जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच,जळगाव यांचे समोर. . . . .
ग्राहक तक्रार अर्ज क्रमांक 317/2014 तक्रार दाखल करणेत आलेची तारीखः- 19/07/2014.
तक्रार निकाली काढणेत आली तारीखः-08/06/2015.
श्री.भानुदास बळीराम पाटील,
उ.व.सज्ञान, धंदाः शेती,
रा.सावखेडासीम, ता.यावल,जि.जळगांव. .......... तक्रारदार.
विरुध्द
1. भारतीय स्टेट बँक शाखा यावल,
कार्यालय,यावल,ता.यावल,जि.जळगांव.
(नोटीस मॅनेजर यांचेवर बजवावी.)
2. अग्रीक्लचर इंन्शुरन्स कंपनी ऑफ इंडीया लि,
कार्यालय- मुंबई विभागीय कार्यालय, 20 वा मजला,
बी.एस.ई.टॉवर,दलाल रोड,फोर्ट,मुंबई. 23.
(नोटीस मॅनेजर यांचेवर बजवावी.) ......... सामनेवाला.
कोरम-
श्री.विनायक रावजी लोंढे अध्यक्ष
श्रीमती पुनम नि.मलीक सदस्या.
तक्रारदारातर्फे श्री.भगवान जी.पाटील वकील.
सामनेवाला क्र. 1 तर्फे श्री.प्रताप निकम वकील.
सामनेवाला क्र. 2 तर्फे श्री.डी.व्ही.भोकरीकर वकील.
निकाल-पत्र
आदेश व्दारा- श्री.विनायक रावजी लोंढे, अध्यक्षः
1. तक्रारदाराने सदरील तक्रार ग्राहक संरक्षण कायदा कलम 12 अन्वये सामनेवाला यांनी पिक विमा योजनेअंतर्गत विमा रक्कम न देऊन सेवा त्रृटी ठेवली आहे म्हणुन विमा रक्कम व नुकसान भरपाई मिळण्यासाठी दाखल केली आहे. तक्रारदाराची तक्रार थोडक्यात येणेप्रमाणेः-
2. तक्रारदार हे मौजे सावखेडासीम,ता.यावल,जि.जळगांव येथील रहीवाशी आहेत. तक्रारदाराचे विरावली,ता.यावल या ठिकाणी शेत गट नंबर 88 मालकी हक्काने आहे. तक्रारदार हे सदर शेत जमीनीतील उत्पन्न घेऊन आपल्या कुटूंबाचा उदरनिर्वाह करतात. सामनेवाला क्र. 1 ही बँक आहे. तक्रारदाराचे सामनेवाला क्र. 1 बँकेत किसान क्रेडीट कार्ड कर्ज खाते आहे. सामनेवाला क्र. 2 ही विमा कंपनी आहे. सामनेवाला क्र. 2 हे सामनेवाला क्र. 1 बँकेमार्फत हवामान आधाराती पिक विमा योजना राबवत असतात. सामनेवाला क्र. 1 व 2 यांनी सन 2012-13 वर्षाकरिता हवामान आधारीत पिक विमा योजना राबवली आहे. तक्रारदाराने सामनेवाला क्र. 1 मार्फत सामनेवाला क्र. 2 विमा कंपनीकडुन पिक विमा योजना घेतलेली आहे. तक्रारदाराने केळी पिकाबाबत रक्कम रु.3,01,000/- चा विमा घेतलेला आहे. सामनेवाला क्र. 1 बँकेत विम्याच्या हप्त्याची रक्कम रु.18,060/- जमा केलेले आहेत. तक्रारदार हे सामनेवाला यांचे ग्राहक आहेत. सन 2012-13 सालात नैसर्गीक आपत्तीत व हवामान बदलामुळे तक्रारदाराच्या शेतातील केळी पिकाचे नुकसान झाले. तक्रारदार हे सदर शेत मिळकतीत असलेल्या यावल महसुल मंडळ पिक योजने अंतर्गत पिक विमा मिळण्यास