::: नि का ल प ञ:::
(मंचाचे निर्णयान्वये, मा. सौ. कल्पना जांगडे (कुटे) मा.सदस्या)
(पारीत दिनांक :- 29/06/2019)
1. तक्रारकर्त्याने सदर तक्रार ग्राहक संरक्षण कायदा 1986 चे कलम 12 अन्वये दाखल केली असून तक्रारीचा थोडक्यात आशय थोडक्यात खालील प्रमाणे.
2. तक्रारकर्ता हे शेतकरी असून ते वाडवडिलांचे काळापासून शेती करीत आहेत. तक्रारकर्ता हे त्यांचे वडील मधुकर चन्ने यांचेसोबत एकत्र रहात असून ते व त्यांचे भाऊ श्री.राकेश यांच्या मालकीचे मौ.पांढरपवनी, भु.क्र.205 आराजी 1.90 हे.आर.शेतजमिनीवर शेती करतात. तक्रारकर्त्याने दि.22/5/2013 रोजी वडिलांसोबत जाऊन वि.प.क्र.4 यांचे दुकानातून वि.प.क्र.5 निर्मीत बि.टी.कॉटन कपाशीचे वाण एमआरसी 7651 चे पाच पाकीट खरेदी केले व त्यानंतर शेतात बियाण्याची पेरणी केली. मात्र बियाणे दोषपूर्ण असल्याने त्याची उगवण झाली नाही. सबब तक्रारकर्त्याने दि.6/7/2013 रोजी याबाबत वि.प.क्र.1 व 2 यांचेकडे तक्रार केली. मात्र वि.प.क्र.1 ते 3 यांनी वि.प.क्र.4 व 5 यांचेसोबत संगनमत करून खोटा तपासणी अहवाल तयार केला. सदर अहवालात बियाण्याची उगवण शक्ती सदोष असल्याचे दिसून येते असे नमूद असले तरी बियाणे सदोष आहे असे म्हणता येणार नाही असा निष्कर्ष काढलेला आहे. मात्र यावरून बियाणे सदोष होते व त्यामुळे उगवण झाली नाही हे निदर्शनांस येते. बियाण्याची उगवण न झाल्यामुळे तक्रारकर्त्याला 2013 च्या संपूर्ण हंगामात पिक घेता आले नाही व त्याचे आर्थीक नुकसान झाले. सबब तक्रारकर्त्याने वि.प.क्र.4 यांनी वि.प.क्र.5 निर्मीत बि.टी.कॉटन कपाशीचे वाण एमआरसी 7651 हे सदोष बियाणे विकले व
वि.प.क्र.1 ते 3 यांनी वि.प.क्र.4 व 5 यांचेसोबत संगनमत करून खोटा तपासणी अहवाल तयार केला याकरीता अधिवक्त्यामार्फत विरूध्द पक्षांना नोटीस बजावून नुकसान भरपाईची मागणी केली. परंतु वि.प.क्र.1 ते 4 यांनी नोटीस प्राप्त होवूनदेखील उत्तर दिले नाही तर वि.प.क्र.5 यांनी खोटे उत्तर दिले. सबब तक्रारकर्त्याने मंचासमक्ष विरूध्द पक्षांविरूध्द तक्रार दाखल करुन त्यामध्ये मागणी केली की, विरूध्द पक्षांनी तक्रारकर्त्यांस सदोष व निःकृष्ट प्रतीचे बियाणे विकल्यामुळे तक्रारकर्त्यास झालेल्या, शारिरीक, मानसीक त्रास व आर्थीक नुकसानापोटी नुकसानभरपाई दाखल प्रत्येकी रू.50,000/- तसेच तक्रारीच्या खर्चापोटी प्रत्येकी रू.10,000/- द्यावेत.
