::: आ दे श :::
( पारित दिनांक : 25/09/2014 )
माननिय श्रीमती जे.जी. खांडेभराड, सदस्या, यांचे अनुसार : -
1. ग्राहक संरक्षण कायदा 1986 चे, कलम : 12 अन्वये दाखल केलेल्या या तक्रारीचा सारांश खालीलप्रमाणे -
तक्रारकर्ता हा वाशिम येथील रहिवासी असून, त्यांच्याकडे घरगुती वापराकरिता विदयुत मिटर लावलेले आहे. तक्रारकर्त्याचा ग्राहक क्र. 326010151981 असा आहे. तसेच तक्रारकर्त्याच्या घरामध्ये विज बचत करणारे विज दिवे ( सि.एफ.एल. ) लावलेले आहेत, त्यामुळे तक्रारकर्त्याचा विज वापर अत्यंत कमी आहे. तक्रारकर्त्याचा दरमहा वीज वापर अंदाजे 1 ते 20 युनिटच्या आत आहे.
तक्रारकर्त्यास माहे नोव्हेंबर 2013 या महिन्याचे देयक गैरवाजवी व अन्यायीपणे दिलेले आहे, त्यामध्ये वीज वापर 164 युनिट दाखविण्यात आला, तो चुकीचा आहे. सदर देयकाची रक्कम कमी करण्यासाठी तक्रारकर्त्याने दिनांक 18/12/2013 रोजी विरुध्द पक्षाकडे अर्ज दिला परंतु त्याचा कुठल्याही प्रकारे विचार करण्यात आला नाही. ऊपरोक्त देयकाची रक्कम विलंब आकारासह भरण्यास तक्रारकर्त्यास भाग पाडले. म्हणून तक्रारकर्त्याला शारीरिक व मानसिक त्रास सहन करावा लागला. त्यामुळे तक्रारकर्ता यांनी सदर तक्रार मंचामध्ये दाखल करुन, विनंती केली ती खालीलप्रमाणे . .
विनंती - तक्रारकर्त्याची तक्रार मंजूर व्हावी आणि तक्रारकर्त्यास देण्यात आलेले माहे नोव्हेंबर 2013 चे देयक गैरवाजवी असल्याने ते रदद् करावे, त्याऐवजी योग्य देयक खुलाश्यासह मिळावे. विरुध्द पक्षाने लावलेल्या मिटरची तपासणी, त्यांच्या खर्चाने करण्यात यावी, मिटर सदोष असल्यास तात्काळ काढून अचूक, योग्य मिटर लावून देण्यात यावे. तक्रारकर्त्याला झालेल्या शारीरिक, मानसिक त्रासाबद्दल तसेच कागदपत्रांचा खर्च म्हणून विरुध्द पक्षाकडून रुपये 10,000/- नुकसान भरपाई देण्याचा आदेश व्हावा, व भविष्यात विरुध्द पक्षाकडून अकारण त्रास देण्यात येऊ नये.
सदर तक्रार शपथेवर दाखल असुन, त्यासोबत एकंदर 3 दस्तऐवज पुरावा म्हणून सादर केली आहेत.
2) विरुध्द पक्षाचा लेखी जवाब -
वरील प्राप्त तक्रारीची विरुध्द पक्ष यांना नोटीस काढल्यानंतर विरुध्द पक्ष यांनी त्यांचा लेखी जबाब / लेखी युक्तिवाद ( निशाणी-4 प्रमाणे ) मंचात दाखल केला असुन,त्यानुसार त्यांनी तक्रारकर्ता यांचे बहुतांश कथन फेटाळले. विरुध्द पक्षाने पुढे नमुद केले की, तक्रारकर्त्याला देण्यात आलेले माहे नोव्हेंबर 2013 चे देयक हे बरोबर असुन,तक्रारकर्त्याचा वीज वापर तेवढा असल्यामुळे देण्यात आलेले आहे. ते देयक न भरल्यास नियमानुसार विदयुत पुरवठा बंद करणे भाग पडेल. मीटर तपासणीचा खर्च विरुध्द पक्ष यांच्या नियमानुसार तक्रारकर्त्यानी दयावा, त्यानुसार तपासणी करण्यात येईल. तक्रारकर्ता यांना दिलेले देयक योग्य असल्यामुळे व त्यांचा वीज वापर हा त्यांच्या उपकरणानुसार असल्यामुळे ते रदद् करण्याचा प्रश्न येत नाही तसेच तक्रारकर्ता यांना कोणत्याही प्रकारचा त्रास झाला नाही, त्यामुळे नुकसान भरपाईचा प्रश्नच उद्भवत नाही. ऊलटपक्षी तक्रारकर्ता यांनी खोटी व खोडसाळपणाची तक्रार केल्यामुळे, विरुध्द पक्षास या प्रकरणाकरिता लागलेला खर्च तक्रारकर्त्याकडून मिळावा.
