निकालपत्र
(घोषीत द्वारा- मा. सौ. स्मिता बी.कुलकर्णी,अध्यक्षा )
1. अर्जदार यांनी गैरअर्जदार यांचेविरुध्द सेवेत त्रुटीच्या कारणावरुन तक्रार दाखल केलेली आहे.
अर्जदार यांचे तक्रारीतील कथन थोडक्यात खालील प्रमाणेः-
2. अर्जदार हा व्यवसायाने शिक्षक असून सध्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळा हंगरगा,तालुका उमरी,जिल्हा नांदेड येथे कार्यरत आहे. अर्जदाराने दिनांक 26.03.2013 रोजी आर.डी.पासबुक क्र. 034633599 हे ट्रान्सफरसाठी सब पोस्ट ऑफिस,उमरी यांचेकडून सब पोस्ट ऑफिस,विक्रमगड ठाणे येथे पाठविले व तशी पावती घेतली होती. सब पोस्ट ऑफिस,विक्रमगड ठाणे येथील ऑफिसला आर.डी.पासबुक प्राप्त होऊनही संबंधीतांनी अर्जदारास आर.डी.पासबुक व त्यामधील रक्कम देणेस नकार दिला. दिनांक 01.07.2013 रोजी पोस्ट मास्टर उमरी यांचेकडे आर.डी.पासबुक ट्रान्सफर पाठविणेबाबतचा अर्ज व त्याची प्रत घेतली. दिनांक 22.11.2013 रोजी सब पोस्ट मास्टर उमरी यांना आर.डी.पासबुक ट्रान्सफर अर्ज केला व तक्रार नमुद केली. पुन्हा दिनांक 25.09.2014 रोजी सब पोस्ट ऑफिस,विक्रमगड ठाणे येथे सदरील तक्रार रजिस्टर्ड पोस्टाव्दारे करण्यात आली, त्यावरही योग्य ती कारवाई आजपर्यंत करण्यात आली नाही. दिनांक 03.01.2015 रोजी सब पोस्ट मास्टर उमरी यांचे नावाने अर्ज दिला असता त्यांनी संपुर्ण कार्यपुर्तता करण्याचे टाळले. मुळ तक्रारीसोबत उमरी येथून सब पोस्ट ऑफिस,विक्रमगड पालघर येथे रजिस्टर्ड पोस्टाव्दारे पाठविल्याबाबतची पावती जोडलेली आहे. गैरअर्जदार यांनी अत्यंत निष्काळजीपणाने व हलगर्जीपणाने अर्जदाराची तक्रार हाताळलेली आहे. त्यामुळे अर्जदारास आर्थिक नुकसान झालेले आहे. गैरअर्जदार क्र. 1 यांनी अर्जदारास सदरील आर.डी.पासबुक मधील रक्कम रु.4,000/- देण्यास स्पष्ट नकार दिल्यामुळे अर्जदाराने सदरील तक्रार दाखल केलेली आहे. तक्रारीमध्ये अर्जदाराने गैरअर्जदार यांचेकडून अर्जदारास आर.डी.पासबुक क्र. 034633599 मधील रक्कम रु.4,000/- व त्यावर द.सा.द.शे.15 टक्के व्याजासह तसेच मानसिक व शारिरिक त्रासापोटी नुकसान भरपाई म्हणून रक्कम रु.20,000/- व दावा खर्च रक्कम रु.5,000/- गैरअर्जदार यांचेकडून अर्जदारास देण्याचा आदेश पारीत करावा अशी विनंती अर्जदार यांनी तक्रारीव्दारे केलेली आहे.
3. गैरअर्जदार क्र.1 व 2 यांना नोटीस प्राप्त झाली, गैरअर्जदार क्र. 2 सब पोस्ट ऑफिस,विक्रमगड ठाणे हे प्रतिनिधी मार्फत तक्रारीमध्ये हजर झाले व त्यांनी लेखी जबाब दाखल केलेला आहे. गैरअर्जदार क्र. 1 सब पोस्ट मास्टर उमरी यांना नोटीस प्राप्त होऊनही प्रकरणामध्ये हजर झालेले नाही. त्यामुळे त्यांचेविरुध्द दिनांक 03.06.2015 रोजी एकतर्फा सुनावणीचा आदेश पारीत करण्यात आला.
गैरअर्जदार क्र. 2 यांचा लेखी जबाब थोडक्यात पुढील प्रमाणेः-
4. अर्जदाराने सब पोस्ट ऑफिस,विक्रमगड ठाणे यांचेविरुध्द आर.डी.पासबुक मधील रक्कम रु.4,000/- न मिळणेबाबत नुकसान भरपाईचा केलेला दावा संबंधीत सब पोस्ट ऑफिस,विक्रमगड पालघर मध्ये तपासला असता तशा प्रकारची कोणतीही तक्रार आमच्या दस्तऐवजामध्ये आर.डी.पासबुक खाते क्र. 034633599 रजि./स्पीड पोस्टचा सुध्दा तपास लागत नाही. त्यामुळे सदर तक्रार आम्ही हाताळू शकत नाही व
5. अर्जदार व गैरअर्जदार यांनी पुराव्याकामी आपले शपथपत्र व कागदपत्रे दाखल केलेली आहेत. अर्जदाराचा युक्तीवाद ऐकला. अर्जदार यांनी दाखल केलेल्या कागदपत्रांचे अवलोकन केले असता खालील गोष्टी स्पष्ट होतात.
