निकालपत्र
( पारीत दिनांक :21/06/2014 )
( द्वारा अध्यक्ष(प्रभारी) श्री.मिलींद भि.पवार(हिरुगडे) )
01. अर्जदार यांनी प्रस्तुत तक्रार ग्राहक संरक्षण कायद्याच्या कलम 12 अन्वये गैरअर्जदार यांच्या विरुध्द दाखल केली असून, तीद्वारे पुढील प्रमाणे मागण्या केलेल्या आहेत.
1. गैरअर्जदार यांनी अर्जदारांना मौजा हिंगणघाट
मौजा नं.188, संत ज्ञानेश्वर वार्ड मिलिंद नगर,
हिंगणघाट, म्युनिसिपल मालमत्ता क्र.130, शिट नं.24,
ब्लॉक नं.14 येथील दुकान गाळा क्र.1 व गाळा क्र.2 ची
कराराप्रमाणे शिल्लक रक्कम रु.10,60,000/- घेवुन
रजिस्टर्ड विक्रीपत्र करुन ताबा द्यावा.
2. मानसिक व शारिरीक त्रासाकरीता रु.1,00,000/-
3. तक्रारीचा खर्च रु.10000/-
अर्जदारांच्या तक्रारीचा थोडक्यात आशय खालीलप्रमाणे आहे.
अर्जदारांनी सदर तक्रार अर्जामध्ये नमुद केले आहे की, त्यांनी गैरअर्जदार यांचे नावे असलेल्या मौजा हिंगणघाट मौजानं.188, संत ज्ञानेश्वर वार्ड मिलिंद नगर, हिंगणघाट, म्युनिसिपल मालमत्ता क्र.130, शिट नं.24, ब्लॉक नं.14 येथील एकुन 6 दुकानापैकी दुकान गाळा क्र.1 व गाळा क्र.2 रु.17,00,000/- ला विकत घेण्याबाबत गैरअर्जदार यांच्या सोबत दिनांक 18/1/2012 रोजी करार केला होता व करार करते वेळी अर्जदारांनी गैरअर्जदार यांना रु.4,00,000/- नगदी दिले व उर्वरीत रक्कम ही विक्रीपत्र केल्यानंतर देण्याचे ठरले होते, दिनांक 30/07/2012 रोजी विक्रीपत्र करण्याची तारीख ठरविण्यात आली होती. अर्जदारांनी गैरअर्जदार यांना वेळोवेळी दुकानाचे रजिस्टर्ड विक्रीपत्र करुन देण्याकरीता विनंती केली असता गैरअर्जदार यांनी अर्जदार यांना उर्वरीत रकमेचे मागणी केली व मागणीनुसार अर्जदार यांनी दिनांक 27/02/2012 रोजीचा रु.1,40,000/- व त्यानंतर दिनांक 18/8/2012 रोजी रु.1,00,000/- असे दोन धनादेश गैरअर्जदार यांना त्यांच्या दुस-या व्यवसायाच्या नावे म्हणजेच गाथा प्रिंटर्स या नावे दिला व तो गैरअर्जदार यांच्या नावे जमाही झाला. असे एकुण रु.6,40,000/- गैरअर्जदार यांना देवुनही त्यांनी दुकानाचे रजिस्टर्ड विक्रीपत्र करुन देण्यास टाळाटाळ करीत आहे. त्यामुळे अर्जदार यांनी दिनांक 5/10/2012 रोजी गैरअर्जदार यांना वकीलामार्फत नोटीसही पाठविला. सदर नोटीसला गैरअर्जदार यांनी दुकानाचा कुठलाही करारनामा झाला नसल्याबाबतचे उत्तर दिले तसेच रु.17,00,000/- मध्ये एकाच दुकानाचे/गाळयाची विक्री करुन देण्याची तयारी दर्शविली.
