निकाल
पारीत दिनांकः- 30/07/2012
(द्वारा- श्रीमती अंजली देशमुख, अध्यक्ष)
तक्रारदाराची तक्रार थोडक्यात खालीलप्रमाणे आहे.
1] तक्रारदार या ज्येष्ठ नागरिक असून त्यांनी त्यांच्या पतीसह “मंथली इन्कम स्कीम” घेतलेली होती व त्याचा अकाऊंट नं. 85727 असा होता. तक्रारदारांनी दि. 1/1/2004 रोजी बेंगलोर सदरची योजना रक्कम रु. 3,00,000/- जमा करुन सुरु केली. सदरच्या योजनेनुसार, रक्कम रु. 3,00,000/- चे डिपॉझिट हे 6 वर्षांनंतर काढता येणार होते. सदरचे डिपॉझिट हे दि. 31/12/2009 रोजी मॅच्युअर होणार होते. तक्रारदारांच्या म्हणण्यानुसार या योजनेनुसार त्यांना द.सा.द.शे. 8% व्याजदराची रक्कम रु. 2000/- दरमहा मिळणार होती व मॅच्युरीटीनंतर बोनससह रक्कम रु. 3,30,000/- मिळणार होती. तक्रारदार जून 2009 मध्ये पुण्यास शिफ्ट झाले म्हणून त्यांनी दि. 25/5/2009 रोजीच्या पत्राने जाबदेणारांना बदललेला पत्ता कळविला व त्यांचे खाते बेंगलोर येथून पुण्यास वर्ग करण्याची विनंती केली. त्यानंतर तक्रारदार काही काळाकरीता भारताबाहेर गेले व जाने. 2010 मध्ये पुन्हा भारतामध्ये आले. परत आल्यानंतर तक्रारदारांनी जाबदेणारांकडे विचारणा केली असता, त्यांचे खाते बेंगलोर येथून पुण्यास वर्ग झाले नसल्याचे त्यांना समजले. जाबदेणार क्र. 1 यांनी त्यांना जाबदेणार क्र. 2 यांच्याकडून कोणतीही सुचना मिळाली नसल्याचे सांगितले. म्हणून तक्रारदारांनी जाबदेणार क्र. 2 यांच्याकडे चौकशी केली, त्यावेळी त्यांनी दि. 25/5/2009 रोजीच जाबदेणार क्र. 1 यांना सुचना दिल्याचे संगितले. तक्रारदार या 69 वर्षांच्या असून जाबदेणारांच्या वर्तणुकीमुळे त्यांना सारखे पोस्टामध्ये जावे लागते. दि. 16/5/2010 रोजी तक्रारदारांना जाबदेणार क्र. 1 यांचे पत्र मिळाले, त्यामध्ये त्यांना जाबदेणार क्र. 2 यांनी खाते वर्ग केल्याचे व रक्कम घेऊन जाण्याविषयी कळविले. तक्रारदारांच्या म्हणण्यानुसार, त्या डिपॉझिटची रक्कम रु. 3,00,000/- + बोनसची रक्कम रु. 30,000/- + अकरा महिन्याचे व्याज (जुलै 2009 ते मे 2010 द.सा.द.शे. 8% व्याजदराने) मिळण्यास हक्कदार आहेत, परंतु त्या जेव्हा जाबदेणार क्र. 1 यांच्याकडे रक्कम घेण्याकरीता गेल्या तेव्हा जाबदेणारांनी दि. 31/12/2009 पर्यंत रकमेवर द.सा.द.शे. 8% व्याजदर दिला व त्यानंतरच्या कालावधीकरीता द.सा.द.शे. 3% व्याजदर दिला. त्यामुळे तक्रारदारांना रु. 2000 – 750 = 1250 x 5 म्हणजे एकुण रक्कम रु. 6250/- कमी मिळाली. तक्रारदारांच्या म्हणण्यानुसार, जाबदेणारांनी तक्रारदारांना मुदतीमध्ये रक्कम दिली नाही, म्हणून जाबदेणार ही रक्कम देणे लागतात, म्हणून सदरील तक्रार. तक्रारदार जाबदेणारांकडून रक्कम रु. 6,250/- द.सा.द.शे. 18% व्याजदराने, रक्कम रु. 25,000/- मानसिक व शारीरिक त्रासापोटी नुकसान भरपाई, तक्रारीचा खर्च व इतर दिलासा मागतात.
2] तक्रारदारांनी त्यांच्या तक्रारीच्या पुष्ठ्यर्थ शपथपत्र व कागदपत्रे दाखल केली.