3. तक्रारकर्त्याची तक्रार स्विकृत करुन विरूध्द पंक्षा विरुध्द नोटीस काढण्यात आले. विरूध्द पक्ष क्र.1 ते 3 हजर होवून त्यांनी आपले संयुक्त लेखी कथन दाखल करून त्यात तक्रारकर्ता हा शेतकरी असून त्याने दिनांक 6 जूलै,2013 रोजी बियाण्याच्या उगवणीसंबंधी तक्रार दाखल केली होती हे मान्य केले आहे. त्यांनी नमूद कले की, सदर तक्रारीअनुषंगाने वि.प.क्र.1 व 2 चे निर्देशांन्वये वि.प.क्र.3 अंतर्गत कार्यरत तालुका चौकशी समितीने संबंधिताना पूर्वसुचना देवून दिनांक 8 ऑगस्ट,2013 रोजी तक्रारकर्त्याचे शेतातील पिकाची मौका तपासणी केली. त्यावेळी चौकशी समितीचे सर्व अधिकारी/प्रतिनिधी तसेच तक्रारकर्त्याचे कुटूंबीय आई,भाऊ श्री.राकेश मधुकर चन्ने, सुमन मधुकर चन्ने, संजय शं.चन्ने, संजय दत्तुजी खनके व शैलेंद्र लटारी खनके हे उपस्थीत होते. सदर चौकशीत समितीने, तक्रारकर्त्याकडील उपलब्ध पाकीट/डबा यावरील नोंदी तसेच देयकावरील लॉट व इतर नोंदींवरून तक्रारकर्त्याने दिनांक 22 मे,2013 रोजी वि.प.क्र.4 कडून वि.प.क्र.5 निर्मीत कपाशी बियाणे विकत घेवून जून महिन्यात पेरणी केली याबाबत खातरजमा केली. पंचांचे समक्ष आढळलेल्या परिस्थितीनुसार वस्तुनिष्ठ पंचनामा तयार केला, सदर अहवालामध्ये तक्रारकर्ता शेतक-याचे सर्व्हे क्र.205 हे समपातळीत नव्हते व आजूबाजूच्या शेतक-यांच्या शेतातील पावसाचे पाणी तक्रारकर्त्याच्या शेतातून उतार असल्यामुळे वाहून गेल्याचे आढळून आले तसेच अतिपावसामुळे आंतरमशागत न झाल्याने तणनियंत्रणात नसल्याचे आढळले. आणी शेतात अतिरिक्त पावसाचे पाण्याचा निचरा होत नसल्याचे आढळून आले. वरील परिस्थितीत असमतोल जमिनीमुळे पावसाच्या पाण्यामुळे बियाणे वाहून जाण्याची, आजुबाजूचे शेतातून वाहून आलेल्या गाळाखाली दबण्याची तसेच पाण्याचा निचरा न झाल्यामुळे पाणी साचून बियाणे सडण्याची शक्यता असल्यामुळे याचा सदर बियाण्याच्या उगवणक्षमतेवर दुरगामी परिणाम झाल्याचा निष्कर्ष समितीने काढला. याशिवाय वि.प.क्र.5 कंपनीकडून एमआरसी7351 बीजी 2, लॉट क्र.100290 ची एकूण 1980 पाकीटे वितरकास व त्यातून 30 पाकिटे वि.प.क्र.4 या किरकोळ विक्रेत्यांस विक्रीकरीता उपलब्ध झाली. वि.प.क्र.4 ने तक्रारकर्त्यांस 5 पाकीटे व त्याच परिसरातील अन्य शेतक-यांना उर्वरीत बियाणे विकले, परंतु सदर बियाण्याबाबत तक्रारकर्त्याच्याच क्षेत्रातील इतर कोणत्याही शेतक-याची कोणतीही तक्रार नाही. यावरून सदर बियाण्याची उगवण क्षमता सदोष होती असे म्हणता येत नाही असा समितीने निष्कर्ष काढला. सदर निष्कर्ष वास्तवीक व शास्त्रशुध्द तपासणीवर आधारीत असून त्याला खोटा व बनावट म्हणणे संयुक्तीक नाही. सबब तक्रारकर्त्याने दाखल केलेली तक्रार खोटी असल्याने ती खर्चासह खारीज करण्यात यावी अशी त्यांनी विनंती केलेली आहे.
4. प्रस्तुत तक्रारीअनुषंगाने मंचाचा नोटीस प्राप्त होवूनदेखील वि.प.क्र.4 हे मंचासमक्ष उपस्थीत झाले नाहीत तसेच त्यांनी कोणताही बचाव सादर केला नाही. सबब मंचाने दि.13 जून,2017 रोजी वि.प.क्र.4 विरूध्द नि.क्र 26एकतर्फा कारवाईचा आदेश पारीत केला.
