार फक्त) त्याचप्रमाणे अर्जाचा खर्च रक्कम रु.5,000/- जाबदाराने तक्रारदारास देणे योग्य व न्यायोचीत होईल असे या मे. मंचाचे स्पष्ट मत आहे.
9. सबब आम्ही खालीलप्रमाणे अंतीम आदेश पारीत करत आहोत.
आदेश
1. तक्रारदाराचा तक्रारअर्ज अंशतः मंजूर करण्यात येतो.
2. जाबदार यांनी तक्रारदार यांना रक्कम रु.5,00,000/- (रुपये पाच लाख फक्त)
अदा करावेत.
3. जाबदाराने तक्रारदार यांना मानसिक त्रासापोटी नुकसानीपोटी रक्कम
रु.50,000/- (रुपये पन्नास हजार फक्त) अदा करावेत.
4. अर्जाचा खर्च म्हणून जाबदाराने रक्कम रु.5,000/- (रुपये पाच हजार फक्त)
अदा करावेत.
5. वरील सर्व आदेशाचे पालन आदेश पारीत तारखेपासून 45 दिवसांचे आत करावे.
6. विहीत मुदतीत आदेशाचे पालन न केल्यास तक्रारदार यांना ग्राहक संरक्षण
कायदा कलम 25 व 27 नुसार जाबदारांविरुध्द कारवाई करणेची मुभा राहील.
7. सदर न्यायनिर्णयाच्या सत्यप्रती उभय पक्षकाराना विनामूल्य पाठवणेत याव्यात.
8. सदर न्यायनिर्णय खुल्या मंचात जाहीर करणेत आला.
ठिकाण- सातारा.
दि. 10-08-2015.
(सौ.सुरेखा हजारे) (श्री.श्रीकांत कुंभार) (सौ.सविता भोसले)
सदस्या सदस्य अध्यक्षा
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, सातारा.