जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्यायमंच, धुळे.
ग्राहक तक्रार क्रमांक – ११२/२०१२
तक्रार दाखल दिनांक – २५/०७/२०१२
तक्रार निकाल दिनांक – ३०/०९/२०१३
श्री. शालिग्राम मल्हारी पाटील
श्री. मल्हारी तुळशीराम पाटील
उ.व. ७४, धंदाः- शेती,
रा.वाघाडी बु.ता. शिंदखेडा जि. धुळे ................ तक्रारदार
विरुध्द
स्टेट बॅंक ऑफ इंडीया
शाखा-बेटावद,
बेटावद ता. शिंदखेडा जि. धुळे ................. सामनेवाला
न्यायासन
(मा.अध्यक्षा – सौ.व्ही.व्ही. दाणी)
(मा.सदस्या – सौ.एस.एस. जैन)
(मा.सदस्य – श्री.एस.एस. जोशी)
उपस्थिती
(तक्रारदारा तर्फे – अॅड.एच.बी.अहिरराव)
(सामनेवाला तर्फे – अॅड.व्ही.बी.पाठक)
निकालपत्र
(दवाराः मा.सदस्या – सौ.एस.एस.जैन)
सामनेवाला यांनी तक्रारदारने कर्जाची संपूर्ण परतफेड करूनही त्यांना निलचा (निरंक) दाखला दिला नाही म्हणून तक्रारदारने सदरची तक्रार दाखल केली आहे.
१. तक्रारदार यांची थोडक्यात तक्रार अशी आहे की, तक्रारदार हे शेतकरी असल्याने त्यांनी सामनेवाला बॅंकेकडून शेतीसाठी पिक कर्ज घेतले होते त्या कर्जापोटी तक्रारदार यांचेकडे रक्कम रू.६२,१८७.८६/- इतकी रक्कम घेणे बाकी होती, तक्रारदार सामनेवाला बॅंकेत पैसे भरण्यासाठी गेले तेव्हा बॅंकेने रक्कम रू.७०,०००/- तक्रारदार कडे घेणे बाकी असल्याचे सांगीतले. त्याप्रमाणे तक्रारदारने बेटावद शाखेत असलेले खाते क्रं.११५८३०१६७०८ मध्ये दि.०७/०४/२०१२ रोजी रू.७०,०००/- कर्जापोटी भरले. तक्रारदारने पैसे भरल्याने त्यांचे खात्यात रक्कम रू.६२,१८७.८६/- ही थकीत रक्कम वजा जाता रू.६८१२.१४/- इतकी रककम शिल्लक होती.
२. तक्रारदार यांना त्यांचे खाते बंद करावयाचे असल्याने व ७/१२ उता-यावरील बोझा कमी करावयाचे असल्याने त्यांनी बॅंकेकडे विनंती केली असता, बॅंकेने तक्रारदारकडे रू.२०,०००/- ची मागणी केली. त्यामुळे तक्रारदारने दि.३०/०४/२०१२ पावेतोचा खाते उतारा बॅंकेडून घेतला असता, त्यात बॅंकेने वेळोवेळी डेबीट व इन्स्प्ेाक्शन चार्ज म्हणून रक्कम रू.५००/५०० तसेच रक्कम रू.२२००/- बेकायदेशीर आकारणी करून तक्रारदारकडे घेणे बाकी दाखविली आहे. तसेच कर्जाचा व्याज दर कमी असतांना जास्तीची व्याजाची आकारणी करून अधिकचे व्याज आकारले आहे.
३. तक्रारदार यांचे पुढे असे म्हणणे आहे की, तक्रारदार यांचे बॅंकेकडे दि.०७/०४/२०१२ रोजी रू.६८१२.८६/- घेणे होते ते खात्यातून काढण्यासाठी तक्रारादार गेला असता बॅंकेने नकार दिला. त्यामुळे तक्रारदारने दि.१५/०५/२०१२ रोजी अॅड. अहिरराव यांचे मार्फत नोटीस पाठवून घेणे असलेली रक्कम व ७/१२ उतारावरील बोझा कमी करण्यासाठी निलचा (निरंकचा) दाखला देणेबाबत मागणी केली. परंतु सामनेवाला यांनी अदयाप रक्कम दिली नाही, दाखलाही दिला नाही. तसेच नोटीसीस उत्तरही दिलेले नाही. अशाप्रकारे सामनेवाला यांनी तक्रारदारास सदोष सेवा पुरवली व व्यापारी अनुचित प्रथा अवलंबून तक्रारदारची फसवणूक केलेली आहे.
