::: आ दे श :::
( पारीत दिनांक : 16/07/2015 )
आदरणीय अध्यक्षा सौ. एस. एम. उंटवाले, यांचे अनुसार
1. ग्राहक संरक्षण कायदा 1986 चे, कलम : 12 अन्वये, सादर करण्यात आलेल्या, सदर तक्रारीचा सारांश येणेप्रमाणे, …
तक्रारकर्त्यांनी तिरुपती येथील बालाजी देवस्थान मध्ये दर्शनाकरिता जाण्याकरिता दि. 08/03/2014 रोजी दि. 10/04/2014 ला अमरावती – तिरुपती एक्सप्रेसने जाण्याकरिता तिकीटची बुकींग केली, त्याचा तिकीट क्र. बी-04843574 व बी.04843577 असा आहे. तक्रारकर्ते दि. 10/04/2014 रोजी गाडीच्या दिलेल्या वेळेमध्ये अकोला स्टेशनवर पोहचले व ते, त्यांना दिलेल्या रेल्वेच्या बोगी क्र. एस 5 मध्ये बसले. त्यावेळेस त्यांना असे आढळून आले की, सदर बोगीमध्ये बेसीन व टॉयलेट मध्ये पाणी नाही. त्यावर तक्रारकर्त्यांनी सदर माहिती बोगीच्या टी.टी.ई ला दिली. सदर गाडी निघण्याची वेळ झाली असल्यामुळे टी.टी.ई ने तक्रारकर्त्यांची समस्या ही नांदेड स्टेशन येथे सोडविण्यात येईल, कारण पुढील पाणी भरण्याची व्यवस्था ही नांदेड स्टेशन येथे आहे, असे सांगितले. सदर गाडी ज्यावेळेस नांदेड स्टेशन येथे पोहचली त्यावेळेस नांदेड स्टेशन येथील कोण्याही कर्मचा-याने सदर बोगी क्र. एस-5 मध्ये पाणी भरले नाही. या बाबतची माहिती टी.टी.ई यांना दिली असता त्यांनी असे म्हटले की, मला काहीही माहिती नाही व रेल्वे मध्ये पाणी भरण्याची व्यवस्था ही पुढे तिरुपती येथे आहे. तक्रारकर्त्यांनी सदर टी.टी.ई. ला तक्रार रजिस्टर मागीतले असता, त्याने ते सुध्दा देण्यास नकार दिला. त्यानंतर दुस-या दिवशी म्हणजे दि. 11/4/2014 रोजी तक्रारकर्ता क्र. 1 याने सर्व तक्रारकर्त्यांच्या वतीने विरुध्दपक्ष क्र. 2 यांच्याकडे संपुर्ण घटनेची तक्रार नोंदविली. तक्रारकर्ते यांना झालेल्या त्रासाला विरुध्दपक्ष क्र. 1 ते 4 हे सर्वस्वी जबाबदार आहेत. सदर बोगीमध्ये पाणी नसल्याने व उन्हाळयाचे दिवस असल्याने पाण्याअभावी तक्रारकर्त्यांना खुपच त्रास सोसावा लागला. तक्रारकर्ता क्र. 2 यांना दुस-या बोगीध्ये जाण्याकरिता रु. 1340/- अतिरीक्त द्यावे लागले. अशा प्रकारे विरुध्दपक्षांनी सेवा देण्यामध्ये न्युनता, निष्काळजीपणा व हलगर्जीपणा केल्यामुळे तक्रारकर्त्यांना बराच त्रास सहन करावा लागला. तक्रारकर्ता क्र. 1 ने केलेल्या तक्रारीवर विरुध्दपक्ष क्र. 1 ते 4 यांनी कुठल्याही प्रकारचा ठोस निर्णय घेतला नाही, त्यामुळे तक्रारकर्त्यांनी दि. 23/06/2014 रोजी विरुध्दपक्ष क्र. 1 ते 4 यांना रजिस्टर्ड पोस्टाद्वारे नोटीस पाठविली व नुकसान भरपाईची मागणी केली. या नोटीसला विरुध्दपक्ष क्र. 2 व 3 यांनी खोटे उत्तर पाठविले व विरुध्दपक्ष क्र. 1 यांनी अद्यापपावेतो कुठलेही उत्तर दिलेले नाही. तक्रारकर्त्यांनी प्रस्तुत तक्रार मंचासमक्ष दाखल करुन विनंती केली आहे की, तक्रारकर्त्यांची तक्रार मंजुर व्हावी व तक्रारकर्त्यांना अकोला ते तिरुपती तिकीटचे पैसे रु. 3880/-, तक्रारकर्ता क्र. 2 यांना बोगी बदलण्याकरिता लागलेले अतिरिक्त रक्कम रु. 1340/- तसेच तक्रारकर्त्यांना मानसिक, आर्थिक व शारीरिक त्रासापोटी प्रत्येकी रु. 25,000/- असे रु. 2,00,000/- व तक्रारकर्त्यानी पाठविलेल्या नोटीसचा खर्च रु. 2000/- विरुध्दपक्ष क्र. 1 ते 4 कडून मिळवून देण्यात यावे तसेच संपुर्ण रकमेवर 18 टक्के दराने व्याज मिळावे.
