जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, लातूर
ग्राहक तक्रार क्रमांक : 60/2011 दाखल तारीख :07/03/2011
निकाल तारीख :06/02/2015
कालावधी :03 वर्षे 10 म.03 दिवस
मेहताब बशीर शेख,
वय 50 वर्षे, धंदा पेन्शनर,
रा. चौधरी नगर, लातूर. ...तक्रारदार.
-विरुध्द-
1) उपकार्यकारी अभियंता,
महाराष्ट्र विदयुत वितरण कंपनी लि.
ग्रामीण सब डिवीजन, साळे गल्ली, लातूर .
2) कनिष्ठ अभियंता,
महाराष्ट्र विदयुत वितरण कंपनी लि.
काटगाव सब डिव्हीजन, ता.जि. लातूर. ..... गैरअर्जदार
कोरम : 1) श्रीमती ए.जी.सातपुते, अध्यक्षा.
2) श्री.अजय भोसरेकर, सदस्य
3) श्रीमती रेखा जाधव, सदस्या.
तक्रारदारातर्फे : अॅड.अनिल के. जवळकर
गै.अ.क्र.1 व 2 तर्फे :अॅड. आर.बी.पांडे
::: निकालपत्र :::
(घोषित द्वारा: श्री.अजय भोसरेकर, मा. सदस्य.)
तक्रारदाराने सदर तक्रार ग्राहक संरक्षण कायदा 1986 चे कलम 12 अंतर्गत गैरअर्जदारा विरुध्द दाखल केली आहे. तक्रारदाराची तक्रार थोडक्यात अशी की,
तक्रारदार हा लातूर येथील रहिवाशी असून निवृत्त माजी सैनिक आहे. तक्रारदाराने नौकरी कालावधीमध्ये असतांना दिंडेगाव येथे गट क्र. 77 मध्ये 6 एकर जमीन खरेदी घेतली होती. सदर जमीनीमध्ये तक्रारदाराने दि. 23.05.2002 रोजी सामनेवाला यांच्या नियमानुसार सर्व कागदपत्रांची पुर्तता करुन 5 एच.पी. शेती पंपाकरीता रक्कम 6470/- डिमांड भरले. तक्रारदारास विदयुत पुरवठा न देता दि. 07.11.2006 रोजी रक्कम रु. 8180/- चे बिल शेख महेबुब बशीर या नावाने दिले. सदर बिलावर मिटर क्र. 7000114238 व ग्राहक क्र.611300243290 चे दिले, तक्रारदाराने दि. 31.01.2007 रोजी सामनेवाला यांना सदर घटनेची लेखी तक्रारीद्वारे विदयुत पुरवठा न देता वीज देयके दिल्या बद्दलची व नावातील चुकीची दुरुस्ती करण्या बाबत लेखी कळवले.
तक्रारदाराने पाठपुरावा करुन पुरवठा प्राप्त होत नाही म्हणुन दि. 02.08.2008 रोजी पुन्हा लेखी तक्रार मीटर बवण्याबाबत केली. तक्रारदारास दि. 24.07.2008 रोजी विदयुत पुरवठा न देता रक्कम रु. 24,050/- चे वीज देयक देण्यात आले. तक्रारदारास दि. 08.08.2008 रोजी मिटर क्र 178449 या नंबरच्या मीटरद्वारे वीज पुरवठा देण्यात आला. सामनेवाला यांनी तक्रारदारास दि.16.10.2010 रोजी मीटर क्र. 114238 त्यावर देवुन ग्राहक क्र. 611300243290 द्वारे रक्कम रु. 24,050/- वीज देयक दिले. प्रत्यक्षात तक्रारदारास मीटर क्र. 178449 असा बसवण्यात आला आहे.
तक्रारदाराने शेती पंपासाठी वीज पुरवठा प्राप्त केला, तो ग्रामीण भागातील आहे व ग्रामीण् भागात 12 ते 14 तास लोडशेडीग असतांना, ऑगष्ट 2008 ते मार्च 2009 या कालावधीमध्ये प्रत्यक्षात रिडींग न घेता 4500 रिडींग दर्शवुन चुकीचे वीज देयक दिले, असे म्हटले आहे. तसेच सविस्तर विवरण तक्रारदाराने त्याच्या तक्रारीच्या परिच्छेद 9 मध्ये कथन केले आहे. तक्रारदाराने वारंवार तक्रार करुन दि. 08.08.2008 पासुन दि. 19.01.2011 पर्यंत वीज देयके दिली नाहीत म्हणुन तक्रार करत राहीला. तक्रारदारास दि. 29.01.2011 रोजी प्रथम वीज देयक देण्यात आले. त्यावर रक्कम रु. 25,170/- चे देण्यात आले. सदर बिल चुकीचे दिल्यामुळे तक्रारदाराने सदर तक्रार या न्यायमंचात दाखल केली आहे.
तक्रारदाराने दि. 29.01.2011 रोजीचे बिल चुकीचे जाहीर करुन रद्द करावे, दि. 08.08.2008 पासुन वापर केल्याप्रमाणे व रिडींगप्रमाणे विना व्याज व दंड व्याज न लावता वीज देयक देण्याचा आदेश व्हावा, 6 वर्षे विदयुत पुरवठा न दिल्यामुळे प्रतिवर्ष रु. 10,000/- याप्रमाणे रु. 60,000/- नुकसान भरपाईची मागणी केली आहे, शारिरीक व मानसिक त्रासापोटी रु. 7000/- व तक्रारीचे खर्च रु. 5000/- मिळण्याची मागणी केली आहे.
