::: आ दे श :::
आदेश पारित व्दारा – श्री.गे.ह.राठोड, मा.सदस्य
ग्राहक संरक्षण कायदा १९८६ चे, कलम : १२ अन्वये, अर्जदाराने दाखल केलेल्या तक्रारी नुसार ग्राहक वाद संक्षिप्त स्वरुपात खालीलप्रमाणे .
- अर्जदाराच्या म्हणण्यानुसार अर्जदार हे हिंगोली येथील रहिवासी असुन, गैरअर्जदार विज कंपनीचे ग्राहक आहे. अर्जदाराने गैरअर्जदार कंपनी मार्फत घरगुती वापरासाठी विद्युत घेतलेली असुन, अर्जदाराचा ग्राहक क्र. 539360376130 असा आहे. अर्जदाराने गैरअर्जदाराकडुन आलेल्या बिलाचा नियमीत भरणा केलेला आहे. व नियमानुसार विज बिल भरण्यास तयार आहे. अर्जदाराने दि.16.02.2016 पर्यंत नियमीत बिल भरलेले असुन सुध्दा गैरअर्जदारानी मार्च 2016 या एका महिण्याचे युनिट 2655 दाखवुन अर्जदाराला रु.39,282/- चे बिल दिले आहे. व त्यामुळे अर्जदाराला त्रास सहन करावा लागला आहे. अर्जदाराने गैरअर्जदाराच्या कार्यालयात वेळो वेळी योग्य विज बिल मिळण्या बाबत विनंती केली असता त्यांच्या कार्यालयातील अभियंता यांनी दि.21.04.2016 रोजी घराची स्थळ चौकशी केली व अहवाल दिला आहे. सदर अहवाल दिल्या नंतर अर्जदाराने अहवालानुसार विज बिल देण्याबाबत विनंती केली परंतु गैरअर्जराच्या कार्यालयानी रु.21,233/- विज बिल कमी केले व रु.19,890/- भरण्यास सांगीतले व विज बिल भरले नाही तर विज बंद करण्यात येईल अशी धमकी दिली. गैरअर्जदाराच्या कार्यालयीन कर्मचा-यांच्या निष्काळजीपणामुळे अर्जदाराचे नुकसान झाले आहे. त्यामुळे अर्जदाराने वकीला मार्फत दि.22.06.2016 रोजी योग्य विज बिल देण्याबाबत विनंती करणारी व योग्य विज बिल देत नाही तो पर्यत विद्युत पुरवठा खंडीत करु नये अशी नोटीस दिली. अर्जदार हा आजही नियमानुसार विज बिल भरण्यास तयार आहे. तरी सुध्दा गैरअर्जदाराच्या निष्काळजीपणामुळे अर्जदारास मानसीक व शारीरिक त्रास होत आहे, त्यामुळे अर्जदारानी प्रस्तुत तक्रार दाखल करुन अर्जदारास योग्य बिल देणे बाबत आदेश व्हावे तसेच गैरअर्जदाराकडुन अर्जदारास नुकसान भरपाई रु.55,000/- मिळणे बाबत आदेश व्हावे अशी विनंती या मंचास केली आहे. अर्जदाराने तक्रारी सोबत शपथ पत्र दाखल केले आहे व पान क्र.8 ते 15 अशी कागदपत्रे दाखल केलेली आहे.
