(घोषित दि. 18.03.2015 व्दारा श्रीमती. रेखा कापडिया, सदस्या)
अर्जदार हे गैरअर्जदार यांचे ग्राहक असून गैरअर्जदार यांच्या तर्फे लावण्यात आलेले वीज मीटर जलदगतीने फिरत असल्याची तक्रार तसेच वसूल केलेली रक्कम परत करण्याची मागणी गैरअर्जदार यांनी मान्य न केल्यामुळे अर्जदाराने ग्राहक संरक्षण कायदा अंतर्गत मंचात दाखल केली आहे.
अर्जदाराने दाखल केलेल्या तक्रारीनुसार त्यांनी घरगुती वापरासाठी गैरअर्जदार यांच्याकडून वीज पुरवठा घेतला होता. गैरअर्जदार यांनी त्यांना कमर्शियल वीज वापर म्हणून वीज बिल आकारणी केली. अर्जदाराने या चुकीच्या वर्गवारी बाबत गैरअर्जदार यांच्या अंतर्गत तक्रार निवारण कक्षाकडे तक्रार दाखल केली. सदरील तक्रार निवारण कक्षाने एप्रिल 2011 ते मे 2012 या कालावधीत अर्जदारास घरगुती वीज वापराच्या दराप्रमाणे वीज आकारणी करण्याचा आदेश संबंधित विभागास दिला असल्याचे अर्जदाराचे म्हणणे आहे. अर्जदाराने घरगुती व व्यावसायिक वर्गवारीच्या रकमेतला फरक रुपये 5,600/- वगळून गैरअर्जदार यांच्याकडे भरणा केला. गैरअर्जदार यांनी ही फरकाची रक्कम वीज बिलातून वळती न करता अर्जदारास वीज बिल आकारणी करणे सुरु ठेवले. अर्जदाराने त्यांचे वीज मीटर वीज वापराची योग्य नोंद घेत नसल्याचे गैरअर्जदार यांना कळविले. पण गैरअर्जदार यांनी तक्रारीची कोणतीही दाखल न घेता मीटर टेस्ट न करता त्यांचा वीज पुरवठा खंडित करुन वीज मीटर काढून नेले. गैरअर्जदार यांच्या या कृतीमुळे अर्जदाराने मंचात तक्रार दाखल केली असून वीज पुरवठा पुनर्रजोडणी करुन द्यावा. तसेच वीज मीटर तपासणी करण्याचा आदेश देण्याची विनंती मंचास केली आहे.
अर्जदाराने तक्रारी सोबत अंतर्गत तक्रार निवारण कक्षाने दिलेला आदेश, स्थळ पाहणी अहवाल, वीज पुरवठा खंडित करण्याबाबतची नोटीस इत्यादी कागदपत्रे मंचात दाखल केली आहेत.
गैरअर्जदार यांनी दाखल केलेल्या जवाबानुसार अर्जदारास व्यावसायिक दराने आकारलेले वीज बिल दुरुस्त करुन त्यांना मार्च 2014 मध्ये 9932.32 रुपये कमी करुन देण्यात आले. ज्यात व्याजाच्या रकमेचा समावेश आहे. अर्जदाराने मीटर टेस्टींगची रक्कम भरलेली नसल्यामुळे मीटर तपासणी करण्यात आली नाही. अर्जदारास देण्यात येणा-या सेवेत त्रुटी नसल्याचे सांगून तक्रार खारीज करण्याची विनंती गैरअर्जदार यांनी मंचास केली आहे.
अर्जदार व गैरअर्जदार यांनी मंचात दाखल केलेल्या कागदपत्रांवरुन व सुनावणीवरुन असे दिसून येते की, अर्जदाराने गैरअर्जदार यांच्याकडून घरगुती वापरासाठी वीज पुरवठा घेतला आहे व त्यांचा ग्राहक क्रमांक 510030304878 असा आहे. गैरअर्जदार यांनी अर्जदारास एप्रिल 2011 ते मे 2012 च्या कालावधीत घरगुती वापराच्या वीजदरा ऐवजी व्यावसायिक वीज वापराच्या दराप्रमाणे वीज बिल आकारणी केली. याबाबत अर्जदाराने गैरअर्जदार यांनी स्थापन केलेल्या अंतर्गत तक्रार निवारण कक्षाकडे दिनांक 15.03.2013 रोजी तक्रार दाखल केली. सदरील कक्षाने दिनांक 29.06.2013 रोजी याबाबत सुनावणी घेऊन एप्रिल 2011 ते एप्रिल 2012 या कालावधीत वीज बिल व्यावसायिक दराऐवजी घरगुती वापराच्या वीज दराप्रमाणे आकारणी करण्याचा संबंधित विभागास निर्णय कळविला. एप्रिल 2011 ते मे 2012 या कालावधीत अर्जदाराचा वीज वापर घरगुती होता हे गैरअर्जदार यांना मान्य असल्याचे स्पष्ट होते.