6. अर्जदाराने तक्रारीमध्ये परिच्छेद क्रमांक 2 मध्ये दिनांक 26.03.2013 रोजी आर.डी.पासबुक क्र. 034633599 हे ट्रान्सफरसाठी सब पोस्ट ऑफिस,उमरी कडून सब पोस्ट ऑफिस,विक्रमगड ठाणे येथे पाठविलेले आहे असे नमुद केलेले आहे. त्याचे पृष्ट्यर्थ पोस्ट मास्टर उमरी यांना दिनांक 16.03.2013 रोजी सब पोस्ट ऑफिस,विक्रमगड ठाणे यांचेकडे अर्जदाराचे आर.डी.पासबुक ट्रान्सफर केले असलयाबद्दलची पावती दाखल केलेली आहे. यावरुन सब पोस्ट ऑफिस,उमरी येथून सब पोस्ट ऑफिस,विक्रमगड ठाणे येथे आर.डी.पासबुक ट्रान्सफर केलेले असलचे दिसते. अर्जदाराचे म्हणणे की, अर्जदाराला आर.डी.ची रक्कम दोन्ही पोस्ट ऑफिसकडून प्राप्त झालेली नाही त्यासााठी अर्जदाराने गैरअर्जदार क्र. 1 व 2 कडे अर्ज दिलेले आहेत. परंतु गैरअर्जदार यांनी अर्जदाराच्या तक्रारीची दखल घेतलेली नसल्यामुळे अर्जदारास तक्रार करावी लागलेली आहे. गैरअर्जदार क्र. 2 यांनी दिलेल्या लेखी जबाबाचे अवलोकन केले असता गैरअर्जदार क्र. 2 सब पोस्ट ऑफिस,विक्रमगड ठाणे यांचेकडे अर्जदाराचे आर.डी.पासबुक क्र. 034633599 चा तपास लागत नसल्यामुळे गैरअर्जदारास अर्जदाराची तक्रार हाताळता आलेली नाही. गैरअर्जदार क्रमप्राप्त. 2 चे हे म्हणणे ग्राह्य धरु शकत नाही कारण गैरअर्जदार यांनी आपले शपथपत्र दाखल केलेले नाही. गैरअर्जदार क्र. 2 सब पोस्ट ऑफिस उमरी यांना नोटीस प्राप्त होऊनही हजर झालेले नाहीत. यावरुन गैरअर्जदार क्र. 2 यांना अर्जदाराची तक्रार मान्य असल्याचे स्पष्ट होते. दाखल कागदपत्रांवरुन अर्जदाराने गैरअर्जदार क्र. 1, सब पोस्ट ऑफिस,उमरी यांचेकडून आर.डी.पासबुक ज्यात रक्कम रु.4,000/- ते सब पोस्ट ऑफिस,विक्रमगड ठाणे येथे ट्रान्सफर केलेले असल्याचे दिसते. अर्जदारास पैशाची आवश्यकता असतांनाही गैरअर्जदार यांनी अर्जदाराचे तक्रारीची कोणतीही दखल घेतलेली नाही ही बाब सेवेत त्रुटी देणारी आहे. गैरअर्जदार यांनी अर्जदाराच्या आर.डी.खात्यातील रक्कम अर्जदारास मागणी केल्यानंतर देणे क्रमप्राप्त असतांनाही गैरअर्जदाराने तसे केलेले नाही. त्यामुळे मंच खालील आदेश देत आहे.
आ दे श
1. अर्जदार यांची तक्रार अंशतः मंजूर करण्यात येते.
2. गैरअर्जदार क्र. 1 व 2 यांना आदेशाची प्रत मिळाल्यानंतर अर्जदाराचे आर.डी.खाते पासबुक कमांक 034633599 याची 8 दिवसाचे आत तपास करुन अर्जदारास रक्कम रु.4,000/- तक्रार दाखल दिनांक 19.03.2015 द.सा.द.शे. 6 टक्के व्याजासह द्यावेत.
3. गैरअर्जदार क्र. 1 व 2 यांनी अर्जदारास तक्रारीचा खर्च रक्कम रु.1,000/- द्यावेत.
4. दोन्ही पक्षकारास निकालाच्या प्रती मोफत पुरविण्यात याव्यात.
5. वरील आदेशाच्या पुर्ततेचा अहवाल दोन्ही पक्षकारांनी निकालाच्या तारखेपासून 45 दिवसांच्या आत मंचात दाखल करावा. प्रकरण 45 दिवसानंतर आदेशाच्या पुर्ततेसाठी ठेवण्यात यावे.