5. मंचाचा नोटीस प्राप्त झाल्यानंतर वि.प.क्र.5 यांनी मंचासमक्ष उपस्थीत होवून आपले लेखी उत्तर दाखल केले. त्यांत वि.प.क्र.5 ने प्राथमीक आक्षेप नोंदविला की बियाणे खरेदीबाबत वि.प.क्र.4 ने दिलेली पावती ही श्री.मधुकर चन्ने यांचे नांवाने असून तक्रारकर्ता हा ग्राहक नाही व त्यामुळे त्याला तक्रार दाखल करण्याचा अधिकार नाही. शिवाय तक्रारकर्ता शेतकरी असल्याबाबत पुराव्यादाखल शेतीचा 7/12 उतारा प्रकरणात दाखल केलेला नाही. वरील कारणास्तव तक्रार खारीज होण्यांस पात्र आहे. एवढेच नव्हे तर तालुका चौकशीसमितीने तक्रारकर्त्याचे तक्रारीनुषंगाने मौका तपासणी करून वि.प.क्र.5 निर्मीत बियाणे सदोष नसल्याचा निष्कर्ष नोंदविलेला आहे. याव्यतिरीक्त सदर बियाणे सदोष असल्याबाबत तक्रारकर्त्याने अन्य कोणताही तज्ञाचा अहवाल सादर केलेला नाही. सबब तक्रारकर्त्याने दाखल केलेली तक्रार खोटी असल्याने ती खर्चासह खारीज करण्यात यावी अशी त्यांनी विनंती केलेली आहे.
6. तक्रारकर्त्याची तक्रार, दस्तावेज, शपथपत्र, लेखी युक्तिवाद तसेच लेखी युक्तिवाद व दस्तवेजांतील मजकुरालाच तक्रारकर्त्याचा तोंडी युक्तिवाद समजण्यात यावे अशी नि.क्र. 32 वर दि.10.1.2019 रोजी पुरसीस दाखल तसेच विरूध्द पक्ष क्र 1 ते 3 यांचे संयुक्त लेखी म्हणणे, वि.प.क.5 चे लेखी कथन, शपथपत्र, तसेच तक्रारकर्ता व विरूध्द पक्षांचे परस्पर विरोधी कथनावरुन खालील मुद्दे मंचाच्या विचारार्थ घेण्यात आले. त्याबाबतची कारणमिमांसा आणी निष्कर्ष पुढील प्रमाणे.
मुद्दे निष्कर्ष
1) विरूध्द पक्ष क्र.1 ते 5 यांनी तक्रारकर्त्याप्रती न्युनता पूर्ण
सेवा दिली आहे काय ? : नाही
2) तक्रारकर्ता मागणीप्रमाणे दाद मिळण्यास पाञ आहे
काय ? : अंतिम आदेशाप्रमाणे.
कारण मिमांसा
मुद्दा क्रं. 1 बाबत ः-
7. तक्रारकर्त्याची तक्रार, वि.प.क्र1ते3 व वि.प.क्र4 यांचे लेखी उत्तर ,शपथपत्र तसेच तक्रारीत नि.क्र.4 वर दाखल दस्तावेजांचे अवलोकन केले असता असे निदर्शनांस येते की तक्रारकर्त्याच्या कटूंबाचे मालकीची मौ.पांढरपवनी, भु.क्र.205 शेतजमिन असून तक्रारकर्त्याने दि.22.5.2013 रोजी वडिलांसोबत जाऊन वि.प.क्र.4 यांचे दुकानातून वि.प.क्र.5 निर्मीत बि.टी.कॉटन कपाशीचे वाण एम आर सी 7351 चे पाच पाकीट खरेदी केले हे प्रकरणात दाखल खरेदी पावतीवरून निदर्शनांस येते. सबब तक्रारकर्ता हे ग्राहक आहेत याबाबत संदिग्धता नाही.
