जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, धुळे.
ग्राहक तक्रार क्रमांक – २९५/२०१० तक्रार दाखल दिनांक – १२/१०/२०१०
तक्रार निकाली दिनांक – ३०/१०/२०१४
डॉ.मंजु राधेश्याम अग्रवाल,
उ.व.- वर्षे, धंदा – वैद्यकीय व्यवसाय,
राहणार – ६, ग्रीन पार्क, ८० फुटी रोड,
धुळे, ता.जि. धुळे . तक्रारदार
विरुध्द
१) स्टेट बॅंक ऑफ इंदौर/ स्टेट बॅंक ऑफ इंडिया,
पत्ताः- पुष्पांजली मार्केट, आग्रारोड,
धुळे, ता.जि. धुळे
२) पंजाब नॅशनल बॅंक,
पत्ताः- खोलगल्ली, धुळे . सामनेवाला
(मा.अध्यक्षा – सौ.व्ही.व्ही. दाणी)
(मा.सदस्य – श्री.एस.एस.जोशी)
उपस्थिती
(तक्रारदारातर्फे – अॅड.सौ.सी.ए.अग्रवाल)
(सामनेवाला क्र.१ तर्फे – अॅड.श्री.एम.एस.पाटील)
(सामनेवाला क्र.२ तर्फे – अॅड.श्री.एन.यु. लोखंडे)
निकालपत्र
(दवाराः मा.सदस्य – श्री.एस.एस.जोशी)
१. सामनेवाले यांनी एटीएम मशीनद्वारे प्रत्यक्षात रक्कम न मिळताही खात्यातून रक्कम वजावट करून सदोष सेवा दिली या कारणावरून तक्रारदार यांनी सदरची तक्रार दाखल केली आहे.
२. तक्रारदार यांची थोडक्यात तक्रार अशी आहे की, त्यांचे सामनेवाले क्र.२ यांच्याकडे बचत खाते आहे. त्याचा क्रमांक ०१३९०००४००१६९५९३ असा आहे. तक्रारदार हे एटीएम सेवेचा वापर करतात. दिनांक १९/०८/२०१० रोजी तक्रारदार यांनी सामनेवाले क्र.१ यांच्या एटीएममधून रूपये १०,०००/- व रूपये १,०००/- अशी रक्कम काढली. त्यावेळी त्यांच्या खात्यात रूपये १३,०१३/- शिल्लक होते. दि.२४/०८/२०१० रोजी सकाळी ८.१४ वा. तक्रारदार हे सामनेवाले क्र.१ यांच्या पुष्पांजली मार्केटमधील एटीएममध्ये रक्कम काढण्यासाठी गेले. त्यावेळी त्यांनी मागणी केलेली रक्कम रूपये १०,०००/- प्रत्यक्षात प्राप्त झाली नाही. त्यावेळी मशीनमधून मिळालेल्या पावतीवर ‘सॉरी अनएबल टू प्रोसेस’ असे लिहिले होते. त्यानंतर तक्रारदार हे देना बॅंकेच्या खोलगल्ली येथील एटीएममध्ये गेले. सकाळी ८.१७ वा. त्यांनी तेथील मशीनवर व्यवहार केला. त्यावेळी त्यांना ‘अपरियाप्त निधी’ अशी पावती प्राप्त झाली. त्याचवेळी त्यांनी खात्यातील शिल्लक तपासली. सकाळी ८.१९ वा. त्यांच्या खात्यात रूपये ३,०१३/- एवढी रक्कम शिल्लक असल्याची पावती त्यांना मिळाली. तक्रारदार यांना सामनेवाले क्र.१ यांच्या एटीएममधून रूपये १०,०००/- प्रत्यक्षात प्राप्त झाले नव्हते, तरीही त्यांच्या खात्यातून तेवढी रक्कम वजा झाली होती. दि.२४/०८/२०१० रोजी सकाळी ११ वाजता त्यांनी सामनेवाले क्र.२ यांना सदर घटना सांगितली. त्यांच्या सुचनेवरून तक्रारदार यांनी ग्राहक सेवा केंद्रात तक्रार नोंदविली. दि.२५/०८/२०१० रोजी तक्रारदार यांच्या खात्यात रूपये ३,०१३/- एवढीच शिल्लक दिसत होती. त्यामुळे त्यांनी पुन्हा तक्रार नोंदविली. दि.१७/०९/२०१० रोजी चौकशी केली असता, त्यांना प्रतिसाद मिळाला नाही. दि.२२/०९/२०१० रोजी त्यांनी पुन्हा चौकशी केली असता सामनेवाले क्र.१ यांनी दावा नामंजूर केला असल्याचे त्यांना सांगण्यात आले. या प्रकारामुळे आपले रूपये १०,०००/- चे नुकसान झाले असून, सामनेवाले क्र.१ व २ यांनी सदोष सेवा दिली असल्याचे तक्रारदार यांचे म्हणणे आहे. सामनेवाले यांच्याकडून रूपये १०,०००/- मिळावे, दि.२४/०८/२०१० पासून त्यावर १५ टक्के व्याज मिळावे, तक्रारीचा खर्च रूपये ३,०००/- मिळावा अशी मागणी तक्रारदार यांनी केली आहे.