रक्कम घेवुनही विक्रीपत्र करुन न देणे ही बाब गैरअर्जदार यांच्या सेवेतील त्रृटी असुन त्यांनी अनुचित व्यापार प्रणालीचा अवलंब केलेला आहे, त्यामुळे अर्जदारांनी गैरअर्जदारांविरुध्द प्रस्तुत तक्रार मंचामध्ये दाखल केली आहे व वरीलप्रमाणे मागणी केली आहे.
02. गैरअर्जदार यांनी आपला लेखी जवाब दाखल केलेला आहे. त्यानुसार गैरअर्जदार यांनी तक्रारीतील विपरित विधाने/आरोप अमान्य करुन पुढे असे नमुद केले की, अर्जदार हे मा.न्यायमंचाला करारपुर्ती ( Specific Performance of Contract) व घोषणा (Declaration) मागत आहे. जर अर्जदाराला करारपुर्ती व घोषणा मागायची असेल तर त्यांना या वि.मंचासमोर दाद मागण्याचा अधिकार नाही, कारण सदर अधिकार हा दिवाणी न्यायालयाला असल्यामुळे. त्यामुळे अर्जदार यांनी प्रस्तुत तक्रार ही दिवाणी न्यायालयात दाखल करायला पाहीजे होती, तसे न करता अर्जदार यांनी प्रस्तुत तक्रार ही वि.मंचासमोर दाखल केली असल्यामुळे अर्जदाराची तक्रार खारीज करण्याची विनंती गैरअर्जदार यांनी केली आहे.
03. गैरअर्जदार यांनी पुढे नमुद केले आहे की, तोंडी ठरल्याप्रमाणे प्रत्येक खोलीची किंमत ही रु.17,00,000/- ठेवण्यात आली होती, परंतु मुद्रांक शुल्क वाचविण्यासाठी ईसारपत्रात रु.17,00,000/- ला दोन खोल्या असे लिहण्यात आले होते. आजही गैरअर्जदार अर्जदारांना ईसारचिठठीच्या वेळी दिलेली रक्कम रु.4,00,000/- व्यतीरीक्त उर्वरीत रक्कम घेवुन एका खोलीचे रजिस्टर्ड विक्रीपत्र करुन देण्यास तयार आहे, परंतु एका खोलीचे रजिस्टर्ड विक्रीपत्र करुन घेण्यास तयार नाही. गैरअर्जदार यांनी पुढे असे नमुद केले आहे की, ईसार पत्रानुसार अर्जदार हे प्रस्तुत तक्रार वि.मंचासमक्ष चालवु शकत नाही, कारण सदर ईसारपत्रासाठी साक्ष-पुरावा व इतर चौकशीची आवश्यक्ता असल्यामुळे व सदर न्याय मंचाला अशी साक्ष-पुरावा घेण्याचे व चौकशी करण्याचे अधिकार नसल्यामुळे प्रस्तुत तक्रार हि वि.मंचासमक्ष चालु शकत नाही. गैरअर्जदार यांच्या तर्फे कुठल्याही प्रकारची चुक झालेली नसल्यामुळे तसेच त्यांनी कुठल्याही प्रकारच्या अनुचीत व्यापार प्रथेचा अवलंब केला नसल्यामुळे अर्जदाराची त्यांच्याविरुध्दची सदरची तक्रार रु.1,00,000/- नुकसान भरपाईसह खारीज करण्यात यावी अशी प्रार्थना गैरअर्जदार यांनी त्यांच्या लेखी उत्तरा्द्वारे मा.मंचास केलेली आहे.
03. अर्जदाराने प्रस्तुत तक्रार प्रतिज्ञापत्रावर दाखल केली असून, सोबत इसारपत्र, नोटीस व उत्तर नोटीसच्या छायांकीत प्रती दाखल केलेल्या आहे.
गैरअर्जदार यांनी त्यांचा लेखी जवाब प्रतिज्ञापत्रावर दाखल केला आहे तसेच लेखी युक्तिवाद दाखल केला आहे.
