नि.30 मे.जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्याय मंच,रत्नागिरी यांचेसमोर तक्रार क्रमांक : 24/2010 तक्रार दाखल झाल्याचा दि.13/05/2010 तक्रार निकाली झाल्याचा दि.06/08/2010 श्री.अनिल गोडसे, अध्यक्ष श्रीमती स्मिता देसाई, सदस्या श्री.जयंत पुरुषोत्तम बिवलकर रा.नरहर वसाहत, शिवाजीनगर, रत्नागिरी 415 639. ... तक्रारदार विरुध्द 1. उपडाकपाल, शिवाजीनगर, उपडाकघर, रत्नागिरी 415 639. 2. अधीक्षक डाकघर विभागीय कार्यालय, रत्नागिरी 415 612. 3. पोस्ट मास्टर जनरल, गोवा रिजन, गोवा 403 001. ... सामनेवाला तक्रारदार : व्यक्तिशः सामनेवालेतर्फे : विधिज्ञ श्री.ए.जी.अभ्यंकर -: नि का ल प त्र :- द्वारा : मा.सदस्या, श्रीमती स्मिता देसाई 1. सामनेवाला यांनी तक्रारदार यांना दिलेल्या सदोष सेवेबाबत तक्रारदार यांनी प्रस्तुत तक्रार दाखल केलेली आहे. 2. तक्रारदार यांच्या तक्रारीप्रमाणे त्यांनी सामनेवाला यांचेकडून राष्ट्रीय बचत प्रमाणपत्रे खरेदी केली होती. सदर प्रमाणपत्रांची मुदत संपल्यानंतर तक्रारदार यांनी सामनेवाला यांच्याकडे प्रमाणपत्रे सादर करुन प्रमाणपत्राची देय रक्कम चेकने मागणी केलेल्या दिवशीच मिळावी अशी लेखी मागणी केली परंतु सामनेवाला यांनी चेक मागणी केल्या दिवशीच देण्यास असमर्थता प्रकट केली. तक्रारदार यांना प्रमाणपत्राची देय रक्कम मागणी केल्यानंतर मागणी केलेल्या दिनांकास सामनेवाला यांनी दिलेली नाही म्हणून तक्रारदार यांनी सामनेवाला यांचेकडे याबाबत लेखी मागणी केली परंतु तक्रारदार यांची लेखी मागणी सामनेवाला यांनी विचारात घेतली नाही. तसेच तक्रारदार यांनी याबाबत वेळोवेळी सामनेवाला यांचेशी पत्रव्यवहार करुनही सामनेवाला यांनी तक्रारदार यांच्या तक्रारीचे निवारण केलेले नाही म्हणून प्रस्तुत तक्रार तक्रारदार यांनी सामनेवाला यांच्या सदोष सेवेबाबत दाखल केलेली आहे. तक्रारदार यांनी आपल्या तक्रारीच्या मागणीत तक्रारदार यांनी प्रमाणपत्राची रक्कम नियत तारखेनंतर मागणी करुनही सामनेवाला क्र.1 यांनी मागणी करताच दिली नाही म्हणून झालेल्या प्रवासाच्या खर्चाबाबत सामनेवाला क्र.1 यांचेकडून रक्कम रु.50/-, प्रमाणपत्राची रक्कम मागणी करतान न मिळाल्यामुळे झालेल्या व्याजाची नुकसानभरपाई म्हणून रक्कम रु.45/- व रु.50/-, मानसिक त्रासापोटी रक्कम रु.500/- तसेच तक्रारीचा खर्च रक्कम रु.500/- सामनेवाला यांचेकडून तक्रारदार यांना मिळावा तसेच भविष्यात देय होणा-या बचत / ठेव प्रमाणपत्रांची रक्कम नियत दिनांकास वा त्यानंतर मागणी करताच देण्याचा सामनेवाला क्र.1 यास आदेश करण्यात यावा अशी मंचासमोर विनंती केलेली आहे. तक्रारदार यांनी आपल्या नि.1 च्या तक्रार