- गैरअर्जदार क्र.1 व 2 याना या मंचा मार्फत नोटीस काढण्यात आल्या त्यानुसार गैरअर्जदारने वकीला मार्फत त्यांचा लेखी जवाब दाखल केलेला आहे. गैरअर्जदार क्र.1 व 2 यांच्या लेखी जवाबा नुसार अर्जदाराची तक्रार चुक, बनावटी व वस्तुस्थितीचे विरुध्द असल्याने अमान्य असल्याचे म्हटले आहे. अर्जदाराचा तक्रारीमधील काही मजकुर अंशतः खरा असल्याचे व अर्जदाराने फेब्रुवारी 2016 पर्यत विज देयक नियमीत भरले असल्याची मान्य केले आहे. अर्जदाराने वापरलेल्या युनिट बिलाची रक्कम रु.19,900/- मार्च 2016 ते आज पर्यंत जमा केलेली नाही. अर्जदाराने जाणीवपुर्वक दर महा वापरात येणारे युनिटच्या बिलाची रक्कम जमा केली नाही. मार्च 2016 मध्ये अर्जदारास रिडींग प्रमाणे युनिटचे बिल देण्यात आले. सदर बिला बाबत अर्जदाराने केलेल्या तक्रारीची दखल घेवुन बिलाचे समायोजन करुन योग्य बिल रु.19,900/- देण्यात आले. गैरअर्जदाराने स्थळ चौकशी करुन अहवाल बोलावुन 2,655/- युनिटचे जुलै 2014 ते फेब्रुवारी 2016 पर्यंत 20 महिन्यामध्ये युनिटचे समायोजन करुन मे 2016 मध्ये अर्जदाराच्या एकुण बिलामध्ये 19,227/- रुपयाचे समायोजन करुन दोन महिन्याचे बिलाचे रिव्हिजन करुन रु.19,900/- रुपयाचे बिल अर्जदाराल देण्यात आले. परंतु अर्जदाराने दुरुस्त बिलाची रक्कम आज पर्यंत जमा केली नाही. त्यामुळे तक्रारदाराची तक्रार फेटाळने हे न्याय होईल असे लेखी जवाबात म्हटले आहे. गैरअर्जदाराचे कार्यालयीन कर्मचा-याच्या निष्काळजीपणामुळे अर्जदाराचे नुकसान झाले हे अमान्य केले आहे. उलट अर्जदाराने 2,655 युनिट 20 महिन्यामध्ये वापरुन दर महा रक्कम जमा केली नाही त्यामुळे गैरअर्जदार कंपनीची आर्थिक नुकसान झाले असल्या बाबत लेखी जवाबात नमुद केले आहे.
- गैरअर्जदाराच्या म्हणण्यानुसार अर्जदाराने पुरावा निर्माण करण्यासाठी वकीला मार्फत नोटीस पाठविली नोटीस मधील मजकुर चुक व मान्य नसल्याने नोटीसाचे उत्तर दिले नाही. गैरअर्जदाराच्या म्हणण्यानुसार अर्जदारास नियमानुसार योग्य बिल देवुन सुध्दा बिलाची रक्कम जमा केली नाही. गैरअर्जदाराकडुन कोणताही निष्काळजीपणा झाला नाही, त्यामुळे अर्जदारास मानसिक व शारीरिक त्रास होण्याचा प्रश्नच होत नाही तसेच अर्जदाराचे कोणतेही नुकसान झाले नाही त्यामुळे नुकसान भरपाईचा खर्च देण्याचा प्रश्नच उदभवत नाही असे गैरअर्जदाराने आपल्या लेखी जवाबामध्ये म्हटले आहे. गैरअर्जदाराच्या लेखी जवाबा प्रमाणे सत्य परिस्थितीनुसार अर्जदाराने जुलै 2014 ते फेब्रुवारी 2016 वापरलेल्या युनिट प्रमाणे बिलाचा भरणा केलेला नाही. अर्जदाराने जुलै 2014 फेब्रुवारी 2016 पर्यंत सी.पी.एल.ची नक्कल दाखल केली आहे. या कालावधीमध्ये प्रत्येक महिन्यात 30 ते 40 युनिट प्रमाणे विज बिलाचा भरणा केलेला आहे. अर्जदाराने जाणिवपुर्वक जास्तीचे दर महा युनिटचे वापर करुन कमी युनिट वापराचे दर महा बिला प्रमाणे स्वतःच्या फायद्यासाठी बिलाचा भरणा केला आहे. त्यामुळे कंपनीचे नुकसान झाले आहे. अर्जदाराने सत्य घटना व परिस्थिती लपवुन खोटी तक्रार दाखल केली आहे म्हणुन अर्जदाराची तक्रार खर्चासह खारिज करावी अशी विनंती या मंचास केली आहे. प्रस्तुत तक्रारीमध्ये दाखल केलेल्या कागदपञांवरून व उभय पक्षांचे म्हणणे ऐकून निर्णयासाठी उपस्थीत होणारे मुद्दे खालीलप्रमाणे.