अर्जदाराची तक्रार, दाखल केलेले सोबतचे कागदपत्रे तसेच गैरअर्जदार यांनी दाखल केलेले लेखी जवाब, उभयतांचे वकीलांनी केलेला मौखिक युक्तिवाद यावरुन खालील कारणे व निष्कर्ष निघतात.
-: कारणे व निष्कर्ष :-
04 अर्जदाराची तक्रार व त्यासोबत दाखल केलेले कागदपत्रांचे बारकाईने अवलोकन करण्यात आले. अर्जदारांनी गैरअर्जदार क्र.1 व 2 यांचे कडुन मौजा हिंगणघाट मौजानं.188, संत ज्ञानेश्वर वार्ड मिलिंद नगर, हिंगणघाट, म्युनिसिपल मालमत्ता क्र.130, शिट नं.24, ब्लॉक नं.14 येथील एकुन 6 दुकानापैकी दुकान गाळा क्र.1 व गाळा क्र.2 रु.17,00,000/- ला विकत घेण्याबाबत गैरअर्जदार यांच्या सोबत दिनांक 18/1/2012 रोजी करार केला होता हे नि.क्र.4/1 वरील ईसारपत्रावरुन दिसुन येते. सदर इसारपत्रावर अर्जदार क्र.1 ते 3 व गैरअर्जदार क्र.1 व 2 यांच्या स्वाक्ष-या आहेत व ते दिनांक 18/1/2012 रोजी नोटराईझ केले आहे. अर्जदारांची मुख्य तक्रार आहे की, वर नमुद केल्याप्रमाणे गाळा क्र.1 व 2 चे विक्रीपत्र गैरअर्जदार क्र.1 व 2 यांनी करुन दिले नाही. सदर व्यवहार रु.17,00,000/- मध्ये ठरला होता व करार करते वेळी अर्जदारांनी गैरअर्जदार यांना रु.4,00,000/- नगदी दिले होते याबाबत वाद नाही तसेच सदर ईसारपत्रानुसार दि.30/4/2012 पुर्वी विक्रीपत्र करावयाचे होते.
05. सदर इसारपत्रामध्ये ठरल्याप्रमाणे गैरअर्जदार क्र.1 व 2 यांनी अर्जदार यांना सदर गाळा नं.1 व 2 चे विक्रीपत्र करुन दिले नाही. तसेच वारंवार रोख रक्कम मागीतली जी अर्जदार यांनी गैरअर्जदार यांना दि.27/2/2012 रोजी धनादेश क्र.351386 द्वारे रु.1,40,000/- गाथा प्रिंटर्स या नावे दिला. परंतु त्यानंतरही गैरअर्जदार यांनी कागदपत्रे तयार नाही म्हणुन विक्रीपत्र करण्याचे टाळले. त्यानंतर गैरअर्जदार यांनी परत अर्जदारांना रक्कम मागीतली व दिनांक 18/8/2012 रोजी धनादेश क्र.3573861 अन्यवे अर्जदाराने गैरअर्जदार यांना रु.1,00,000/- गाथा प्रिंटर्स या नावे दिला. अशा प्रकारे अर्जदार यांनी गैरअर्जदार क्र.1 व 2 यांना एकुण रु.6,40,000/- देवुनही गैरअर्जदार यांनी विक्रीपत्र करुन दिले नाही.
06. गैरअर्जदार यांनी मात्र अर्जदार यांची तक्रार पुर्णतः अमान्य केली आहे. सदर इसारपत्राप्रमाणे एक दुकान रु.17,00,000/- ला ठरले होते असे कथन केले व अर्जदार यांनी नंतर दिलेली रक्कम ही गाथा प्रिंटर्सच्या बिला पोटी दिलेली आहे. तसेच सदर तक्रार वि.मंचासमोर चालु शकत नाही असेही कथन करुन गैरअर्जदार यांनी अर्जदाराची तक्रार अमान्य केली आहे.
