(मंचाचा निर्णय: श्रीमती गीता बडवाईक- सदस्यायांचे आदेशांन्वये)
-// आ दे श //-
(पारित दिनांक : 10/12/2012)
1. तक्रारकर्त्याचा पेंशन खाते विरुध्द पक्षाचे बँकेत सन 2001 पासुन खाते क्र.11140045852 आहे. दि. 20.02.2010 ला तक्रारकर्त्याच्या जावयाने रु.25,000/- तक्रारकर्त्याच्या खात्यात जमा केले ते काढण्यासाठी दि.25.02.2010 ला तक्रारकर्ता बँकेत गेला असता रु.25,000/- आहरण पावती बँक खिडकी क्र.3 वरील कर्मचारी विरुध्द पक्ष क्र.2 यांना दिले. विरुध्द पक्ष क्र.2 नी तक्रारकर्त्याला सांगितले की, त्यांच्या खात्यात 20,000/- आलेले आहे, ती रक्कम काढायची असल्यास दुसरी आहरण पावती भरुन द्यावी, त्याप्रमाणे तक्रारकर्त्याने दुसरी आहरण पावती रु.20,000/- भरुन दिली. विरुध्द पक्ष क्र.2 ने रु.20,000/- (100 X 200) याप्रमाणे दिले. तक्रारकर्त्याने रु.25,000/- ची पावती परत मागितली. परंतु विरुध्द पक्ष क्र.2 ने ती परत न करता तुकडे तुकडे करुन टाकले. तक्रारकर्त्याने विरुध्द पक्ष क्र.2 ला खाते पुस्तीकेत नोंद करुन मागितली असता प्रिंटर बंद आहे या कारणास्तव नोंद करुन दिली नाही. दि. 3 मार्च, व 7 मार्च, 2010 रोजी तक्रारकर्ता विरुध्द पक्ष बँकेत गेले व विरुध्द पक्ष क्र.2 ला पासबुकमध्ये नोंद करण्याची विनंती केली, परंतु विरुध्द पक्ष क्र.2 ने नोंद करुन दिली नाही दि.3 मे, 2010 ला विरुध्द पक्ष क्र.2 ने पासबुकमध्ये फक्त जमा रकमेची नोंद केली. परंतु रक्क्म काढण्याची नोंद केली नाही, त्यामुळे तक्रारकर्त्याने विरुध्द पक्ष क्र.1 प्रबंधकाकडे विरुध्द पक्ष क्र.2 च्या विरुध्द तक्रार केली. विरुध्द पक्ष क्र.1 च्या तपासणी अधिका-यांनी तक्रारकर्त्याच्या तक्रारीची चौकशी करुन तक्रार बंद केली.
2. तक्रारकर्त्याचे म्हणणे आहे की, विरुध्द पक्षांनी त्यांना रु.5,000/- कमी देऊनही ती रक्क्म त्यांच्या बँकखात्यातुन वळती केली आहे ही विरुध्द पक्षांची कृती त्यांच्या सेवेतील त्रुटी आहे. त्यामुळे तक्रारकर्त्याने विरुध्द पक्षाच्या विरुध्द सदरची तक्रार मंचात दाखल केली.
3. तक्रारकर्त्याने तक्रारीमध्ये विरुध्द पक्षांनी अनुचित व्यापार प्रणालीचा अवलंब केला हे घोषीत करावे, रु.5,000/- 24 टक्के व्याजासह परत करावे तसेच शारीरिक, मानसिक नुकसान भरपाई व तक्रारीच्या खर्चाची मागणी केली आहे.
तक्रारकर्त्याने तक्रारीच्या पृष्ठयर्थ दस्तावेज दाखल करण्याच्या यादी प्रमाणे एकूण 7 दस्त तक्रारीच्या पृष्ठ क्र. 8 वर दाखल केले.
मंचाची नोटीस विरुध्द पक्षाला प्राप्त झाल्यावर, त्यांनी लेखी उत्तर दाखल केले. विरुध्द पक्षांचे लेखी उत्तर खालिल प्रमाणे...