-
मुद्दे उत्तर
1. अर्जदार हा गैरअर्जदार क्रमांक 1 व 2 चा
ग्राहक आहे काय ? होय
- अर्जदार हा विद्युत मिटर नुसार योग्य बिल मिळण्यास
पात्र आहे काय ? होय
3 गैरअर्जदार क्रमांक 1 व 2 यांनी अर्जदारास सेवेत
ञुटी दिली आहे काय ? होय
4 आदेश काय ? अंतीम आदेशाप्रमाणे
कारण मिमांसा मुद्दा क्र.1 ते 4
- अर्जदार यांनी तक्रारीसोबत दाखल केलेल्या कागदपत्रावरुन अर्जदारांनी गैरअर्जदार क्र.1 व 2 यांच्याकडुन घरगुती वापराकरीता विद्युत घेतलेली आहे. व महाराष्ट स्टेट इलेक्ट्रीसीटी डिस्ट्रीब्यूशन कंपनी लि., यांच्या विज आकार देयकानुसान त्यांचा ग्राहक क्र.539360376130 असा आहे. व देयक दि.08.03.2016 नुसार अर्जदारांनी गैरअर्जदाराकडे विज बिलाचा भरणा केलेला आहे. त्यामुळे अर्जदार हा गैरअर्जदारांचा ग्राहक आहे हे स्पष्ट दिसुन येते.
- अर्जदारांनी दाखल केलेल्या कागदपत्रावरुन गैरअर्जदारांचे विज आकार देयक दि.08.03.2016 नुसार रु.230/- चा भरणा केलेला आहे. व विज आकार देयक दि.09.05.2016 नुसार अर्जदारास गैरअर्जदाराने दि.31.03.2016 ते 30.04.2016 या कालावधीमध्ये वापरलेले युनिट 152 दाखविले आहे. व मागील वापर केलेल्या विजेचे युनिट खालील प्रमाणे दिलेले आहे.
अ.क्र. | मागिल विजेचा वापर | वापरलेले युनिट |
1 | मे -15 | 36 |
2 | जुन - 15 | 37 |
3 | जुलै -15 | 35 |
4 | आगष्ट - 15 | 37 |
5 | सप्टेंबर - 15 | 36 |
6 | आक्टोंबर- 15 | 36 |
7 | नोव्हेंबर - 15 | 36 |
8 | डिसेंबर - 15 | 36 |
9 | जानेवारी - 16 | 36 |
10 | फेब्रुवारी - 16 | 36 |
11 | मार्च - 16 | 2655 |
- अर्जदाराने तक्रारीमध्ये मार्च 2016 चे स्वतंत्र विज आकार देयक दाखल केलेले नाही परंतु विज आकार देय दि.09.05.2016 मध्ये मार्च 2016 मध्ये वापरलेले विज युनिट 2,655 दाखवलेले आहे. त्या बाबत अर्जदारांनी गैरअर्जदाराकडे दि.03.05.2016, 16.05.2016 व 20.06.2016 रोजी तक्रार केलेली आहे. व योग्य विज देयक देण्यात यावे अशी विनंती केली आहे.परंतु गैरअर्जदारांनी योग्य विद्युत देयक अर्जदारास दिलेले दिसुन येत नाही. गैरअर्जदारांनी दि.21.04.2016 रोजी अर्जदाराच्या घराच्या मिटरची तपासणी करुन Spot inspection report of Consumer premises तयार केलेला आहे. त्यामध्ये सुध्दा Revise the bill as par reading असा शेरा आहे. गैरअर्जदारांनी देयक दि.09.06.2016 नुसार विद्युत बिलाचे नियमा नुसार समायोजन करुन अर्जदारास रु.19,900/- असे बिल दिलेले आहे. सदर विद्युत बिलाचे समायोजन कशाच्या आधारे करण्यात आले या बाबत कोणतेही कागदपत्रे गैरअर्जदारांनी या मंचा दाखल केलेले नाही. त्यामुळे गैरअर्जदारांनी मार्च 2016 च्या विज आकर देयकामध्ये नमुद केलेले अर्जदारांनी वापरलेले विज युनिट 2655 योग्य वाटत नाही. व त्यामुळे सदर विज देयक योग्य