07. उपलब्ध कागदपत्रांचे बारकाईने अवलोकन करण्यात आले. नि.क्र.4/1 कडे दाखल इसारपत्राचे अवलोकन केले असता सदर इसारपत्रचा स्टँम्प हा लिहुन देणार श्री सुदत्त मोरेश्वर मानकर नावावा आहे व सदर इसारपत्रावर लिहुन देणार म्हणुन गैरअर्जदार क्र.1 व 2 यांच्या स्वाक्षरी आहे व लिहुन घेणार म्हणुन अर्जदार क्र.1 ते 3 यांच्या स्वाक्ष-या आहे. सदर ईसारपत्रासोबत गैरअर्जदार क्र.1 व 2 यांचा ओळखीचा पुरावा म्हणुन निवडणुक ओळखपत्र आहे. यावरुन सदर ईसारपत्र गैरअर्जदार क्र.1 व 2 यांनी करुन दिल्याचे सिध्द होत आहे. सदर ईसारपत्राच्या पहिल्या पानावर शेवटचे ओळीत ‘ग्राऊंड फ्लोवर वरील दुकान क्र.1 व 2 अशी दोन दुकाने तुम्हाला आज रोजी विकण्याचा सौदा रु.17,00,000/- रुपयामध्ये विकण्याचा सौदा तुमच्याशी पक्का केला आहे’ या विधानावर गैरअर्जदार यांनी अर्जदार यांना दुकान क्र.1 व 2 ही दोन्ही दुकाने रु.17,00,000/-एवढया किमतीत विक्री करण्याचे कबुल केले होते हे सिध्द होते. त्यामुळे सदर दोन दुकानांची किंमत रु.17,00,000/- नसुन एका दुकानाची किंमत रु.17,00,000/- आहे असे गैरअर्जदार यांचे कथन निष्प्रभ ठरते. गैरअर्जदार यांच्या सदर विधानांना कुठलाही आधार नाही.
08. गैरअर्जदार यांनी प्रस्तुत प्रकरणी आमचा दुकान/गाळे बांधुन विक्री करण्याचा व्यवसाय नाही असा बचाव केला आहे. मात्र प्रस्तुत कामी नि.क्र.4/1 ईसारपत्राचे अवलोकन केले असता सदर ईसारपत्रावर ‘आम्ही व्यवसायाकरीता सहा दुकाने काढलेली आहेत’ असे लिहुन दिले आहे. त्यामुळे दुकान/गाळे बांधणे व विकणे हा गैरअर्जदार यांचा व्यवसाय असल्याचे स्पष्ट होते. गैरअर्जदार यांनी पुढे नमुद केले आहे की, सदर व्यवहारा पोटी अर्जदार यांनी ईसार म्हणुन रु.4,00,000/- दिले व त्या नंतर धनादेशाद्वारे रु.1,40,000/- व रु.1,00,000/- अशी रक्कम गैरअर्जदार यांना दिली ती दुकाण/गाळयांच्या व्यवहारा पोटी दिली नसुन गैरअर्जदार यांचे कडे अर्जदार यांचे गाथा प्रिंटर्सचे बिल्स बकाया होते त्यापोटी अर्जदार यांनी रु.1,40,000/- व रु.1,00,000/- दिले आहे. सदर रकमेचा दुकान/गाळे यांच्या रकमेशी तसेच व्यवहाराशी काहीही संबंध नाही. मात्र सदर बाब अर्जदार यांनी नाकारली व रु.1,40,000/- व रु.1,00,000/- हे दुकाने/गाळयांच्या व्यवहारापोटी दिलेली असल्याचे म्हटले आहे. प्रकरण चालु असतांना वि.मंचाने सुध्दा सदर रु.2,40,000/’ ची रक्कम जर प्रिंटर्सचे बिला बाबत असतील तर त्यांची बिले, ठरलेला व्यवहार यांचा पुरावा दाखल करावा असे गैरअर्जदार यांना सुचविले होते, परंतु गैरअर्जदार यांनी तसा कोणताही पुरावा वि.मंचासमक्ष दाखल केलेला नाही. त्यामुळे अर्जदार यांनी गैरअर्जदार यांना रु.1,40,000/- व रु.1,00,000/- दिलेले हे गाथा प्रिंटर्सच्या बिलापोटी दिले हे गैरअर्जदार यांचे बचावात्मक विधान तथ्यहीन आहे.