सदर जबाब, विरुध्द पक्ष यांनी, शपथेवर, सादर केला.
3) कारणे व निष्कर्ष ::
या प्रकरणातील तक्रारकर्ता यांची तक्रार, विरुध्द पक्ष यांचा लेखी जबाब, उभय पक्षाने दाखल केलेल्या दस्तऐवजांचे काळजीपूर्वक अवलोकन मंचाने केले व खालील निष्कर्ष कारणे देऊन नमुद केला.
तक्रारकर्ता जेष्ठ नागरीक आहे तसेच नालंदा नगर, वाशिम येथील रहिवासी आहे. तक्रारकर्ता विद्युत वितरण कंपनीचा नियमीत ग्राहक असून त्यांचा वीज ग्राहक क्रमांक -326010151981 हा आहे, हे विरुध्द पक्ष यांना कबूल आहे. तक्रारकर्ता यांच्या तक्रारीमध्ये दिनांक 10/10/2013 ते 10/11/2013 म्हणजेच माहे नोव्हेंबर च्या देयकामध्ये एकूण वीज वापर हा 164 युनिटचा दर्शविलेला असून, तो अवाजवी आहे, हे निदर्शनास येते. कारण तक्रारकर्ता यांनी त्यांचे आधीचे जे देयक म्हणजेच जे दस्तऐवज दाखल केले आहेत. त्यामधील जानेवारी-2013 चे युनिट 11, फेब्रुवारी-2013 चे युनिट 1, मार्च-2013 चे युनिट 11, एप्रिल-2013 चे युनिट 14, मे-2013 चे युनिट 14, जुन-2013 चे युनिट 11,जुलै-2013 चे युनिट 8, ऑगष्ट-2013 चे युनिट 8, सप्टेंबर-2013 चे युनिट 7, तर ऑक्टोंबर-2013 चे युनिट 10 व नोव्हेंबर-2013 चे युनिट 164 दर्शविलेले आहे. जानेवारी-2013 ते ऑक्टोंबर-2013 हया दरम्यान एकूण वीज वापर हे फक्त 1 ते 20 युनिटच्या दरम्यानच दिसत आहे. तक्रारकर्ता यांनी, दिनांक 18/12/2013 रोजी महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळ, वीज देयक वितरण विभाग, शाखा वाशिम यांना अर्ज करुन, हयाविषयी माहिती दिली आहे. परंतु त्या अर्जावर विरुध्द पक्ष वीज कंपनीने कोणतीही कार्यवाही केलेली दिसत नाही. तसेच तक्रारकर्त्याचा अर्ज असूनही, मिटर तपासणीचा अहवाल मागविलेला नाही.
तसेच विरुध्द पक्षाने घेतलेला बचाव हा केवळ नकारार्थी कथनात आहे, त्यामुळे त्यांनी तक्रारकर्त्याला दिलेले नोव्हेंबर-2013 चे देयक कसे वाजवी आहे, हे सिध्द होत नाही. म्हणून विरुध्द पक्ष – वीज कंपनीने, तक्रारकर्त्याला माहे नोव्हेंबर-2013 चे देयक अवाजवी दिलेले आहे, असे मंचाचे मत आहे. त्यामुळे ते देयक रद्द होण्यास पात्र आहे, या निष्कर्षाप्रत मंच पोहचलेले आहे. तसेच विरुध्द पक्षाचे हे कृत्य म्हणजेच त्यांची सेवेतील न्युनता आहे.
सबब, पुढीलप्रमाणे अंतिम आदेश पारित करत आहे.
अंतिम आदेश
- तक्रारकर्ता यांची तक्रार अंशत: मंजूर करण्यांत येत आहे.
2) विरुध्द पक्षाने, तक्रारकर्त्याला दिलेले माहे नोव्हेंबर-2013 चे देयक रद्द करुन, त्याऐवजी योग्य देयक खुलाश्यासह दयावे.
- विरुध्द पक्ष यांनी तक्रारकर्त्यास शारीरिक, मानसिक, आर्थिक नुकसान भरपाईपोटी रुपये 5,000/- (रुपये पाच हजार फक्त) व तक्रारीचा खर्च रुपये 2,000/- (रुपये दोनहजार फक्त) दयावा.
- विरुध्द पक्ष यांनी या आदेशाचे पालन, आदेशाची प्रत मिळाल्यापासून 45 दिवसाचे आत करावे व तसा पूर्तता अहवाल मंचात दाखल करावा.
- उभय पक्षांना या आदेशाच्या प्रती निशुल्क पुरवाव्या.
(श्रीमती जे.जी. खांडेभराड) (श्री. ए.सी.उकळकर) ( सौ. एस.एम. उंटवाले )
सदस्या. सदस्य. अध्यक्षा.
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्याय मंच, वाशिम.