४. तक्रारदार यांनी सामनेवाला यांचेकडून तक्रारदारची घेणे असलेली रक्कम रू.६८१२.८६/- ही १८% व्याजासहित परत मिळावी, बॅंकेने ७/१२ उता-यावरील बोझा निल (निरंक) करण्याकरिता दाखला दयावा. तसेच मानसिक व शारिरिक त्रासापोटी नुकसान भरपाई रू.२५,०००/- ही १८% व्याजासह परत मिळावी व तक्रारीचा खर्च रू.१०,०००/- १८% व्याजासह देण्याचा आदेश व्हावा, अशी विनंती केली आहे.
५. तक्रारदार यांनी आपल्या म्हणण्याच्या पृष्टयार्थ नि.४ सोबत नि.४/१ वर खाते उतारा, नि.४/२ वर नोटीस प्रत, नि.४/३ वर खात्याच्या पासबुकची प्रत, नि.४/४ वर नोटीस पोहच पावती, नि.९ सोबत नि.९/१ वर शपथपत्र, नि.९/२ वर पासबुकची प्रत, नि.९/३ वर तक्रारी अर्ज इत्यादी कागदपत्रे दाखल केली आहे.
६. सामनेवाला यांनी आपला खुलासा नि.६ वर दाखल केला आहे. त्यात त्यांनी तक्रारदारने सामनेवाला यांचेवर खोटे व बिनबुडाचे, कपोलकल्पीत आरोप करून मे. मंचाचे सामनेवाला यांचेबद्दल मला कलुषित करण्याचा प्रयत्न केला आहे. तक्रारदारास कोणतीही सदोष सेवा दिलेली नाही अथवा अनुचित ग्राहक सेवा वगैरे अवलंब केलेला नाही. तक्रारदारने कर्ज घेतल्याची व कर्जाची मंजुर रक्कम व व्याजाचा ठरलेला दर हेतुतः नमूद करण्याचे टाळले आहे. त्यामुळे तक्रारदार स्वच्छ हाताने मंचाकडे न्याय मागणेसाठी आलेला नाही.
७. सामनेवाला यांचे पुढे असे म्हणणे आहे की, तक्रारदारने बॅंकेकडून दि.१०/०४/२००७ रोजी रक्कम रू.५०,०००/- इतके कर्ज ११.५०% व्याज दराप्रमाणे घेवून तसे दि.१०/०४/२००७ रोजी ‘अॅरेंजमेंट लेटर’ व ‘हायपोथिकेशन ऑफ डीड’ करून देवून पिक कर्ज फेड करण्याचे मान्य केले होते व आहे. तक्रारदार यांस बॅंकेचे वकिल अॅड.पाठक यांनी दि.२४/०९/२०११ रोजी नोटीस पाठवून थकीत कर्ज रू.६२,१८७.८६/- अधिक व्याज अधिक नोटिस खर्च अशी एकत्रित रकमेची मागणी केली होती. सदर नोटीस तक्रारदारास दि.२९/०९/२०११ रोजी मिळूनही उत्तर दिलेले नाही. उलट बॅंकेने कायदेशीर कारवाई करू नये म्हणून दि.०७/०४/२०१२ रोजी कर्जखात्याला रू.७०,०००/- स्वतःहून भरलेले आहे. त्यामुळे बॅंकेने नोटीस पाठवून थकीत कर्जाची रक्कम रू.६२,१८७.८६/- मागणी करीत असतांना, तक्रारदारास रू.७०,०००/- भरावयास सांगितले हे गैरकायदा, वस्तुस्थिती विरोधी, खोटे आहे. तक्रारदारचा मुलगा संजय पाटील यांचे विरूध्द सामनेवाला बॅंकेने थकीत कर्ज रकमेच्या वसुलीपोटी धुळे कोर्टात स्पे.मु.नं. १७७/१० हा दि.२८/१०/२०१० रोजी दाखल केला होता. त्याचा निकाल दि.०७/०७/२०११ रोजी झालेला असून सामनेवाला यांचा दावा मंजूर झालेला असल्याने संजय पाटील याचे विरूध्द रिकव्हरी प्रोसीडिंग रे.द. नं.२१/१२ शिंदखेडा कोर्टात सुरू असून, सदर प्रकरण आपसात मिटविणेसाठी तक्रारदार सामनेवाला यांचेवर नेहमी दडपण आणीत आहे. तसे करण्यास नकार दिल्याने तक्रारदारने सदरचा अर्ज दाखल केला आहे.