4. विरुध्द पक्ष क्र.1 ने लेखी उत्तर दस्तावेजांसह दाखल केले, त्यांचे म्हणणे आहे की, त्यांनी आपल्या ग्राहकांना नेहमीच सुव्यवस्थित सेवा प्रदान केली आहे. तक्रारकर्त्याच्या तक्रारीनंतर विरुध्द पक्ष क्र.1 यांनी पूर्णपणे आंतरिक मौखिक व दस्तावेजांची चौकशी केली त्याअन्वये बँकेने तक्रारकर्त्याची रु.25,000/- ची आहरण पावती वटवून 100 रुपयांच्या 200 व 50 रुपयांच्या 100 नोटा असे एकूण रु.25,000/- चे भुगतान केले आहे. आहरण पावतीवर तक्रारकर्त्याची सही व नोटांची संख्या नमुद आहे. तक्रारकर्त्याच्या पासबुकात दि.25.02.2010 ला रु.25,000/- काढल्याची स्पष्ट नोंद आहे. तक्रारकर्त्याने खोटी, दिशाभुल करणारी तक्रार दाखल केल्यामुळे सदर तक्रार खर्चासह खारिज करावी व त्यावर दंडात्मक कार्यवाही करण्याची विनंती विरुध्द पक्ष क्र.1 ने केली आहे.
5. विरुध्द पक्ष क्र.2 चे म्हणणे आहे की. दि.25.02.2010 रोजी तकारकर्त्याला रु.25,000/- चे आहरण पावती देऊन खिडकी क्र.3 वर आले, त्याअन्वये त्यांना रु.25,000/- चे भुगतान (100 x 200 व 50 x 100) याप्रमाणे भरण्यांत आले व आहरण पावतीवर पैसे प्राप्त झाल्याबाबत स्वाक्षरी घेतली. तक्रारकर्त्याने पैसे प्राप्त झाल्यावर ते घेतले व समाधान झाल्यावर खिडकी सोडली. दि.03.03.2010, 07.04.2010 व 04.05.2010 ला त्यांनी बँकेकडून पासबुकावर नोंदी करुन घेतल्या, त्यानंतर तक्रारकर्त्याने तकार केली आहे. तक्रारकर्त्याने खोटी तक्रार दाखल केल्यामुळे सदर तक्रार खर्चासहीत खारिज करण्याची विनंती केली.
6. तक्रारकर्त्याची तक्रार, दस्तावेज, लेखी युक्तिवाद तसेच दोन्ही विरुध्द पक्षांचे लेखी उत्तर, दस्तावेज, लेखी युक्तिवाद यांचे मंचाने अवलोकन केले. तसेच दोन्ही पक्षांच्या वकीलांचा युक्तीवाद ऐकल्यानंतर मंचासमोर पुढील प्रश्न उपस्थित होतो. तक्रारकर्त्याची तक्रार मान्य होण्यास पात्र आहे का ?