सदर तक्रार शपथेवर दाखल असून त्यासोबत एकंदर 15 दस्तऐवज पुरावे म्हणून जोडण्यात आले आहेत.
विरुध्दपक्ष क्र. 1 ते 4 यांचा लेखीजवाब :-
2. सदर तक्रारीचे अनुषंगाने, विरुध्दपक्ष यांनी आपला लेखीजवाब, शपथेवर दाखल केला. त्यानुसार तक्रारकर्त्याच्या तक्रारीतील विधाने नाकबुल करुन असे नमुद केले आहे की,…
सदर ट्रेन अमरावती – तिरुपती ही अमरावती रेल्वे स्टेशनवरुन सुरु होते व स्टेशन मॅनेजर, अमरावती यांनी दि.21/11/2014 रोजी कळविल्याप्रमाणे त्यांनी बोगी क्र. एस-5 मधील पाण्याची टाकी पाण्याने भरली व बोगी स्वच्छ केल्यानंतर व त्या बोगीमध्ये सर्व सुविधा असल्याचे आढळल्यानंतर दि. 10/4/2014 रोजी सदर ट्रेन वेळेवर निघाली. नांदेड स्टेशनला गाडी पोहोचल्यानंतर सदर गाडीच्या बोगींमध्ये पुन्हा पाणी भरण्यात आले व त्यानंतर सदर गाडी पुढील प्रवासाकरिता निघाली. या सर्व बाबींवरुन असे दिसून येते की, सदर गाडीच्या बोगी क्र. एस-5 मध्ये सर्व व्यवस्था व सुविधा उपलब्ध करुन दिल्या होत्या. एस-5 बोगीमध्ये अमरावती येथे पाणी भरण्यात आले तसेच नांदेड रेल्वे स्टेशनवर सुध्दा पाणी भरण्यात आले होते. त्यामुळे तक्रारकर्त्यांची केलेली तक्रार ही चुकीची आहे व म्हणून ती खारीज करण्यात यावी.
विरुध्दपक्ष यांनी सदर लेखी जवाब शपथपत्रावर दाखल केला
3. त्यानंतर तक्रारकर्त्यातर्फे व विरुध्दपक्षातर्फे तोंडी युक्तीवाद करण्यात आला.
::: का र णे व नि ष्क र्ष :::
4. या प्रकरणातील तक्रारकर्ते यांची तक्रार, विरुध्दपक्ष क्र. 1 ते 4 यांचा संयुक्त लेखी जबाब, उभय पक्षाने दाखल केलेले सर्व दस्तऐवज, उभय पक्षांचा तोंडी युक्तीवाद यांचे काळजीपुर्वक अवलोकन करुन खालील निष्कर्ष कारणे देवून नमुद केला तो येणे प्रमाणे..