८. तक्रारदार यांचेकडे खाते बंद करण्यासाठी रू.२०,०००/- ची मागणी केली या बाबतचा कायदेशीर पुरावा तक्रार अर्जासोबत दाखल केलेला नाही. त्यामुळे सदरचा आरोप खोटा आहे. तक्रारदारचा खाते उतारा हा सामनेवाला यांचे नियमाप्रमाणे असून संगणकीय प्रणाली प्रमाणे करणेत आलेला आहे. पिक कर्ज घेतांना तक्रारदारने ‘अॅरेंजमेंट लेटर’ व ‘हायपोथिकेशन ऑफ डीड’ मध्ये व्याजाचा दर ११.५०% प्रमाणे देण्याचे कबूल केलेले होते व आहे. तसेच पिक कर्जाची रक्कम थकीत झाल्यास २% पिनल इंटरेस्ट देण्याचे कबूल केलेले होते व आहे. दि.१०/०४/२००७ ते दि.२४/०९/२०११ पर्यंत दिलेली नोटीस दि.२९/०९/२०११ ला स्विकारलेवर ही दि.०४/०५/२०१२ पर्यंत व्याजदराबाबत तक्रारदारने कुठलीही हरकत घेतलेली नाही. दि.२४/०९/२०११ रोजी सामनेवाला यांनी दिलेल्या नोटीसीप्रमाणे निघत असलेली घेणे तक्रारदार यांनी दिलेले नाही व व्याज ही देणेस नकार दिल्याने तक्रारदार यांनी सामनेवाला यांचेकडे केलेली मागणी नैसर्गिक न्यायतत्वाला धरून नसून बेकायदेशीर केलेली आहे. व्याजाचा घेणे असलेला उर्वरित भाग रक्कम रू..१९,८४१.८०/- इतका तक्रारदारकडे घेणे आहे त्यामुळे तक्रारदारने कर्जा संदर्भातल्या अॅग्रीमेंटस् मधील तरतुदीचा भंग केलेला आहे. तक्रारदारने दि.१०/०४/२००७ रोजी पिक कर्ज घेवून त्याची मुदतीत पतरफेड केलेली नाही व त्याचे नुतनीकरणही (रिन्युवल) केले नाही व तक्रार अर्ज दि.०४/०७/२०१२ रोजी म्हणजे तब्बल ५ वर्षांनी दाखल केलेला असल्याने त्यास मुदतीची बाधा येते. तक्रारदारने पिक कर्ज घेतल्यानंतर एकदाही ‘रिन्युवल केलेली नाही व आजही तक्रारदारकडे रू.१९,८४१.८०/- व्याजापोटी घेणे बाकी आहे, ते देणे दयावे लागु नये म्हणून तक्रारदारने सदरच्या खोटया अर्जादवारे बेकायदेशीर मागणी केलेली आहे. त्यामुळे तक्रारदारचा तक्रार अर्ज खर्चासह फेटाळण्यात यावा. सामनेवाला यांचा खर्च देण्याबाबत तक्रारदारास आदेश व्हावा असे नमुद केले आहे.
९. सामनेवाला यांनी आपले म्हणण्याच्या पृष्टयार्थ नि.८ सोबत नि.८/१ वर तक्रारदारचा कर्जाचा अर्ज, नि.८/२ वर ‘अॅरेंजमेंट लेटर’, नि.८/३ वर ‘हायपोथिकेशन ऑफ डीड’ नि.८/४ वर नोटीसीची प्रत, नि.८/५ वर पोहच पावती, नि.८/६ वर तक्रारदारचा खाते उतारा, नि.८/७ वर बॅंकेचे परिपत्रक, नि.८/८ वर दरखास्त प्रकारणाची सही शिक्क्याची नक्कल तसेच नि.१० सोबत नि.१०/१ वर बॅंकेची नोटीस, नि.१०/२, नि.१०/३ व नि.१०/४ वर खाते उतारा. तसेच नि.११ सोबत नि.११/१ वर कर्जखात्याची Long enquiry ची प्रत, नि.११/२ वर Draft enquiry ची प्रत, नि.११/३ वर बॅंकेने तक्रारदारास थकीत कर्जाबाबत दिलेल्या नोटीसीचे परत आलेले पाकीट व नि.१२ सोबत सप्टेंबर महिनाअखेर होणारी Account closure enquiry ची प्रत व Draft enquiry ची प्रत, इ. कागदपत्रे दाखल केलेले आहेत.