8. तक्रारकर्त्याने सदर शेतात उपरोक्त बियाण्याची दिनांक 11/7/2013रोजी पेरणी केली. मात्र बियाणे दोषपूर्ण असल्याने त्याची उगवण झाली नाही अशी तक्रारकर्त्याने दि.6/7/2013 रोजी वि.प.क्र.1 व 2 यांचेकडे तक्रार केली. सदर तक्रारीअनुषंगाने वि.प.क्र.1 व 2 चे निर्देशांन्वये वि.प.क्र.3 अंतर्गत कार्यरत तालुका चौकशी समितीने संबधितांना पूर्वसुचना देवून दिनांक 8 ऑगस्ट,2013 रोजी तक्रारकर्त्याचे शेतातील पिकाची मौका तपासणी केली. त्यावेळी चौकशी समितीचे सर्व अधिकारी/प्रतिनिधी तसेच तक्रारकर्त्याचे कुटूंबीय आई,भाऊ श्री.राकेश मधुकर चन्ने, सुमन मधुकर चन्ने, संजय शं.चन्ने, संजय दत्तुजी खनके व शैलेंद्र लटारी खनके हे उपस्थीत होते. सदर चौकशीत समितीने, तक्रारकर्त्याकडील उपलब्ध पाकीट/डबा यावरील नोंदी तसेच देयकावरील लॉट व इतर नोंदींवरून तक्रारकर्त्याने दिनांक 22 मे,2013 रोजी वि.प.क्र.4 कडून वि.प.क्र.5 निर्मीत कपाशी बियाणे विकत घेवून जून महिन्यात पेरणी केली याबाबत खातरजमा केली. पंचांचे समक्ष आढळलेल्या परिस्थितीनुसार वस्तुनिष्ठ पंचनामा तयार केला, त्यात, तक्रारकर्ता शेतक-याचे सर्व्हे क्र.205 हे समपातळीत नव्हते व आजूबाजूच्या शेतक-यांच्या शेतातील पावसाचे पाणी तक्रारकर्त्याच्या शेतातून उतार असल्यामुळे वाहून गेल्याचे आढळून आले तसेच अतिपावसामुळे आंतरमशागत न झाल्याने तणनियंत्रणात नसल्याचे आढळले. आणी शेतात अतिरिक्त पावसाचे पाण्याचा निचरा होत नसल्याचे आढळून आले
तसेच सदर तपासणी अहवालाच्या निष्कर्षामध्ये बियाण्यांचा गुणात्मक दर्जा म्हणजे उगवण शक्तीमध्ये तृटी असल्याचे दिसून येत नाही असे नमूद आहे . सदर अहवाल दस्त क्र.अ-5 वर दाखल आहे. याशिवाय वि.प.क्र.5 कंपनी निर्मीत सदर लॉट च्या विक्रीसाठी प्राप्त 30 पाकिटांपैकी वि.प.क्र.4 ने तक्रारकर्त्यांस 5 पाकीटे व त्याच परिसरातील अन्य शेतक-यांना उर्वरीत बियाणे विकले, परंतु सदर बियाण्याबाबत तक्रारकर्त्याच्याच क्षेत्रातील इतर कोणत्याही शेतकऱ्यांची कोणतीही तक्रार नाही. यावरून सदर बियाण्याची उगवण क्षमता सदोष होती असे म्हणता येत नाही असा निष्कर्ष समितीने काढला आहे. तक्रारकर्त्याने सदर तपासणी अहवालातील निष्कर्ष खोटा व बनावट असल्याबाबत कोणताही पुरावा तसेच सदर बियाणे सदोष असल्याबाबत कोणताही तज्ञाचा अहवाल सादर केलेला नाही. सबब तक्रारकर्त्याने दाखल केलेली तक्रार सिध्द होत नसल्याने ती खारीज होण्यांस पात्र आहे या निष्कर्षाप्रत मंच आलेले आहे. सबब मुद्दा क्र. 1 चे उत्तर नकारार्थी नोंदविण्यात येते.
मुद्दा क्रं. 2 बाबत ः-
9. मुद्दा क्रं. 1 च्या विवेचनावरुन मंच खालील प्रमाणे आदेश पारीत करीत आहे.
अंतीम आदेश
(1) तक्रारकर्त्यांची तक्रार खारीज करण्यात येते
(2) उभय पक्षांनी आपआपला तक्रारीचा खर्च सोसावा.
(3) उभय पक्षांना आदेशाची प्रत तात्काळ पाठविण्यात यावी .
चंद्रपूर
दिनांक – 29/06/2019
(श्रीमती.कल्पना जांगडे(कुटे)) (श्रीमती. किर्ती वैदय (गाडगीळ)) (श्री. अतुल डी. आळशी)
सदस्या सदस्या अध्यक्ष
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्यायमंच, चंद्रपूर.