- // कारणमिमांसा // -
7. तक्रारकर्ता हा विरुध्द पक्ष कं.1 बँकेचा ग्राहक असुन विरुध्द पक्ष क्र.2 हा विरुध्द पक्ष क्र.1 मधे रोखपाल या पदावर कार्यरत होता, ही बाब दोन्ही पक्षांना मान्य आहे. तक्रारकर्त्याने पासबुकची प्रत दाखल केली आहे, तसेच मुळ पासबुक तपासणीसाठी मंचाला दिले त्यावरुन स्पष्ट होते की, तक्रारकर्त्याच्या पासबुकात त्यांनी विरुध्द पक्ष क्र.1 बँकेशी केलेल्या व्यवहाराबाबतच्या नोंदी केलेल्या आहेत. दि.25.02.2010 नंतर तक्रारकर्त्याने दि.03.03.2010, दि.07.04.2010 व दि.04.05.2010 ला बँकेतुन रकमेचे आहरण केलेले आहे. दि.25.02.2010 च्या आहरणाबाबत कमी रक्कम प्राप्त झाल्याची तक्रार तक्रारकर्त्याने दि.28.05.2010 ला विरुध्द पक्ष क्र.1 कडे केली आहे, याचाच अर्थ तक्रारकर्त्याने तब्बल 3 महिन्यानंतर तक्रार दाखल केली आहे. तक्रारकर्त्याचे म्हणणे आहे की, त्यांना दि.25.02.2010 च्या व्यवहाराबाबत विरुध्द पक्ष क्र.2 ने प्रिंटर बंद आहे या सबबीखाली नोंद करुन दिली नाही, हे तक्रारकर्त्याचे म्हणणे मंचास रास्त वाटत नाही. विरुध्द पक्ष क्र.1 बँकेच्या नागपूर शहरात अनेक शाखा आहेत. तक्रारकर्त्याला विरुध्द पक्ष क्र.2 च्या व्यवहाराबाबत संशय होता, तर त्याने विरुध्द पक्ष क्र.1 च्या दुस-या शाखेमधे जाऊन पासबुकामधे त्वरीत नोंदी करावयास पाहीजे होत्या. किंवा ATM चा वापर करुन Mini Statement काढून Balance ची तपासणी करावयास पाहीजे होती. परंतु तक्रारकर्ता तब्बल तीन महिने शांत राहील्यानंतर त्याने विरुध्द पक्ष क्र.2 च्या विरोधात दि.25.02.2010 ला कमी रक्कम दिल्याबाबत तक्रार दाखल केली आहे. तक्रारकर्त्याने विरुध्द पक्षाच्या सेवेतील त्रुटी सिध्द केली नाही, त्यामुळे तक्रारकर्त्याच्या तक्रारीत मंचाला तथ्य वाटत नाही. तक्रारकर्त्याच्या तक्रारीवर विरुध्द पक्ष क्र.1 ने आवश्यक ती चौकशी करुन चौकशी अहवाल तक्रारकर्त्यास कळविला असल्यामुळे विरुध्द पक्ष क्र.1 च्या सेवेत त्रुटी नाही, असे मंचाचे स्पष्ट मत आहे. विरुध्द पक्ष क्र.2 हा विरुध्द पक्ष क्र.1 चा कर्मचारी असुन त्यांचे विरुध्द उशीरा कमी रक्कम प्राप्त झाल्याबाबत तक्रारकर्त्याने दिेलेले कारण मंचाला समर्थनीय वाटत नाही.
सबब आदेश.
-// अं ति म आ दे श //-
1. तक्रारकर्त्याची तक्रार खर्चासह खारिज करण्यांत येते.
1.
(अल्का पटेल) (रोहीणी कुंडले) (गीता बडवाईक)
सदस्या अध्यक्षा सदस्या
-असहमतीचा आदेश-
(पारित दिनांक – 11.12.2012)
श्रीमती रोहीणी कुंडले, अध्यक्षा यांचे आदेशाप्रमाणे.
प्रकरण क्र. 709/11 मध्ये दि.10.12.2012 रोजी सदस्या गीता बडवाईक यांनी आदेश पारित केला. त्यामध्ये अंतिम आदेशामध्ये तक्रार खर्चासह खारीज करण्यात येते असे नमूद आहे. परंतू खर्च कोणाला कोणी द्यायचा याबद्दल तपशिल नाही. या मर्यादित मुद्याच्या अनूषंगाने मी अध्यक्षा, आदेशातील या कलमाशी असहमत आहे.
हा असहमतीचा आदेश मी हे प्रकरण आजच्या बोर्डवर घेऊन 10-30 वाजता पारित करीत आहे. माझ्या मते
1) तक्रारकर्त्याची तक्रार खारीज.
2) खर्चाबद्दल कोणतेही आदेश नाही.
असा अंतिम आदेश असायला पाहिजे. या मर्यादित मुद्यावर असहमतीचा आदेश दि.11.12.2012 रोजी पारित करण्यात येत आहे.
(रोहीणी कुंडले)
अध्यक्षा
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच,
नागपूर.