१०. तक्रारदार यांची तक्रार, सामनेवाला यांचा खुलासा व युक्तिवाद ऐकल्यानंतर तसेच दाखल कागदपत्रे पाहता आमच्या समोर निष्कर्षासाठी खालील मुद्दे उपस्थित होतात व त्याची उत्तरे आम्ही सकारण खालीलप्रमाणे देत आहोत.
मुद्दे निष्कर्ष
१. सामनेवाला यांनी तक्रारदार यास
दयावयाच्या सेवेत त्रृटी केली आहे काय ? नाही
२. आदेश काय? खालीलप्रमाणे
विवेचन
११. मुद्दा क्र.१- तक्रारदार यांची मुख्य तक्रार अशी आहे की, त्यांनी सामनेवाला बॅंकेकडे शेतीसाठी पिक कर्ज घेतले होते. कर्जापोटी तक्रारदार यांचेकडे रक्कम रू.६२,१८७.८६/- इतकी रककम मात्र घेणे बाकी होती. जेव्हा तक्रारदार सामनेवाला बॅंकेत पैसे भरणेसाठी गेले, तेव्हा बॅंकेने तक्रारदार यांना रक्कम रू.७०,०००/- घेणे बाकी असल्याचे सांगितले. त्याप्रमाणे तक्रारदार यांनी दि.०७/०४/२०१२ रोजी थकीत कर्जापोटी रक्कम रू.७०,०००/- भरलेले आहे. त्यावेळी तक्रारदार यांचे खात्यात रककम रू.६८१२.१४/- इतकी उर्वरीत रक्कम शिल्लक होती. तक्रारदार यांना बॅंकेचे खाते बंद करावयाचे असल्याने व ७/१२ उता-यावरील बोझा कमी करावयाचे असल्याने त्यांनी सामनेवाला बॅंकेकडे विनंती केली असता, बॅंकेने तक्रारदारकडे खाते बंद करणेसाठी रक्कम रू.२०,०००/- ची मागणी केली. त्यामुळे तक्रारदारने दि.३०/०४/२०१२ पावेतोचा खात्याचा उतारा सामनेवाला बॅंकेकडून घेतला असता त्यात बेकायदेशीर आकारणी करून तक्रारदारकडे घेणे बाकी दाखविली असल्याने दिसून आले. तक्रारदार हे खात्यातून उर्वरित रक्कम रू.६८१२.८६/- काढण्यासाठी गेले असता सामनेवाला यांनी नकार दिला म्हणून तक्रारदारने दि.१५/०५/२०१२ रोजी वकिलांमार्फत नोटीस पाठवून घेणे असलेली रक्कम व ७/१२ उता-यावरील बोझा कमी करण्यासाठी निरंकचा दाखला देणेबाबत मागणी केली. परंतू सामनेवाला यांनी अदयाप रक्कम न देवून दाखलाही न देवून सेवेत त्रृटी केली आहे.
१२. याबाबत सामनेवाला यांनी आपल्या खुलाश्यात तक्रारदारने दि.१०/०४/२००७ रोजी कर्ज ठरलेल्या व्याजदराप्रमाणे घेवून पिक कर्ज फेड करण्याचे मान्य केलेले होते. त्याबद्दल ‘अॅरेंजमेंट लेटर’ व ‘हायपोथिकेशन ऑफ डीड’ करून दिलेले होत. तसेच तक्रारदारने पिक कर्ज घेतल्यानंतर त्याने ते प्रत्येक वर्षी रिन्युवल करावयास हवे होते. ते तक्रारदारने एकदाही रिन्युवल केलेले नाही व त्याची परतफेडही केलेली नाही. त्यामुळे सामनेवाला बॅंकेने त्यांचे वकिलांमार्फत नोटीस पाठवून थकित कर्ज अधिक लागु व्याज अधिक नोटीस खर्च अशी एकत्रित रकमेची मागणी केलेली होती. सदर नोटीस मिळूनही तक्रारदारने कुठलेही उत्तर दिलेले नाही. तक्रारदार ‘हायपोथिकेशन ऑफ डीड’ व ‘अॅरेंजमेंट लेटर’ (तजबीज पत्रक) मध्ये व्याजाचा दर ११.५०% देण्याचे कबूल केलेल आहे. तसेच पिक कर्जाची रक्कम थकीत झाल्यास २% पिनल इंटरेस्ट देण्याचे ही कुबूल केलेले होते व आहे. सदरचे लेटर (पत्र) व अॅग्रीमेंट (करारनामा) सामनेवाला यांनी खुलाश्यासोबत दाखल केलेले आहे. आम्ही त्या कागदपत्रांचे बारकाईने अवलोकन केले आहे. त्यात नि.