09. गैरअर्जदार व अर्जदार यांचे मध्ये सदर दोन दुकाने/गाळे विक्रीचा व्यवहार हा करारपुर्ती ( Specific Performance of Contract) व घोषणा (Declaration) या तरतुदी खाली येतो म्हणुन या वि.मंचात प्रस्तुत प्रकरण चालण्यास पात्र नाही अशी मागणी गैरअर्जदार यांनी केली आहे व त्यासंबंधी विविध न्यायनिवाडे मंचासमक्ष दाखल केले आहे. परंतु सदर न्यायनिवाडे या प्रकरणास लागु पडत नाही. कारण नि.क्र.4/1 वरील ईसारपत्राचे अवलोकन केले असता गैरअर्जदार यांचे मालकीचे एकुण सहा दुकाने/गाळे आहे पैकी अर्जदार यांनी दोन दुकाने/गाळे क्र.1 व 2 हे त्यांचे स्वयं रोजगारासाठी खरेदी करण्यासाठी ठरलेला व्यवहार व अँडव्हांस म्हणुन दिलेली रक्कम याबाबत आहे. सदर व्यवहारावरुन गैरअर्जदार यांचे अर्जदार हे ग्राहक होते असे स्पष्ट दिसुन येते व ठरलेल्या व्यवहाराप्रमाणे उर्वरीत रक्कम घेवुन गैरअर्जदार क्र.1 व 2 यांनी दुकान/गाळे क्र.1 व 2 चे विक्रीपत्र अर्जदार यांचे नावे करुन देणे बंधन कारक ठरते. अर्जदार यांचे मागणी प्रमाणे गैरअर्जदार यांनी अर्जदार यांना दोन दुकान/गाळयाचे विक्रीपत्र करुन दिले नाही म्हणुन गैरअर्जदार यांना अर्जदार यांनी वकीलामार्फत नोटीस दिला हे नि.क्र.4/2 वरील नोटीस वरुन दिसुन येते. त्यास खोटया मजकुराचे उत्तर गैरअर्जदाराने वि.मंचाला दिले हे नि.क्र.4/3 वरील उजरी नोटीस वरुन दिसुन येते. अशा प्रकारे ठरलेला व्यवहार पुर्ण न करणे, अँडव्हांस रक्कम स्विकारुन उर्वरीत व्यवहार पुर्ण करण्यास टाळाटाळ करणे ही अनुचित व्यापार प्रथा आहे व त्याचा वापर गैरअर्जदार क्र.1 व 2 यांनी केला असल्याचे पुराव्यावरुन सिध्द झाले आहे. अशा प्रकारे गैरअर्जदार यांनी दि.18/1/2012 रोजी अर्जदार यांचेशी ठरलेला व्यवहार पुर्ण न करता अर्जदार यांना दुषीत व त्रुटीची सेवा दिली आहे असे वि.मंचाचे स्पष्ट मत झाले आहे.
10. वरील सर्व विवेचनावरुन गैरअर्जदार व अर्जदार यांचे मध्ये ठरलेला व्यवहारा प्रमाणे गैरअर्जदार यांनी अर्जदार यांचे रु.17,00,000/- पैकी रु.6,40,000/- वजा करुन उर्वरीत रक्कम रु.10,60,000/- घेवुन दुकान/गाळे क्र.1 व 2 चे विक्रीपत्र करुन देणे ही गैरअर्जदार यांची जबाबदारी आहे व त्याप्रमाणे दुकान/गाळे क्र.1 व 2 चे विक्रीपत्र करुन घेण्यास अर्जदार पात्र आहे असे वि.मंचाचे मत आहे.
