द्वारा- सौ. मोहिनी जयंत भिलकर, सदस्या -
अर्जदार श्रीमती ममता अशोक चौधरी यांनी दाखल केलेल्या ग्राहक तक्रारीचा आशय असा की,..........
1. अर्जदार यांनी गैरअर्जदार यांचकडे टेलिफोन कनेक्शनसाठी अर्ज करुन टेलिफोन घेतला त्याचा नंबर 224420 असा आहे. अर्जदार यांना दि. 1-5-04 ते दि. 31-05-04 या काळाचे रु.120 रेंटल चार्ज असलेले बील गैरअर्जदार यांनी दिले. त्यानंतर गैरअर्जदार यांनी काहीही सुचना न देता दि. 1-8-04 ते दि. 21-08-04 या कालावधीचे रु.490 रेंटल चार्ज असलेले बील अर्जदार यांना दिले. दि. 29-02-07 पर्यंत अशीच रु.490 रेंटल चार्ज असलेली बीले अर्जदार यांना देण्यात आली.
2. अर्जदार म्हणतात की, गैरअर्जदार यांना आपली चूक लक्षात आल्यावर गैरअर्जदार यांनी रु.180 चार्ज लावून दि. 1-4-07 ते दि. 30-4-07 या काळाचे बील अर्जदार यांना पाठविले. ही गैरअर्जदार यांच्या सेवेतील कमतरता आहे.
3. अर्जदार विनंती करतात की, गैरअर्जदार यांनी दिलेली बीले ही रु 120 रेंटल चार्ज लावून अडजेस्ट करुन द्यावी. गैरअर्जदार यांनी अर्जदार यांना शारीरिक, मानसिक त्रासासाठी तसेच ग्राहक तक्रारीचा खर्च म्हणून रु.2000/- द्यावेत.
4. गैरअर्जदार आपल्या लेखी बयानात नि.क्रं. 11 वर म्हणतात की, गैरअर्जदार यांनी अर्जदार यांना दिलेले रु.490 चे बील हे दि. 1-8-04 ते दि. 21-8-04 या कालावधीचे नसून ते दि. 01-08-04 ते दि. 31-08-04 या कालावधीचे आहे. गैरअर्जदार हे ग्राहकांसाठी विविध योजना राबवित असतात. अर्जदार यांनी दि. 7-8-04 रोजी अर्ज करुन प्लॅन 490 ही सेवा स्वतःच्या टेलिफोनवर उपलब्ध करुन घेतली. त्यामुळे बिलात रेंटल चार्ज रु 490 दाखवून गैरअर्जदार यांनी अर्जदार यांना बील दिलेले आहे. अर्जदार यांची तक्रार ही दि. 1-8-04 ते दि. 29-02-07 या काळातील असल्यामुळे ती मुदतबाहय आहे.
5. अर्जदार यांनी दि. 27-02-07 रोजी 180 प्लॅन (इंडिया वन प्लॅन) घेतला त्यामुळे अर्जदार यांचे दि. 1-3-07 ते दि. 26-03-07 चे बील हे दि. 1 ते 26 या तारखेपर्यंत रु.425 चे व दि. 27 ते 30 या तारखेचे बील हे 30 रु.चे (425 + 30 = 455) प्रमाणे 455 रु. आलेले आहे. प्लॅन 180 ची सवलत अर्जदार यांना दि. 27-03-07 पासून मिळालेली आहे.
6. गैरअर्जदार यांनी अर्जदार यांना दि. 1-4-07 ते दि. 30-4-07 चे बील हे इंडिया वन प्लॅन आणि 99 च्या सुविधाप्रमाणे पाठविलेले आहे. अर्जदार यांची तक्रार ही दिनांक 5-6-04 पासून असल्यामुळे ती ‘मुदतबाहय व खारीज करण्यासारखी आहे. अर्जदार यांनी स्वतः अर्ज करुन सर्व सुविधा घेतलेल्या आहेत. त्यामुळे अर्जदार यांची तक्रार ही रु.2000/- खर्चासहीत खारीज करण्यात यावी.
कारणे व निष्कर्ष
7. अर्जदार, गैरअर्जदार यांनी दाखल केलेली कागदपत्रे, शपथपत्र, पुरावा व केलेला युक्तिवाद यावरुन असे निदर्शनास येते की, अर्जदार यांनी स्वतः दि. 7-8-04 रोजी अर्ज करुन जिरो रेंटल प्लॅन 490 लागू करण्याबाबत गैरअर्जदार यांना सांगितले आहे. तसेच दि. 27-02-07 रोजी अर्ज करुन वन इंडिया प्लॅन आणि प्लॅन 99 ची सुविधा मागितलेली आहे.
8. अर्जदार यांची दोन्ही अर्ज हे रेकॉर्डवर आहेत. यावरुन अर्जदार यांनी स्वतःच टेलिफोनच्या सुविधा मागितलेल्या असल्याचे दिसून येते . या आधारावरच गैरअर्जदार यांनी अर्जदार यांना बिले दिलेली आहेत.
अशा स्थितीत सदर आदेश पारित करण्यात येत आहे.
आदेश
अर्जदार यांची ग्राहक तक्रार ही खारीज करण्यात येत आहे.