::: आ दे श :::
( पारित दिनांक : 29/08/2017 )
माननिय अध्यक्षा सौ.एस.एम.उंटवाले, यांचे अनुसार : -
1) तक्रारकर्ता यांनी सदरहू तक्रार, ग्राहक संरक्षण कायदा 1986 चे, कलम 12 अन्वये, विरुध्द पक्षाने द्यावयाच्या सेवेत त्रुटी ठेवली व अनुचित व्यापार प्रथेचा अवलंब केला, म्हणून नुकसान भरपाई मिळण्यासाठी दाखल केली आहे. तक्रारकर्ते यांची तक्रार, विरुध्द पक्ष क्र. 1 व 2 चा लेखी जबाब, उभय पक्षाने दाखल केलेले सर्व दस्तऐवज, प्रतिज्ञालेख, तक्रारकर्ते यांचा लेखी युक्तिवाद, यांचे काळजीपूर्वक अवलोकन करुन, खालीलप्रमाणे निर्णय पारित केला.
उभय पक्षाला मान्य असलेल्या बाबी अशा आहेत की, तक्रारकर्ता हा चाकोली येथील रहिवाशी आहे, ते शेती करतात. तक्रारकर्ते यांच्या वादातील शेताचा गट नं. 69 आहे. तक्रारकर्ते यांनी त्यांच्या शेतासाठी मोरगव्हाण लघु प्रकल्प जलाशयातून पाणी वापरण्याची लघु पाटबंधारे विभाग वाशिम यांचेकडे अर्ज करुन 12 वर्षाच्या कालावधीकरिता परवानगी मिळविली होती. म्हणून तक्रारकर्ते यांनी विरुध्द पक्षाकडे कृषी पंपाला विद्युत पुरवठा मिळणेकरिता अर्ज केला होता. उभय पक्षात याबद्दलही वाद नाही की, विरुध्द पक्षाने दिलेल्या कोटेशनची रक्कम तक्रारकर्ते यांनी भरली होती व त्यानंतर विरुध्द पक्षाने विद्युत संचाची पाहणी करुन, तक्रारकर्ते यांना कृषी पंपासाठी विद्युत पुरवठा दिला होता. तक्रारकर्त्याच्या ग्राहक क्रमांकाबद्दल वाद नाही. उभय पक्षाला कबूल असलेल्या वरील बाबीनुसार तक्रारकर्ता विरुध्द पक्षाचा ग्राहक आहे, या निष्कर्षाप्रत मंच आले आहे.
2) तक्रारकर्ते यांचे म्हणणे असे आहे की, दिनांक 14/07/2015 रोजी त्यांचा सदरचा विद्युत पुरवठा, विरुध्द पक्षाने चुकीच्या डि.पी. वरुन तक्रारकर्त्याचा विज पुरवठा जोडला हे कारण सांगून काही व्यक्तींनी खंडित केला. तक्रारकर्ते यांनी विरुध्द पक्षाकडे दिनांक 15/07/2015 रोजी अर्ज करुन, याबद्दल विरुध्द पक्षाने चौकशी करुन, ज्या लोकांनी सदरचा विद्युत पुरवठा बंद केला त्यांचेवर कायदेशीर कार्यवाही करुन, विज पुरवठा तात्काळ जोडून द्यावा, अशी विनंती केली. परंतु विरुध्द पक्षाने आजपर्यंतही तो जोडून दिला नाही. त्यामुळे ही विरुध्द पक्षाची सेवा न्युनता ठरते. वास्तविक विरुध्द पक्षाच्या सक्षम व्यक्तींनी मोकास्थळाची रितसर पाहणी करुन, चौकशी करुन पडताळणी केली व त्यानंतर तक्रारकर्त्याला सदरचा विज पुरवठा देण्यात आला होता. सदर विज पुरवठा बंद असल्यामुळे तक्रारकर्त्याचे आर्थिक नुकसान होत आहे, म्हणून प्रार्थनेनुसार तक्रार मंजूर करावी अशी विनंती, तक्रारकर्ते यांनी मंचाला केली आहे. तक्रारकर्ते यांनी अंतरीम आदेश होणेबाबत अर्ज केला आहे, त्यावर मंचाचे मा. सदस्यांनी विरुध्द पक्षाने निवेदन दाखल करावे, असा आदेश पारित केला होता.
