जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, धुळे.
ग्राहक तक्रार क्रमांक – १०६/२०१२ तक्रार दाखल दिनांक – २८/०६/२०१२
तक्रार निकाली दिनांक – ३०/१०/२०१४
श्री. दौलत रामचंद्र पाटील
उ.व.- सज्ञान, धंदा-शेती
रा.जेबापुर, ता.साक्री, जि.धुळे . तक्रारदार
विरुध्द
१) म.दुय्यम अभियंता सो.
महाराष्ट्र राज्य विद्यूत वितरण कंपनी लि.
ग्रामीण विभाग सामोडे, ता.साक्री, जि.धुळे
२) म.सहाय्यक अभियंता सो.
महाराष्ट्र राज्य विद्यूत वितरण कंपनी लि.
तालूका ऑफीस साक्री, ता.साक्री, जि.धुळे
३) म.कार्यकारी अभियंता सो.
महाराष्ट्र राज्य विद्यूत वितरण कंपनी लि.
गौरव हॉटेल समोर, नकाणे रोड, ता.,जि. धुळे .सामनेवाला
(मा.अध्यक्षा – सौ.व्ही.व्ही. दाणी)
(मा.सदस्य – श्री.एस.एस.जोशी)
उपस्थिती
(तक्रारदारातर्फे – अॅड.श्री.आर.बी. सूर्यवंशी)
(सामनेवालातर्फे – अॅड.श्री.एल.पी. ठाकूर)
निकालपत्र
(दवाराः मा.अध्यक्षा – सौ.व्ही.व्ही. दाणी)
१. सामनेवाले यांच्या निष्काळजीपणामुळे जळालेल्या ऊसाची त्यांनी भरपाई द्यावी यासाठी तक्रारदार यांनी सदरची तक्रार दाखल केली आहे.
२. तक्रारदार यांची थोडक्यात तक्रार अशी आहे की, तक्रारदार यांचे मौजे दापूर, ता.साक्री शिवारात गट क्र.१४७ ही शेतजमीन असून त्यात विहीर आहे. त्या विहिरीवर त्यांनी सामनेवाले यांच्याकडून वीज जोडणी घेतली आहे. त्या शेतात तक्रारदार यांनी ०.८० आर एवढ्या क्षेत्रात ऊसाची लागवड केली होती. दि.२१/०१/२०११ रोजी दुपारी ३ वाजेच्या सुमारास अनिल विश्वासराव भदाणे यांच्या शेतातील वीज तार तुटून पडल्याने शॉर्टसर्कीट होवून आग लागली. त्यात तक्रारदार यांच्या शेतातील सुमारे रूपये १,९८,७५७/- एवढ्या किंमतीचा ऊस जळून खाक झाला. सामनेवाले यांनी या रकमेसह मानसिक त्रासापोटी रूपये १०,०००/-, तक्रारीचा खर्च रूपये १०,०००/- ची भरपाई द्यावी अशी मागणी तक्रारदार यांनी केली आहे.
३. तक्रारदार यांनी तक्रारीसोबत ७/१२ उतारा, खातेउतारा, वीज कंपनीच्या सामोडे येथील कनिष्ठ अभियंतांना दिलेले पत्र, पिंपळनेर पोलीस ठाण्यात दिलेली खबर, घटनास्थळाचा पंचनामा, नैसर्गिक आपत्ती पंचनामा, आगीचे कारण, सहाय्यक विद्युत निरीक्षकांनी घेतलेला जबाब, कनिष्ठ अभियंता अशोक शिवराम सोनवणे यांचा जबाब, वृत्तपत्रातील बातमी, वीज देयक आदी कागदपत्रांच्या प्रती दाखल केल्या आहेत.