पात्र ठरले आहेत. विरावली तलाठी सज्जाचे अंतर्गत व यावल महसुल मंडळात शेत मिळकत असलेल्या शेतक-यांना पिक विमा रक्कम मिळाली आहे. तक्रारदाराचे शेत जमीनी लगत असलेल्या शेतक-यांना विमा रक्कम मिळाली आहे. तक्रारदाराचे शेतातील केळीच्या पिकाचे मोठे नुकसान झालेले असतांना सुध्दा त्यांना विमा रक्कम अदा करण्यात आली नाही. तक्रारदाराने सामनेवाला यांच्याकडुन विम्याच्या रक्कमेची मागणी केली. तक्रारदाराने चौकशी केली असता असे लक्षात आले की, सामनेवाला क्र. 1 बँकेकडुन चुकून तक्रारदाराचे सदरील शेत मिळकत ही साकळी महसुल मंडळामध्ये दाखविली आहे. प्रत्यक्षात सदरील शेत जमीन यावल महसुल मंडळात आहे. सामनेवाला क्र. 1 व 2 यांचेत मतभेद निर्माण झाले. सामनेवाला क्र. 2 यांनी सामनेवाला क्र. 1 यांना विमा क्लेम पास करण्यास नकार दिला. शेती हे तक्रारदाराचे एकमेव उत्पन्नाचे साधन आहे. तक्रारदाराच्या शेतातील पिकाचे मोठे नुकसान झाल्यामुळे त्यांचेवर कर्जाचा बोजा झाला आहे. सामनेवाला यांनी विमा रक्कम नाकारुन त्यात भर घातली. सामनेवाला यांनी विमा रक्कम न देऊन अनुचित व्यापारी प्रथेचा अवलंब केला आहे. तक्रारदाराने सामनेवाला यांच्याकडे विनंती अर्ज केला असता त्याचा काहीही उपयोग झाला नाही. तक्रारदाराने पुढे असेही नमुद केलेले आहे की, जुन,2014 मध्ये आय.डी.बी.आय.बँकेच्या मार्फत ज्या शेतक-यांचा विमा काढला होता त्यांना पिक विम्याची रक्कम मिळुन गेली आहे. सामनेवाला क्र. 2 यांनी तक्रारदारास असे सांगीतले की, बँकेच्या चुकीमुळे सदरील बाब घडली आहे. शेतक-यांचा विचार करुनच त्यांचा क्लेम मंजुर केला होता. ती चुक बँकेने केली असल्यामुळे तक्रारदाराचा क्लेम मंजुर करता येणार नाही. सामनेवाला क्र. 1 यांनी तक्रारदारास सांगीतले की, त्यांचे पिक विम्याचा प्रिमियम व्याजासह परत देण्यास ते तयार आहेत त्यास तक्रारदाराने नकार दिला. तक्रारदाराने केळी पिकाची लागवड, संवर्धन करण्यासाठी रु.2,00,000/- ते रु.2,50,000/- खर्च केला आहे. सबब तक्रारदाराने सामनेवाला क्र. 1 व 2 यांच्याकडुन पिक विम्याची रक्कम रु.3,01,000/- मिळावी असे आदेश करण्यात यावेत, तसेच सामनेवाला यांच्याकडुन तक्रारदारास झालेल्या मानसिक व शारिरिक त्रासापोटी रु.2,24,000/- व तक्रारीचा खर्च रु.75,000/- देववावा.
3. सामनेवाला हे या मंचासमोर हजर झाले त्यांनी लेखी कैफीयत दाखल करण्यासाठी ब-याच मुदती घेतल्या. सामनेवाला क्र. 1 यांनी मुदतीत लेखी कैफीयत दाखल केली नाही म्हणुन त्यांचेविरुध्द दि.28/1/2015 रोजी नो-से आदेश करण्यात आले.