3] जाबदेणारांना नोटीस पाठविली असता, ते मंचामध्ये उपस्थित झाले व त्यांच्या लेखी जबाबाद्वारे तक्रारदाराच्या मागणीस विरोध दर्शविला. त्यांच्या म्हणण्यानुसार, तक्रारदारांनी त्यांना दि. 25/5/2009 रोजी पत्ता बदलाविषयीचे पत्र पाठविले नव्हते, तर बेंगलोर येथून वानवडी, पुणे येथे खाते वर्ग करण्याचा अर्ज पाठविला होता. तक्रारदारांनी दि. 4/3/2010 रोजी एम.आय.एस. अकाऊंट नं. 85727 वर्ग करण्याकरीता वानवडी पोस्ट ऑफिसमध्ये पासबुक व अर्ज सादर केला व सब पोस्टमास्तर, वानवडी पोस्ट ऑफिस यांनी बेंगलोर, जी.पी.ओ. ला रजि. पत्र क्र. 9745, दि. 5/3/2010 रोजी सदरचे पासबुक व अर्ज पाठविला. जाबदेणारांच्या म्हणण्यानुसार, तक्रारदारांनी वेळेत पासबुक व खाते वर्ग करण्याचा अर्ज सादर केला नाही, ही त्यांची चुकी आहे. तक्रारदार दि. 26/5/2010 रोजी रक्कम रु. 3,47,850/- मिळण्यास हक्कदार ठरतात. जाबदेणारांनी एम.आय.एस. अकाऊंट नं. 85727 च्या मॅच्युरीटीची रक्कम तक्रारदारास ‘पोस्ट ऑफिस सेव्हिंग बँक जनरल रुल्स, 1981’ आणि ‘पोस्ट ऑफिस सेव्हिंग अकाऊंट रुल्स, 1981’ च्या अटी व शर्तींनुसार दिलेली आहे, यामध्ये त्यांची कोणतीही सेवेतील त्रुटी नाही. सदरच्या अटी व शर्ती तक्रारदारासही बंधनकारक आहेत. वरील सर्व कारणांवरुन तक्रारदारांची तक्रार नामंजूर करावी अशी मागणी जाबदेणार करतात.
4] जाबदेणारांनी त्यांच्या लेखी जबाबाच्यापुष्ठ्यर्थ शपथपत्र व कागदपत्रे दाखल केली.
5] दोन्ही पक्षकारांनी दाखल केलेल्या कागदपत्रांची मंचाने पाहणी केली. तक्रारदारांनी दि. 1/1/2004 रोजी जाबदेणार क्र. 2 यांच्याकडे एम.आय.एस. अकाऊंट नं. 85727 मध्ये रक्कम रु. 3,00,000/- सहा वर्षांकरीता गुंतविले होते. तक्रारदारांच्या म्हणण्यानुसार, त्यांनी दि. 25/5/2009 रोजी जाबदेणार क्र. 2 यांना पत्ता बदलल्याचे पत्र पाठविले, परंतु तक्रारदारांनी त्या पत्राची प्रत मंचामध्ये दाखल केली नाही. जाबदेणारांच्या म्हणण्यानुसार, तक्रारदारांनी दि. 25/5/2009 रोजी पत्त्यामध्ये बदल झाल्याबद्दल न कळविता अकाऊंट ट्रान्सफर करण्याचा अर्ज केला होता, जाबदेणारांनी या अर्जाची प्रतही मंचामध्ये दाखल केलेली आहे. तक्रारदारांनी दि. 4/3/2010 रोजी एम.आय.एस. अकाऊंट नं. 85727 वर्ग करण्याकरीता वानवडी पोस्ट ऑफिसमध्ये पासबुक व अर्ज सादर केल्याचे व त्यांनी दि. 5/3/2010 रोजी बेंगलोर, जी.पी.ओ. ला रजि. पत्र क्र. 9745, सदरचे पासबुक व अर्ज पाठविला, हे जाबदेणारांनी दाखल केलेल्या कागदपत्रांवरुन दिसून येते. याचाच अर्थ तक्रारदारांनी जाबदेणाराकडे विलंबाने पासबुक सादर केले, हे स्पष्ट होते. जाबदेणारांनी त्यांच्या लेखी जबाबासोबत ‘पोस्ट ऑफिस सेव्हिंग बँक जनरल रुल्स, 1981’ आणि ‘पोस्ट ऑफिस सेव्हिंग अकाऊंट रुल्स, 1981’ दाखल केलेले आहेत. जाबदेणारांनी तक्रारदारांना जी रक्कम दिलेली आहे ती वर नमुद केलेल्या अटी व शर्तींनुसार दिलेली आहे व ती योग्य आहे, असे मंचाचे मत आहे. त्यामुळे मंच प्रस्तुतची तक्रार नामंजूर करते.
6] वरील सर्व विवेचनावरुन व कागदपत्रांवरुन मंच खालील आदेश पारीत करते.
** आदेश **
1. तक्रारदारांची तक्रार नामंजूर करण्यात येते.
2. तक्रारीच्या खर्चाबद्दल कोणतेही आदेश नाहीत.
3. निकालाच्या प्रती दोन्ही पक्षकारांना नि:शुल्क
पाठविण्यात याव्यात.