11. सदरचा व्यवहार ठरल्यानंतर अर्जदार यांनी एकुण रु.6,40,000/- एवढी रक्कम दिली व उर्वरीत रक्कम देवुन विक्रीपत्र करुन घेण्यास तयार असुनही गैरअर्जदार क्र.1 व 2 यांनी तसे केले नाही. त्यामुळे अर्जदार यांना रक्कम गुंतवुन त्यांचा फायदा झाला नाही व स्वयंरोजगार टाकुन त्याचा उपभोग घेता आला नाही. अर्जदार यांना गैरअर्जदार यांना वारंवार विनंती करावी लागली, वकीलामार्फत नोटीस पाठवावी लागली व त्यानंतर वि.मंचात तक्रार दाखल करावी लागली, त्यामुळे अर्जदारांना झालेला मानसिक व शारिरीक त्रास सहन करावा लागला, त्यापोटी रु.5000/- व तक्रारीचा खर्च म्हणुन रु.2000/- गैरअर्जदार यांच्या कडुन मिळण्यास अर्जदार पात्र आहे असे वि.मंचास वाटते.
12. वरील सर्व विवेचनावरुन गैरअर्जदार यांनी अनुचित व्यापार प्रथेचा अवलंब केला आहे व अर्जदार यांना त्रुटीची सेवा दिली आहे या निष्कर्षाप्रत हे वि.मंच आल्याने खालील प्रमाणे आदेश पारीत करण्यात येत आहे.
// आदेश //
अर्जदार यांची तक्रार अंशतः मंजुरकरण्यात येते.
2) गैरअर्जदार क्र.1 व 2 यांनी मौजा हिंगणघाट मौजानं.188,
संत ज्ञानेश्वर वार्ड मिलिंद नगर, हिंगणघाट, म्युनिसिपल
मालमत्ता क्र.130, शिट नं.24, ब्लॉक नं.14 येथील दुकान
गाळा क्र.1 व गाळा क्र.2 ची कराराप्रमाणे शिल्लक रक्कम
रु.10,60,000/- (रु.दहा लाख साठ हजार फक्त) घेवुन
अर्जदार क्र.1 ते 3 च्या नावे रजिस्टर्ड विक्रीपत्र करुन द्यावे.
वरील आदेशाचे पालन गैरअर्जदार क्र.1 व 2 यांनी आदेशाची
प्रत प्राप्त झालेल्या दिनांकापासुन 30 दिवसांच्या आंत
करावे. मुदतीत आदेशाचे पालन न केल्यास, मुदतीनंतर
उपरोक्त कलम 2 मधील व्यवहार पुर्ण न केल्याबद्दल
व्यवहार पुर्ण होईपर्यंत, आदेश पारीत दिनांका पासुन
म्हणजेच दिनांक 16/06/2014 पासून दंड म्हणुन दरमहा
रु.1000/- अर्जदार क्र.1 ते 3 यांना देण्यास गैरअर्जदार
क्र.1 व 2 जवाबदार राहतील.
अर्जदार क्र.1 ते 3 यांना झालेल्या शारीरिक व मानसिक
त्रासाबद्दल गैरअर्जदार क्र.1 व 2 यांनी अर्जदारास रुपये
5000/- ( रुपये पाच हजार फक्त) व तक्रारीचा खर्च रुपये
2000/- ( दोन हजार फक्त) सदर निकाल प्राप्ती पासून
तीस दिवसांचे आंत द्यावे.
5) मा.सदस्यांसाठीच्या ‘ब’ व ‘क’ फाईल्स संबंधीतांनी परत
घेवुन जाव्यात.
निकालपत्राच्या प्रति सर्व संबंधीत पक्षांना माहितीस्तव व
उचित कार्यवाहीकरीता पाठविण्यात याव्यात.