4. सामनेवाला क्र. 2 हे या मंचासमोर हजर झाले व त्यांनी लेखी कैफीयत सादर केली. त्यांनी तक्रारदाराच्या तक्रारीतील मुख्य बाबींचे खंडन केलेले आहे. सामनेवाला क्र. 2 यांचे कथन की, विमा काढलेल्या शेतक-यांना विमा रक्कम मिळण्यासाठी नोटीफीकेशन मध्ये नमुद केलेल्या बाबींची पुर्तता करणे गरजेचे आहे. महाराष्ट्र शासनाने प्रायोगीक तत्वावर हवामानावर आधारीत फळ विमा योजनेस मान्यता दिलेली आहे. नोंदल्या गेलेल्या हवामानाच्या तपशिलानुसार सहपत्रात नमुद केल्याप्रमाणे शेतक-यांना विमा कंपनी मार्फत नुकसान भरपाई देण्यात येईल अशी तरतुद केली आहे. सामनेवाला क्र. 2 यांनी सदरील बाब बँकेच्या लक्षात आणुन दिली व स्किम लागु करण्याबाबत कळविले. अग्रीक्लचर इंन्शुरन्स कंपनी लि यांनी पिक विमा योजनेची शासनाने निर्देशीत केल्याप्रमाणे अंमलात आणली. सदरील योजना रेव्हेन्यु सर्कल तत्वावर अंमलात आणली होती. केळीच्या पिकाकरिता रु.1,00,000/- पर हेक्टर इतकी विमा रक्कम निश्चित करण्यात आली. ज्या शेतक-यांनी कर्ज काढले आहे त्यांच्याकरिता विमा घेणे बंधनकारक होते. सदरील क्लेम नुसार केळीच्या पिकाकरिता रक्कम रु.25,000/- पर हेक्टर हवामान नुसार देण्यात येईल तसेच रक्कम रु.75,000/- पर हेक्टर जोराचे वादळ आले तर देण्यात येईल असे निश्चित केले. हवामानाच्या अनुषंगाने तसेच वादळात नुकसान झाल्यास रु.75,000/- पर हेक्टर रक्कम देण्यात आलेली आहे. सदरील रक्कम नोडल बँकेने यावल रेव्हेन्यु सर्कल मध्ये येणा-या शेतक-यांच्या शेत जमीनीसाठी दिली आहे तसेच नोडल बँक ही सामनेवाला क्र. 2 यांना आवश्यक ती कागदपत्रे त्यामध्ये जाहिरनामा, विम्याची रक्कम याची माहिती पुरवते. सामनेवाला क्र. 1 यांनी यावल सर्कल चे संबंधी माहिती पाठविली होती. सामनेवाला क्र. 2 यांनी सर्व क्लेम मंजुर केले आहेत व पर हेक्टर रु.75,000/- यावल सर्कल मधील शेतक-यांना देण्यात आलेले आहेत. तक्रारदार यांना विमा रक्कम केवळ सामनेवाला क्र. 1 यांचे चुकीमुळे मिळालेली नाही. सामनेवाला क्र. 1 यांनी माहिती पाठवितांना तक्रारदाराचे शेत साकळी रेव्हेन्यु सर्कल मध्ये येते अशी चुकीची माहिती पाठविली प्रत्यक्षात तक्रारदाराचे शेत यावल रेव्हेन्यु सर्कल मध्ये येते अशी माहिती पाठविणे गरजेचे होते. सामनेवाला क्र. 1 यांच्या चुकीमुळे तक्रारदारास विमा रक्कम मिळाली नाही. तसेच सामनेवाला यांनी पुढे असे कथन केले आहे की, शासन निर्णय क्रमांक विमायो 2012 /प्र.क्र.166/दि.27 सप्टेंबर,2012 या मध्ये हवामान आधारीत पिक विमा योजनेत नुकसान भरपाई पुर्णपणे संबंधीत विमा कंपनीने शेतक-यास सहपत्र 2 नुसार परस्पर बँकेमार्फत अदा करावयाची आहे. विहित नमुन्यात माहिती वित्तीय संस्थेने विमा कंपनीकडे सादर करणे आवश्यक आहे तसे न केल्यास होणारी नुकसान भरपाई देण्याची जबाबदारी वित्तीय संस्थेची राहील असे नमुद केलेले आहे. सबब सामनेवाला क्र. 1 यांनी चुकीची माहिती देऊन तक्रारदारास विमा लाभापासुन वंचित ठेवले आहे. सामनेवाला क्र. 2 यांनी द्यावयाचे सेवेत त्रृटी ठेवली नाही. सबब तक्रारदाराची तक्रार रद्य करण्यात यावी.