3) विरुध्द पक्षाचे असे म्हणणे आहे की, तक्रारकर्त्याचा शेतासाठीचा विद्युत पुरवठा विरुध्द पक्षाने खंडीत केलेला नाही. तक्रारकर्त्याने जो अर्ज दिला, त्यात गजानन सुर्यभान कोकाटे यांनी लाईनमनला पैसे देवून तक्रारकर्त्याचे कृषी पंपाचे
विद्युत कनेक्शन कट केले असे नमूद आहे. तक्रारकर्त्याच्या तक्रारीत देखील विरुध्द पक्षाने विद्युत पुरवठा खंडित केला, असे नमूद नाही. त्यामुळे यात विरुध्द पक्षाची सेवा न्युनता नाही, उलट विरुध्द पक्षाचे कर्मचारी तक्रारकर्त्याचा विद्युत पुरवठा जोडण्याकरिता मोक्यावर गेले असता, तिथल्या लोकांनी तो जोडू दिला नाही व धमक्या दिल्या. तसेच तेंव्हा तक्रारकतो तिथे हजर राहण्यास तयार नव्हता. तेथील लोक विरुध्द पक्ष कर्मचा-यांच्या अंगावर धावून आले, त्यामुळे विरुध्द पक्षाच्या कर्मचा-यांच्या जिवितास धोका निर्माण झाला. गावकरी लोकांच्या हया भानगडी आहेत. तक्रारकर्त्याने पोलीस मदत घेतल्यास व स्वतः तो मोक्यावर हजर राहिल्यास विरुध्द पक्ष पंचनामा करुन, तक्रारकर्त्याचा विद्युत पुरवठा जोडून देण्यास तयार आहेत.
विरुध्द पक्षाने याच आशयाची पुरसिस रेकॉर्डवर दाखल केली म्हणून मंचाने उभय पक्षांना, सदरचा विद्युत पुरवठा सुरु करण्याबाबत मौखीक आदेश दिले होते. परंतु त्याबाबत विरुध्द पक्षाने निशाणी-10 प्रमाणे अर्ज करुन, तक्रारकर्त्याने विद्युत मानकाप्रमाणे संच मांडणी करावी व त्याबाबतीतला टेस्ट रिपोर्ट सादर करावा असे आदेश, मंचाने तक्रारकर्त्यास द्यावे, असे त्यात कथन केले. विरुध्द पक्षाने याबाबत रेकॉर्डवर दिनांक 11/09/2015 चा पंचनामा, नितीन निकम, गजानन पारिसकर, पुंडलीक धांडे यांचे प्रतिज्ञापत्र दाखल केले, सदर प्रतिज्ञापत्र व पंचनामा यावरुन असे दिसून येते की, दिनांक 11/09/2015 रोजी विरुध्द पक्ष त्यांचे कर्मचा-यांना घेवून मोरगव्हाण धरणावर तक्रारकर्ते यांचे विद्युत कनेक्शन जोडण्याकरिता गेले होते, तक्रारकर्ते देखील नंतर मोक्यावर सर्व साहित्यासह हजर झाले होते. मात्र काही शेतकरी गजानन सुर्यभान कोकाटे, हरीदास जाधव व ईतर हयांनी मोकास्थळावर येवून वाद घातला व विरोध करुन तक्रारकर्त्याचे कृषी पंपाचे कनेक्शन जोडू दिले नाही, मात्र यावर तक्रारकर्ते यांचे असे म्हणणे आहे की, विरुध्द पक्षाने आधी तक्रारकर्त्यास कृषी पंपाचा विद्युत पुरवठा दिला होता, तक्रारकर्त्याने तो वापरलाही होता त्यामुळे विरुध्द पक्षाने तेंव्हा सर्व बाबींची पडताळणी, पाहणी करुनच तक्रारकर्त्याला विज पुरवठा दिला होता. म्हणून आता जे ईसम अडथळा करत आहेत, त्यांचेवर विरुध्द पक्षाने फौजदारी कार्यवाही करावी किंवा विरुध्द पक्षाने पोलीस मदत घेवून, तक्रारकर्त्याचा विद्युत पुरवठा सुरु करुन द्यावा, विज पुरवठा देणे हे विरुध्द पक्षाचे कर्तव्य आहे.