याप्रकरणात उभय पक्षाला ही बाब मान्य आहे की, तक्रारकर्ते हे दि. 10/4/2014 रोजी त्यांचे तिकीट क्र. बी-04843574 व बी- 04843577 नुसार अमरावती - तिरुपती एक्सप्रेसने, तिरुपती येथे जाण्याकरिता अकोला स्टेशन वरुन सदर रेल्वेच्या बोगी क्र. एस-5 मध्ये बसले होते. अशा रितीने तक्रारकर्ते हे विरुध्दपक्षाचे ग्राहक होतात व यास विरुध्दपक्षाचा आक्षेप नाही. मंचाच्या कार्यक्षेत्राबद्दलचा कोणताही आक्षेप विरुध्दपक्षाने घेतला नाही.
तक्रारकर्ते यांच्या मते, ते जेंव्हा सदर रेल्वेच्या बोगी क्र. एस-5 मध्ये तिरुपती प्रवासाकरिता बसले तेंव्हा त्यांच्या असे लक्षात आले की, सदर बोगी मध्ये बेसीन व टॉयलेट मध्ये पाणी नाही, त्यामुळे तक्रारकर्ते यांनी सदर माहीती टी.टी.ई ला दिली, त्यांनी पाण्याची व्यवस्था नांदेड स्टेशनला सोडविण्यात येईल, असे सांगितले, परंतु नांदेड स्टेशन वरील कोणत्याही कर्मचा-याने सदर बोगी क्र. एस.-5 मध्ये पाणी भरले नाही. त्यामुळे तक्रारकर्ते क्र. 1 यांनी इतर तक्रारकर्त्यांच्या वतीने या घटनेची तक्रार विरुध्दपक्षाकडे नोंदविली, परंतु त्यावर कुठलीही कार्यवाही विरुध्दपक्षाने केली नाही. त्यामुळे पाण्याअभावी तक्रारकर्त्यांची खुप गैरसोय झाली. सबब ही विरुध्दपक्षाची सेवेतील न्युनता आहे. यावर विरुध्दपक्षाने असा युक्तीवाद केला की, रेल्वेच्या अमरावती येथील अधिका-यांनी या बाबत चौकशी केली असता, त्यांना असे निदर्शनास आले की, सदर गाडी अमरावती येथून दि. 10/4/2014 रोजी निर्धारीत वेळेला सुटली होती व बोगी क्र. एस-5 मधील पाण्याच्या टँकमध्ये अमरावतीला पाणी भरल्या गेले होते, तसेच नांदेड स्टेशनला देखील पुन्हा यात पाणी भरल्या गेले होते, त्याबद्दलचे सर्व चौकशीचे दस्त रेकॉर्डवर दाखल केले आहे.
उभय पक्षांचा युक्तीवाद ऐकल्यानंतर, उभय पक्षाने दाखल केलेले सर्व दस्तऐवज तपासले असता, असे दिसते की, सर्व तक्रारकर्त्यांच्या वतीने तक्रारकर्ता क्र. 1 यांनी सदर बाबीची तक्रार दि. 11/4/2014 रोजी विरुध्दपक्षाच्या तक्रार बुकमध्ये नोंदविली होती. त्या अनुषंगाने विरुध्दपक्ष क्र. 4 यांनी दि. 19/4/2014 रोजी तक्रारकर्ते क्र. 1 यांना असे कळविले होते की, सदर तक्रार ही नांदेड विभागाअंतर्गत येत असल्यामुळे, त्यांनी ती विरुध्दपक्ष क्र. 3 कडे फॉरवर्ड केली. रेकॉर्डवरील दि. 23/6/2014 रोजीच्या दस्ताप्रमाणे तक्रारकर्ते यांनी विरुध्दपक्षाला सदर घटना नमुद करीत, नुकसान भरपाई मागण्यासाठी कायदेशिर नोटीस पाठवली होती. दस्तऐवज क्र. 27 वरुन असा बोध होतो की, दि. 12/7/2014 रोजी विरुध्दपक्ष क्र. 2 यांनी तक्रारकर्ते यांना असे कळविले होते की, तिरुपती स्टेशनवर सदर ट्रेन मध्ये पाण्याची व्यवस्था उपलब्ध करुन दिली होती व तक्रारकर्ते यांची तक्रार योग्य कार्यवाहीसाठी विरुध्दपक्ष क्र. 4 कडे पाठविली होती. परंतु दस्तऐवज क्र. 28 प्रमाणे दि. 