अर्जाच्या पृष्ठयर्थ नि.2 वर शपथपत्र, नि.3 च्या यादीने नि.3/1 ते नि.3/18 वर कागदपत्रे दाखल केलेली आहेत. 3. सामनेवाला यांनी नि.10 वर आपले म्हणणे दाखल केलेले आहे. सामनेवाला यांनी तक्रारदार यांना कार्यालयीन प्रक्रियेस अनुसरुनच चेकने रक्कम अदा केलेली आहे. त्यामुळे तक्रारदार यांच्या तक्रार अर्जास कोणतेही कारण नाही असे सामनेवाला यांनी आपल्या म्हणण्यामध्ये नमूद केलेले आहे. शेवटी तक्रारदार यांचा तक्रार अर्ज खर्चासह नामंजूर करण्यात यावा अशी मंचासमोर विनंती केलेली आहे. सामनेवाला यांनी आपल्या म्हणण्याच्या पृष्ठयर्थ नि.11 वर सामनेवाला क्र.2 यांचे शपथपत्र, नि.12 च्या अर्जान्वये नि.12/1 वर कागदपत्रे, नि.15 अन्वये सामनेवाला क्र.3 तर्फे सामनेवाला क्र.1 व 3 साठी सामनेवाला क्र.2 यांना दिलेले अधिकारपत्र, नि.16 ला सामनेवाला क्र.1 व 3 तर्फे सामनेवाला क्र.2 यांनी दिलेले म्हणणे व प्रतिज्ञापत्र हेच याकामी सामनेवाला क्र.1 व 3 तर्फे वाचण्यात यावे अशी पुरशिस, नि.20 अन्वये सामनेवाला क्र.1 ते 3 तर्फे आणखी लेखी पुरावा देणेचा नाही याबाबतचा अर्ज इत्यादी कागदपत्रे दाखल केलेली आहेत. 4. तक्रारदार यांनी नि.18 वर आपले प्रतिउत्तर दाखल केलेले आहे. सामनेवाला यांनी आपल्या म्हणण्यामध्ये नमूद केलेले आयकर कायद्याचे कलम तसेच रक्कम अदा करणेबाबतची कार्यालयीन प्रक्रिया प्रस्तुत तक्रारीचा विषय नाही. तसेच सहा वर्षीय बचत प्रमाणपत्रांबाबत सामनेवाला यांनी सादर केलेली कलम 15(बी) व कलम 16 प्रस्तुत तक्रार विषयासंबंधात गैरलागू आहेत असे नमूद केले आहे. तक्रारदार यांना सामनेवाला यांनी मुदत संपल्यानंतर मागणी करुनही बचत प्रमाणपत्रांची रक्कम दिली नाही आणि त्याबाबतची मागणी विचारात घेतली नाही म्हणून प्रस्तुत तक्रार दाखल करावी लागली आहे असे तक्रारदार यांनी प्रतिउत्तरात नमूद केले आहे. तक्रारदार यांनी प्रतिउत्तराच्या पृष्ठयर्थ नि.21 वर शपथपत्र, नि.22 च्या अर्जान्वये नि.23 च्या यादीअन्वये नि.23/1 ते नि.23/4 वर कागदपत्रे दाखल केलेली आहेत. तक्रारदार यांनी नि.25 वर व सामनेवाला यांनी नि.28 वर लेखी युक्तिवाद दाखल केलेला आहे. 5. तक्रारदार यांचा तक्रार अर्ज, शपथपत्र, तक्रारदार यांनी दाखल केलेली कागदपत्रे, सामनेवाला यांनी दिलेले म्हणणे, शपथपत्र, सामनेवाला यांनी दाखल केलेली कागदपत्रे, प्रतिउत्तर, दोन्ही बाजूंनी दाखल लेखी युक्तिवाद व ऐकण्यात आलेला तोंडी युक्तिवाद यावरुन खालील मुद्दे मंचाच्या निष्कर्षासाठी उपस्थित होतात. अ.क्र. | मुद्दे | उत्तरे | 1. | तक्रारदार यांना सामनेवाला यांनी सदोष सेवा दिली हे तक्रारदार यांनी सिध्द केले आहे काय ? | होय. | 2. | तक्रारदार मागणीप्रमाणे अनुतोष मिळण्यास पात्र आहेत काय ? | अंशतः मंजूर. | 3. | काय आदेश ? | अंतिम आदेशाप्रमाणे. |
