निकालपत्र तक्रार दाखल दिनांकः- 07/05/2011 तक्रार नोदणी दिनांकः- 16/05/2011 तक्रार निकाल दिनांकः- 02/12/2011 कालावधी 06 महिने 16 दिवस जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्यायमंच, परभणी अध्यक्ष - श्री.चंद्रकांत बी. पांढरपट्टे, B.Com.LL.B. सदस्या सदस्या सुजाता जोशी B.Sc.LL.B. सौ.अनिता ओस्तवाल M.Sc. श्री.प्रा.गणेश पिता नारायणराव बोकारे. अर्जदार वय 37 वर्ष.धंदा.नौकरी. अड.व्ही.के.बलखंडे. रा.के.एस.डाखोरे यांचे घर,जुने आर.टी.ओ.जवळ. शिवराम नगर.परभणी विरुध्द स्टेट बँक ऑफ इंडिया. गैरअर्जदार. मुख्य शाखा, मार्फत शाखा व्यवस्थापक, अड.अभय.एस.कौसडीकर स्टेट बॅंक ऑफ इंडिया. स्टेशनरोड.परभणी. ------------------------------------------------------------------------------------ कोरम - 1) श्री.सी.बी.पांढरपट्टे. अध्यक्ष. 2) सौ.सुजाता जोशी. सदस्या. 3) सौ.अनिता ओस्तवाल. सदस्या. ------------------------------------------------------------------------------------------------------- ( निकालपत्र पारित व्दारा – सौ.सुजाता जोशी. सदस्या.) गैरअर्जदाराने दिलेल्या त्रुटीच्या सेवेबद्दल अर्जदाराने ही तक्रार दाखल केली आहे. अर्जदाराची थोडक्यात तक्रार अशी आहे की, अर्जदार हा परभणी येथील रहीवासी असून गैरअर्जदाराकडे त्याचे बचत खाते असून त्याला ए.टी.एम.सुविधा आहे. दिनांक 01 व 02/02/2011 रोजी मुंबई येथे होणा-या अधिवेशनासाठी अर्जदार जाणार होता व त्यासाठी त्याने त्याच्या बचत खात्यात एकुण रु.50,000/- भरले मुंबईला गेल्यावर दिनांक 01/02/2011 रोजी तेथील ए.टी.एम. मधून पैसे काढण्याचा अर्जदाराने प्रयत्न केला असता “ सॉरी अनेबल टु प्रोसेस ” असुविधेबद्दल खेद अशा प्रकरणाच्या सुचना ए.टी.एम. मधून मिळत राहिल्या दुस-यांदा प्रयत्न केल्यावरही “ ट्रानझॅक्शन डीक्लाईन 055 इनव्हॅलीड टर्न ऑर अकाऊंट ” अशा प्रकारे सुचना पत्र येत होते. अर्जदार हा मुंबईतील एस.बी.आय.शाखेत चौकशीसाठी गेला असता अर्जदाराशी ए.टी.एम.सुविधा बचत खात्याशी जोडलेली नाही असे समजले असता अर्जदाराने गैरअर्जदाराच्या परभणी शाखा व्यवस्थापकांशी संपर्क साधला असता त्यांनी बँकेच्या शाखेत लेखी अर्ज देवुन ए.टी.एम. सुविधा सुरु करा असे सांगीतले.अर्जदाराच्या खात्यात पुरेशी रक्कम असूनही ए.टी.एम. मधून रक्कम न मिळाल्यामुळे अर्जदारास मुंबई येथे असंख्य असुविधांचा आणि आर्थिक समस्यांचा सामना करावा लागला. अर्जदाराने दिनांक 03/02/2011 रोजी गैरअर्जदाराशी संपर्क साधला असता गैरअर्जदाराने अर्जदाराने ए.टी.