३. तक्रारदार यांनी तक्रारीसोबत सामनेवाले यांना पाठविलेली नोटीस, एटीएममधून मिळालेल्या पावत्या, सामनेवाले क्र.१ यांनी पाठविलेले उत्तर आदी कागदपत्रांच्या छायांकीत प्रती दाखल केल्या आहेत.
४. सामनेवाले क्र.१ व २ यांनी हजर होवून स्वतंत्रपणे खुलासा दाखल केला. सामनेवाले क्र.१ यांनी आपल्या खुलाशात म्हटले आहे की, तक्रारदार यांनी तक्रारीत कथन केलेला मजकूर खोटा आहे. तक्रारदार हे सामनेवाले क्र.१ यांचे ग्राहक नाहीत. एटीएमबाबत बॅंकांमध्ये अंतर्गत करार झालेला आहे. त्याचा वापर तक्रारदार यांनी केला आहे. तक्रारदार हे सामनेवाले क्र.२ यांचे खातेदार आणि ग्राहक आहेत. सामनेवाले क्र.१ यांनी त्यांना कोणतीही सदोष सेवा दिलेली नाही. तक्रारदार यांनी दि.१९/०८/२०१० रोजी सामनेवाले क्र.१ यांच्या एटीएममधून रूपये १,०००/- व रूपये १०,०००/- एवढी रक्कम काढली होती. त्यावेळी त्यांच्या खात्यात रूपये १३,०१३/- एवढी रक्कम शिलक होती. दि.२४/०८/२०१० रोजी सकाळी ८.१७ वाजता तक्रारदार यांनी एटीएममधून रूपये १०,०००/- काढले व ती रककम त्यांना मिळालेली आहे, हे व्यवहार क्र.७१२२३ यावरून सिध्द होते. ही रक्कम काढल्यानंतर त्यांच्या खात्यात रूपये ३,०१३/- एवढीच शिल्लक होती. दि.२४/०८/२०१० रोजी सकाळी ८.१७ वा. ते देना बॅंकेच्या एटीएमवर गेले असता तेथे त्यांनी अन्य म्हणजे क्र.५०४८८४०१३९०१०००४ या कार्डचा वापर केला. त्यावेळी त्यांना ‘अपरियाप्त निधी’ अशी पावती मिळाली. याचाच अर्थ तक्रारदार यांनी ८.१७ वा. पहिल्या कार्डचा म्हणजे क्र.५०४८८४०१३९०१०००४०१२ या कार्डचा वापर करून रूपये १०,०००/- काढले होते. त्यामुळे त्या खात्यात रूपये ३०१३/- एवढीच शिल्लक होती. असे असतांना त्यांनी दुस-या कार्डचा वापर करून देना बॅंकेच्या एटीएममधून पैसे काढण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी त्यांना ‘अपरियाप्त निधी’ अशी पावती मिळाली. सामनेवाले क्र.१ यांनी तक्रारदार यांना सदोष सेवा दिलेली नाही. तक्रारदार यांनी जाणीवपूर्वक तक्रार दाखल केली असून खाते पुस्तक दाखल केलेले नाही. तक्रारदार यांची तक्रार खोटी असून ती रद्द करावी अशी मागणी सामनेवाले क्र.१ यांनी केली आहे.
