(द्वारा- श्रीमती ज्योती पत्की, सदस्य) या तक्रारीची माहिती थोडक्यात खालीलप्रमाणे आहे. तक्रारदाराचे म्हणणे असे आहे की, त्याची हनुमंतगाव, ता.गंगापूर येथे गट नं.96 मध्ये शेतजमीन असून त्या ठिकाणी त्याने चार एकर क्षेत्रावर ऊसाची लागवड केली होती. त्याच्या शेतावरुन वीज वितरण कंपनीच्या वीज तारा जातात, त्या तारा ब-याच दिवसापासून लोंबकळलेल्या असल्यामुळे त्याबाबत संबंधीत वीज वितरण कंपनीच्या लाईनमनकडे वेळोवेळी तक्रार केली. परंतू त्यांनी कोणत्याही प्रकारची कार्यवाही केली नाही. दि.28.10.2009 रोजी दुपारी 4 ते 5 वाजण्याच्या सुमारास हया तारांचे घर्षण झाल्यामुळे त्याचे शेतातील ऊसाला आग लागली व संपूर्ण ऊस जळून खाक झाला. (2) त.क्र.92/10 सदरील घटनेची दुस-या दिवशी म्हणजेच दि.29.10.2009 रोजी तहसील कार्यालय, वीज वितरण कंपनी आणि तलाठी, गंगापूर यांच्याकडे लेखी व तोंडी स्वरुपाची तक्रार दिली. त्यानुसार तहसील कार्यालय, गंगापूर यांनी संबंधीत तलाठयाला पाठवून जळालेल्या ऊसाचा पंचनामा केला. वीज तारांचे घर्षण होऊन लागलेल्या आगीमध्ये ऊस जळाल्यामुळे त्याचे रु.3,00,000/- चे नुकसान झाले. म्हणून त्याने वीज वितरण कंपनीकडे नुकसान भरपाईची मागणी केली. परंतू त्यांनी त्याने दिलेल्या तक्रारीची पोहोच दिली नाही व कोणतीही दखली घेतली नाही आणि नुकसान भरपाई दिली नाही. म्हणून तक्रारदाराने अशी मागणी केली आहे की, त्यास गैरअर्जदार वीज वितरण कंपनीकडून रु.3,00,000/- नुकसान भरपाई व त्यावरील व्याज तक्रारीच्या खर्चासह देण्यात यावी. गैरअर्जदार वीज वितरण कंपनीने लेखी निवेदन दाखल करुन तक्रारदाराची तक्रार चुकीची व खोटी असल्यामुळे फेटाळण्यात यावी अशी मागणी केली आहे. त्यांचे म्हणणे असे आहे की, तक्रारदाराच्या शेतामधून जाणा-या वीज तारा लोंबकळलेल्या नाहीत आणि तक्रारदाराच्या शेतामधे तारांचे घर्षण झाल्यामुळे ऊस जळालेला नाही. तक्रारदाराने तहसील कार्यालय व तलाठी यांचेकडे खोटी तक्रार देऊन व त्यांना हाताशी धरुन खोटा पंचनामा केलेला आहे. तक्रारदाराने ऊस जळाल्याची त्यांचेकडे कोणतीही लेखी व तोंडी तक्रार केली नाही. गैरअर्जदार वीत वितरण कंपनीच्या निष्काळजीपणामुळे तक्रारदाराचा ऊस जळाला नाही व कोणत्याही प्रकारचे नुकसान झालेले नाही. म्हणून तक्रारदाराची तक्रार खर्चासह फेटाळण्यात यावी अशी मागणी गैरअर्जदार वीज वितरण कंपनीने केली आहे. दोन्ही पक्षाने दाखल केलेल्या शपथपत्र व कागदपत्रांची मंचाने पाहणी केली. तक्रारदाराच्या वतीने अड के.एम.पवार आणि गैरअर्जदार वीज वितरण कंपनीच्या वतीने अड.पी.एम.हिवाळे यांचा युक्तिवाद ऐकण्यात आला. तक्रारदाराचे म्हणण्यानुसार त्याच्या शेतामधून जाणा-या वीजेच्या तारा लोंबकळल्यामुळे त्याचे एकमेकांना घर्षण होऊन आग लागल्यामुळे दि.28.10.2009 रोजी त्याचे शेतातील ऊस जळाला. वीज वितरण कंपनीकडे तारांची योग्य काळजी घेण्याबाबत वेळोवेळी तक्रार करुनही त्यांनी दखल घेतली नाही. याबाबत वीज वितरण कंपनीचे म्हणणे असे आहे की, त्यांनी तारांची योग्य काळजी घेतलेली आहे व त्यांनी कोणताही निष्काळजीपणा केलेला नाही. (3) त.