नसल्याचे दिसुन येते. अर्जदारांने जुलै 2014 ते फेब्रुवारी 2016 पर्यंत वापरलेला युनिट प्रमाणे अर्जदारांनी भरणा केला नाही असे गैरअर्जदारांनी आपल्या लेखी जबाबामध्ये नमुद केले आहे परंतु गैरअर्जदारांनी माहे जुलै 2014 ते फेब्रुवारी 2016 या कालावधीमध्ये अर्जदारांनी वापरलेल्या घरगुती बिलाबाबत काही आक्षेप घेतलेला दिसुन येत नाही. तसेच गैरअर्जदारांनी अर्जदारांनी वापरलेल्या विज युनिट पेक्षा कमी विज युनिटचे पैसे भरले या बबात अर्जदारास काहीही कळविलेले दिसुन येत नाही. त्यामुळे अर्जदारांनी जास्तीचे विज युनिट वापरुन कमी विज युनिटचे पैसे भरले हे गैरअर्जदारांचे म्हणणे योग्य वाटत नाही. गैरअर्जदारास अर्जदारांनी मार्च 2016 च्या विज बिला संदर्भात केलेल्या तक्रारीची योग्य वेळी दखल न घेता व योग्य बिल अर्जदारांस वेळेत न दिल्यामुळे अर्जदारास गैरअर्जदाराकडुन मानसिक त्रास झाला हे दिसुन येते.
- अर्जदारांनी त्यांना मिळालेल्या विज आकार देयका नुसार फेब्रुवारी 2016 पर्यत विज बिलाचा भरणा केल्याचे दिसुन येते. व अर्जदारांनी फेब्रुवारी 2016 पर्यंत विज देयक नियमीत भरले असल्याने गैरअर्जदारांनी आपल्या लेखी जवाबात मान्य केलेले आहे. अर्जदारांनी माहे मार्च 2016 ते आज पर्यंत विज बिलांचा भरणा केल्याचे दिसुन येत नाही. त्यामुळे अर्जदारांनी ते वापरत असलेले विजेचे बिल मार्च 2016 पासुन आज पर्यंत भरणे आवश्यक आहे. गैरअर्जदारानी अर्जदारास विज बिल मिटर रिडींगनुसार 3 महिण्याचे मिटर रिडींगची सरासरी काढुन दर महा येणारे मिटर रिडींगनुसार विजेचे बिल अर्जदारास दयावे व अर्जदाराने नविन बिला प्रमाणे गैरअर्जदाकडे थकित विज बिलाची रक्कम जमा करावी. वरील बाबीचा सारासार विचार करता मुद्दा क्र.2 व 3 चे उत्तर होकारार्थी देवुन मुद्द क्र.4 नुसार हे मंच खालील प्रमाणे आदेश पारित करित आहे.
अंतिम आदेश
- अर्जदार तक्रार अर्ज क्रमांक 90/2016 गैरअर्जदार क्र.1 व 2 विरुध्द अंशतः
मंजूर करण्यात येत आहे.
2. गैरअर्जदारांनी अर्जदारास दिलेले मार्च 2016 चे विज आकार देयक रद्द
करण्यात येत आहे.
- गैरअर्जदार यांनी अर्जदारांनी वापरलेली विज बिलाची रक्कम मिटरच्या
रिडींग नुसार तिन महिण्याची सरासरी काढुन दर महा येणारे मिटर रिडींग
नुसार विज बिल हे अर्जदारास देण्यात यावे. व अर्जदाराने सदर सुधारीत
बिल त्यांना प्राप्त झाल्यानंतर त्यांनी विज बिलाची रक्कम 30 दिससाच्या
आत गैरअर्जदाराकडे जमा करावी.
- गैरअर्जदार क्रमांक 1 व 2 यांनी अर्जदार यांना ञुटीची सेवा दिल्याबद्दल
रुपये 500/- (पाचशे रुपये) व तक्रारीचा खर्च रुपये 500/- (पाचशे रुपये)
दयावेत.
5. सदर आदेशाच्या प्रती उभय पक्षकारांना मोफत पुरवाव्यात.
श्री.गे.ह.राठोड श्रीमती ए.जी.सातपुते
सदस्य अध्यक्षा
दि.29.06.2017
स्टेनो/गंगाखेडे