४. सामनेवाले यांनी हजर होवून आपला खुलासा दाखल केला. त्यात म्हटले आहे की, तक्रारदार यांची तक्रार खोटी आहे. तक्रारदार व सामनेवाले यांच्यात ग्राहक व सेवा देणार असे नाते नाही. त्यामुळे सदरच्या न्यायमंचास सदर तक्रार चालविण्याचे न्यायक्षेत्र नाही. तक्रारदार सांगतो त्याप्रमाणे कोणतीही घटना घडलेली नाही, म्हणून सदरची तक्रार रद्द करावी अशी मागणी सामनेवाले यांनी केली आहे.
५. तक्रारदार यांची तक्रार त्यासोबत त्यांनी दाखल केलेली कागदपत्रे, लेखी युक्तिवाद आणि उभयपक्षाच्या वकिलांनी केलेला युक्तिवाद याचा विचार करता आमच्यासमोर पुढील मुद्दे उपस्थित होतात.
मुद्दे निष्कर्ष
- तक्रारदार हे सामनेवाले यांचे ग्राहक
आहेत काय ? होय
- तक्रारदार हे नुकसान भरपाई मिळण्यास
पात्र आहेत काय ? होय
- आदेश काय ? अंतिम आदेशाप्रमाणे
६. मुद्दा ‘अ’- तक्रारदार यांच्या मौजे दापूर ता.साक्री शिवारातील गट क्र.१४७ वरील ऊसाचे पिक दि.२१/०१/२०११ रोजी सामनेवाले यांची वीज तार तुटल्यामुळे आग लागून त्यात जळाले अशी तक्रारदार यांची मुख्य तक्रार आहे. त्याबाबत सामनेवाले यांनी नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी तक्रारदार यांनी केली आहे. तक्रारदार यांनी दाखल केलेली कागदपत्रे आणि त्यावर सामनेवाले यांनी दिलेला खुलासा या दोघांचेही मंचाने काळजीपूर्वक अवलोकन केले. त्यावरून असे निदर्शनास येते की, तक्रारदार यांच्या शेतात वीज तार तुटल्यामुळे ऊस पिकाचे नुकसान झाले आहे. तथापि, सामनेवाले यांनी त्यांच्या खुलाशात या घटनेस ते जबाबदार नाही असा पवित्रा घेतला आहे. तक्रारदार यांनी घटनेची खबर, घटनास्थळाचा पंचनामा, वीज कंपनीच्या कर्मचा-यांचे जबाब, आगीचे कारण आदी कागदपत्रे दाखल केली. त्यावरून दि.२१/०१/२०११ रोजी दुपारी ३ वाजेच्या सुमारास अनिल विश्वासराव भदाणे यांच्या शेतातील वीज तार तुटल्यामुळे शॉर्टसर्कीट होवून आसपासच्या सहा शेतक-यांच्या शेतातील ऊसाच्या पिकाला आग लागून त्याचे नुकसान झाले असे दिसून येते. तक्रारदार यांनी इतर कागदपत्रांसोबत वीज बिलही दाखल केले आहे. त्या बिलावर दौलत रामचंद्र पाटील असे नाव असून ग्राहक क्रमांक ०८६७८७०००८८८ असा नमूद केला आहे. यावरून सदरचे बिल हे तक्रारदार यांचेच आहे हे स्पष्ट होते. सामनेवाले यांनी आपल्या खुलाशात तक्रारदार हे त्यांचे ग्राहक नसल्याचे नमूद केले असले तरी वरील बिलावरून तक्रारदार हे सामनेवाले यांचे ग्राहक आहेत हे स्पष्ट होते. म्हणूनच मुद्दा क्र.’अ’ चे उत्तर आम्ही होकारार्थी देत आहोत.