5. तक्रारदाराने पुराव्याचे शपथपत्र दाखल केलेले आहे. तसेच तक्रारीसोबत भारत सरकार, कृषी विभाग यांचे क्लेम बाबत नोटीफीकेशन, महाराष्ट्र शासनाचे नोटीफीकेशन, सहपत्रे, विमा पॉलीसी लागु करण्याबाबत वेगवेगळे दस्त सह पत्रकासह दाखल केलेले आहेत. सामनेवाला क्र. 1 यांनी सक्षम अधिका-याचे शपथपत्र दाखल केलेले आहे. सामनेवाला क्र. 2 यांनी सक्षम अधिका-याचे शपथपत्र तसेच सोबत विमा योजना लागु करण्याच्या संदर्भातील महाराष्ट्र शासन व केंद्र शासन यांचे परिपत्रक दाखल केलेले आहे. तक्रारदाराचे वकील श्री.भगवान पाटील यांचा युक्तीवाद ऐकला. सामनेवाला क्र. 1 यांचे वकील श्री.प्रताप निकम यांचा युंक्तीवाद ऐकला. सामनेवाला क्र. 2 यांचे वकील श्री.भोकरीकर यांचा युक्तीवाद ऐकला. तक्रारदार व सामनेवाला यांनी दाखल केलेले शपथपत्र व दस्ताचे अवलोकन केले. न्याय-निर्णयासाठी खालील मुद्ये उपस्थित होतात.
मुद्ये उत्तर
1) सामनेवाला यांनी तक्रारदार यांना द्यावयाचे सेवेत त्रृटी
ठेवली आहे ही बाब तक्रारदाराने शाबीत केली आहे काय ? होय.
2) तक्रारदार हे विमा रक्कम मिळण्यास पात्र आहेत काय ? होय.
असल्यास कोणाकडुन ? सामनेवाला क्र.1 कडुन
3) कोणता आदेश ? शेवटी दिलेप्रमाणे.
कारणमिमांसा
मुद्या क्र. 1 व 2ः
6. तक्रारदार हे व्यवसायाने शेतकरी आहेत. तक्रारदाराचे मौजे विरावली,ता.यावल,जि.जळगांव येथे गट क्रमांक 88 क्षेत्र 3 हेक्टर 1 आर शेत जमीन आहे. तक्रारदाराने सन 2012-13 वर्षाकरिता हवामान आधारीत पिक विमा योजने अंतर्गत विमा काढला होता. सदरील विम्याची रक्कम सामनेवाला क्र. 1 बँकेत दि.31/10/2012 रोजी भरली होती. तक्रारदाराची शेत जमीन विरावली तलाठी सज्जेचे अंर्तगत व यावल महसुल मंडळात येते. वर नमुद केलेल्या बाबी विषयी तक्रारदार व सामनेवाला यांचेमध्ये वाद नाही. तक्रारदाराचे वकीलांनी असा युक्तीवाद केला की, तक्रारदाराची शेत जमीन विरावली तलाठी सज्जेत येते. सदरील शेत जमीन ही यावल महसुल मंडळात समाविष्ठ झालेली आहे. सदरील महसुल मंडळात ज्या ज्या शेतक-यांनी हवामान आधारीत पिक विमा योजने अंतर्गत विमा काढला होता त्या सर्व शेतक-यांना पिकाचे नुकसानीपोटी रक्कम मिळाली आहे. तक्रारदाराची शेत जमीन यावल महसुल मंडळात समाविष्ठ असतांनाही व त्यांनी विमा रक्कम भरलेली असतांनाही सामनेवाला यांनी तक्रारदारास विमा रक्कम देण्यास टाळाटाळ करुन सेवेत त्रृटी ठेवली आहे. तसेच तक्रारदाराचे वकीलांनी पुढे असाही युक्तीवाद केला की, सामनेवाला क्र. 1 यांनी तक्रारदाराची शेत जमीन साकळी सर्कल मध्ये येते अशी चुकीची माहिती सामनेवाला क्र. 2 यांच्याकडे पाठविली त्यास तक्रारदार जबाबदार नाहीत. सदरील बाब ही सामनेवाला क्र. 1 व 2 यांच्यातील अंतर्गत वादातील आहे. तक्रारदार