५. आपल्या खुलाशासोबत सामनेवाले क्र.१ यांनी तक्रारदार यांनी एटीएमवर व्यवहार केल्याच्या पावत्या, तक्रारदार यांना पाठविलेले पत्र, एटीएम स्टेटमेंट आदी कागदपत्रांच्या छायांकीत प्रती दाखल केल्या आहेत.
६. सामनेवाले क्र.२ यांनी आपल्या खुलाशात म्हटले आहे की, तक्रारदार यांनी सामनेवाले क्र.१ यांच्या एटीएम मधून रूपये १०,०००/- काढल्यामुळे त्यांच्या खात्यावर तेवढी रक्कम नावे टाकण्यात आली आहे. यात सामनेवाले क्र.२ यांनी सेवा देण्यात कसूर केली असे म्हणता येणार नाही. त्यामुळे तक्रारदार यांची तक्रार रद्द करावी अशी मागणी त्यांनी केली आहे.
७. आपल्या खुलाशासोबत सामनेवाले क्र.२ यांनी तक्रारदार यांच्या खातेउता-याची प्रत दाखल केली आहे.
८. तक्रारदार यांच्या वकिलांना युक्तिवादासाठी वेळोवेळी पाच तारखांना संधी देण्यात आली. तथापि, त्यांनी युक्तिवाद केला नाही. तक्रारदार यांनी तक्रारीसोबत दाखल केलेली कागदपत्रे, सामनेवाले क्र.१ व २ यांनी खुलाशासोबत दाखल केलेली कागदपत्रे आणि सामनेवाले क्र.१ व २ यांच्या विद्वान वकिलांनी केलेला युक्तिवाद विचारात घेता आमच्यासमोर निष्कर्षासाठी पुढील मुद्दे उपस्थित होतात.
. मुद्दे निष्कर्ष
- तक्रारदार हे सामनेवाले क्र.१ व २ यांचे ग्राहक
आहेत काय ? होय
ब. तक्रारदार यांनी त्यांची तक्रार सिध्द केली
आहे काय ? नाही
- आदेश काय ? अंतिम आदेशाप्रमाणे
९.मुद्दा ‘अ’- तक्रारदार यांचे सामनेवाले क्र.२ यांच्याकडे बचत खाते आहे. त्या खात्याचा ते नियमितपणे वापर करीत आहेत. सामनेवाले क्र.२ यांनीच तक्रारदार यांना एटीएम कार्ड दिले असून एटीएमची सेवा उपलब्ध करून दिली आहे. ही बाब सामनेवाले क्र.१ व २ यांना मान्य आहे. तक्रारदार यांनी सामनेवाले क्र.१ यांच्या एटीएमचा वापर केला आहे. त्यांच्याकडे तक्रारदार यांचे खाते नाही. ही बाबही सामनेवाले क्र.१ व २ यांना मान्य आहे. सामनेवाले क्र.१ व २ यांच्यात एटीएम मशीनबाबत अंतर्गत करार झालेला आहे. त्यामुळेच तक्रारदार यांना सामनेवाले क्र.१ यांच्या एटीएमचा वापर करता आला आहे. तक्रारदार यांनी सामनेवाले क्र.१ यांच्या एटीएमचा वापर केला, म्हणजेच सामनेवाले क्र.१ यांनी तक्रारदार यांना एटीएम वापराची सेवा दिली आहे. तक्रारदार यांचे सामनेवाले क्र.२ यांच्या बॅंकेत खाते आहे, म्हणजे तक्रारदार सामनेवाले क्र.२ यांचे ग्राहक आहेत. तर सामनेवाले क्र.२ यांच्या परवानगीने आणि अंतर्गत करारान्वये सामनेवाले क्र.१ यांनी तक्रारदार यांना एटीएम वापरण्याची सेवा उपलब्ध करून दिली आहे. सामनेवाले क्र.१ यांची सेवा वापरल्याबाबतच्या पावत्या तक्रारदार यांनी दाखल केल्या आहेत. यावरून तक्रारदार हे सामनेवाले क्र.१ व २ यांचे ग्राहक ठरतात असे आमचे मत आहे. याच कारणामुळे आम्ही मुद्दा ‘अ’ चे उत्तर होकारार्थी देत आहोत.