क्र.92/10 तक्रारदाराच्या शेतामधून जाणा-या वीजेच्या तारा लोंबकळलेल्या असल्यामुळे आणि त्यांचे घर्षण होऊन आग लागल्यामुळे ऊस जळाला हे सिध्द करण्यासाठी तक्रारदाराने तलाठयाने केलेला पंचनामा दाखल केला आहे. तलाठयाने केलेल्या पंचनामा पाहिला असता त्यावरुन तक्रारदाराच्या शेतामधील वीज तारांचे घर्षण होऊन आग लागली व त्यामुळे ऊस जळाल्याचे सिध्द होत नाही. सर्वात महत्वाची बाब म्हणजे तक्रारदाराच्या शेतामधील ऊस दि.28.10.2009 रोजी जळाला असतानाही तक्रारदाराने त्याबाबतची माहिती संबंधित पोलीस स्टेशन आणि वीज वितरण कंपनीकडे दिलेली नाही. तक्रारदाराने सदर घटनची माहिती फक्त तहसीलदार गगापूर यांना दिलेली असल्याचे तलाठयाने घटनेनंतर दि.29.10.2009 रोजी केलेल्या पंचनाम्यावरुन दिसून येते. तक्रारदाराने सदर घटनेची तक्रार ताबडतोब पोलीस स्टेशनला का दिली नाही याबाबत खुलासा केला नाही त्यामुळे तक्रारदाराच्या या तक्रारीबाबत संशय निर्माण होतो. तसेच सदर घटना वीज तारांच्या घर्षणामुळे आग लागून झाल्याचे प्रत्यक्षात कोणीही पाहिलेले नाही. त्यामुळे तक्रारदाराच्या शेतामध्ये लागलेली आग वीजेच्या तारांच्या घर्षणामुळेच लागलेली आहे हे सिध्द होत शकत नाही. तक्रारदाराने सदर घटनेची तक्रार वीज वितरण कंपनीकडे घटनेनंतर कधी केली होती या संबंधीचा कोणताही पुरावा दाखल केलेला नाही. तक्रारदाराने सदर घटनेनंतर वीज वितरण कंपनीस दि.20.1.2010 रोजी वकिलामार्फत नोटीस पाठवून घटनेची माहिती देऊन नुकसान भरपाईची मागणी केली. परंतू त्याने सदर माहिती वीज वितरण कंपनीला देण्यास विलंब का केला याबाबतचा खुलासा केलेला नाही. तक्रारदाराने सदर घटनेची माहिती ताबडतोब पोलीसांना तसेच वीज वितरण कंपनीस का दिली नाही, त्यामुळे देखील असा संशय निर्माण होतो की, तक्रारदाराच्या शेतातील आग दुस-या कोणत्या तरी कारणामुळे लागलेली असेल आणि तक्रारदाराने विचार करुन जळालेल्या ऊसाची नुकसान भरपाई वीज वितरण कंपनीकडून मागता येईल या उद्येशाने वीजेच्या तारांचे घर्षण होऊन आग लागल्याचे सांगितले असावे. तक्रारदाराने सादर केलेला एकंदर पुरावा पाहता तक्रारदाराच्या शेतामधून जाणा-या वीज तारांचे घर्षण होऊन त्याच्या शेतातील ऊसाला आग लागल्यो सिध्द होऊ शकत नाही. आणि वीज वितरण कंपनीच्या सेवेत कोणत्याही प्रकारची त्रुटी असल्याचे देखील दिसून येत नाही. म्हणून तक्रारदार वीज वितरण कंपनीकडून नुकसान भरपाई (4) त.क्र.92/10 मिळण्यास पात्र ठरत नाही. म्हणून खालीलप्रमाणे आदेश करण्यात येतो. आदेश 1) तक्रारदाराची तक्रार फेटाळण्यात येते. 2) तक्रारीचा खर्च उभयपक्षांनी आपापला सोसावा.. 3) उभयपक्षांना आदेश कळविण्यात यावा. श्रीमती ज्योती पत्की श्रीमती रेखा कापडिया श्री.डी.एस.देशमुख सदस्य सदस्य अध्यक्ष
| [ Smt.Rekha Kapadiya] MEMBER[ Shri.D.S.Deshmukh] PRESIDENT[ Smt.Jyoti H.Patki] MEMBER | |