हे नुकसान भरपाई मिळण्यास पात्र आहेत. सामनेवाला क्र. 1 यांनी त्यांचे शपथपत्रामध्ये असे कथन केले आहे की, शासनाची पिक कर्ज विमा योजने अंतर्गत ज्या शेतक-यांनी कर्ज घेतले आहे त्यांची पिक विमा रक्कम संबंधीत शेतक-यांकडुन रोखीने अथवा कर्ज खात्यात टाकुन सामनेवाला क्र. 2 यांच्याकडुन संपुर्ण माहितीसह रवाना करण्यात येते. शेतक-याचे एका नावाने अनेक शेत जमीन असतात व त्या वेगवेगळया ठिकाणी असतात व त्याचे महसुल मंडळ वेगवेगळे असते. पिक कर्ज घेणा-या शेतक-याकडुन महसुल मंडळाचा उल्लेख नसतो. संपुर्ण प्रक्रिया पुर्ण झाल्यानंतर पिक विमा योजना अर्जातील माहिती पडताळणी करणे तसेच त्याची खात्री करणे व ते रेकॉर्डवर नमुद करणे हे प्रिमियम स्विकारतांना पाहणे बंधनकारक असते. सामनेवाला क्र. 2 यांनी विमा रक्कम स्विकारली आहे. काही चुक झाली असल्यास नुकसान भरपाईचे संदर्भात बदल होत नाही. सामनेवाला क्र. 1 यांनी तक्रारदाराकडुन विमा रक्कम घेतलेली आहे. शेताचा गट नंबर व शिवार याची माहिती सामनेवाला क्र. 2 यांना दिलेली आहे. सामनेवाला क्र. 2 यांनी तांत्रीक अडचण दाखवुन विमा रक्कम देण्यास टाळाटाळ केली आहे. विमा रक्कम देण्याची जबाबदारी सामनेवाला क्र. 1 यांच्यावर नाही.
7. सामनेवाला क्र. 2 यांचे वकील श्री.भोकरीकर यांनी या मंचाचे लक्ष राष्ट्रीय शेतकरी इंन्शुरन्स स्किम परिपत्रकाकडे वेधले तसेच असा युक्तीवाद केला की, सामनेवाला क्र. 1 यांनी विमा रक्कम स्विकारतांना संपुर्ण दस्तऐवज, सर्कलची माहिती काटेकोरपणे लिहुन देऊन तंतोतंत माहिती सामनेवाला क्र. 2 यांना द्यावयास पाहीजे होती. सामनेवाला क्र. 1 यांनी तक्रारदाराची शेत जमीन अनुज्ञेय नसलेल्या रेव्हेन्यु सर्कल मध्ये दाखवुन तक्रारदारास विमा रक्कमेपासुन वंचित ठेवले आहे. सामनेवाला क्र.1 यांनी जर तक्रारदाराची शेत जमीन विरावली सर्कल,यावल महसुल मंडळ मध्ये माहिती लिहीतांना समाविष्ठ केली असती तर सामनेवाला क्र. 2 यांनी तक्रारदाराचा क्लेम मंजुर केला असता. सामनेवाला क्र. 2 यांनी जे जे क्लेम यावल महसुल मंडळात दर्शविले होते त्यांची मंजुरी देऊन रक्कम अदा केली आहे. सामनेवाला क्र. 1 यांनी चुकीने तक्रारदाराचे शेत जमीन वेगळया सर्कल मध्ये दाखवण्यात आली. परिपत्रकानुसार सदरील रक्कम देण्यास सामनेवाला क्र.2 हे जबाबदार नसुन सामनेवाला क्र. 1 हे जबाबदार आहेत. सामनेवाला क्र. 2 यांचे वकीलांनी या मंचाचे लक्ष कर्ज देणा-या बँकेची जबाबदारी व त्यासंबंधी स्पेशल अटी वर वेधले. अट क्र. 5 मध्ये जर शेतकरी विमा क्लेमच्या अंतर्गत लाभ मिळण्यास अपात्र ठरले असतील व सदरील बाब ही नोडल बँक यांचे चुकीमुळे झाली असेल तर संबंधीत बँक या एकमेव नुकसान भरपाई देण्यास पात्र राहतील असे नमुद केलेले आहे.
