** निकालपत्र **
(21/02/2013)
प्रस्तुतची तक्रार, तक्रारदार यांनी ग्राहक संरक्षण कायदा, 1986 चे कलम 12 प्रमाणे जाबदेणार क्र. 1 व 2 चे विरुद्ध दाखल केलेली आहे. तक्रारीतील कथने खालीलप्रमाणे.
1] तक्रारदार हे नोकरदार होते. जाबदेणार क्र. 1 ही भारतीय स्टेट बँक असून ती ग्राहकांना क्रेडीट कार्ड देते. जाबदेणार क्र. 2 हे जाबदेणार क्र. 1 यांची अधिकृत एजंट असून जाबदेणार क्र. 2 यांनी क्रेडीट कार्ड ज्या ग्राहकास द्यावयाचे होते त्याची योग्यायोग्यता तपासून त्याबाबतचा अहवाल जाबदेणार क्र. 1 यांना दिलेनंतर जाबदेणार क्र. 1 नी त्या ग्राहकास क्रेडीत कार्ड देते असे तक्रारदारांच्या कथनानुसार दिसते. त्याप्रमाणे यातील जाबदेणार क्र. 2 यांनी जाबदेणार क्र. 1 यांच्या मंजूरीने तक्रारदार यांना त्यांच्या नोकरीच्या ठिकाणी भेटून जाबदेणार क्र. 1 चे क्रेडीट कार्ड क्र. 4006661154081009 असा होता. वरील कार्ड तक्रारदार यांना दिलेनंतर पुन्हा एक वर्षाने जाबदेणार यांनी तक्रारदार यांना नविन नूतनीकरण केल्ले क्रेडीट कार्ड क्र. 4317575154005632 चे दिले व तक्रारदार यांनी या दोन्ही कार्डाचा सन 2001 ते 2008 वापर करुन त्या दोन्ही क्रेडीटकार्डद्वारे एकुण रु. 68,434/- (रु. अडुसष्ठ हजार चारशे चौतीस मात्र) एतक्या रकमेचा वापर केला व सन 2008 पासून तक्रारदार यांनी दोन्ही
कार्डाचा वापर पूर्णत: बंद केला आहे. एप्रिल2001 ते जाने. 2008 अखेर यातील तक्रारदार यांनी जाबदेणार क्र. 1 यांना व व्याजासह कॅश, डी.डी., चेक या माध्यमातून एकुण रक्कम रु. 2,09,949/- (रु. दोन लाख नऊ हजार नऊशे एकोणपन्नास मात्र) इतकी रक्कम अदा केली आहे व तक्रारदार हे जाबदेणार क्र. 1 चे काही देणे नाही म्हणून निश्चित झाले व मध्येच जाबदेणार क्र. 1 यांनी दि. 23/12/2009 रोजी पुन्हा तक्रारदार यांचेकडे रक्कम रु. 29,049/- ची क्रेडीट कार्डावर तक्रारदार यांचे नावे रक्कम थकित दाखवून त्याची मागणी केली, त्यामुळे या अन्यायी मागणीविरुद्ध या तक्रारदाराने दि. 11/02/2010 रोजी वकीलामार्फत कायदेशिर नोटीस दिली, तरीसुद्धा जाबदेणार यांनी त्यांची वसुली मागणी थांबविली नाही, त्यामुळे मानसिक त्रासाला व अन्यायी वसुलीस कंटाळून व क्रेडीट कार्डच्या वापराच्या नियम, अटी व वापरलेल्या पैशाबाबत व्याज आकारणी, त्याचा द.सा.द.शे. दर व रु. 68, 434/- पोटी किती कायदेशिर भरना रक्कम होते त्याबाबत तक्रारदार यांना अंधारात ठेवले व जाबदेणारांच्या सेवेतील असलेल्या त्रुटीबाबत व जाबदेणार यांच्या सेवेतील कमतरता व त्यांनी तक्रारदार यांना दिलेली सदोष सेवा याबाबत जाबदेणार यांचेकडून तक्रारदार यांना त्यांनी वापरलेल्या दोन्ही क्रेडीट कार्डच्या वापराबाबत जी जाबदेणार यांनी तक्रारदार यांना परत केली आहेत त्यामुळे त्यांना तक्रारदार यांचेकडून काही रक्कम वसुलीचा अधिकार नाही, ती थांबविण्यात यावी व तक्रारदार यांना जाबदेणार यांचे बेकायदेशिर वसुलीमुळे, सदोष सेवेमुळे जो शारिरीक, मानसिक त्रास झाला त्याची भरपाई रक्कम रु. 20,000/- व सदर तक्रारीचा खर्च व इतर खर्च रु. 5,000/- जाबदेणार यांनी तक्रारदार यांना द्यावा अशी मागणी केली आहे.