१०.मुद्दा ‘ब’ – सामनेवाले क्र.१ यांच्या एटीएममधून प्रत्यक्ष रक्कम रूपये १०,०००/- न मिळताही सामनेवाले क्र.२ यांनी ती आपल्या खात्यातून वजा केली असे तक्रारदार यांचे मुख्य म्हणणे आहे. तर सामनेवाले क्र.१ व २ यांनी तक्रारदार यांचे म्हणणे फेटाळून लावले आहे. दि.२४/०८/२०१० रोजी तक्रारदार यांना रूपये १०,०००/- प्राप्त झाले होते आणि त्यामुळेच त्यांच्या खात्यातून तेवढी रक्कम वजा करण्यात आली होती असे सामनेवाले क्र.१ व २ यांचे म्हणणे आहे.
तक्रारदार यांनी तक्रारीसोबत एटीएमच्या पावत्यांची छायांकीत प्रत दाखल केली आहे. त्यात पावती क्र.१ वर तक्रारदार यांच्या खाते क्र.०१३९०००४००१६९५९३ यावर रूपये २३,०१३/- एवढीच शिल्लक असल्याचे दिसते. सामनेवाले क्र.१ यांच्या एटीएम मध्ये व्यवहार क्र.७१२१ ची ही पावती दाखल आहे. ही शिल्लक तपासतांना तक्रारदार यांनी कार्ड क्र.५०४८८४************२ याचा वापर केल्याचे दिसते. पावती क्र.२ सामनेवाले क्र.१ यांच्याच एटीएमची दि.१९/०८/२०१० ची आहे. त्यावरील व्यवहार क्र.७१२४ असा असून कार्ड क्रमांक वरीलप्रमाणेच आहे. खाते क्रमांकही वरीलप्रमाणे असून या पावतीवर रूपये १०,०००/- काढल्याचे दिसते. त्यानंतर शिल्लक रूपये १३,०१३/- एवढी दिसते आहे. पावती क्र.३ सामनेवाले क्र.१ यांच्याच एटीएमची दि.२४/०८/२०१० ची आहे. त्यात कार्ड क्रमांक वरीलप्रमाणेच दिसत असून पावतीवर ‘सॉरी अनएबल टू प्रोसेस’ असा शेरा दिसत आहे. पावती क्र.४ देना बॅंक खोलगल्ली धुळे यांची दि.२४/०८/२०१० ची आहे. त्यातील कार्ड क्र.५०४८-८४०१-३९०१-०००४ असा दिसत आहे. या पावतीवर ‘ट्रॅन्झॅक्शन इज नॉट सक्सेसफूल’ आणि ‘इन सफिशियंट फंड’ असा शेरा दिसत आहे. पावती क्र.५ देना बॅंक खोलगल्ली धुळे यांचीच दि.२४/०८/२०१० ची दिसत असून त्यावर कार्ड क्रमांक वरीलप्रमाणेच (पावती क्र.४ प्रमाणेच) दिसत आहे. पावती क्र.६ देना बॅंकेची दि.२४/०८/२०१० ची असून त्यात कार्ड क्रमांक वरीलप्रमाणे (पावती क्र.४ व ५ प्रमाणे) दिसत असून खात्यातील शिल्लक रूपये ३,०१३/- दिसत आहे. पावती क्र.७ सामनेवाले क्र.१ यांच्या एटीएमची दि.२५/०८/२०१० रोजीची दिसत असून त्यात कार्ड क्र.५०४८८४************२ असा दिसत असून ट्रॅन्झॅक्शन क्र.८१९६ आहे, तर खात्यातील शिल्लक रूपये ३,०१३/- दिसत आहे. पावती क्र.८ सामनेवाले क्र.१ यांच्या एटीएमची दि.१७/०९/२०१० ची दिसत आहे. त्यातील कार्ड क्रमांक वरीलप्रमाणेच असून खात्यातील शिल्लक रूपये २४,६२७/- इतकी दिसत आहे.