अर्जदाराने दिनांक 25.02.2014 रोजी पत्राव्दारे त्यांनी वीज बिलाची वरील वर्गवारीतील फरकेची रक्कम वगळता उर्वरीत रक्कम भरली असल्याचे गैरअर्जदार यांना कळविले. तसेच फरकाची रक्कम वीज बिलातून वजा करण्यात आली नसल्याचे कळविले. गैरअर्जदार यांनी अर्जदाराचे जानेवारी 2012 ते सप्टेंबर 2014 या कालावधीचे सी.पी.एल जवाबासोबत जोडले आहे. सदरील सी.पी.एल चे निरीक्षण केल्यावर जानेवारी 2012 मध्ये अर्जदाराकडे बसविण्यात आलेल्या मीटरचा क्रमांक 76/10132980 असा असल्याचे दिसून येते. एप्रिल 2012 पर्यंत त्यांना वाणिज्य वर्गवारीनुसार वीज बिल आकारण्यात येत असलेले दिसून येते. मार्च 2012 पासून पुढील कालावधीसाठी गैरअर्जदार यांनी अर्जदारास घरगुती वीज दराप्रमाणे वीज आकारणी केलेली स्पष्ट होते. ऑगस्ट 2012 मध्ये गैरअर्जदार यांनी अर्जदाराचे जुने मीटर (क्रमांक 76/10132980) बदलून त्याजागी नवीन मीटर (क्रमांक 80/00128260) बसविले. अंतर्गत तक्रार निवारण मंचाने दिनांक 29.06.2013 रोजी दिलेल्या निर्णयाची अंमलबजावणी मार्च 2014 च्या वीज बिलात करण्यात आलेली दिसून येते. या महिन्याच्या वीज बिलातून 9932.32 एवढी रक्कम वीज दरातील फरक म्हणून वजा करण्यात आल्याचे गैरअर्जदार यांनी आपल्या जवाबात म्हटले आहे. यावरुन एप्रिल 2011 ते मे 2012 या कालावधीत देण्यात आलेल्या चुकीच्या वीज बिलामुळे अर्जदारास मार्च 2014 पर्यंत एकुण 11134.64 रुपये व्याज म्हणून आकारण्यात आले असल्याचे स्पष्ट होते. गैरअर्जदार यांनी मान्य केल्याप्रमाणे वाणिज्य व घरगुती वापराच्या वीज बिलातील रकमेचा फरक (9932.32 – 3473.97 = 6458.55) असा येतो. मार्च 2014 मधील थकबाकी रुपये 11134.64 रुपये दर्शविण्यात आलेली रक्कम धरता गैरअर्जदार यांनी वीज बिलातून 11134.64 + 6458.55 = 17593.19 एवढी रक्कम वजा करणे अपेक्षित होते.
अर्जदाराने त्यांच्याकडे लावण्यात आलेले वीज मीटर हे फास्ट असल्याचे व गैरअर्जदार त्यावर कोणतीही कारवाई करीत नसल्याचे म्हटले आहे. मंचात अर्जदारा तर्फे दाखल करण्यात आलेल्या कागदपत्रात त्यांनी मीटर फास्ट असल्याबाबत गैरअर्जदार यांच्याकडे तक्रार केल्याबाबत कोणताही पुरावा जोडलेला नाही, त्यामुळे अर्जदाराच्या या तक्रारीची मंच दखल घेत नाही. अर्जदाराने एप्रिल 2013 नंतर वीज बिलाची रक्कम भरलेली नाही. गैरअर्जदार यांनी अर्जदाराचा वीज पुरवठा वीज बिलाच्या थकबाकीमुळे खंडित केलेला आहे. गैरअर्जदार यांनी अर्जदारास वर नमूद केल्या प्रमाणे रुपये 9932.32 ऐवजी 17593.12 रुपये वजा करुन सुधारीत वीज बिल द्यावे व त्या नंतर अर्जदाराने उर्वरीत रक्कम भरल्यास वीज पुरवठा नियमानुसार पुनर्रजोडणी करुन द्यावा.
आदेश
- अर्जदाराची तक्रार अंशत: मान्य करण्यात येते.
- गैरअर्जदार यांनी अर्जदारास 9932.32 ऐवजी 17593.13 एवढी रक्कम वजा करुन सुधारीत वीज बिल द्यावे.
- अर्जदाराने सुधारीत वीज बिल भरल्यानंतर त्यांचा वीज पुरवठा पुनर्रजोडणी करुन द्यावा.
- खर्चा बाबत आदेश नाहीत.