16/7/2014 रोजी विरुध्दपक्ष क्र. 4 ने पुन: तक्रारकर्त्यास असे कळविले आहे की, सदर ट्रेनचा nominated watering point विरुध्दपक्ष क्र. 4 कडे उपलब्ध नसल्याने सदर तक्रार विरुध्दपक्ष क्र. 3 कडे पाठविण्यात आली आहे. दाखल दस्तऐवज क्र. 29 वरुन असा बोध होतो की, विरुध्दपक्ष क्र. 3 यांनी तक्रारकर्त्यांना दि. 20/7/2014 रोजी एक पत्र पाठविले होते व त्यात संदर्भ म्हणून तक्रारकर्ते यांची दि. 10/4/2014 रोजीची तक्रार व दि. 23/6/2014 रोजीची नोटीस, असा घेवून, त्यात असे नमुद केले आहे :-
“It is to inform you that in our earlier communication with Shri Sumit Bajaj, vide letter no N/G-50/01-TRF/MAY/14-15 dt.24.06.2014, it was informed that watering to all the reserved coaches were attended at Nanded station on reception of message through proper channel. The same was agreed by shri Sumit Bajaj in his letter dt.28.5.2014”
“In view of above circumstances, the compensation demands raised by you are inadmissible; as there is contradiction in your letter dt. 23.6.2014 and statement of shri Sumit Bajaj vide letter dt. 28.5.2014”
म्हणजे विरुध्दपक्ष क्र. 3 यांनी तक्रारकर्ते क्र. 1 यांना त्यांचे पत्र क्र. N/G-50/01-TRF/MAY/14-15 नुसार असे कळविले होते की, त्यांनी नांदेड स्टेशनवर सदर रेल्वेमध्ये पाण्याची व्यवस्था उपलब्ध करुन दिली होती व ही बाब तक्रारकर्ते क्र. 1 यांनी त्यांच्या दि. 28/5/2014 रोजीच्या पत्रानुसार कबुल केलेली आहे. परंतु तरी देखील तक्रारकर्ते यांनी उपरोक्त पत्रव्यवहाराच्या प्रती रेकॉर्डवर दाखल केल्या नाही, अगर त्या बद्दलचा कोणताही खुलासा मंचासमोर केला नाही. म्हणजे तकारकर्ते स्वच्छ हाताने मंचासमोर मदत मागण्यास आलेले नाहीत, हे स्पप्ट होते, असे मंचाचे मत आहे. शिवाय विरुध्दपक्षाने दाखल केलेले दस्तऐवज जसे की, स्टेशन मॅनेजर अमरावती रेल्वे स्टेशन यांचे शपथपत्र, त्यांचा दि. 21/11/2014 रोजीचा खुलासा, विरुध्दपक्ष क्र. 3 चा दि. 6/9/2014 रोजी केलेला खुलासा व त्याबद्दलचे शपथपत्र ई. दस्तऐवज असे दर्शवितात की, सदर रेल्वे अमरावती स्टेशनवरुन सुटतांना अमरावती येथे बोगी क्र. एस-5 मध्ये पाणी भरल्या गेले होते व त्यानंतर नांदेड स्टेशनला देखील सदर रेल्वेच्या बोगीत पाणी भरल्या गेले होते. त्यामुळे विरुध्दपक्षाच्या सेवा न्युनतेबद्दल तक्रारकर्त्यांकडून योग्य तो पुरावा उपलब्ध नसल्यामुळे तक्रारकर्ते यांची प्रार्थना मंचाला मंजुर करता येणार नाही. सबब अंतिम आदेश पारीत केला तो येणे प्रमाणे.
:::अं ति म आ दे श:::
- तक्रारकर्ते यांची तक्रार खारीज करण्यात येत आहे.
- न्यायिक खर्चाबाबत कोणतेही आदेश नाही.
3) सदर आदेशाच्या प्रती उभयपक्षांना निशुल्क देण्यात याव्या.