(घोषित दि. 03.03.2015 व्दारा श्रीमती. रेखा कापडिया, सदस्या)
अर्जदार हे गैरअर्जदार यांचे ग्राहक असून त्यांना गैरअर्जदार यांनी वाढीव वीज बिल आकारणी केली. या वीज बिलाबाबत केलेल्या तक्रारीची दखल गैरअर्जदार यांनी न घेतल्यामुळे अर्जदाराने ग्राहक संरक्षण कायदा अंतर्गत मंचात तक्रार दाखल केली आहे.
अर्जदाराने दाखल केलेल्या तक्रारीनुसार ते बाभुळगाव ता.भोकरदन जि.जालना येथील रहिवासी आहेत. त्यांच्या म्हणण्यानुसार ते बी.पी.एल वर्गवारीत मोडतात. तसेच त्यांचा सरासरी वीज वापर हा 30-40 युनिट प्रतिमाह असा आहे. गैरअर्जदार यांनी फेब्रूवारी 2010 मध्ये त्यांना घरगुती वापरासाठी वीज जोडणी दिली. ऑगस्ट 2014 मध्ये गैरअर्जदार यांनी त्यांना 3,22,910/- रुपयाची बिल आकारणी केली, जी पूर्णपणे चुकीची असल्याचे अर्जदाराचे म्हणणे आहे. सदरील वीज बिल रद्द करण्याची व गैरअर्जदार यांनी या चुकीच्या वीज बिला पोटी वीज पुरवठा खंडित केल्यामुळे झालेल्या मानसिक त्रासाबद्दल नुकसान भरपाई देण्याची मागणी केली आहे. गैरअर्जदार यांनी खंडित केलेला वीज पुरवठा पुनर्रजोडणी करुन देण्याबाबत आदेश देण्याची विनंती मंचास केली आहे.
अर्जदाराने तक्रारी सोबत वादग्रस्त वीज बिल, गैरअर्जदार यांना केलेल्या तक्रारीच्या प्रति जोडल्या आहेत.
अर्जदाराने वीज पुरवठा पुनर्रजोडणी करुन देण्याबाबत केलेल्या अर्जावर दिनांक 19.11.2014 रोजी मंचाने सुनावणी घेतली. अर्जदाराने तक्रारी सोबत दाखल केलेल्या कागदपत्रांवरुन जानेवारी 2010 ते ऑगस्ट 2014 पर्यंतच्या कालावधीत अर्जदाराचा वीज वापर 20 युनिट प्रतिमाह असल्याचे दिसून आले. अर्जदाराने देखील या वीज बिलाचा भरणा नियमितपणे केलेला दिसून येतो. ऑगस्ट 2014 मध्ये गैरअर्जदार यांनी अर्जदारास 23004 युनिट वीज वापराचे दिलेले बिल प्रथमदर्शनी योग्य नसल्याचे दिसून आल्यामुळे मंचाने गैरअर्जदार यांना अर्जदाराचा खंडित केलेला वीज पुरवठा पुनर्रजोडणी करुन देण्याचा अंतरिम आदेश पारित केला.
गैरअर्जदार यांनी मंचात दाखल केलेल्या जवाबानुसार अर्जदारास देण्यात आलेले 23004 युनिटचे वीज बिल योग्य आहे. अर्जदाराच्या मीटरची तपासणी करण्यात आली असून त्याचा अहवाल अर्जदारास देण्यात आलेला आहे. अर्जदारास देण्यात आलेल्या सेवेत कोणतीही त्रुटी नसल्याचे सांगून अर्जदाराची तक्रार खारीज करण्याची विनंती मंचास केली आहे.