8. वर नमुद केलेला संपुर्ण युक्तीवाद लक्षात घेतला व दस्तऐवजांचे अवलोकन केले. तक्रारदाराने सामनेवाला क्र. 1 यांच्याकडे केळी पिकाचा विमा सन 2012-13 साली उतरविला होता व सदरील विम्याची रक्कम सामनेवाला क्र. 1 यांच्याकडे भरली होती. सामनेवाला क्र. 1 यांनी सदरील रक्कम सामनेवाला क्र. 2 यांच्याकडे पाठविली. सामनेवाला क्र. 1 यांनी महत्वाचे दस्तऐवज करतांना तक्रारदाराची शेत जमीन साकळी महसुल मंडळात येते अशी चुकीची माहिती दिलेली आहे. प्रत्यक्षात तक्रारदाराची शेत जमीन विरावली तलाठी सज्जेत येत असुन यावल महसुल मंडळात आहे. ज्या ज्या शेतक-यांनी सदरील महसुल मंडळात पिक विमा घेतलेला आहे त्या सर्वांची नुकसान भरपाई मिळाली आहे. सामनेवाला क्र. 1 यांनी सामनेवाला क्र. 2 यांच्याकडे चुकीची माहिती दिल्यामुळे तक्रारदारास विमा रक्कम मिळाली नाही. जर नोडल बँकेने विमा कंपनीकडे चुकीची माहिती दिली असेल व शेतकरी विमा रक्कमेपासुन वंचित राहीला असेल तर नुकसान भरपाई देण्याची जबाबदारी चुक करणा-या बँकेवर राहील असे स्पष्टपणे भारत सरकार, कृषी मंत्रालय यांचे दि.16/7/1999 चे अग्रीक्लचर स्किमच्या परिपत्रकात नमुद केलेले आहे. संपुर्ण पुराव्याचे अवलोकन केले असता लक्षात येते की, सामनेवाला क्र. 1 यांनी सामनेवाला क्र. 2 यांच्याकडे तक्रारदाराचे शेताबाबत व सर्कल बाबत चुकीची माहिती दिली त्यामुळे तक्रारदार हे विमा रक्कम मिळण्यापासुन वंचित राहीले. सामनेवाला क्र. 1 यांनी तक्रारदाराचे शेत जमीनी विषयी व अर्जा विषयी संपुर्ण खरी माहिती दिली असती तर तक्रारदारास विम्याचा लाभ मिळाला असता. या मंचाचे मत की, सामनेवाला क्र. 1 यांचे चुकीमुळे तक्रारदारास विमा रक्कम मिळाली नाही. सामनेवाला क्र. 1 यांनी तक्रारदाराकडुन विमा रक्कम स्विकारली आहे व ती विमा रक्कम सामनेवाला क्र. 2 यांच्याकडे पाठवितांना खरी व योग्य माहिती देण्याची जबाबदारी सामनेवाला क्र. 1 यांचेवर आहे ती त्यांनी दिली नाही म्हणुन सामनेवाला क्र. 1 यांनी तक्रारदारास द्यावयाचे सेवेत त्रृटी ठेवली आहे. सामनेवाला क्र. 1 हे तक्रारदारास विमा रक्कम देण्यास पात्र आहेत. सामनेवाला क्र. 2 यांनी तक्रारदारास द्यावयाचे सेवेत त्रृटी ठेवली नाही. सबब आदेश.
आ दे श
1) तक्रारदाराचा तक्रार अर्ज अंशतः मंजुर करण्यात येतो.
2) सामनेवाला क्र. 1 यांना असे आदेश देण्यात येतात की, त्यांनी तक्रारदारास विमा क्लेम रक्कम रु.3,01,000/- (अक्षरी रक्कम रु.तीन लाख एक हजार मात्र ) आदेशाची प्रत मिळाल्यापासुन एक महीन्याचे आंत अदा करावेत., सदर मुदतीत अदा न केल्यास सदरील रक्कमेवर द.सा.द.शे.9 टक्के व्याज तक्रार दाखल तारखेपासुन ते संपुर्ण रक्कम मिळेपावेतो द्यावे.
3) सामनेवाला क्र. 1 यांना असेही आदेशीत करण्यात येते की, त्यांनी तक्रारदारास झालेल्या मानसिक व शारिरिक त्रासापोटी रु.3,000/- (अक्षरी रु.तीन हजार मात्र ) व तक्रार अर्जाचे खर्चापोटी रु.1,500/-(अक्षरी रु.एक हजार पाचशे मात्र ) आदेशाची प्रत मिळाल्यापासुन एक महीन्याचे आंत अदा करावेत.
ज ळ गा व
दिनांकः- 08/06/2015. ( श्रीमती पुनम नि.मलीक ) (श्री.विनायक रा.लोंढे )
सदस्या अध्यक्ष
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच,जळगांव.