विवेचन 6. मुद्दा क्र.1 - तक्रारदार यांनी आपल्या तक्रार अर्जामध्ये आपल्या प्रमाणपत्रांची रक्कम नियत तारखेनंतर मागणी केलेली असूनही त्याचदिवशी दिली नाही त्यामुळे तक्रारदार यांचे व्याजाचे नुकसान झाले व मानसिक त्रास झाला. सामनेवाला यांच्या या सदोष सेवेबाबत तक्रारदार यांनी या मंचामध्ये दाद मागितली आहे. सामनेवाला यांनी आपल्या युक्तिवादामध्ये तसेच म्हणण्यामध्ये तक्रारदार यांच्या प्रमाणपत्रांची मुदत दि.08/11/2008 रोजी संपली होती. सदरचे प्रमाणपत्राची रक्कम मिळण्यासाठी तक्रारदार यांनी सामनेवाला क्र.1 यांच्याकडे दि.10/11/2008 रोजी सादर केली. सामनेवाला क्र.1 यांनी सदरची प्रमाणपत्रानुसार मिळणारी रक्कम ही रु.20,000/- पेक्षा जास्त असल्याने व रु.20,000/- पेक्षा जास्त असणारी रक्कम फक्त चेकने अदा करण्याची तरतूद असल्याने तक्रारदारांचा अर्ज प्रधान कार्यालयाकडे म्हणजे सामनेवाला क्र.2 यांचेकडे पाठविला व प्रधान कार्यालयाने धनादेश काढल्यानंतर तात्काळ दि.12/11/2008 रोजी सदरचा धनादेश तक्रारदार यांना अदा करण्यात आला. सामनेवाला यांनी त्यासाठी आयकर कायदा कलम 269 (टी) नुसार व 6 वर्षीय राष्ट्रीय बचत प्रमाणपत्र सर्टिफिकेटबाबत असलेल्या नियमावलीतील कलम 16 चा आधार घेतला आहे. तक्रारदार यांनी दि.08/11/2008 रोजी प्रमाणपत्रे सादर केल्यानंतर तक्रारदार यांना दोनच दिवसांत रकमेचा धनादेश प्राप्त झाला आहे. त्यामुळे सामनेवाला यांनी तक्रारदार यांना सदोष सेवा दिली असे म्हणता येणार नाही असे सामनेवाला यांनी आपल्या युक्तिवादामध्ये नमूद केले आहे. सामनेवाला यांनी दाखल केलेल्या वरील नियमावलीतील कलम 15 मध्ये प्रमाणपत्राच्या मुदतीनंतर देण्यात येणा-या व्याजाबाबतही तरतूद करण्यात आलेली आहे. त्यामध्ये कलम 15 (ब) मध्ये एक महिन्यापेक्षा कमी कालावधीचे व्याज दूर्लक्षीत करण्यात यावे असे नमूद केले आहे. तक्रारदार यांची मागणी पाहता व तक्रारदार यांनी सामनेवाला यांच्याकडे पाठपुरावा करुनही तक्रारदार यांच्या शंकेचे सामनेवाला यांनी कोणतेही निराकरण मुदतीत केले नाही तसेच तक्रारदार यांच्या गुंतवणूकीची रक्कम व त्यावर होणा-या दोन दिवसांच्या व्याजाची रक्कम जरी कमी असली तरी तक्रारदार यांना त्याच दिवशी धनादेश मिळण्यात नेमकी काय अडचण आली ? याबाबत कोणतेही स्पष्टीकरण सामनेवाला यांनी तक्रारदार यांनाही केले नाही व मंचासमोरही दाखल केले नाही. रु.20,000/- अगर त्यावरील रक्कम धनादेशाने देणेबाबत नियमावली जरी असली तरी असे धनादेश ग्राहकास विलंबाने मिळाले तर ग्राहकाचे निश्चितच नुकसान होणार आहे. सामनेवाला यांनी धनादेश किती दिवसांत दिले पाहिजेत व त्याबाबत काय तरतूद आहे याबाबतचा कोणताही पुरावा मंचासमोर सादर केला नाही अथवा आपल्या म्हणण्यामध्येही नमूद केला नाही. सदरची बाब ही सामनेवाला यांच्या सेवेतील त्रुटी दर्शविते असे या मंचाचे मत झाले आहे. 