सामनेवाले क्र.१ यांनीही वरीलप्रमाणे पावत्या दाखल केल्या आहेत. या पावत्यांमध्ये त्यांनी असे निदर्शनास आणून दिले की, तक्रारदार यांनी सामनेवाले क्र.१ यांच्या एटीएम मशीनचा वापर करतांना कार्ड क्र.५०४८८४************२ याचा वापर केल्याचे दिसते आहे. तर अन्य एटीएमचा वापर करतांना तक्रारदार यांनी कार्ड क्र.५०४८-८४०१-३९०१-०००४ याचा वापर केला आहे. यावरून तक्रारदार यांनी दोन स्वतंत्र बॅंकांचे एटीएम वापरतांना दोन निरनिराळया क्रमांकाच्या एटीएम कार्डचा वापर केला. त्यामुळे तक्रारदार यांचे म्हणणे ग्राहय धरता येणार नाही. तक्रारदार यांनी दि.२४/०८/२०१० रोजी सामनेवाले क्र.१ यांच्या एटीएमचा वापर केला त्याचवेळी त्यांना रूपये १०,०००/- एवढी रक्कम प्राप्त झाली होती. त्यानंतर तक्रारदार यांनी भिन्न क्रमांकाच्या एटीएम कार्डचा वापर करून देना बॅंकेच्या एटीएम मधून पैसे काढण्याचा प्रयत्न केला. तक्रारदार यांनी सामनेवाले क्र.१ यांच्या एटीएम मध्ये वापरलेले एटीएम कार्ड आणि देना बॅंकेच्या एटीएम मधून वापरलेले एटीएम कार्ड भिन्न क्रमांकाचे आहेत. त्यामुळे सामनेवाले क्र.१ यांच्या एटीएममधून तक्रारदार यांना रक्कम मिळाली नाही आणि रक्कम न मिळताच सामनेवाले क्र.२ यांनी ती नावे टाकली हे तक्रारदार यांचे म्हणणे खरे नाही असा मुद्दा सामनेवाले क्र.१ व सामनेवाले क्र.२ यांच्या वकिलांनी युक्तिवादात उपस्थित केला.
सामनेवाले क्र.१ व सामनेवाले क्र.२ यांनी आपल्या म्हणण्याच्या पुष्ट्यर्थ तक्रारदार यांचे एटीएम स्टेटमेंट आणि खातेउतारा दाखल केला आहे. त्यापैकी तक्रारदार यांना दि.२४/०८/२०१० रोजी रूपये १०,०००/- एवढी रक्कम प्राप्त झाल्याचे दिसत आहे. सामनेवाले क्र.१ व २ यांनी दाखल केलेल्या कागदपत्रांवर आणि त्यांच्या विद्वान वकिलांनी युक्तिवादात उपस्थित केलेल्या मुद्यांवर तक्रारदार यांनी कोणतेही स्पष्टीकरण दिलेले नाही.
तक्रारदार यांची तक्रार आणि त्याबाबत सामनेवाले क्र.१ व २ यांनी केलेला खुलासा आणि त्याच्या पुष्ट्यर्थ दाखल केलेली कागदपत्रे पाहता. तक्रारदार हे त्यांची तक्रार सिध्द करू शकलेले नाही या मतापर्यंत आम्ही आलो आहोत. तक्रारदार यांनी रक्कम काढतांना दोन निरनिराळया क्रमांकाच्या एटीएम कार्डचा वापर केल्याचे दिसते आहे. त्यामुळे तक्रारदार यांनी तक्रारीत केलेले कथन ग्राह्य धरता येणार नाही, असे आम्हाला वाटते. म्हणूनच मुद्दा ‘ब’ चे उत्तर आम्ही नकारार्थी देत आहोत.
११.मुद्दा ‘क’ – वरील विवेचनाचा विचार करता तक्रारदार हे त्यांची तक्रार सिध्द करू शकलेले नाहीत. त्यामुळे तक्रारदार यांची तक्रार मंजूर करता येणार नाही या निर्णयाप्रत आम्ही आलो आहोत. म्हणून आम्ही पुढीलप्रमाणे आदेश पारीत करीत आहोत.
आ दे श
१. तक्रारदार यांचा तक्रार अर्ज नामंजूर करण्यात येत आहे.
२. खर्चाबाबत कोणतेही आदेश नाहीत.
धुळे.
-
(श्री.एस.एस. जोशी) (सौ.व्ही.व्ही. दाणी)
सदस्य अध्यक्षा
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, धुळे.