तक्रारकर्ते यांनी त्यानंतर रेकॉर्डवर विरुध्द पक्षाच्या वरील अर्जानुसार एक टेस्ट रिपोर्ट दाखल केला व तक्रारकर्त्याने पूर्ण पुर्तता केली, आता विरुध्द पक्षास विज जोडणी देण्याचा आदेश व्हावा, असे मंचाला सांगितले. मात्र याबद्दल विरुध्द पक्षाने मंचाला पुरसिस दाखल करुन, असे कळविले की, तक्रारदाराने दिलेल्या या टेस्ट रिपोर्टनुसार विरुध्द पक्षाने मौका पाहणी केली तेंव्हा तिथे कोणतीही संच मांडणी नव्हती. याबद्दल तक्रारकर्त्यास फोनव्दारे माहिती विचारली असता, त्यांनीही समाधानकारक ऊत्तर दिले नाही. दिनांक 11/12/2015 रोजी शाखा अभियंता, सिंचन शाखा, रिठद यांचे पत्र विरुध्द पक्षाला प्राप्त झाले. त्या पत्रानुसार त्यांनी विरुध्द पक्षाला असे कळविले की, मोरगव्हाण प्रकल्पाचे बुडीत क्षेत्रात विद्युत कनेक्शन विरुध्द पक्षाने कोणत्याही कास्तकारास देवू नये. तक्रारकर्ते यांनी जो टेस्ट रिपोर्ट दिला तो अपूर्ण आहे, पुढे विरुध्द पक्षाचे पुरसिसमध्ये असेही कथन आहे की, चाचणी अहवाल हा चाकोलीचा आहे व मोरगव्हाण बुडीत क्षेत्राबद्दल सिंचन विभागाची परवानगी नाही. त्यामुळे तक्रारकर्त्याने सिंचन विभागाकडून बुडीत क्षेत्रात विद्युत पुरवठा करण्याबाबतची स्पष्ट परवानगी व तसा चाचणी रिपोर्ट विदयुत मानकाप्रमाणे संच मांडणी फिटींग, अर्थींगसह करुन मंचात दाखल करावा व विरुध्द पक्षाला द्यावा त्यानंतर विरुध्द पक्षाव्दारे तपासणी होवून विद्युत पुरवठा करता येईल. विरुध्द पक्षाने या पुरसिससोबत आवश्यक ते दस्त जोडले आहेत. यावर तक्रारकर्त्याने नंतर पुन्हा श्री. रामटेके यांचा टेस्ट रिपोर्ट व सिंचन शाखा, रिठद यांचे ना हरकत प्रमाणपत्र हे दस्त रेकॉर्डवर दाखल केले.
4) अशाप्रकारे उभय पक्षाने रेकॉर्डवर अनेक अर्ज, पुरसिस, दस्तऐवज दाखल केले आहेत. यावर मंचाचे असे मत आहे की, तक्रारकर्त्याच्या कथनानुसार त्यांच्या कृषी पंपाचा विद्युत पुरवठा हा गावातील काही व्यक्तींनी बंद केला होता, तो विरुध्द पक्षाने खंडित केलेला नाही त्यामुळे यात विरुध्द पक्षाची सेवा न्युनता म्हणता येणार नाही. मात्र तक्रारकर्त्याने देखील अडथळा करणा-या व्यक्तींविरुध्द दिवाणी न्यायालयात दावा दाखल केला नाही किंवा विरुध्द पक्षाने पोलीस मदत घेवून, त्यांचेवर फौजदारी कार्यवाही केलेली नाही. मंच अशाप्रकारे आदेश पारित करु शकले असते परंतु रेकॉर्डवर उभय पक्षाने शाखा अभियंता, सिंचन शाखा, रिठद यांचे वेगवेगळया तारखेचे पत्र दाखल केले, त्यातील मजकूर सारखा आहे, तो असा की, मोरगव्हाण प्रकल्पाचे बुडीत क्षेत्रात कोणत्याही कास्तकारास विद्युत कनेक्शन देण्यास परवानगी नाही. तक्रारकर्ते यांनी शाखा अभियंता, सिंचन शाखेचे ना हरकत प्रमाणपत्र दाखल केले त्यातील पण मजकूर असाच आहे की, सिंचन शाखेच्या अंतर्गत असलेले मोरगव्हाण लघु पाटबंधारे योजना चे बुडीत क्षेत्राची योग्य शहानिशा करुन बुडीत क्षेत्राचे बाहेर संबंधीत कास्तकारांना विद्युत पोल अथवा विद्युत कनेक्शन देण्यास हया कार्यालयाची हरकत नाही. त्यामुळे सिंचन शाखेचे हे पत्र दूर्लक्षित करता