एम. सुविधा बंद करण्याचा अर्ज दिला असावा असे सांगीतले. गैरअर्जदाराने दिलेल्या त्रुटीच्या सेवे विरुध्द व झालेल्या मानसिक व शारिरिक त्रासाविरुध्द गैरअर्जदारा विरुध्द अर्जदाराने ही तक्रार दाखल केलेली आहे.व मानसिक व शारिरीक त्रासापोटी रु.50,000/- व तक्रार अर्जाच्या खर्चापोटी रु.5,000/- देण्यात यावेत अशी मागणी केलेली आहे. अर्जदाराने तक्रारीसोबत त्याचे शपथपत्र बचत खाते पुस्तिका, ए.टी.एम. कार्ड, ए.टी.एम. वापरानंतर आलेल्या ग्राहक सुचना, गैरअर्जदाराला दिलेली नोटीस, युनिव्हर्सिटीचे प्रमाणपत्र इ. कागदपत्रांच्या छायाप्रती दाखल केलेल्या आहेत. गैरअर्जदाराने त्याच्या लेखी जबाबात अर्जदाराने दाखल केलेल्या तक्रारीस तक्रार दाखल केल्याचे कोणतेही कारणच घडलेले नसल्यामुळे अर्जदाराची तक्रार रु.10,000/- खर्चासहीत खारीज करण्याची विनंती केलेली आहे. अर्जदाराला ए.टी.एम. मधून पैसे मिळाले नसल्याचे कारण तांत्रिक असू शकेल त्यामुळे अर्जदाराला झालेल्या असुविधेबद्दल गैरअर्जदार हा वैयक्तिकरित्या जबाबदार नाही. अर्जदारास ए.टी.एम. सुविधा पूर्वीपासून चालू होती व आजही चालू आहे.अर्जदार यांना अन्य पर्याय उपलब्ध असतांना त्यांनी ते वापरले नाहीत म्हणून गैरअर्जदार अर्जदाराच्या असुविधेसाठी जबाबदार नाहीत. अर्जदारास मुंबई ए.टी.एम. मधुन पैसे मिळालेले नाहीत ही बाब गैरअर्जदार बँकेच्या नियंत्रणाच्या व कार्यक्षेत्राच्या बाहेर आहे त्यामुळे गैरअर्जदाराचा प्रत्यक्ष वा अप्रत्यक्ष संबंध नाही अर्जदाराने त्याचे नेमके काय नुकसान झाले याचा पुरावा दिलेला नाही व अर्जदाराने मागणी केलेली नुकसान भरपाई देणे गैरअर्जदारास बंधनकारक नाही. त्यामुळे अर्जदाराची तक्रार रु. 10,000/- खर्चासह फेटाळण्याची विनंती गैरअर्जदाराने केलेली आहे. गैरअर्जदाराने लेखी जबाबासोबत त्याचे शपथपत्र, अर्जदाराच्या बचत खात्याचा खातेउतारा इ.कागदपत्र दाखल केलेली आहेत. तक्रारीत दाखल कागदपत्र व वकिलांच्या लेखी युक्तीवादा वरुन निर्णयासाठी खालील मुद्दे उपस्थीत होतात. मुद्दे. उत्तर 1 अर्जदारास गैरअर्जदाराने त्रुटीची सेवा दिलेली आहे काय ? नाही. 2 अर्जदार कोणता अनुतोष मिळणेस पात्र आहे.? अंतिम आदेशा प्रमाणे. कारणे. गैरअर्जदाराने सदरील तक्रार परभणी ग्राहक मंचाच्या न्यायक्षेत्रात येत नाही.म्हणून फेटाळण्यात यावी असा अर्ज केलेला आहे.परंतु अर्जदार हा गैरअर्जदारांचा परभणी शाखेचा खातेदार आहे व त्याचे ए.टी.एम. कार्डही परभणीचे आहे.तसेच मुंबईसह परभणी येथेही गैरअर्जदाराची शाखा आहे.