७. मुद्दा ‘ब’- तक्रारदार यांनी दाखल केलेल्या कागदपत्रांवरून त्यांच्या शेतात सामनेवाले यांची वीज तार तुटून आगीची घटना घडली आणि त्यामुळे ऊसाचे पिक जळून त्याचे ५० टक्केपेक्षा अधिक नुकसान झाले असे तक्रारदार यांचे म्हणणे आहे. आपल्या म्हणण्याच्या पुष्ट्यर्थ तक्रारदार यांनी ७/१२ उतारा, सामनेवाले यांनी वसंतदादा पाटील सहकारी साखर कारखान्याला दिलेले पत्र, पोलीस ठाण्यात दाखल खबर, घटनास्थळाचा पंचनामा, तक्रारदार यांचा जबाब, नैसर्गिक आपत्ती पंचनामा, कॉज ऑफ फायर, सहाय्यक तारमार्ग तंत्री यांचा जबाब, कनिष्ठ अभियंता यांचा जबाब आदी कागदपत्रांच्या छायांकीत प्रती दाखल केल्या आहेत. तक्रारदार यांच्या ७/१२ उता-यावर त्यांनी शेतात ०.८० आर एवढ्या क्षेत्रावर ऊस लागवड केल्याची नोंद आहे. सामनेवाले यांनी वसंतदादा साखर कारखाना यांना दिलेल्या पत्रात तक्रारदार यांच्या शेतात विजेच्या शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याचे नमूद केले आहे. पिंपळनेर पोलिसात दाखल खबर मध्येही तक्रारदार यांच्या शेतात विजेच्या शॉर्ट सर्किटमुळे नुकसान झाल्याचे म्हटले आहे. घटनास्थळाच्या पंचनाम्यातही त्याचा उल्लेख आहे. तक्रारदार यांच्या जबाबात आणि नैसर्गिक आपत्ती पंचनाम्यात त्यांच्या शेतातील पन्नास टक्केपेक्षा अधिक ऊसाचे आगीत नुकसान झाल्याचे म्हटले आहे. कॉज ऑफ फायर या दस्तऐवजावर आगीचे कारण स्पष्टपणे नमूद करण्यात आले आहे. सहाय्यक तारमार्ग तंत्री साहेबराव लक्ष्मण गायकवाड यांनी आपल्या जबाबात आगीची घटना घडल्याचे मान्य केले आहे. कनिष्ठ अभियंता ए.एस. सोनवणे यांनीही आगीची घटना घडल्याचे मान्य केले आहे.
सामनेवाले यांनी आपल्या बचावासाठी खुलाशाव्यतीरिक्त इतर कागदपत्रे दाखल केलेली नाही. तक्रारदार यांनी दाखल केलेल्या कागदपत्रांवरून त्यांच्या शेतात दि.२१/०१/२०११ रोजी वीज तार तुटून शॉर्ट सर्किटमुळे आग लागून ऊस जळाल्याची घटना घडली हे स्पष्ट होते. या तारेमुळे तक्रारदार यांच्या शेतात ही घटना घडली ती तार सामनेवाले यांची होती हे वरील कागदपत्रांवरून स्पष्ट होते. सामनेवाले यांचे अधिकारी आणि कर्मचारी यांचे जे जबाब दाखल आहेत, त्यातही वरील घटना त्यांनी मान्य केली आहे. या घटनेत तक्रारदार यांच्या शेतातील ऊसाचे पन्नास टक्क्यांपेक्षा अधिक नुकसान झाले हे तक्रारदार यांचा जबाब आणि नैसर्गिक आपत्ती पंचनामा यावरून दिसून येते.
सामनेवाले यांच्या वीज तारेमुळे तक्रारदार यांच्या शेतातील ऊसाचे पन्नास टक्क्यांपेक्षा अधिक नुकसान झाले आहे. त्यामुळे त्याची भरपाई देणे हे सामनेवाले यांच्याकडून अपेक्षित होते. मात्र सामनेवाले यांनी ती जबाबदारी फेटाळून लावली. सामनेवाले यांची ही त्रुटी सेवेतील त्रुटी म्हणता येईल असे आम्हाला वाटते. तक्रारदार यांनी आपल्या तक्रारीत रूपये १,९८,७५७/- एवढ्या रकमेचे नुकसान झाल्याचे नमूद केले आहे. तथापि, नैसर्गिक आपत्ती पंचनाम्यात आणि घटनास्थळाच्या पंचनाम्यात तक्रारदार यांचा पन्नास टक्के म्हणजेच ०.४० आर एवढ्या क्षेत्रावरील ऊस जळून नुकसान झाल्याचे म्हटले आहे. त्यानुसार नुकसानभरपाईची रक्कम तक्रारदार यांना मिळावयास हवी असे आमचे मत आहे.