तक्रारदाराने आपले तक्रारीचे पुष्टयर्थ शपथपत्र व एकुण 19 कागदपत्रे दाखल केली आहेत. तक्रारदाराने अंतरीम आदेशाची मागणी केली आहे, त्यात रु. 5450/- भरुन वीज पुरवठा खंडीत करुन नये अशी विनंती केली आहे. त्यानुसार न्यायमंचाने तक्रारदारास दि. 7.3.2011 रोजी अंतरीम आदेश पारीत करुन, तक्रारदारास रु; 5450/- भरणा करुन सामनेवाला यांनी आपले लेखी म्हणणे दाखल करे पर्यंत तक्रारदाराचा वीज पुरवठा खंडीत करु नये, असा आदेश पारीत केला.
सामनेवाला यांना न्यायमंचाची नोटीस प्राप्त असून, सामनेवाला यांच्या वतीने दि. 15.02.2013 रोजी सामनेवाला यांच्या वकीलानी पुरसीस देवुन म्हणणे दाखल करण्यासाठी मुदत मागणारा अर्ज दाखल केला. सदर अर्ज न्यायमंचाने मंजुर केला. सामनेवाला यांनी दि. 18.02.2013 रोजी सहाय्यक विधी अधिकारी यांचे पत्र दाखल केले, त्यात त्यांनी 8 दिवसाची वाढीव मुदत लेखी म्हणणे दाखल करणेसाठी मागणी केली. सदर प्रकरणात सामनेवाला यांनी त्यांच्या वकालतनामा दाखल केला नाही. व लेखी महणणेसाठी पुरेसी मुदत देवुन दाखल न केल्या कारणाने सामनेवाला यांचे विरोधात दि. 14.02.2013 रोजी एकतर्फा आदेश पारीत करण्यात आला.
तक्रारदाराने दाखल केलेली तक्रार व तक्रारदाराने दि. 31.01.2015 रोजी दाखल केलेले लेखी पुरसीस या नुसार तक्रारदाराच्या तक्रारीचे बारकाईने अवलोकन केले असता, तक्रारदाराने वर कथन केल्याप्रमाणे, गैरअर्जदार यांनी योग्य प्रकारे वापराचे रिडींग न घेता वीज देयके चुकीच्या नावाने, मीटर नंबर चुकीचा टाकुन, विज पुरवठा न देता वीज देयके देवुन तक्रारदारास दयावयाच्या सेवेत कसुर केला आहे हे तक्रारदाराने दाखल केलेल्या कागदपत्रावरुन व सामनेवाला यांनी म्हणणे मांडण्याच्या अर्जाशिवाय वकालतनामा न दाखल करुन व म्हणणे न दाखल करुन, हे अप्रत्यक्षपणे मान्य केले आहे. तक्रारदाराने केलेल्या मागणीचा विचार करता , दि. 29.01.2011 रोजीचे वीज देयक रद्द करणे, दि. 08.08.2008 पासुन वीज पुरवठा दिल्यापासुन ते आज तारखेपर्यंत मीटर रिडींग वापराप्रमाणे देयके विना दंड व्याज आकारता तक्रारदार भरु शकेल अशा सवलतीने मंजुर करणे, तक्रारदारास मानसिक व शारिरीक त्रासापोटी रु. 3000/- तसेच तक्रारीचे खर्चापोटी रु. 2000/- सामनेवाला यांनी आपले लेखी म्हणणे दाखल केले नाहीत म्हणुन सामनेवाला यांना ग्राहक साहाय्यता निधीमध्ये रु. 2000/- दंड म्हणुन भरण्याचा, व तक्रारदारान अंतरीम आदेशाद्वारे भरणा केलेली रक्कम रु. 5450/- ही रक्कम दि. 08.08.2008 च्या तयार होणा-या बिलात समायोजीत करावे, असा आदेश करणे योग्य व न्यायाचे होईल असे या न्यायमंचाचे मत आहे.
सबब न्यायमंच खालील प्रमाणे आदेशा पारीत करीत आहे.
आदेश
- तक्रारदाराची तक्रार अंशत: मंजुर करण्यात येत आहे.
- सामनेवाला यांना आदेश देण्यात येतो की, तक्रारदारास अदा केलेले वीज देयक दि. 29.01.2011 रोजीचे रद्द करण्यात येत आहे.
- सामनेवाला यांना आदेश देण्यात येतो की, तक्रारदारास वीज पुरवठा दि. 08.08.2008 रोजी दिली या तारखेपासुन आज तारखेपर्यंत मीटर वापराप्रमाणे रिडींगचे वीज देयक विना दंड व्याज आकारता, तक्रारदार भरु शकेल अशा सवलतीने वीज देयक भरुन घ्यावेत.
- सामनेवाला यांना आदेश देण्यात येतो की, तक्रारदार यांना मानसिक व शारिरीक त्रासापोटी रक्कम रु. 3000/- व तक्रारीचे खर्चापोटी रु. 2000/- आदेश प्राप्ती पासुन 30 दिवसाचे आत अदा करावेत.
- सामनेवाला यांना आदेश देण्यता येतो की, ग्राहक साहाय्यता निधीमध्ये रु. 2000/- दंड म्हणुन, आदेश प्राप्ती पासुन 30 दिवसाचे आत भरणा करावेत.
- सामनेवाला यांना आदेश देण्यात येतो की, तक्रारदाराने अंतरीम आदेशाद्वारे भरणा केलेली रक्कम रु. 5450/- ही आदेश क्र. 3 च्या वीज देयकात आदेश प्राप्ती पासुन 30 दिवसाचे आत समायोजित करावी.
(अजय भोसरेकर) (श्रीमती ए.जी.सातपुते)
सदस्य अध्यक्षा
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच लातूर.
**//राजूरकर//**