त्यामुळे अर्जदाराची तक्रार परभणी न्याय मंचाच्या अधिकार क्षेत्रात यते. अर्जदार हा गैरअर्जदार बँकेचा ग्राहक आहे त्याचे बचतखाते असून खाते क्रमांक 30613579645 असून ए.टी.एम. कार्डमधारक आहे ही बाब सर्वमान्य आहे. अर्जदाराने त्याच्या खात्यात दिनांक 29/01/2011 पर्यंत रु.50,000/- जमा केल्याचे नि.14/1 वरील खाते उता-यावरुन सिध्द होते. अर्जदाराने नि.3/3 वरील दाखल केलेल्या ए.टी.एम. ग्राहक सुचने वरुन अर्जदाराने ए.टी.एम. चा वापर केल्यावर त्याला “ Sorry unable to process ” “ Transaction declined ” अशा प्रकारच्या सुचना आल्या व “ Kindly contact your Branch ” अशी सुचना आल्याचे दिसून येते. त्यानंतर अर्जदार हा गैरअर्जदाराच्या खडकपाडा, कल्याण जि.ठाणे येथील शाखेत गेला असता तेथे अर्जदाराची ए. टी.एम. सुविधा ही बचत खात्याशी जोडलेली नाही असे सांगण्यात आले.मुंबईहूनच अर्जदाराने गैरअर्जदार बँकेंच्या शाखाधिका-यांनी फोन केला असता त्यांनी “ तुमच्या बँकेच्या शाखेत लेखी अर्ज देवुन ए. टी. एम. सुविधा सुरु करा ” असे सांगीतले त्या सर्व बाबी अर्जदाराने शपथेवर सांगीतलेल्या आहेत.व गैरअर्जदारातर्फे नाकारलेल्या नाहीत. अर्जदाराने मुंबईत वापरलेली ए.टी.एम. केंद स्टेट बँक ऑफ हैद्राबाद व अक्सीस बँकेची आहेत.त्यापैकी एक ग्राहक सुचना ही फक्त खाते उतारा दिसतो व उरलेल्या 3 ग्राहक सुचनेपैकी एक अस्पष्ट आहे व दोन पैकी एकावर “ SORRY UNABLE TO PROCESS ” व एकावर TRANSACTION DECLINED असे छापलेले आहे.अर्जदाराने तक्रारीत अक्सीस बँक व स्टेट बँक ऑफ हैद्राबाद यांना पार्टी केले असते तर अर्जदाराला त्या दिवशी ए.टी.एम. व्दारे पैसे का मिळाले नाहीत याचे खरे कारण समजले असते अर्जदाराने दिनांक 03/02/2011 पासून दिनांक 21/02/2011 पर्यंत त्याच्या ए.टी.एम. कार्डवरुन विविध बँकांमधून पैसे काढलेले दिसतात.म्हणजेच अर्जदाराची ए. टी.एम. सुविधा चालू आहे.अर्जदार गैरअर्जदार बँकेशी तक्रारीस कारण घडले त्यादिवशी कनेक्ट झाला होता किंवा नाही हेच सिध्द झाले नसल्यामुळे गैरअर्जदाराने अर्जदारास त्रुटीची सेवा दिलेली आहे असे आम्हास वाटत नाही.म्हणून खालील प्रमाणे आदेश करण्यात येत आहे. आ दे श 1 अर्जदाराची तक्रार फेटाळण्यात येत आहे. 2 अर्जदार व गैरअर्जदाराने तक्रारीचा खर्च आपापला सोसावा. 4 पक्षकाराना आदेशाच्या प्रती मोफत पुरवाव्यात. सौ. अनिता ओस्तवाल सौ.सुजाता जोशी श्री. सी.बी. पांढरपटटे सदस्या सदस्या अध्यक्ष.
| [HONABLE MRS. Sujata Joshi] Member[HONABLE MR. C. B. Pandharpatte] PRESIDENT[HONABLE MRS. Anita Ostwal] Member | |