निकालपत्र
तक्रार दाखल दिनांकः- 02/07/2013
तक्रार नोदणी दिनांकः- 09/07/2013
तक्रार निकाल दिनांकः-12/03/2014
कालावधी 1 वर्ष 8 महिने 10 दिवस
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्यायमंच, परभणी
अध्यक्ष - श्री प्रदीप निटुरकर, B.Com.LL.B.
सदस्या - सौ.अनिता ओस्तवाल M.Sc.LL.B.
1 नरेंद्र पि.वैनसुख जोशी अर्जदार
वय 27 वर्षे, धंदा व्यापार, अWड.ए.डी.गिरगांवकर
रा.व्दारा सत्यनारायण कन्हैयालाल व्यास, (अर्जदार क्र.1 व 2 करिता)
दत्त नगर परभणी,
ता.जि.परभणी.
2 अमृता भ्र. नरेंद्र जोशी
वय 24 वर्षे, धंदा – घरकाम,
रा.वरीलप्रमाणे
विरुध्द
स्टेशन मास्तर, गैरअर्जदार
दक्षिण मध्य रेल्वे परभणी, अWड.ए.जी.सोनी
जि.परभणी.
------------------------------------------------------------------------------------
कोरम - 1) श्री.प्रदीप निटुरकर, अध्यक्ष.
2) सौ.अनिता ओस्तवाल, सदस्या.
-------------------------------------------------------------------------------------------------------
(निकालपत्र पारित व्दारा – सौ.अनिता ओस्तवाल, सदस्या)
गैरअर्जदाराने ञुटीची सेवा दिल्याच्या आरोपावरुन अर्जदारांनी ही तक्रार मंचात दाखल केली आहे.
अर्जदारांची थोडक्यात तक्रार अशी की,
अर्जदारांनी दिनांक 01.11.2011 रोजी बार्शी ते परभणी व परभणी ते बार्शी रेल्वे गाडी क्रमांक 07501 आदिलाबाद ते पंढरपुरला जाणा-या गाडीचे S-4 बोगीचे आसन क्रमांक 25 व 28 आरक्षीत केले होते. दिनांक 06.11.2011 रोजी बार्शीला जाण्यासाठी परभणी रेल्वे स्थानकावर 0.03 वाजता अर्जदार क्र.1 व 2 आले होते. त्यावेळी सदरील रेल्वेला खुप गर्दी होती. त्याशिवाय सदरील रेल्वेच्या कोणत्याही बोगीवर नंबर वगैरे दर्शविण्यात आला नव्हता. म्हणुन त्यांना आरक्षीत केलेल्या जागेवर सुध्दा प्रवास करता आला नाही. वास्तविक पाहता अर्जदारांना व्यापाराच्या उद्देशाने बार्शिला जाणे अत्यंत महत्वाचे होते. परंतु ठरल्याप्रमाणे त्यांना बार्शिला पोहचता आले नाही. त्यामुळे त्यांचे आर्थिक नुकसान झाले. म्हणुन अर्जदारांनी मंचात तक्रार दाखल करुन गैरअर्जदाराने आरक्षीत तिकीटांचे रक्कम रुपये 312/- अर्जदारांना परत करावेत तसेच मानसीक ञासापोटी रक्कम रुपये 10,000/- व तक्रार अर्जाच्या खर्चापोटी रक्कम रुपये 1000/- अर्जदारांना मिळावेत अशी मागणी अर्जदारांनी मंचासमोर केली आहे.
अर्जदारांनी तक्रार अर्जासोबत शपथपञ नि.2 वर व पुराव्यातील कागदपञ नि.4वर मंचासमोर दाखल केली.
मंचाची नोटीस गैरअर्जदारास तामील झाल्यानंतर नेमल्या तारखेस हजर होवुन लेखी निवेदन दाखल करण्यासाठी वेळ मागीतला. त्यानंतर अनेक वेळा संधी देवुनही गैरअर्जदाराने मुदतीत लेखी निवेदन दाखल न केल्यामुळे त्याच्या विरोधात No Say आदेश पारीत करण्यात आला.