2] सदर प्रकरणातील जाबदेणार क्र. 1 व 2 यांना नोटीस बजावूनही, ते गैरहजर राहिले किंवा त्यांचेतर्फे कोणी वकील वा प्रतिनिधी नियुक्त करण्यात आला नाही, त्यामुळे त्यांच्याविरुद्ध तक्रार अर्जावरती दि. 7/1/2011 रोजी एकतर्फा चौकशीचा आदेश करण्यात आला. त्यामुळे सदरचे प्रकरण एकतर्फा चालून तक्रारदार यांनी प्रकरणी दाखल केलेली कागदपत्रे व त्यांचे शपथपत्र व लेखी युक्तीवादाचा विचार करुन गुणवत्तेवर निर्णय देण्यात येत आहे.
3] तक्रारदार यांनी दाखल केलेल्या तक्रारेतील कथने, कागदपत्रे व युक्तीवादाचा विचार करता खालील मुद्दे मंचाने निश्चित केले आहेत, सदर मुद्दे व त्यावरील निष्कर्ष खालीलप्रमाणे आहेत.
मुद्दे निष्कर्ष
1. जाबदेणार यांनी तक्रारदार यांना क्रेडीट कार्ड :
देवून त्याच्या व्याज आकारणी व केलेला :
त्याच्या क्रेडीटखात्याचा हिशोब न देवून व :
खरी वसुलपात्र नेमकी रक्कम न दाखवून :
मनमानी रक्कम वसुल करुन सदोष सेवा :
दिलेली आहे का? : होय
2. जाबदेणार हे तक्रारदार यांना नुकसान भरपाई:
व अर्जाचा खर्च देण्यास जबाबदार आहेत क़ा? होय
3. अंतीम आदेश काय : तक्रार अंशत: मंजूर
कारणे
4] प्रस्तुत प्रकरणातील तक्रारदार यांनी प्रकरणी त्यांचा तक्रार अर्ज, शपथपत्र, जाबदेणार क्र. 1 व 2 यांना प्रत्यक्ष तक्रारदार यांनी लिहिलेली नोटीस पान क्र. 9 ते 14, क्रेडीट कार्डद्वारे वापरलेले पैसे जाबदेणार यांना परत केलेबाबत स्टेटमेंट पान क्र. 15 ते 25 व वकीलामार्फत पान क्र. 26 वरील दिलेली नोटीस दि. 12/4/2001 पासून जाबदेणार क्र. 1 यांना पैसे दिलेबाबतच्या पावत्या व जाबदेणार क्र. 1 यांनी तक्रारदार यांना मागणी केलेल्या रकमांचे पत्र प्रकरणी मंचासमोर दाखल केली आहेत. त्याचप्रमाणे तक्रारदार यांनी त्यांचा युक्तीवाद दि. 25/4/2012 रोजी याकामी दाखल केला आहे. सदर कागदपत्रांचे बारकाईने अवलोकन केले असता असे आढळून येते की, तक्रारदार यांना यातील जाबदेणार यांनी स्वत: भेटून वादातील क्रेडीट कार्ड दिलेले होते. त्याचा वापर तक्रारदार यांनी सन 2001 ते 2004 अखेर केला व त्याचे पेमेंट जाबदेणार यांना प्रतिमहिना वेळेवर पेड केलेचे व सन 2008 साली तक्रारदार यांनी जाबदेणार यांना परत केलेचे स्पष्ट दिसून येते. तरीसुद्धा यातील जाबदेणार यांनी जानेवारी 2010 अखेर तक्रारदार यांचेकडून येणेबाकी दाखविलेली आहे. तक्रारदार यांनी सन 2008 पासून दोन्ही क्रेडीट कार्ड जाबदेणार यांना परत करुन त्याचा वापर थांबविला असतानासुद्धा तक्रारदार यांचेकडून येणेबाकी वसुल दाखवला आहे. प्रतिमहिना तक्रारदार यांनी क्रेडीटकार्डद्वारे वापराचे पैसे जाबदेणार यांना परत दिले आहेत. तरीसुद्धा अवास्तव, अमर्याद व्याज आकारुन जाबदेणार यांनी मनमानी वसुली केली आहे व क्रेडीट कार्डच्या वापरायच्या पैशाबाबत त्यांच्या व्याज आकारणीबाबत, वसुलीपद्धतीबाबत काहीही माहीती तक्रारदार यांना मागणी करुनही जाबदेणार यांनी दिलेली नाही असे स्पष्ट दिसून येते.