८/१ शेती विषयक कर्जाचे नियम व अटी यामधील अट क्रं.१७ मध्ये आपल्या खात्यावर व्याज द.सा.द.शे. ११.५०% या दराने वार्षिक बॅंकेच्या नियमाने आकारल्या जाईल. व्याजाचा दर प्रसंगानुरूप कमी जास्त करण्याचा अधिकार बॅंकेला राहील. असे नमूद आहे. तसेच अट क्रं. १८ मध्ये येणे असलेला हप्ता योग्य वेळी न भरल्यास त्या दिवसापासून पैसे भरेपर्यंत २% या दराने (पेनल) व्याज आकारला जाईल. असे नमुद आहे. नि.८/२ वरील ‘लेटर ऑफ अॅरेंजमेंट’ (तजबीज पत्रक) दाखल आहे. त्यातील अट (F) मध्येही व्याजदर ११.५०% आणि कर्ज थकीत झाल्यास २% पिनल व्याजाची आकारली जाईल असे नमूद आहे. नि.८/३ वरील ‘हायपोथिकेशन ऑफ डीड’ मध्येही सदर बाब नमूद आहे. यावरील दोन्ही कागदपत्रांवर तक्रारदारची इंग्रजीत सही आहे. यावरून त्याला व्याजदराची कल्पना होती हे दिसून येते. तसेच ‘अॅरेंजमेंट लेटर’ व ‘हायपोथिकेशन ऑफ डीड’ मध्ये Event of default (थकबाकीदार घोषणेनंतर) मधील अटींनुसार या दोन्ही कागदपत्रातील कोणत्याही अटीं व शर्तींचा भंग झाल्यास कर्जदारावर कर्ज वसुली करिता कायदेशीर कारवाई केली जाईल असे नमुद आहे. सामनेवाला यांनी दाखल केलेल्या कागदपत्रांवरून त्यांनी तक्रारदारास कर्ज भरण्यासंदर्भात वेळोवेळी नोटीसा पाठविल्याचे दिसून येत आहे व दि.१९/०८/२०१३ रोजी दाखल केलेल्या खाते उता-यांवरून तक्रारदारकडे कर्जापोटीची रक्कम बाकी असल्याचे दिसून येत आहे. यावरून सामनेवाला यांनी तक्रारदारास नील (निरंक) चा दाखला न देवून कोणत्याही प्रकारची सेवेत त्रुटी केलेली नाही या मतास आम्ही आलो आहोत. म्हणून मुद्दा क्र.१ चे उत्तर नकारार्थी देत आहोत.
१३. मुद्दा क्र.२- मुदृा क्र.१ चे उत्तर जरी नकारार्थी असले तरीही शेतकरी हिताचा व्यापक दृष्टीने विचार करता तक्रारदार यांनी सप्टेंबर महिना अखेर नियमानुसार होणारी रक्कम रू.२७,९८२.५७/- ही सामनेवाला बॅंकेत या आदेशाच्या दिनांकापासून १५ दिवसात भरावे व बॅंकेने रक्कम भरून घेवून तक्रारदार यांना पुढील १५ दिवसांत निरंकचा दाखला दयावा असे आम्हास वाटते. वरील सर्व विवेचनावरून आम्ही खालीलप्रमाणे आदेश देत आहोत.
आ दे श
१. तक्रारदार यांनी सप्टेंबर महिना अखेर नियमानुसार होणारी रक्कम रुपये रू.२७,९८२.५७/-हीसामनेवाला स्टेट बॅंक ऑफ इंडिया यांचेकडे या आदेशाच्या दिनांकापासून १५ दिवसात भरावी.
२. आदेश क्रं.१ नुसार रक्कम भरून झालेनंतर सामनेवाला स्टेट बॅंक ऑफ इंडिया यांनी तक्रारदार यास पुढील १५ दिवसाचे आत निरंकचा दाखला दयावा.
३. तक्रारदार व सामनेवाला यांनी आपआपला खर्च सोसावा.
धुळे.
दि.३०/०९/२०१३.
(श्री.एस.एस. जोशी) (सौ.एस.एस. जैन) (सौ.व्ही.व्ही. दाणी)
सदस्य सदस्या अध्यक्षा
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्यायमंच, धुळे.