अर्जदाराच्या कैफियतीवरुन खालील मुद्दे उपस्थित होतात.
मुद्ये उत्तर
1 गैरअर्जदाराने अर्जदारास ञुटीची सेवा
दिल्याचे शाबीत झाले आहे काय ? होय
2 अर्जदार कोणती दाद मिळण्यास पाञ आहे ? अंतीम आदेशाप्रमाणे
कारणे
मुद्दा क्रमांक 1 व 2 -
अर्जदारांनी दिनांक 01.11.2011 रोजी बार्शी ते परभणी व परभणी ते बार्शी रेल्वे गाडी क्रमांक 07501 आदिलाबाद ते पंढरपुर जाणा-या गाडीचे S-4 बोगीचे आसन क्रमांक 25 व 28 आरक्षीत केले होते. दिनांक 06.11.2011 रोजी अर्जदार हे रेल्वे स्थानकावर आले होते. परंतु रेल्वेला खूप गर्दी झाल्यामुळे व रेल्वेच्या बोगीवर बोगी क्रमांक दर्शविलेले नसल्यामुळे त्यांना आरक्षीत जागेवर पोहचता आले नाही व त्यांना नियोजन केल्याप्रमाणे बार्शीला जाता आले नाही अशी थोडक्यात अर्जदाराची तक्रार आहे. अर्जदाराने मंचासमोर दाखल केलेल्या नि.क्र.4 वरील पुराव्यातील कागदपञाची पडताळणी केली असता अर्जदाराच्या कथनात तथ्य असल्याचे जाणवते. अर्जदारांकडे दिनांक 06.11.2011 रोजी परभणी ते बार्शी असा प्रवास करण्यासाठीचे कन्फर्म तिकीट असल्याचे स्पष्ट होते. परंतु सदर रेल्वेला खूप गर्दी असल्यामुळे व कोणत्याही बोगीवर नंबर वगैरे दर्शविण्यात आलेले नसल्यामुळे त्यांना ठरल्याप्रमाणे प्रवास करता आला नाही म्हणुन अर्जदारांनी त्याच दिवशी गैरअर्जदाराकडे तक्रार दाखल केल्याचेही निदर्शनास येते. वास्तविक पाहता प्रवास आरामदायी व कोणत्याही ञासाविना करता यावा म्हणुन प्रवासी आरक्षणासाठी जास्त चार्जेस देवुन तिकीट कन्फर्म करतो व त्या मोबदल्यात सुखकर प्रवासाची अपेक्षा करतो. परंतु रेल्वेच्या गलथान कारभारामुळे जर प्रवाशांना प्रवासच करता येत नसेल तर ती नक्कीच गैरअर्जदारांच्या सेवेत ञुटी असल्याचे मंचाचे मत आहे. सबब मुद्दा क्र.1 चे उत्तर होकारार्थी देवुन आम्ही खालील प्रमाणे आदेश पारीत करीत आहोत.
आ दे श
1 अर्जदाराचा तक्रार अर्ज अशंतः मंजूर करण्यात येत आहे.
2 गैरअर्जदाराने निकाल कळाल्यापासुन 30 दिवसांच्या आत तिकीटाची रक्कम रुपये 312/- अर्जदारास परत करावी.
3 गैरअर्जदाराने मानसीक ञासापोटी रक्कम रुपये 1000/- व तक्रारीच्या खर्चापोटी रक्कम रुपये 500/- आदेश मुदतीत अर्जदारास द्यावे.
4 दोन्ही पक्षांना आदेशाच्या प्रती मोफत पुरावाव्यात.
सौ.अनिता ओस्तवाल श्री.प्रदीप निटुरकर
सदस्या अध्यक्ष