तक्रारदार यांनी आपल्या तक्रारीत संपूर्ण लागवड क्षेत्रावरील म्हणजे ०.८० आर एवढ्या क्षेत्रावरील ऊसाचे नुकसान झाले असे म्हटले आहे. तथापि, पंचनाम्यानुसार त्यांच्या शेतातील ०.४० आर एवढ्या क्षेत्रावरील ऊसाचे नुकसान झाल्याचे दिसते आहे. त्यामुळे ०.४० एवढ्या क्षेत्रावरील ऊसाच्या नुकसानीपोटी तक्रारदार हे भरपाई मिळण्यास पात्र आहे, असे आमचे मत आहे. तक्रारदार यांनी नुकसानीची रक्कम रूपये १,९८,७५७/- एवढी मागितली आहे. प्रत्यक्षात त्यांचे नुकसान पन्नासटक्के झाले असल्याने ते रक्कम रूपये ९९,३७९/- एवढी भरपाई मिळण्यास पात्र ठरतात. सामनेवाले यांनी तक्रारदार यांना नुकसान भरपाई नाकारल्यानेच त्यांना या मंचात दाद मागावी लागली. त्यामुळे साहजिकच तक्रारदार यांना मानसिक त्रास आणि तक्रारीचा खर्च सोसावा लागला. त्याबद्दलही त्यांना अनु्क्रमे रूपये २,०००/- आणि रूपये ५००/- एवढी भरपाई मिळायला हवी असे आमचे मत आहे.
८.मुद्दा क्र. ‘‘क’’ – वरील विवेचनाचा विचार करता, तक्रारदार हे सामनेवाले यांचे “ग्राहक” आहेत हे सिध्द होत होते. त्यामुळे तक्रारदार यांच्या शेतात सामनेवाले यांची वीजतार तुटून झालेल्या नुकसानीबद्दल त्यांना सामनेवाले यांच्याकडून भरपाई मिळणे क्रमप्राप्त आहे. मात्र सामनेवाले यांनी भरपाई देण्याचे नाकारल्याने तक्रारदार यांना या मंचात दाद मागावी लागली. या सर्व बाबींचा विचार करता आम्ही पुढील प्रमाणे आदेश पारीत करीत आहोत.
आ दे श
- तक्रारदार यांचा तक्रार अर्ज अंशतः मंजूर करण्यात येत आहे.
- सामनेवाले यांनी या निकालाच्या प्राप्तीपासून ३० दिवसाच्या आत तक्रारदार यांना पुढीलप्रमाणे भरपाई द्यावी.
- ऊसाच्या नुकसानीपोटी रूपये ९९,३७९/- (अक्षरी रूपये नव्याण्णव हजार तीनशे एकोणऐंशी मात्र) एवढी रक्कम द्यावी.
(ब) मानसिक त्रासापोटी रूपये २,०००/- (अक्षरी रक्कम रूपये दोन हजार मात्र) आणि तक्रारीचा खर्च रूपये ५००/- (अक्षरी रूपये पाचशे मात्र) द्यावा.
३. आदेश क्र.२(अ) मधील भरपाईची रक्कम मुदतीत न दिल्यास संपूर्ण रक्कम देवून होईपर्यंत द.सा.द.शे. ६ टक्के प्रमाणे व्याज देण्यास सामनेवाले जबाबदार राहतील.
धुळे.
-
(श्री.एस.एस. जोशी) (सौ.व्ही.व्ही. दाणी)
सदस्य अध्यक्षा
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, धुळे.