::: आ दे श :::
( पारित दिनांक : 27/11/2017 )
माननिय अध्यक्षा सौ.एस.एम.उंटवाले, यांचे अनुसार : -
तक्रारकर्तीने सदरहू तक्रार, ग्राहक संरक्षण कायदा 1986 चे, कलम 12 अन्वये, दोषपूर्ण सेवे संदर्भात विरुध्द पक्षाविरुध्द दाखल केली आहे.
सदर प्रकरणात तक्रारकर्तीची तक्रार व दाखल दस्तांवरुन निर्णय पारित केला कारण विरुध्द पक्ष क्र. 1 व 2 यांना पुरेशी संधी देवुनही त्यांनी लेखी जबाब दाखल केला नाही, त्यामुळे दिनांक 20/07/2017 रोजी विरुध्द पक्ष क्र. 1 व 2 विरुध्द ‘‘ विना लेखी जबाब ’’ चा आदेश मा. सदस्य यांनी पारित केला.
दाखल दस्तांवरुन असे दिसते की, विरुध्द पक्षाने दिनांक 27/02/2014 पासुन तक्रारकर्तीकडे घरगुती विद्युत पुरवठा सुरु करुन दिला होता. त्यामुळे तक्रारकर्ती विरुध्द पक्ष क्र. 1 व 2 ची ग्राहक आहे, या निष्कर्षाप्रत मंच आले आहे.
तक्रारकर्तीने दिनांक 18/02/2017 रोजीचे विद्युत देयक जे एकूण रक्कम रुपये 4,910/- चे आहे व सदर रक्कम थकबाकी राहिल्यामुळे विरुध्द पक्षाने दिनांक 18/03/2017 रोजी विद्युत कायदा 2003 कलम 56 अंतर्गत विद्युत पुरवठा खंडित करणेबाबतची दिलेली नोटीस, मंचासमोर आव्हानीत केली आहे. तक्रारकर्तीने तक्रारीसोबत अंतरीम अर्ज केला होता. त्यावर मा. सदस्य यांनी दिनांक 05/04/2017 रोजी खालीलप्रमाणे आदेश पारित केला होता.
‘‘ तक्रारकर्ती यांचा अर्ज, दाखल दस्त तपासले व युक्तिवाद एैकला. दाखल देयकावरुन असे दिसते की, तक्रारकर्तीला थकित बिल रुपये 4,910/- आले आहे, त्यापैकी रुपये 1,000/- चा भरणा करावा. तसेच विरुध्द पक्षाने अंतरीम अर्जावर दिनांक 12/04/2017 पर्यंत आपले निवेदन सादर करावे व तोपर्यंत तक्रारकर्तीचा विद्युत पुरवठा खंडित करु नये. ’’
विरुध्द पक्षाने, तक्रारकर्तीच्या अर्जावर कोणतेही निवेदन दिलेले नाही. परंतु दाखल दिनांक 18/02/2017 चे विद्युत देयक प्रतीवरुन असा बोध होतो की, सदर देयक हे फेब्रुवारी 2017 चे आहे व ते एकूण रुपये 125.26 ईतक्या रक्कमेचे आहे व एकूण विज वापर 3 नोंदविला आहे, मात्र त्यात निव्वळ थकबाकी ही रक्कम रुपये 4,238.20 ईतकी दर्शविली आहे व तक्रारकर्तीने दिनांक 02/03/2016 पासुन तर 18/02/2017 पर्यंत देयक रक्कम अदा केल्याच्या पावत्या रेकॉर्डवर दाखल केलेल्या नाही. तक्रारकर्तीने रेकॉर्डवर या आधीचे जुन 2015 व जुलै 2014 या दोन विद्युत देयकाच्या प्रती दाखल केल्या, त्यावरुन तिचा मागील विज वापर लक्षात येतो. मात्र विरुध्द पक्षाकडे विद्युत देयक रक्कम भरणा केलेली तारीख 13/03/2015 पासुन एकदम 02/03/2016 अशी आहे. त्यामुळे तक्रारकर्तीने विरुध्द पक्ष हे दर महिण्याचे अव्वाच्या सव्वा चुकीचे विद्युत देयक देत आहेत, ही बाब सिध्द केली नाही, असे मंचाचे मत आहे. म्हणून तक्रारकर्तीची प्रार्थना मंजूर करता येणार नाही.
सबब अंतिम आदेश, पुढीलप्रमाणे पारित केला.
:: अंतिम आदेश ::
1. तक्रारकर्तीची तक्रार पुराव्याअभावी खारिज करण्यात येते.
2. न्यायिक खर्चाबाबत कोणताही आदेश पारित करण्यात येत नाही.
3. उभय पक्षकारांना आदेशाची प्रत निःशुल्क देण्यात यावी.
( श्री. कैलास वानखडे ) ( सौ. एस.एम. उंटवाले )
सदस्य. अध्यक्षा.
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्याय मंच, वाशिम.
svGiri