7. मुद्दा क्र.2 - तक्रारदार यांनी आपल्या विनंती कलम क मध्ये सामनेवाला यांच्याकडे वारंवार हेलपाटे मारावे लागल्याने प्रवास खर्च तसेच विनंती कलम ख मध्ये व्याजाची नुकसानभरपाई, मानसिक त्रासापोटी नुकसानभरपाई तसेच तक्रार अर्जाचा खर्च तसेच विनंती कलम ड मध्ये भविष्यातील बचत प्रमाणपत्राबाबत आदेश होण्याची मागणी केली आहे. तक्रारदार व सामनेवाला यांचा युक्तिवाद व सामनेवाला यांनी सादर केलेली व्याजाबाबतची तरतूद विचारात घेता तक्रारदार यांची व्याजाबाबतची मागणी अमान्य करण्यात येत आहे. तक्रारदाराच्या मागणीच्या अनुषंगाने तक्रार अर्ज दाखल करेपर्यंत व दाखल केल्यानंतरही सामनेवाला यांनी तक्रारदार यांच्या तक्रारीचे निराकरण केले नाही व तक्रारदार तक्रारदार यांना डाक अदालत तसेच सदरच्या मंचामध्ये धाव घ्यावी लागली ही बाब निश्चितच तक्रारदार यांना शारिरिक व मानसिक त्रास देणारी आहे. त्यामुळे तक्रारदार यांना शारिरिक, मानसिक त्रासापोटी नुकसानभरपाई व तक्रार अर्जाच्या खर्चापोटी रक्कम रु.500/- करणे योग्य होईल असे मंचाचे मत झाले आहे. तक्रारदार यांनी कलम ड मध्ये भविष्यात देय होणा-या बचत ठेव प्रमाणपत्राबाबत आदेश करण्याची मागणी केली आहे. तथापी सदरची मागणी भविष्यातील बचत प्रमाणपत्राबाबत असल्याने त्याबाबत कोणताही आदेश करणे संयुक्तिक होणार नाही असे मंचाचे मत आहे. वरील सर्व विवेचनावरुन सदरचा मंच खालीलप्रमाणे आदेश पारीत करीत आहे. आदेश 1. तक्रारदार यांचा तक्रार अर्ज अंशतः मंजूर करण्यात येत आहे. 2. तक्रारदार यांना शारिरिक, मानसिक त्रासापोटी नुकसानभरपाई व तक्रार अर्जाच्या खर्चापोटी रक्कम रु.500/- (रु.पाचशे मात्र) अदा करावेत असा सामनेवाला यांना आदेश करण्यात येतो. 3. वर नमूद आदेशाची पूर्तता सामनेवाला यांनी दि.06/10/2010 पर्यंत करण्याची आहे. 4. सामनेवाला यांनी विहीत मुदतीत आदेशाची पूर्तता न केल्यास तक्रारदार ग्राहक संरक्षण कायद्यातील तरतूदीनुसार दाद मागू शकतील. रत्नागिरी दिनांक : 06/08/2010 (अनिल गोडसे) अध्यक्ष, ग्राहक तक्रार निवारण न्याय मंच, रत्नागिरी जिल्हा. (स्मिता देसाई) सदस्या, ग्राहक तक्रार निवारण न्याय मंच, रत्नागिरी जिल्हा. प्रत : तक्रारदार यांना हातपोच/रजि.पोस्टाने प्रत : सामनेवाले यांना हातपोच/रजि.पोस्टाने
| [HONABLE MRS. Smita Desai] MEMBER[HONABLE MR. Anil Y. Godse] PRESIDENT | |