अर्जदार व गैरअर्जदार यांनी मंचात दाखल केलेल्या कागदपत्रांवरुन व सुनावणीवरुन असे दिसून येते की, अर्जदाराने फेब्रूवारी 2010 मध्ये घरगुती वापरासाठी वीज पुरवठा घेतला आहे. त्याचा ग्राहक क्रमांक 514020477257 असा असून त्यांच्याकडे बसविण्यात आलेला मीटरचा क्रमांक 61/00582950 असा आहे. मंचात दाखल करण्यात आलेल्या सी.पी.एल चे निरीक्षण केल्यावर फेब्रूवारी 2010 ते जुलै 2014 या कालावधीत मीटर व्यवस्थितपणे वीज वापराची नोंद घेत असल्याचे दिसून येते. अर्जदाराचा नवीन वीज पुरवठा घेतल्यानंतर ते फेब्रूवारी 2010 ते जुलै 2014 या 41 महिन्याच्या कालावधीत एकूण वीज वापर 1602 युनिट असा असल्याचे दिसून येते. ज्याची सरासरी 1602 - 41 = 40 युनिट प्रतिमाह होते. ऑगस्ट 2014 मध्ये गैरअर्जदार यांनी अर्जदारास मीटर स्टेटस् नॉर्मल दर्शवून मागील रिडींग 1574 व चालू रिडींग 1602 दर्शवून 28 युनिट वीज वापराचे बिल दिले आहे. यावरुन मीटर बाबत किंवा अर्जदाराच्या वीज वापराबाबत दोनही पक्षात वाद नव्हता हे दिसून येते. ऑगस्ट 2014 मध्ये गैरअर्जदार यांनी अर्जदारास मागील रिडींग 1602 व चालू रिडींग 24606 दर्शवित 23004 युनिट वीज वापराचे 3,10,582 . 22 रुपयाची वीज बिल आकारणी केली जी चुकीची असल्याची अर्जदाराची तक्रार आहे. अर्जदाराने दिनांक 24.09.2014 रोजी या बिलाबाबत गैरअर्जदार यांच्याकडे तक्रार दाखल केली. दिनांक 21.09.2014 रोजी अर्जदाराच्या मीटरची चाचणी करण्यात आली. या चाचणी अहवालात मीटरचे सील योग्य असल्याचे नमूद केले आहे. तसेच अर्जदाराकडे तीन बल्ब व एक पंखा एवढाच वीजभार असल्याचे नमूद केले आहे. गैरअर्जदार यांच्या या निरीक्षणावरुन व अर्जदाराकडे असलेला वीज भार यावरुन एका महिन्याचा वीज वापर 23004 युनिट एवढा येणे हे तांत्रिक द्ष्टया पूर्णपणे चुकीचे आहे हे मंचाचे स्पष्ट मत आहे. ऑगस्ट 2014 मध्ये देण्यात आलेल्या वाढीव वीज वापरानंतर सप्टेंबर 2014 मध्ये गैरअर्जदार यांनी अर्जदारास 32 युनिट वीज वापराचे बिल आकारले असल्याचे व ते योग्य असल्याचे म्हटले आहे. दिनांक 09.10.2014 रोजी अर्जदाराचे मीटर तपासणी करण्यात आले असून ते 24.31 टक्के जास्त गतीने वीज वापराची नोंद घेत असल्याचे म्हटले आहे. या अहवालावरुन अर्जदाराच्या मीटरची फक्त 10 A करंटवर चाचणी घेण्यात आल्याचे दिसून येते. गैरअर्जदार यांनी वीज मीटरची पूर्णपणे तांत्रिकद्ष्टया व नियमाप्रमाणे चाचणी केली नसल्याचे यावरुन स्पष्ट होते. अर्जदाराचा वीज भार लक्षात घेता तो 10 A पेक्षा कमी असल्याचे दिसून येते.
वरील सर्व निरीक्षणावरुन गैरअर्जदार यांनी अर्जदारास ऑगस्ट 2014 मध्ये आकारलेले 23004 युनिट वीज वापराचे बिल चुकीचे असल्याचे स्पष्ट होते. अर्जदारास सरासरीवर अधारीत वीज बिल आकारणी करणे योग्य ठरेल.
आदेश
- अर्जदाराची तक्रार मान्य करण्यात येत आहे.
- गैरअर्जदार यांनी अर्जदारास ऑगस्ट 2014 या महिन्यात दिलेले 23004 युनिट वीज वापराचे बिल रद्द करण्यात येत आहे.
- गैरअर्जदार यांनी अर्जदारास ऑगस्ट 2014 या महिन्यासाठी सरासरी वापरानुसार 40 युनिट वीज वापराचे बिल आकारुन 30 दिवसात सुधारीत वीज बिल द्यावे.
- वरील प्रमाणे देण्यात येणा-या सुधारीत वीज बिलात कोणतेही व्याज व दंड आकारु नये.
- गैरअर्जदार यांनी अर्जदारास सेवेतील त्रुटीपोटी व मानसिक त्रासापोटी रुपये 1,000/- (रुपये एक हजार फक्त) व खर्चा बद्दल रुपये 1,500/- (अक्षरी रुपये एक हजार पाचशे फक्त) 30 दिवसात द्यावे.