5] त्याचप्रमाणे मे. ग्राहक मंचामध्ये सदर केस न्यायप्रविष्ट असतानासुद्धा यातील तक्रारदार यास जाबदेणार यांनी दि. 16/7/2010 रोजी व दि. 30/9/2010 अखेर रु. 23,500/- येणेबाकी दाखवून ती न भरलेस कारवाई करण्यात येईल असे सांगितले. भितीपोटी तडजोडीने यातील तक्रारदार यांनी जाबदेणार यांना अनुक्रमे 7/8/2010 रोजी रु. 2000/- व दि. 15/9/2010 रोजी रु. 21,500/- चेकने पाठवले. तक्रारदार यांनी एकुणच जाबदेणार यांची रक्कम परतेफेड करण्यात अत्यंत प्रामाणिक पणा दाखविला आहे. याउअपरही या घटनेनंतर पुन्हा जाबदेणार यांनी रु. 13,602/- ची मागणी तक्रारदार यांचेकडे केली. त्वरीत तक्रारदार यांनी जाबदेणार यांना भेटून सर्व रक्कम भरावी असे सांग्तले त्यामुळे त्यांनी नरमाईची भूमिका घेऊन दि. 23/5/2011 रोजी रु. 161/- ची मागणी केली. नाईलाजाने तक्रारदाराने सदर रक्कम जाबदेणार यांना पेड केली. एकंदरीत जाबदेणार यांनी सर्व कायदेशिर नियम, बँकेचे नियम गुंडाळून सर्वसामान्य पूर्वीच्या पठाणी कायद्याप्रमाणे वसुली केल्याचे स्पष्ट दिसते व क्रेडीट कार्ड त्याचा वापर, त्याची वसुली त्याची कार्यपद्धती याबाबत तक्रारदार यांना जाबदेणार यांनी काहीही माहिती दिलेली नाही असे स्पष्ट दिसून येते. तक्रारदार हे जाबदेणार यांचे ग्राहक आहेत. त्यांनीच तक्रारदार यांना वेगवेगळी आमीषे दाखवून क्रेडीट कार्ड वितरीत केलेचे स्पष्ट दिसून येते व जाबदेणार यांनी तक्रारदार यांना दिलेली सेवा ही नि:संशयरित्या दोषपूर्ण आहे, सदोष आहे व त्यामुळे तक्रारदार यांची सदरची तक्रार ग्राहक संरक्षण कायदा, 1986 नुसार समर्थनिय व योग्य असलेचे स्पष्ट दिसते.
6] तक्रारदार यांनी दाखल केलेली तक्रार त्यासोबत शपथपत्र, युक्तीवाद व दाखल केलेल्या कागदोपत्री पुराव्यांचे खंडन जाबदेणार यांनी, त्यांना संधी देवूनही मंचामध्ये हजर राहून नाकारलेली नाही वा नाशाबित केलेली नाहीत. तक्रारदार यांचे सर्व पुरावे व कागदपत्रे पाहता असे दिसते की तक्रारदार यांची तक्रार योग्य व कायदेशिर आहे. तक्रारदार यांनी दि. 11/2/2010 रोजी जाबदेणार यांना रजि. पोस्टाने वकीलामार्फत कायदेशिर नोटीस दिली होती, परंतु जाबदेणार यांनी नोटीसीला प्रतिसाद दिला नाही वा उत्तरही दिले नाही, त्यामुळे सदर तक्रारदार हे जाबदेणार यांना कोणतीही रक्कम देण्यास जबाबदार नाहीत या निष्कर्षाप्रत हा मंच आलेला आहे. तसेच तक्रारदार हे जाबदेणार यांच्या बेकायदेशिर वसुलीमुळे व सदोष सेवेमुळे जो मानसिक शारिरीक त्रास झाला त्यापोटी नुकसान भरपाई रु. 10,000/- व तक्रारीचा खर्च रु. 2000/- मिळण्यास पात्र आहेत. सबब, मंचातर्फे खालीलप्रमाणे आदेश करण्यात येत आहेत.
** आदेश **
1. तक्रारदाराची तक्रार अंशत: मंजूर करणेत येत आहे.
2. असे जाहीर करण्यात येते की, जाबदेणार यांनी
तक्रारदार यांना त्यांच्या क्रेडीट कार्डाचा प्रत्यक्ष
वापर व त्यापोटी त्यांचेकडून जाबदेणार यांनी
वसुल केलेली रक्कम याबाबत कोणत्याही प्रकारे
तक्रारदारांच्या मागणीप्रमाणे त्यांच्या वसुलीबाबत
खुलासा न करता व्यवहारात पारदर्शकता न दाखवता
मनमानी वसुल केला आहे, त्यामुळे ती त्यांच्या
सेवेतील कमतरता आहे.
3. जाबदेणार यांना असा आदेश देण्यात येतात की,
त्यांनी येथून पुढे तक्रारदारांच्याकडून संदर्भिय
क्रेडीटकार्डच्या बाबतीत कोणतीही वसुली करु नये.
4. जाबदेणार यांनी तक्रारदार यांना नुकसान भरपाई
पोटी रक्कम रु. 10,000/- (रु. दहा हजार फक्त)
व तक्रारीचा खर्च रक्कम रु. 2,000/- (रु. दोन
हजार फक्त, आदेशाची प्रत प्राप्त झालेपासून एक
महिन्याच्या आत अदा करावी.
नुकसान भरपाईची रक्कम आदेशाची प्रत प्राप्त
झाल्यापासून एक मह्न्याच्या आत अदा न केलेस
तक्रारदार सदर रकमेवर द.सा.द.शे. 9% दराने रक्कम
मिळेपर्यंत व्याज मिळणेस पात्र आहेत.
5. आदेशाची प्रत उभय पक्षकारांना नि:शुल्क पाठविण्यात
यावी.