येणार नाही कारण दाखल इतर दस्तांवरुन असे दिसून येते की, या प्रकल्पाचे बुडीत क्षेत्रात गेरेढोरे पाणी पिण्याकरिता जातात तसेच बरेच लोक पाणी भरण्याकरिता जातात. विद्युत खांब रोवून कनेक्शन दिल्यास विद्युत प्रवाह पाण्यामध्ये उतरुन जिवित हानी होण्याची शक्यता नाकारता येणार नाही. तक्रारकर्त्याचे पुर्वीचे / आधीचे विद्युत कनेक्शन हे त्याच्या चाकोली येथील गट क्र. 69 मध्ये बागायती करण्यासाठी मोरगव्हाण धरणाच्या सरकारी जागेतील बुडीत क्षेत्रात त्याने घेतले होते परंतु त्या जागेबद्दल सिंचन शाखा तसेच गावातील ईतर शेतक-यांचा वरील कारणामुळे आक्षेप होता, असे दाखल कागदपत्रांवरुन स्पष्ट होते. त्यामुळे मंचाचा देखील सुरक्षिततेचा मुद्दा लक्षात घेवून तक्रारकर्त्यास त्याच्या पुर्वीच्या ठिकाणावरुनच विरुध्द पक्षाने नवीन कनेक्शन देण्यास विरोध आहे, असे असतांना दिनांक 29/04/2016 रोजी तक्रारकर्त्याने विरुध्द पक्षाकडे एक अर्ज दाखल करुन त्याच्या कृषी पंपाचे कनेक्शन हे मौजे मोरगव्हाण येथील गट क्र. 53 मध्ये विरुध्द पक्षाने स्थलांतरीत करुन द्यावे, अशी विनंती विरुध्द पक्षाला केलेली दिसते. त्यासोबत तक्रारकर्त्याने मौजे मोरगव्हाण येथील गट क्र. 53 चे मालक भानुदास सखाराम कोकाटे यांचा त्याबद्दल संमतीलेख देखील जोडलेला आहे. त्यामुळे आता तक्रारकर्त्याच्या तक्रारीचे स्वरुप पूर्णपणे बदलले आहे व स्थलांतराची केस समोर आली परंतु न्यायाच्या दृष्टीने विरुध्द पक्षाने तक्रारकर्त्याच्या हया अर्जाचा विचार करावा असे मंचाला वाटते. त्याकरिता लागणारे सर्व कागदपत्र व टेस्ट रिपोर्ट सर्व सामानासहित, मीटर पेटी लावून, अर्थींग करुन तक्रारकर्त्याने पुरवावे तसेच ईतरही आवश्यक ती मदत तक्रारकर्त्याने विरुध्द पक्षास करावी. त्यानंतर विरुध्द पक्षाने लवकरात लवकर 45 दिवसात तक्रारकर्त्यास नवीन स्थलांतरीत जागी कृषी पंपाचा विद्युत पुरवठा जोडून द्यावा. मात्र अशा परिस्थितीत तक्रारकर्ते यांच्या ईतर मागण्या फेटाळण्यात येतात, म्हणून अंतिम आदेश खालीलप्रमाणे पारित केला.
:: अंतिम आदेश ::
1. तक्रारकर्त्याची तक्रार अंशत: मंजूर करण्यात येते.
2. विरुध्द पक्षाने, तक्रारकर्ते यांच्या दिनांक 29/04/2016 रोजीच्या विरुध्द पक्षाकडे दाखल केलेल्या अर्जानुसार तक्रारकर्त्याचे कृषी पंपाचे कनेक्शन
मौजे मोरगव्हाण ता. रिसोड, जि. वाशिम येथील गट क्र. 53 मध्ये सर्व कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करुन स्थलांतरीत करुन द्यावे.
3. तक्रारकर्ते यांनी त्यासाठी लागणारे सर्व कागदपत्र व टेस्ट रिपोर्ट ( सर्व सामानासहीत, मीटर पेटी लावून, अर्थींग करुन ) विरुध्द पक्षास पुरवावे व त्यानंतर विरुध्द पक्षाने लवकरात लवकर सदर कार्यवाही 45 दिवसात पूर्ण करावी.
4. तक्रारकर्त्याच्या इतर मागण्या फेटाळण्यात येतात.
5. उभय पक्षकारांना आदेशाची प्रत निःशुल्क देण्यात यावी.
( श्री. कैलास वानखडे ) ( सौ. एस.एम. उंटवाले )
सदस्य. अध्यक्षा.
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्याय मंच, वाशिम.
svGiri